गद्रे अँड देव असोसिएट श्रीरंग गद्रेची सीए फर्म. पार्टनर देव व्हीआरएस घेऊन रिटायर होऊन मुलाकडे दिल्लीला राहायला गेल्यावर पार्टनरशिप डीझोलव्ह होऊन श्रीरंग गद्रे एकटाच मालक होता आता. वय पंचावन्न. त्याची बायको गेल्याच वर्षी कॅन्सरने गेली. मुलगा अमेरिकेत शिकून तिथेच नोकरी करण्याच्या विचारात. श्रीरंग एकटाच होता आता. पैसा भरपूर होता. प्रभात रोड वर तीन बेडरूम चा आलिशान फ्लॅट मिळाला होता गेल्याच वर्षी इमारत रीडेव्हलप झाल्यावर. त्याची बायको स्वाती डिसेंबर मधे गेली आणि जानेवारीत पझेशन मिळालं. स्वाती नवीन जागा बघू शकली नाही! आता श्रीरंग प्रॅक्टिस वेळ घालवायला चालवतो. बांधलेले काही मोठे क्लायंट आहेत. त्यांचं बिलिंग जोरदार होतं. बाकी आर्टिकल करायला पोर येतात त्यांना ज्ञान देतो. संध्याकाळी क्लब मध्ये टेनिस खेळून गँग बरोबर दोन ड्रिंक झाली की घरी येऊन जेऊन कुमार गंधर्व ऐकत झोपी जातो. सकाळी वॉक. आणि ऑफिस. वर्षातून दोन फॉरेन हॉलिडे गँग बरोबर. लाईफ सेट होत त्याचं.

तीन महिन्यांपूर्वी मध्या परांजपे चा फोन आला. मध्या म्हणजे ह्याचा शाळेतला मित्र. आता दीनानाथ मध्ये ओंकोलोजीचा एच ओ डी आहे. श्रीरंग च्या बायकोची सगळी ट्रीटमेंट त्यानेच केली. शेवटी म्हणाला “जाऊ दे स्वाती ला. केमो नाही घेऊ शकणार ती आता.” त्या नंतर काही दिवसात स्वाती घरीच गेली. पण रंग्या म्हणजे श्रीरंग, मध्या, ऍडव्होकेट पुरुषोत्तम म्हणजे उत्तम, दिग्या म्हणजे पटवर्धन बिल्डर्स कंपनीचा पार्टनर दिगंबर पटवर्धन ज्याने श्रीरंग ची बिल्डिंग री डेव्हलप केली असे सगळे शाळेपासून गां# दोस्त. तर तीन महिन्यापूर्वी मध्याचा फोन आला.

श्रीरंग – बोल रे.

मध्या – एक काम आहे.

श्रीरंग – बोल की. वहिनीला संध्याकाळी खोटं सांगायचं आहे की तू माझ्या बरोबर येणार आहेस असं?

मध्या – नाही रे बाबा.

श्रीरंग – मग आज रमीचा डाव वहिनीला सांगून टाकणार का?

मध्या – ती घरी नाहीये आज संध्याकाळी. आम्ही घरीच बसणार आहोत.

श्रीरंग – का रे? कुठे जाते आहे? क्लब मधून मी पण येतो. तुझ्या घरीच उघडतो लास्ट मंथ मध्ये ड्युटी फ्री मधून आणलेली ग्लेन फिडिक.

मध्या – नको. तिला वास फार येतात. तू नुसता ये खेळ बघायला.

श्रीरंग – ओके. ठेऊ मग?

मध्या – मी काय तुला रमी बघायचं आमंत्रण द्यायला फोन केला अस वाटतंय का? ठेवतोस काय?

श्रीरंग – अरे हो. काय काम आहे सांग.

मध्या – अरे हीची एक मामे बहीण आहे. औरंगाबाद ला असते. हिचा मामा महिन्याभरापूर्वी गेला. आता अपूर्वा एकटीच असते.

श्रीरंग – अपूर्वा कोण?

मध्या – हे असे चु#टिक प्रश्न विचारतोस ना म्हणून आम्हाला शंका येते की तुला सीए कोणी केला अशी. अरे बाबा मामाच्या मुलीबद्दल बोलतोय ना? मग अपूर्वा कोण असेल? हिच्या काकाची आजी असेल का?

श्रीरंग – आलं लक्षात. अपूर्वा वहिनीच्या मामाची मुलगी. पुढे बोल.

मध्या – हिने अपूर्वाला पुण्याला आमच्या घरी बोलावली आहे.

श्रीरंग – सहकुटुंब की एकटीलाच?

मध्या – रंगा तू नक्की सेटिंग लावून सीए झाला आहेस. किती बिनडोक प्रश्न विचारतोस. अरे बाबा तिचं कोणी नाहीये. हीची मामी अपूर्वा झाली तेव्हाच गेली. मग अपूर्वा ने मामाला म्हातारपणी कोण बघणार म्हणून लग्न केलं नाही. आता मामा गेल्यावर एकटी आहे. पैशांची ददात नाहीये. घराचा वरचा मजला स्टुडंट्स ना भाड्यावर देतात. त्याचे भरपूर पैसे येतात.

श्रीरंग – मग तिचे रिटर्न फाईल करायचे आहेत का? कॅश व्यवहार आहेत का?

मध्या – अरे नाही रे बाबा. ती पुण्यात आल्यावर तिला दिवसभर घरी बसवू का? आमची ही क्लिनिकला जाणार. मी हॉस्पिटल मध्ये. अपूर्वाला काहीतरी उद्योग नको का द्यायला? ती बीकॉम आहे. तुझ्या ऑफिसात पाठवू का? पगार वगैरे तू ठरव. ते तिचा इंटरव्ह्यू घेऊन ठरव. पाठवू का?

श्रीरंग – माझ्याकडे?

मध्या – मग माझ्या बरोबर ओ टी मध्ये नेऊ का अप्रन घालून? माणूस कापल्यावर बघून तिथेच हार्ट फेल होईल तिचा. पाठवू की नको सांग.

श्रीरंग – पाठव बाबा. कधी पाठवतोस?

मध्या – परवा. बुधवारी. किती वाजता पाठवू सांग?

श्रीरंग – दुपारी तीन वाजता पाठव. सकाळी माझी मीटिंग आहे हिंजवडी ला.

मध्या – बाय…

श्रीरंग – बाय.

मंगळवार धावपळीत गेला. बुधवारी श्रीरंग हिंजवडी ला मीटिंग साठी गेला. क्लायंट च्या सी एफ ओ ची बंगलोर पुणे फ्लाईट delay झाली. मग श्रीरंग ने तिथेच सी ई ओ बरोबर लंच घेतला. त्यांचा सी एफ ओ फेज थ्री मधील त्या ऑफिसात दोन वाजता पोहोचला. त्या नंतर मीटिंग संपायला साडेतीन झाले. श्रीरंग ला परतीच्या रस्त्यावर ट्रॅफिक लागला. घरी पोहोचायला सहा वाजले. गाडीतून उतरत गाडी लॉक करत त्याने ऑफिस बॉय विजयला ऑफिस बंद करून चावी घरी द्यायला सांगितली. तेव्हा विजय म्हणाला की एक मॅडम बराच वेळ वाट बघत आहेत. ते ऐकून श्रीरंग ला त्याने अपूर्वा ला बोलावली होती ते आठवलं. तो म्हणाला “त्यांना सांग मी पाच मिनिटात येतोय.” त्याने ड्रायव्हर ला पार्क केलेली गाडी ऑफिसमधे घ्यायला सांगितली.

श्रीरंग ऑफिस मध्ये आला. रिसेप्शन एरिया मध्ये अपूर्वा बसली होती. जेमतेम पंचेचाळीस ते पन्नास असेल. पण तितकी देखील न वाटणारी. आरपार रोखून बघणारी. नाकी डोळी नीटस, मापात असलेली. तिला पाहून श्रीरंग म्हणाला –

श्रीरंग – सॉरी हा अपूर्वा. मीटिंग delay झाली आणि मग ट्रॅफिक मध्ये अडकलो.

अपूर्वा – नो प्रोब्लेम.

श्रीरंग – ये ना. केबिन मध्ये ये. विजय दोन चहा दे मस्त.

अपूर्वा – मला नको. माझा तीन कप झालाय ऑलरेडी. विजय मस्त चहा बनवतो. तुम्ही घ्या.

श्रीरंग ला जरा ओशाळ वाटलं.

श्रीरंग – oh is it? मग कॉफी घे. विजय कॉफी तर अप्रतिम बनवतो. विजय दोन अप्रतिम कॉफी दे.

दोघे केबिन मध्ये येऊन बसले.

श्रीरंग – सॉरी परत एकदा. माझी ग्लोब इन्फोटेक बरोबर मीटिंग होती. Quarterly result फायनल करायचा होता.

अपूर्वा – एक विचारू?

श्रीरंग – विचार ना.

अपूर्वा – ह्या क्वार्टर मध्ये त्यांचं land sale चं डील झालं आहे का? आणि ते रिझल्ट मध्ये रिफ्लेक्ट करणार आहात का?

श्रीरंग ने चमकून तिच्याकडे पाहिलं. औरंगाबाद मध्ये असलेल्या बाई ला गलोब इन्फोटेक च्या land deal ची माहिती असलेली पाहून तो उडाला.

श्रीरंग – तुला काय माहित त्या बद्दल?

अपूर्वा – मी ओरिजनल शेयर होल्डर आहे. माझे बाबा शेअर्स मध्ये invest करायचे. मला माहिती सांगायचे. मग मलाही इंटरेस्ट निर्माण झाला. ग्लोब इन्फोटेक चे माझ्याकडे तीन हजार शेयर आहेत. त्यांच्या बॅलन्स शीटवर तुमची सही बघते मी. त्यांचे सी ई ओ वेंकटेश ह्यांनी त्यांच्या con call मध्ये land deal चा ओझरता उल्लेख केला होता. सो मी विचारलं.

अपूर्वा ला असलेली माहिती, इंटरेस्ट पाहून श्रीरंग इंप्रेस झाला होता. ब्युटी विथ ब्रेन असलेल्या अपूर्वा ला भेटून त्याला आनंद झाला होता. इतक्यात विजय कॉफी घेऊन आला. कॉफीचा घोट घेत श्रीरंग म्हणाला –

श्रीरंग – सॉरी. मी ती माहिती देऊ शकत नाही. बिझनेस चे एथिक्स असतात.

अपूर्वा – नक्कीच. मी सहज विचारलं.

श्रीरंग – मला मध्या…म्हणजे मधुकर ने तुझ्या बद्दल सांगितल आहे. Sorry to hear about your father.

अपूर्वा – हो. ते माझा आदर्श होते.

श्रीरंग – I am sure की त्यांना आदर्श मानणाऱ्या तुझ्या सारखेच ते देखील खूप sharp आणि हुशार होते.

अपूर्वा – Yes. ते हुशार होतेच.

श्रीरंग – ठीक आहे. Good to meet you. उद्यापासून कामावर ये. काम बघ. तुला काय करता येईल ते बघ. मग पगाराच बोलू. चालेल ना?

अपूर्वा – Perfect. Thank you sir.

श्रीरंग – तू मधुकर ची मेहुणी आहेस. मला श्रीरंग म्हण. सर नको.

अपूर्वा – नाही सर. मी इथे काम करायला येणार आहे. मधु भवोजिंची मेहुणी म्हणून नाही. मी तुम्हाला सर म्हणेन. बाय. गुड नाईट सर.

अपूर्वा ने शेक hand केला आणि ती गेली. श्रीरंगला स्वतःला लक्षात येत नव्हतं की त्याच्या मनात नक्की काय सुरू आहे.

क्रमशः (©मंदार जोग)व्हालेंटाईन डे…भाग २

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!