मराठी रोमँटिक कथा - ही वाट दूर जाते भाग ९

ही वाट दूर जाते भाग 1: प्रवासाची सुरुवात | मराठी प्रेमकथा

ही वाट दूर जाते भाग 1: प्रवासाची सुरुवात | मराठी प्रेमकथा

फर्स्ट क्लास पोस्ट ग्रॅज्युएट, दिसायला उजवी, एकुलती एक मुलगी अश्विनी अठ्ठावीस वर्षांची झाली. तीन वर्ष अनेक स्थळे बघूनही अजून तिचं लग्न जमत नसल्याने गोपाळराव आणि मंजुषाकाकू, म्हणजे तिचे आईवडील जरा काळजीत होते. तिलाही आईवडिलांच्या काळजीची काळजी होती. सर्व विवाह संस्था, वेबसाइटवर अश्विनीचे प्रोफाईल झळकत होते. अनेक कांदेपोहे झडत होते. पण काहीतरी कुठेतरी अडत होते. ग्रॅज्युएशन नंतर लगेच दोनाचे चार करायचे ह्या विचारामुळे गोपाळरावांनी तिला धड नोकरीही करू दिली नाही. मग अनेक मध्यमवर्गीय मुलींसारखे मुलगा शोधायच्या प्रोसेसमध्ये बारीक सारीक डिप्लोमा आणि एम ए पूर्ण झालं. पण मुलगा मिळाला नाही. मैत्रिणींची लग्न झाली. काहींना मुलं झाली. त्यांच्या रोमँटिक कथा ऐकून अश्विनीच्या मनात आणि शरीरात कालवाकालव होत असे. काही मुलांनी गळ टाकले पण होते. परंतु मध्यमवर्गीय संस्कार आईवडिलांचा धाक आणि लग्नाआधी “तसलं” काही केल्यास भलतंच होऊन बसेल ह्या भीतीने अश्विनीला त्या प्रलोभनांपासून दूर ठेवले.

अश्विनी टाईमपास म्हणून एका मैत्रिणीच्या ब्युटिकमध्ये संध्याकाळी जात असे. मैत्रीण चार पैसेही देई. पण पैशापेक्षा वेळ घालवणे आणि रोज अंगावर येणारी संध्याकाळ, आईवडिलांचे चिंताग्रस्त चेहरे ह्यातून सुटका हे नोकरी करायचे दोन मुख्य हेतू होते. ह्याच रुटीनमध्ये अनेक महिने गेले. आताशा आईवडीलही लग्नाचा अप्रिय विषय शक्यतो टाळत. कारण बोलून लग्न होत नाही पण सर्वांनाच मनस्ताप होतो हे त्यांच्याही लक्षात आले होते.

अश्याच एका उदास संध्याकाळी मंजुषाकाकू देवासमोर निरांजन लावत होत्या. इतक्यात गोपाळरावांचा फोन खणखणला. फोन त्यांच्या चुलत बहिणीचा होता.

बहीण- अरे गोपाळ आनंदाची बातमी आहे.

गोपाळराव- काय झालं?

बहीण- अश्विनीसाठी एक स्थळ आहे.

गोपाळराव- (हल्ली त्यांनी अश्या बातम्या ऐकून आनंदी होणे सोडून दिले होते. त्यांनी शांतपणे विचारले) कोण आहे मुलगा?

बहीण- अरे आमच्या समोरचे ते चिटणीस आहेत ना त्यांचा मुलगा अविनाश. पुढल्या महिन्यात मुंबईला येतोय. फक्त पंधरा दिवस. लग्न करून मुलीला घेऊन लगेच रिटर्न.

गोपाळराव- मग आता आपण काय करायचं आहे?

बहीण- माझ्याकडे अश्विनीची पत्रिका आणि फोटो आहेच. तो मी चिटणीसना देते. मी फक्त तुला कळवायला फोन केला.

गोपाळराव- ठीक आहे.

बहीण- अरे गोपाळ इतका हताश नको होऊ. माझं मन सांगतय की अश्विनी ह्यावेळी नशीब काढणार.

गोपाळराव- तोंडात साखर पडो तुझ्या! शुभं भवतु!

अविनाश म्हणजे चिटणीसांचा एकुलता एक मुलगा. इंजिनियर होऊन एका नामांकित आयटी कंपनीत नोकरीला लागून अमेरिकेत लॉंग टर्म प्रोजेक्टवर गेलेला. तिथून ती कंपनी सोडून क्लायंटकडे नोकरीला राहिलेला. तिथे जरा स्थिरस्थावर झाल्यावर टिपिकल आयटी मधील अनेक अमेरिकास्थित मुलांसारखा देशात येऊन पंधरा दिवसात चट मंगनी पट ब्याह करून परत उडून जायच्या तयारीत असलेला देखणा मुलगा. वय तीस वर्ष.

पत्रिका जुळल्या. फोटो पाहून दोन्ही बाजूंकडून होकार आले. दहा दिवसात लग्न जमले देखील. अश्विनीच्या मनात स्वप्नांचे मोर नाचू लागले. नजरे समोर मॅनहॅटनच्या उंच इमारती दिसू लागल्या. अविनाशच्या NYC मधल्या फोटोत ती स्वतःला बघू लागली. लग्नाची तयारी जोरात सुरु झाली. स्काईपवर, व्हाट्सअप मध्ये अश्विनी आणि अविनाशच्या गप्पांना रोमांसचा रंग चढू लागला. आकर्षणाची जागा हळूहळू अधीरतेने घेतली. सर्व खरेदी, मोजक्या लोकांना बोलावणी झाली. अविनाश उद्या येणार आणि तीन दिवसांनी लग्न! अश्विनी खुश होती. मैत्रिणी चिडवत होत्या की तिला लॉटरी लागली. हे ऐकून अश्विनी मनोमन सुखावत होती. मैत्रिणींबरोबर केळवणं झाली. अनुभवी सख्यानी “पहिल्या रात्रीच्या” टिप्स दिल्या. अश्विनी स्वप्नात रमली. कल्पनेने रोमांचित झाली.

अविनाशला एअरपोर्टवर घ्यायला त्याचे आईवडील आणि अश्विनीचे आईवडीलही गेले होते. अश्विनी त्याच्या फोनची वाट बघत होती. अविनाश आला. सर्वांच्या पाया पडला. गोपाळराव आणि मंजुषाकाकू जावयाला प्रथमच पाहून भरून पावले. तृप्त मनाने घरी निघाले. अविनाश त्याच्या आईवडिलांबरोबर घरी पोहोचला. प्रचंड जेटलॅग असून फ्रेश झाल्यावर थोडे खाऊन त्याने अश्विनीला फोन केला. त्याची वाट पहात असलेल्या अश्विनने एका रिंगमध्ये फोन उचलला-

अश्विनी- हॅलो!

अविनाश- हाय!

अश्विनी- जेवलास का?

अविनाश- हो.

अश्विनी- How was the flight?

अविनाश- Oh it was nice. Except for an hour’s delay at Frankfort.

अश्विनी- हम्म!

अविनाश- So? All set?

अश्विनी- हम्म!

अविनाश- I have something urgent and important to share with you.

अश्विनी- (थोड्या आश्चर्याने, उत्सुकतेने) ओके. बोल ना.

अविनाश- Ashwini, there is a slight problem.

अश्विनी- (थोडी चिंताग्रस्त होऊन) का रे? काय झालं? कसला प्रॉब्लेम?

अविनाश- Look, the problem is तू लग्नानंतर माझ्याबरोबर लगेच फ्लाय नाही करू शकणार. तुला किमान एक वर्ष थांबावं लागेल.

अश्विनी- एक वर्ष? का? लाग्नानात्र मला व्हिसा मिळेल ना लगेच?

अविनाश- नाही. ऐक. I am in the process of changing my job back there. Mostly मी दुसऱ्या स्टेट मध्ये एकदम west coast जाईन. I will need some time to settle there. मी apply केलं होतं. ही डेव्हलपमेंट day before yesterday ची आहे. Offer is so good that I could not turn it down.

अश्विनी- हे काय म्हणतो आहेस तू अविनाश? म्हणजे लग्नानंतर मी इथे आणि तू एकटा परत? अरे कसं शक्य आहे ते? आणि किती दिवस? तू हे आधी का नाही सांगितलंस?

अविनाश- Hey listen. Don’t get so panic. काही महिन्यांचा प्रश्न आहे. मग तू येणारच आहेस. ही मोठी संधी आहे माझ्यासाठी. मी ती सोडू शकत नाही. आणि आपले लग्न पण तितकेच important आहे. मी माझ्या आईवडिलांना, तुला, तुझ्या पेरेंट्स ना शब्द दिला आहे. तूच विचार कर. त्यांना किती त्रास झाला असता जर मी हे लग्न पुढे ढकललं असत तर? तुला किती त्रास झाला असता? So here I am. पण I thought की तुला आधी सिच्युशन सांगावी. So you can tell your parents and I can tell my folks.

अश्विनी- (रागावून) अरे काय बोलतो आहेस तू? मी आईबाबांना कसं सांगू हे? त्यांनी किती स्वप्न बघितली आहेत! त्यांना धक्का बसेल प्रचंड! बघ ना. काहीतरी उपाय असेल. मी तिथे येऊन आपलं घर सजावेन. मला फक्त तू बरोबर हवा आहेस. बाकी काही नाही. आपण दोघे एकत्र राहू. ऍडजस्ट करेन मी सर्व. मला माहीत आहे अमेरिकेत नोकर मिळत नाहीत. खूप महाग असतात. पण काळजी नको करू. मी सर्व छान सांभाळेन. पण हे अस नको ना बोलू अविनाश! मला प्लिज बरोबर ने रे! (रडण्यामुळे तिचा आवाज कापरा झाला)

अविनाश- Baby, please don’t get emotional. Look at the practical aspects of life. आणि मी तुला जे आहे ते सांगितलं आहे. You still have a choice. You can still say no. There is no force. But you got to trust me. आणि माझा निर्णय पक्का आहे! Think and let me know!

अविनाशने फोन कट केला. अश्विनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आईबाबांना काय आणि कसं सांगायचं ह्याचा विचार करत ती मागे वळली. गोपाळराव तिच्यासमोर उभे होते! तिने त्यांच्या डोळ्यात पाहिलं. त्यांनी सर्व ऐकलेल होतं. अश्विनीने धावत जाऊन त्यांना मिठी मारली. गोपाळराव तिच्या डोक्यावरून हात फिरवत समोर दिसणाऱ्या देव्हाऱ्याकडे बघत होते. इतर दिवशी शांतपणे तेवणाऱ्या देव्हाऱ्यातील निरांजनाची ज्योत आज बेचैन असल्यासारखी फडफडत होती!!!

क्रमश:

आमचे whatsapp channel join करा- whatsapp.com  

पुढील भागाची लिंक- ही वाट दूर जाते – भाग २ – लग्न – मराठी कथा

हे पण वाचा- वेळ

कच्छी

बाप्पा

वारसा

गणपती – तथास्तु

गणपती – तथास्तु

कृष्ण जन्म

गणपती, उत्सव कि इव्हेंट?

आजी

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

3 thoughts on “ही वाट दूर जाते भाग 1: प्रवासाची सुरुवात | मराठी प्रेमकथा”
  1. छान सुरुवात आहे कथेची… पण honest इच्छा आहे की पुनर्जन्म, पुनर्मिलन असा विषय नसावा. आधीच्याही कथा आवडल्या…

  2. सुंदर सुरुवात!! 👌👌
    पुढील भागाच्या प्रतिक्षेत!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: © Mandar Jog - All Rights Reserved