गणपती बाप्पा मोरया
गिरगावातील आमच्या गणपती कारखान्यातून फोन आला. गणपती नोंदवायला या असा निरोप मिळाला आणि २०२४ च्या गणेशोत्सवाची नांदी झाली. आमच्या चार ते पाच पिढ्या अव्याहतपणे सुरु असलेल्या घरच्या दीड दिवसाच्या उत्सवात अजून एक वर्ष सामील होण्याची वेळ जवळ येऊन ठेपली. आज अनेक वर्ष झाली पण त्याच दुकानातून, त्याच आकाराची, तीच मूर्ती आम्ही आणतो. आज जवळपास साडेपाच हजाराच्या घरात किंमत असलेल्या त्या मूर्तीची मी लहान असताना किंमत पंचवीस रुपये होती. म्हणजे गेल्या काही वर्षात महागाई दोनशे पटीपेक्षा वाढली. अर्थात कच्चा माल, कारागिरांचे पगार हे खर्च देखील वाढले असणार.
गेल्या काही वर्षात गिरगावातून अनेक मराठी कुटुंब बाहेर पडली. बिल्डर, पुनर्विकास, टॉवर नामक परप्रांतीय राक्षसांनी हुसकून लावली. मराठी माणसांचे गणपतीचे अनेक कारखाने आपसूक बंद झाले. तरीही अजूनही गिरगावात आपले अस्तित्व टिकवून असलेल्या काही मोजक्या गणपती कारखान्यांच मला खूप कौतुक आहे. आम्ही शाळेत जायचो तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे कारखाने दिसत. साधारण मे महिन्यात त्यांची दार किलकिली झालेली असत. जूनमध्ये पावसात शाळेत जाताना त्या कारखान्यात दिसणारे गणपतीचे विविध साचे, चिकण माती, नारळाच्या शेंड्यांचा ढीग दिसत. माती कालवून साच्यात भरणारे कारागीर दिसत. जसजसे दिवस जात तसतश्या मूर्ती आकाराला येत. मग एकेक अवयव साच्यातून येऊन मूर्तीला जोडला जाई. मग मूर्ती सुकल्या की त्यावर फिक्कट गुलाबी रंगाचा बेस मारलेला दिसला की आता आठवड्याभरात रंगकाम सुरु हे लक्षात येऊन आम्हा पोरांची पावलं कारखान्याच्या दारात रेंगाळू लागत. जमिनीवर बसलेला कारागीर, त्याच्यासमोर असलेल लाकडी स्टूल, त्या स्टुलावर मधोमध खिळा ठोकून ३६० अंशात फिरू शकणारी अनेक रंग सांडलेली फळी आणि त्या फळीवर बाप्पाची मोहक मूर्ती असा सरंजाम असे. हातात असलेल्या लहानश्या स्प्रे मधून बेस मारून झाला की खरे रंगकाम सुरु होत असे. फक्त सोनेरी रंग न सांडवता लावणे ह्यापालिकडे मुकुट रंगवायला फारशी कलात्मकता लागत नसल्याने ओळखीच्या कारखान्यातील कारागीर एखादा मुकुट आम्हाला रंगवू देत. तो रंगवताना पण त्या मूर्तीत असलेला बाप्पा आपल्याला आशीर्वाद देतोय, आपल्याकडे बघून हसतोय हे फिलिंग खूप समाधान द्यायचं.
मुकुट, आसन आणि उंदीर झाल्यावर बाप्पाची सोंड. कान, केस, जानव, हातावरच्या रेषा, नखं, कद, पाय, पाठ, गळ्यातले दागिने, आसन, उंदराचे डोळे आणि कान हे सर्व रंगवले जात. बाप्पाला आता रूप आलेलं असे. मग सर्वात शेवटी आखणी होत असे. आखणी म्हणजे मूर्तीच्या अगदी बारीक सारीक तपशिलांना जिवंत करणे. मला वाटत त्यात कपाळावरचे गंध, कपाळावरची बट असे बारकावे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मूर्तीचे डोळे रंगवणे ह्याचा समावेश असे. एखादा तपशील राहून गेला असण्याची किंवा क्रम वर खाली झाला असण्याची शक्यता आहे. पण माझ्या आठवणीप्रमाणे हे लिहिलेलं आहे. तर आखणी झाली आणि डोळे रंगवून झाले की मूर्ती जिवंत वाटू लागे. मूर्तीच “ध्यान” दिसू लागे. गणपतीच्या आठवडाभर आधी सर्व कारखान्यात बसलेल्या विविध आकारातल्या आणि प्रकारातल्या मूर्ती गिरगावच वातावरण मंगलमय करत. बाप्पाच्या आगमनाची वर्दी देऊ लागत.
तेव्हा गणपती बाप्पा चा “गंपती बप्पा” झाला नव्हता. गिरगावातल्या चाळीचाळीतून अनेक घराघरात गणेशाची प्रतिष्ठापना केली जाई. दीड दिवस किंवा गौरी गणपती असे वास्तव्य असलेल्या बाप्पांच्या आरत्या म्हणायला प्रत्येक खोलीत सबंध चाळ गोळा होई. सार्वजनिक गणपतीच्या मांडवात देवे म्हणताना आवाज टिपेला लावण्याबरोबर श्वासाची देखील स्पर्धा लागे. धूप आणि उदबत्तीच्या वासाने वातावरण भरलेलं असे. एकमेकांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला जाऊन प्रसादाचे मोदक आणि पेढे खाऊन त्या दिवसात सर्वांच वजन दोन तीन किलो ने वाढत असे.
रात्री वाड्यांमध्ये नाटकं, ऑर्केस्ट्रा, स्थानिक कलागुण कार्यक्रम आणि वाडीच्या मधोमध पडदा लावून दोन्ही बाजूला बसलेल्या प्रेक्षकांसाठी लावलेला सिनेमा अशी मौज असे. दिवसा महिला मंडळाचे हळदी कुंकू, भजन, खेळाच्या स्पर्धा, सहस्त्रावर्तन असे मस्त कार्यक्रम असत. सार्वजनिक गणपती हा उत्सव होता. त्याचा बाप्पाला मांडवात लपवून त्याला नवसाचा, राजा, महाराजा, सम्राट अशी बिरूद लावून, भक्तांच्या लांबलांब रांगा निर्माण करून मंडळ आणि कार्यकर्त्यांना गब्बर करणारा इव्हेंट झाला नव्हता. बाप्पा देव होता. त्याचा “सेलिब्रिटी” झाला नव्हता!
दीड दिवसांचे गणपती विसर्जन हा देखील एक सुख सोहळा असे. “आवाहनं न जाना मी….” ही प्रार्थना ऐकून डोळे पुसत उत्तरपूजेच्या अक्षता बाप्पाच्या शिरावर वाहिल्या की त्यातले देवत्वाचे चैतन्य परत स्वर्गात जात असे आणि त्याच्या अस्तित्वाने पावन झालेली ती मूर्ती समुद्रात विसर्जित करण्यासाठी मंडळी निघत. तेव्हा भरती ओहोटीचा एक सोपा फॉर्म्युला बाबांनी आम्हाला सांगितला होता. भरतीची वेळ ही साधारणपणे त्या दिवशीच्या तिथीच्या पाऊण संख्येइतकी असते. म्हणजे दीड दिवसांचे गणपती विसर्जनाच्या दिवशी, अर्थात पंचमीला पूर्ण भरती साधारण दुपारी आणि पहाटे पावणे चार वाजता असेल. तो फॉर्म्युला तेव्हा तरी बरोबर बसत असे. आताही बहुधा बसत असेल.
तर विसर्जनाच्या मिरवणुकीत झांजा वाजवत, बाप्पाला “पुढल्या वर्षी लवकर या” असे साकडे घालत मंडळी चालायला सुरुवात करायची. सूर्य कललेला असायचा. शाडूच्या मातीचा गणपती हातात धरणार्याच्या हाताला रग लागलेली असे. पण हातातील बाप्पा तिचा त्रास होऊन देत नसे. वाजत गाजत “पायी हळू हळू चाला…” म्हणत मंडळी चौपाटीवर पोहोचत. वाळूत शिरल्यावर अनुभवी काका दगड शोधू लागत. नजरेस पडलेला दगड हळूच उचलून घेऊन सर्वांना येऊन मिळत. समुद्राच्या काठावर वाळूत पाट ठेवला की तो कलू नये म्हणून त्याला वाळूचा एक थर लावून आधार दिला जाई. आरती करून काकांनी आणलेल्या त्या दगडावर आपटून नारळ वाढवला की बाप्पाला नमस्कार करून घरातील मोठे मूर्ती, तिच्याबरोबर नारळाची कवड आणि पानात बांधलेली दही पोह्याची शिदोरी घेऊन निघत. मागे राहिलेल्यांना हुंदका आवरत नसे. समुद्रात आतवर गेल्यावर बाप्पाच विसर्जन केल्यावर मला तरी तो क्षितिजावर उडत वर जाताना मला दोन्ही हातांनी आशीर्वाद देत असल्याचा भास होत असे. डोळ्यातून घळाघळा वाहणाऱ्या अश्रूत बाप्पाची प्रतिमा धूसर होत अंतर्धान पावत असे!
आताही गणेशोत्सव आहे. पण तो बराच बदलला आहे. आता सेलिब्रिटी बाप्पा आणि सुप्रसिद्ध मंडळ आहेत, ‘गंपती बप्पा’ चे कान बधीर करणारा डीजे आहे, करोडो रुपये आणि दागिन्यांनी ओथंबून वाहणार्या मोठमोठ्या दानपेट्या आणि हुंड्या आहेत, आपल्या भक्तीची निस्सिमता ‘किती वेळ रांगेत उभा राहिलो’ ह्या निकषावर मोजून जगाला सांगणारे भक्त आहेत, सामान्य लोक तासंतास रांगेत उभे असताना सहज दर्शन मिळवून सेल्फी काढणारे नट नट्या आहेत, शाडू ऐवजी सहज बनणाऱ्या पण सहज विघटन न होणाऱ्या प्लास्टरच्या मूर्ती आहेत, पारंपारिक कारखाने बंद पडून रस्त्याच्या कडेला भूछ्त्रासारखे उगवणारे प्लास्टिकचे ‘गंपती शो रूम’ आहेत. भपका आहे, प्रसिद्धी आहे आणि धनिक शेठ लोकांनी विकत घेतलेले box office bappa देखील आहेत. फक्त ज्यांनी ह्या उत्सवाच पावित्र्य पाहिलं आणि जपल ते भक्त मात्र आता ह्या इव्हेंट मध्ये उत्सव आणि नवसाचा वगैरे म्हणून फेमस केलेल्या गणपतीच्या अजस्त्र मूर्तीत आपला बाप्पा शोधत असतात जो कुठेच सापडत नाही. कारण गणेशोत्सवही इतर पारंपारिक मराठमोळ्या सणांसारखा नष्ट झालेला आहे. कारण टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात आता इतर सगळे आहेत पण टिळक कुठेच दिसत नाहीत! आणि उत्सव शोबाजीच्या Box office event मध्ये पैसा आहे, धम्माल आणि एन्जॉय आहे, श्रद्धेचा बाजार आहे, धनिकांचा व्यापार आहे, परंपरेचा संहार आहे, दिवे आणि डीजेचा झगमगाट आहे, प्रचंड आकाराच्या प्लास्टरच्या मूर्ती आहेत पण बाप्पा कुठेच दिसत नाही! कलियुग उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. पण आम्हाला ते दिसत ©मंदार जोग
हे पण वाचा-
आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा
आमच्या लघुकथा लघुकथा
माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख
आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण
