लेडी पायलट | Mandar Jog

लेडी पायलट

“Ladies and gentlemen, welcome on board.”

कॅप्टन राधिका देवचा शांत आणि आत्मविश्वासपूर्ण आवाज विमानाच्या केबिनमध्ये घुमला. “मी कॅप्टन राधिका देव. माझ्यासोबत First Officer अमित आहेत. दिल्लीहून मुंबईपर्यंतचा आपला प्रवास साधारण दोन तासांचा असेल. हवामान सध्या ठीक आहे. त्यामुळे आपण वेळेत मुंबईला पोहोचू अशी अपेक्षा आहे. Thank you for flying with us.” तिची अनाउन्समेंट संपली आणि केबिन मध्ये पुन्हा आपल्या नेहमीचा गजबजाट सुरु झाला. खिडकीतून खाली दिसणारी दिल्ली हळूहळू लहान होत गेली. कुणी मोबाईलवर शेवटचा मेसेज करून तो flight modeवर टाकला, कुणी सीट मागे करून डोळे मिटले, कुणी खिडकीतून ढगांकडे पाहत राहिलं. विमानातला मंद प्रकाश, इंजिनचा सतत कानावर पडणारा आवाज, एसीची हलकी थंड हवा आणि मधूनच ट्रॉली घेऊन जाणाऱ्या एअर होस्टेस यामुळे वातावरण अगदी निवांत होतं.

मागच्या बाजूला चार तरुण मित्र एकत्र बसले होते. त्यातला आदित्य बाकीच्यांपेक्षा थोडा जास्त बोलका. राधिकाची अनाउन्समेंट संपल्यावर त्याने हेडफोन काढले आणि मित्रांकडे पाहत हळूच म्हटलं,

“अरे बापरे गाईज आज lady pilot आहे. केबिन क्रू बनून फूड सर्व्ह करायच्या ऐवजी ह्या श्रीमंत बापांच्या पोरी पायलट बनून लोकांच्या जीवाशी खेळतात. लेडी पायलटना कमर्शियल विमान उडवायला परवानगी का देतात हेच समजत नाही मला. आता land होईपर्यंत आपण gas वर.”

हे ऐकून बाकी तिघे हसले. समोरच्या सीटवर बसलेल्या एका गृहस्थाने मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं. आदित्यने त्यांना पाहून हात जोडले आणि हसतच म्हणाला,

“काका, बेल्ट घट्ट बांधा. बाई विमान चालवते आहे.”

त्यावर चौघेही जोरात हसले आणि एअर होस्टेसना न्याहाळू लागले. विमान तोवर ढगांच्या वर आलं आणि प्रवासी आता बर्यापैकी सेटल झाले. पुढचा जवळजवळ एक तास अगदी सहज गेला. चहा-कॉफीचे ट्रे फिरले, काही जणांनी खिडकीतून बाहेर पाहत फोटो काढले, काहींनी चित्रपट सुरू केले. एका कुटुंबातली छोटी मुलगी आईला सतत प्रश्न विचारत होती आणि तिचा बाबा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना खिडकीबाहेर काहीतरी दाखवत होता. दोन वृद्ध गृहस्थ कुठल्यातरी जुन्या प्रवासाच्या आठवणींवर हसत होते. आदित्य आणि त्याचे मित्र पत्ते खेळत होते. बाहेरच्या जगापासून हजारो फूट वर, त्या विमानातल्या जगात प्रत्येक प्रवाश्याची स्वतःची वेगवेगळी आयुष्य आणि वेगवेगळी स्टोरी होती. पण विमान जमिनीवर उतरेपर्यंत सगळेच त्या विमान प्रवास नामक दोन तासांच्या आयुष्य आणि कथेचा हिस्सा झाले होते ज्या कथेला एक अनपेक्षित कलाटणी मिळणार होती हे त्यांना कोणालाच माहित नव्हत.

सगळ सुरळीत सुरु असताना अचानक सीट बेल्टचा साइन on झाला. काही सेकंदांनी डोक्यावर असलेल्या स्पीकर मधून राधिकाचा आवाज आला.

“Ladies and gentlemen, we are expecting some turbulence ahead due to bad weather. Please fasten your seat belts and remain seated.”

एअर होस्टेस सगळे ट्रे वगैरे जागेवर ठेऊन तातडीने प्रत्येक प्रवाशाने सीट बेल्ट लावला असल्याची खात्री करून घेऊन आपापल्या जागेवर बसल्या. खिडकीबाहेरचं दृश्यही अचानक बदललं होतं. काही वेळापूर्वी पांढरे दिसणारे ढग आता काळेकुट्ट झाले होते. दूरवर वीज चमकत होती. विमानाने पहिला हलका धक्का घेतला. काही प्रवाशांनी सहज सीटच्या हाताला हात लावला. कुणीतरी हसून शेजाऱ्याला म्हटलं, “थोडं turbulence आहे, काही नाही.” जणू सगळ्यांना स्वतःलाच धीर द्यायचा होता.

दुसरा धक्का पहिल्यापेक्षा मोठा होता. विमान काही क्षण खाली गेल्यासारखं झालं. आदित्यच्या हातातले पत्ते हवेत उडाले आणि त्याच्या मित्रांच्या मांडीवर पडले. काही क्षणांपूर्वी हसणारा तोच आदित्य आता खिडकीबाहेर पाहत होता. बाहेर काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. फक्त काळे ढग, पावसाच्या धारा आणि अधूनमधून चमकणारी वीज.

राधिकाचा आवाज पुन्हा आला.

“Please remain calm and keep your seat belts fastened.”

तिचा आवाज शांत होता. आणि ह्यावेळी थोडा जास्त गंभीर देखील होता. आता विमानाचे हेलकावे वाढत होते. अजून एक मोठा धक्का बसला आणि केबिनमध्ये एक बाई भीतीने जोरात किंचाळली. दुसर्या एका महिलेने आपल्या मुलाला छातीशी धरलं. मागच्या बाजूला कुणीतरी देवाचं नाव घेतलं. एक वृद्ध गृहस्थ डोळे मिटून मंत्र म्हणू लागले. त्यांच्या शेजारी बसलेल्या गृहस्थाने त्यांचा हात धरला.

“घाबरू नका. काही होणार नाही.”

पण ते वाक्य बोलताना त्याच्याच आवाजात भीती होती. विमान पुन्हा जोरात हललं. काही प्रवाशांना आता जुन्या विमान अपघातांच्या बातम्या आठवू लागल्या. कुणाला काही वर्षांपूर्वी टीव्हीवर पाहिलेला crash आठवत होता,  तर कुणाला विमान कोसळतानाचा व्हिडिओ. माणूस संकटात असताना त्याला वास्तवापेक्षा त्याच्या आठवणी जास्त घाबरवतात. एका तरुणाने फोन काढून आईचा नंबर लावला. नेटवर्क नव्हतं. त्याने पुन्हा प्रयत्न केला. पुन्हा नाही. त्याने फोन हातातच धरून डोळे मिटले. समोर बसलेल्या एका महिलेने आपल्या गळ्यातली माळ घट्ट पकडली होती. एक लहान मुलगा मात्र अजूनही परिस्थिती समजून न घेता आईला विचारत होता,

“आपण खाली पडणार का?”

आईने त्याला घट्ट मिठी मारली.

“नाही अस काही होणार नाही. मी आहे ना. तू घाबरू नको.”

आणि मग विमान अचानक काही सेकंद निरंत्रण सुटल्यासारख एवढ्या वेगाने खाली गेलं की अनेकांच्या पोटात गोळा आला. पण या वेळी कुणीही बोललं नाही. किंकाळ्याही थांबल्या. जणू प्रत्येकाला आतून जाणवलं होतं की आता काहीतरी गंभीर घडणार आहे. प्रत्येकजण जणू मृत्युला सामोरा जायला तयार झाला होता. इथे आदित्यने समोरच्या सीटला दोन्ही हातांनी पकडलं. त्याच्या चेहऱ्यावरची सगळी मस्ती गायब झाली होती. त्याच्या डोक्यात काही वेळापूर्वीचा स्वतःचाच आवाज पुन्हा घुमला—‘“काका, बेल्ट घट्ट बांधा. बाई विमान चालवते आहे.” त्याने डोळे घट्ट मिटले. परत राधिकाचा आवाज आला.

“Brace position.”

ह्यावेळी अत्यंत सिरीयस. आता तिच्या आवाजात आश्वासन नव्हतं. आदेश होता. सर्व प्रवाश्यांनी वाकून अपपापली डोकी हातांनी दाबून धरली. विमान कोणत्याही क्षणी crash होणार होत. प्रत्येकजण देवाचा धावा करत होता. आपापल्या प्रिय जनांना आठवून त्यांचा निरोप घेत होता.

विमान पुन्हा खाली नियंत्र सुटल्यासारखं प्रचंड वेगाने खाली गेलं. सर्वांच्या पोटात गोळा आला. काही सेकंदांसाठी विमान एखाद्या खोल दरीत कोसळत असल्यासारखं वाटलं. आणि मग अचानक एक प्रचंड धक्का बसला. चाकं धावपट्टीला टेकली. विमान काही अंतर घसरलं. एका बाजूला झुकलं. पुन्हा सरळ झालं. वेग कमी होत गेला. काही सेकंदांनी विमान पूर्णपणे थांबलं!

केबिनमध्ये इतकी शांतता पसरली होती की प्रत्येकाला स्वतःचा श्वास ऐकू येत होता. कुणी लगेच बेल्ट काढला नाही. कुणीच जागेवरून हलल नाही. कारण कुणालाही विश्वास बसत नव्हता की ते वाचले आहेत. मग कुणीतरी हळू आवाजात म्हटलं,

“वाचलो…”

त्या एका शब्दानंतर जणू सगळ्यांना जिवंत असल्याची जाणीव झाली. मग कुणी रडायला लागलं, कुणी हसायला लागलं. कुणी हात जोडले तर कुणी चक्क अनोळखी शेजाऱ्याला मिठी मारली. विमानाचे दरवाजे उघडले. बाहेर airport staff  आणि इमर्जन्सी स्टाफ, ambulance सर्व तयार होते. पण आश्चर्य म्हणजे एकही प्रवासी लगेच बाहेर पडला नाही.

आदित्य उठला. पुढे येऊन त्याने एअर होस्टेसला रिक्वेस्ट केली-

आदित्य- प्लीज आम्हाला कॅप्टन राधिकाला भेटायचं आहे. मगच आम्ही बाहेर पडू. त्यांना प्लीज बोलवा.

बाकीच्या प्रवाश्यांनी देखील राधिकाला भेटायची इच्छा व्यक्त केली. सर्वांनाच तिचे आभार मानायचे होते. एअर होस्टेस ने राधिकाला मेसेज दिला. cockpitचा दरवाजा उघडला आणि कॅप्टन राधिका देव बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. पण डोळ्यांत समाधान होतं. राधिका बाहेर आल्यावर सर्व प्रवाश्यांनी टाळ्या वाजवल्या. थांक्यू थांक्यू ने विमान गजबजून गेलं. तेवढ्यात आदित्य राधिका समोर जाऊन उभा राहिला आणि काही क्षण त्याला काही बोलताच आलं नाही. मग त्याने हात जोडले आणि म्हणाला-

आदित्य- कॅप्टन, मला माफ करा. आज विमानात लेडी पायलट आहे हे कळल्यावर मी तुमची चेष्टा केली. तुम्ही लेडी आहात म्हणून capable नाही आहात अस म्हणून तुम्हाला आणि तुमच्यासारख्या सगळ्याच लेडी पायलटना judge केलं. सेक्सिस्ट रिमार्क्स केले. पण आज तुम्ही आमचा जीव वाचवून, माझं रक्षण करून मला आयुष्यभराचा धडा शिकवलात. तो धडा हा की स्त्री पुरुषांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नसते आणि त्यांचा सन्मान करायला हवा. कॅप्टन माझी एक रिक्वेस्ट आहे. प्लीज नाही म्हणू नका.

राधिका- काय?

आदित्य- आज रक्षाबंधन आहे. मी मुंबईला माझ्या बहिणीकडे राखी घेऊन जातोय. तिने राखी बांधल्यावर तिच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यायला. पण आज तुम्ही माझा जीव वाचवून माझ रक्षण केल आहात. म्हणून मी तुम्हाला राखी बांधणार आहे. जर रक्षण करणाऱ्याला राखी बांधतात तर मग रक्षण करणाऱ्या बहिणीला राखी का बंधू नये?

हे बोलून त्याने खिशातून एक छोटीशी राखी काढली. राधिकाने हात पुढे केला. ती हसून त्याच्याकडे बघत होती. आदित्यने हातातली राखी राधिकाच्या मनगटावर राखी बांधली. त्याच्या मागे उभ्या असलेल्या समीरने खिशातून स्वतःची राखी काढली.

समीर- राखी तर मी पण बांधणार माझं रक्षण करणाऱ्या बहिणीला.

अस म्हणत त्यानेही राधिकाच्या दुसऱ्या हाताला राखी बांधली. मग तिसरा मित्र पुढे आला. चौथा आला. त्यानंतर एक महिला. मग तिचा नवरा. कुणी आपल्या बहिणीसाठी आणलेली राखी तिच्या हातावर बांधली तर कुणी मुलासाठी घेतलेली. कुणाकडे राखी नव्हती, त्याने फक्त तिचा हात हातात घेऊन तो आपल्या डोक्याला लावला. कोणी आपला रुमाल राखी म्हणून तिच्या हाताला बांधला. हळू हळू विमानातील प्रत्येकजण तिच्या हाताला काही ना काही बांधून किंवा shake hand करून तिचे आभार मानून विमानातून बाहेर पडत होता. सगळे प्रवासी गेल्यावर शेवटी राधिका बाहेर पडून एरोब्रीज वरून चालत असताना एअर लाईनचा स्टाफ आणि एअर पोर्ट कर्मचारी देखील दुतर्फा उभे राहून टाळ्या वाजवत एक एक करत तिच्या हाताला राखी बांधत होते. तिचे दोन्ही हात राखी आणि कृतज्ञता ह्यांनी भरून गेले होते आणि नव्या जमान्यात एका सुंदर नात्याचा नवा अर्थ जगाला सांगत होते.

हे पण वाचा-

सख्या रे …

ट्वेंटी थ्री

गुंतता हृदय – सर्व भाग

मृगजळ- सर्व भाग

व्हॅलेंटाईन डे- भाग १

रिफ्लेक्शन भाग १

आमच्या इतर लघुकथा – लघुकथा

आमचे व्यक्तिचित्रण- व्यक्तिचित्रण

आमचे ललित लेख- ललित

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

4 thoughts on “लेडी पायलट”
  1. अफलातून कथा प्रत्यक्षात अनुभवतो असं वाटलं.धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!