चांद मातला भाग ५
रिक्षात बसलेल्या मीरा चे हात पाय थरथरत होते. कसाबसा तिने रिक्षावाल्याला घरचा पत्ता सांगितला आणि मागे डोके टेकून ती स्वतः ला पूर्वस्थितीत आणण्याचा प्रयत्न करत होती.आजूबाजूला जाणाऱ्या गाड्या,हॉर्न चे आवाज …तिला कशाचेच भान नव्हते. तिचे डोळे सारखे भरून येत होते. रिक्षा थांबली तशी ती भर्रकन खाली उतरली. पर्स मध्ये हात घालून तिने शंभर ची नोट ड्रायव्हर च्या हातात अक्षरशः कोंबली आणि पाठीमागे वळून ती बिल्डिंग च्या गेट च्या आत धावतच शिरली.
रिक्षावाला ताई सुट्टे तरी घ्या म्हणत होता तेही तिने ऐकले नसावे.
लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर थांबली तशी ती धडपडत बाहेर आली आणि पर्स मधून चाव्या काढल्या.दार धाडकन उघडून तिने पर्स सोफ्यावर फेकली आणि पाठीवर बंद केलेल्या दाराला टेकून जवळजवळ खाली कोसळली.हुंदके अनावर झाले तिला.तशीच उठून ती बाथरूममध्ये शिरली.शॉवर ऑन करून ती शॉवर खाली कपड्यासह उभी राहिली.डोक्यावरून पडणाऱ्या पाण्यात तिचे अश्रू मिसळून गेले.रोहन ने जिथे जिथे स्पर्श केला तिथे कितीवेळा साबण लावला तरी तिचे समाधान होत नव्हते.
काय करणार होते मी हे…मोहित ला समजले तर त्याला काय वाटेल??? किती प्रेम करतो तो माझ्यावर.. माझ्या सौन्दर्याची कधी उघड स्तुती नाही केली त्याने पण त्याच्या नजरेतून त्याची माझ्याबद्दल ची ओढ, प्रेम दिसते ना मला??? मग मी अशी कशी वाहवत गेले??? त्या अनोळखी रोहन ने थोडे माझ्या रूपाचे कौतुक काय केले तर मी तेवढ्या ओळखीवर त्याला भेटायला गेले???
तिची जेवणाची इच्छा मरून गेली . मग भरून कडक कॉफी घेऊन ती सोफ्यावर कलंडली. तसाच तिचा डोळा लागला.
बेल च्या आवाजाने ती दचकून जागी झाली .तिला मोहित च्या फोन ची आठवण झाली.आई बाबा आले असतील या विचाराने तिने स्वतः ला सावरून दार उघडले.मोहित चे आई बाबाच आले होते.तिला खरंच मनापासून आनंद झाला.”या ना बाबा,आई. बसा हं ,मी पाणी आणते पटकन”ती आत किचन मध्ये गेली. जाता जाता तिने बेसिन वर पटकन चेहरा धुतला आणि पावडर चा पफ चेहऱ्यावर फिरवून केस मागे घेऊन घट्ट बांधले.
ट्रे मधून साध्या पाण्याचे ग्लास घेऊन ती बाहेर आली.”का गं, आज थकल्यासारखी दिसतेस?? मानस त्रास देतो का फार?? की माझा मोहित छळतो?? सांग हो तसे,चांगले खडसावते त्याला” सासूबाई हसून बोलल्या. मीरा ने
स्वतः ला सावरले, नाही हो, तसे अजिबात नाही, काल रात्री जरा झोप झाली नाही म्हणून आत्ता थोडी पडले होते म्हणून तुम्हाला तसे वाटले असेल. बरं ,बसा तुम्ही,चेंज करा आणि आराम करा, मानस येईलच आत्ता.मी खायला काहीतरी गरम करते. काय करू? शिरा की उपमा??” “शिरा चालेल गं, मानस ला पण फार आवडतो, तोच कर, आणि हे बघ , त्याला आवडते म्हणून चीझ शंकरपाळी आणली आहे ती पण काढ थोडी.”
“आई तुम्ही कशाला करत बसलात, तुम्हाला आधीच तेलाचा वास सहन होत नाही.”
असू दे गं, उद्या रात्री इथूनच नाशिक ला जायचे आहे मधू च्या सासरी, रिकाम्या हाताने कशी जाऊ? म्हणून तिकडे पण थोड्या करून घेतल्या.”
बरं मीरा, उद्या सकाळी यांचे नॉर्मल चेक अप आहे डॉ बापटांच्या कडे तर त्यांच्यासोबत आपणही बाहेर पडू, मला थोडी खरेदी करायची आहे, हे नंतर मित्राकडे जेवून गप्पा मारून रिक्षाने परत येतील आपण सावकाश येऊ खरेदी करून .”
बरं आई, चालेल की, परत येताना मानस ला घेऊन येऊ स्कुल मधून.”
एवढ्यात मानस शाळेतून परत आला , आज्जी आजोबांना बघून स्वारी प्रचंड खुश झाली. त्या तिघांची अखंड बडबड सुरू झाली .
काहीशी सावरलेली मीरा संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीत गुंतून गेली.
मोहित थोडा उशिरा आला. तो ही आई बाबांना बघून खुश झाला. त्यांच्या बोलण्यात अधून मधून भाग घेत असलेल्या मीरा ला उगाच वाटत होतं की मोहित तिला बारीक न्याहाळून बघतोय. तिच्या अंगावर शहारे आले.
रात्री सारे आवरून झोपायला अकरा वाजले. मानस आज्जी जवळ गोष्ट ऐकत झोपून गेला होता. मीरा बेडरूममध्ये आली तेव्हा मोहित पुस्तक हातात घेऊन गुणगुणत होता “चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनों….”. इतर वेळ असती तर मीरा ने काहीतरी गुणगुणत उत्तर दिले असते पण आज तिच्या मनात अपराधीपणाची भावना दाटून आली होती. तिने ड्रॉवर मधली व्हिक्स ची बाटली हातात घेतली आणि ती आडवी झाली. “का गं, डोके दुखते का, आण मी लावून देतो”. मोहित ने हळुवारपणे व्हिक्स लावले आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. मीरा च्या डोळ्यात पाणी आले, किती प्रेम करतो हा आपल्यावर आणि मी कोणा परक्याच्या मोहा पायी मोहितला न सांगता त्याच्या फ्लॅटवर गेले…
मोहित ला तिच्या डोळ्यातील पाणी दिसले ,”वेडाबाई,दमलीस ना खूप, झोप आता, सकाळी शॉपिंग आहे ना सासू सुनांचे? गुड नाईट” म्हणून तो झोपून देखील गेला.
मीरा ला देखील विचार करून ग्लानी आली, कधी झोप लागली ते समजले देखील नाही.
दुसऱ्या दिवशी ती नेहमीप्रमाणे जागी झाली, तर बाहेर मोहितच्या आणि मानस च्या दंग्याचा आवाज येत होता, आणि आज्जी आजोबा त्यांचा दंगा एन्जॉय करत चहा घेत होते. “अरे मीरा, उठलीस तू, ये आधी चहा घे गरमच आहे. मोहीत म्हणाला तुझे डोके दुखत होते म्हणून तुला उठवले नाही त्याने. त्यानेच चहा केला बघ. सुधारणा झालीय हो माझ्या लेकात” सासूबाई चेष्टा करत म्हणाल्या.
“अहो उठवायचं ना मला”
असू दे गं, एक दिवस आईने माझ्या हातचा चहा प्यायला तर काही होणार नाही तिला”
मोहित च्या आईने राग आल्यासारखे डोळे मोठे करून मोहित ला हळूच एक चापट मारली.
” चला मी पटकन आवरून नाश्ता आणि डबा करते यांचा, आपण लवकरच निघू आई, नाहीतर लक्ष्मी रोड वर चालायला सुद्धा जागा मिळत नाही”
नंतर आवरण्याचा गडबडीत आणि शॉपिंग च्या नादात तिचे मोबाईल कडे जवळजवळ पूर्ण दुर्लक्ष झाले. संध्याकाळी सुद्धा मोहित च्या आई बाबांसाठी हलके जेवण म्हणून डाळ खिचडी टाकली तिने. नंतर मोहित त्यांना स्टेशनवर सोडायला गेला. तो परत येईपर्यंत मानस झोपून गेला होता. मीरा ने सहज मोबाईल हातात घेतला.बॅटरी पूर्ण डिस्चार्ज झाली होती.
“अरे बापरे, काल पासून मोबाईल चार्ज केलाच नाही”
तिने मोबाईल चार्जिंग ला लावला आणि ती फ्रेश व्हायला गेली. एवढ्यात तिच्या मोबाईल वर मेसेज आल्याने त्याचा लाईट लागला. ड्रेसिंग टेबल जवळ कपडे बदलत असलेल्या मोहित ने मोबाईल उचलून मेसेज बघितला,तो रोहन चा मेसेज होता.
हॅलो, हाऊ आर यू? रागावलीस का माझ्यावर? सॉरी ,मला कन्ट्रोल करता आले नाही. उद्या भेटशील पुन्हा?वाडेश्वर, सकाळी 11 वाजता, वाट पहातो.”
मोहित ने तसाच मोबाईल ठेवला आणि तो बेडवर झोपायला गेला. मीरा ने बेडरूममध्ये आल्यावर मोबाईल ऑन करून बघितला, तिला रोहन चा मेसेज दिसला. तिने वाचुन घाईघाईने डिलीट केला आणि ती मोहित जवळ येऊन झोपली. खूप अस्वस्थ झाली होती ती.”का गं ,परत डोके दुखते का??” मोहित ने प्रेमाने डोक्यावरून हात फिरवून विचारले.तिने मानेनेच नाही म्हटले आणि मोहित च्या मिठीत शिरून मोहित ला म्हणाली ,”मला खूप जवळ घे, घट्ट जवळ घे”
“माझी वेडा बाई” असे म्हणून मोहित ने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि तिला घट्ट जवळ घेतले.
मीरा ला शांत झोप लागल्याचे बघून मोहित ने स्वतः चा मोबाईल ऑन केला.रोहन चा मेसेज होता, “उद्या भेटायचे का?”
मोहित ने “येस “म्हणून रिप्लाय केला आणि त्या नंतर त्याने आपली सेक्रेटरी माया ला मेसेज केला “प्लॅन वर्क होतोय,उद्या भेटायचे ठरले आहे”.
…….कोण कोणासोबत प्लॅन करत आहे? मोहित आणि रोहन चा प्लॅन काय आहे?? मीरा उद्या रोहन ला भेटायला जाणार का?? माया चा रोल काय आहे या संपूर्ण प्लॅन मध्ये???
क्रमश:
लेखिका – सुप्रिया कुलकर्णी
पुढील भागाची लिंक-
पुढील भागाची लिंक- चांद मातला भाग ५
मागील भागाची लिंक- चांद मातला भाग ४
हे पण वाचा-
आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा
आमच्या लघुकथा लघुकथा
माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख
आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

[…] पुढील भागाची लिंक- चांद मातला भाग ५ […]
मला पहिल्या भागापासून वाटत होतं की माहितच तिला फसवतो आहे . पण तुमच्या कथेत फार ट्विट येतात .बघू काय होते ते.
[…] आधीच्या भागाची लिंक- चांद मातला भाग ५ […]