नर्मदा परिक्रमा | उत्तरवाहिनी
नर्मदा परिक्रमा | उत्तरवाहिनी
भाग 1– मुंबई ते नागपूर
मला माहीत नाही ‘गुमनाम’ सिनेमा ही पोस्ट वाचणाऱ्या किती लोकांनी पाहिला असेल. त्यात एकमेकांशी थोडीफार ओळख असलेले किंवा अजिबात ओळख नसलेले सात-आठ लोक एका निर्जन बेटावर विमानात बिघाड झाल्यामुळे उतरतात आणि पुढे त्यांचं काय होतं अशी गोष्ट होती. माझा भाऊ आणि त्याचा एक अवलिया मित्र ह्यांनी ह्यावेळी अशीच एक मोट बांधली होती. बारा लोक. त्यातले काही एकमेकांना ओळखत होते. काही एकमेकांचे नातेवाईक होते, काही एकमेकांचे लंगोटी आणि चड्डी यार होते, काही एकमेकांना पहिल्यांदाच भेटणार होते तर काही अनेक वर्षांनी नव्या रूपात एकमेकांसमोर येणार होते. होय. अशीच विचित्र सरमिसळ होती लोकांची. आणि त्यांना एकत्र आणणारी घटना होती उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा! आमचा हा अवलिया मित्र नर्मदा भक्त आहे. एका नामांकित आयटी कंपनीत चांगल्या पदावर काम करणारा, अत्यंत विनम्र, मृदू स्वभावाचा हा मित्र गेली अनेक वर्षं परिक्रमा करतो आहे. माझ्या भावाने त्याच्या बरोबर गेली दोन वर्षं परिक्रमा केली आहे. एक वर्ष गुजरातमध्ये आणि एक वर्ष मध्य प्रदेशात. यंदा त्यांनी त्या उपक्रमासाठी निवडलेल्या पुण्यवान, नशीबवान लोकांमध्ये माझा नंबर लागला हे माझं भाग्य. दोनेक महिन्यांपूर्वी भावाच्या घरी जेवायला बसलेले असताना त्याने विचारणा केली की, तू येणार का परिक्रमेला? मी लगेच होकार दिला. एका आठवड्यात बारा इच्छुकांचा WhatsApp ग्रुप तयार झाला आणि माझा भाऊ आणि अवलिया मित्र दोघे त्यात माहिती टाकू लागले. ट्रिप सर्वसमावेशक असावी म्हणून तसेच विमानाची तिकिटे आमच्या तारखांना बऱ्यापैकी महाग होती म्हणून ट्रेनने जाण्याचा सर्वांनी निर्णय घेतला. मी आजवर अक्कलकोटकरिता सोलापूर, अनेकदा मुंबई-पुणे आणि सहा महिन्यांपूर्वी केलेला भंगार मुंबई-गोवा-मुंबई हा प्रवास वगळता वीसएक वर्षांत लांबचा प्रवास ट्रेनने केलेला नाही. पण कंपनी फॅन्टॅस्टिक लोकांची असल्याने मी सायकलवरदेखील जायला तयार झालो असतो. इथे तर वातानुकूलित ट्रेनचा डबा होता.
भावाने आणि त्याच्या त्या अवलिया मित्राने एजंटमार्फत तिकिटे काढली आणि tentative itinerary ग्रुपवर टाकली. आम्ही सगळे फक्त वाचत आणि अंगठे दाखवून सहमती दर्शवत होतो. फार वैविध्यपूर्ण लोक होते आमच्या त्या ग्रुपमध्ये. त्यातील चौघे पुरुष मोठमोठ्या कंपन्यांत उच्च पदांवर कार्यरत. एक जण देशात आणि परदेशात अत्यंत लोकप्रिय असलेल्या ब्रँडचा मालक. त्याची पीएचडी झालेली उच्चशिक्षित बायको. एक शिक्षिका. एक लेडी सायकोलॉजिस्ट, दोघी उच्चशिक्षित होममेकर, एक ऑर्थोपेडिक सर्जन आणि मी. त्यातले मी आणि माझा भाऊ सर्वांची कॉमन लिंक. पण सगळीच मंडळी अत्यंत सज्जन, उत्साही आणि मॅच्युअर्ड. त्यामुळे परिक्रमा सुंदर होणार ह्यात शंका नव्हती. शेवटी चांगल्या लोकांची संगत कोणत्याही कार्याच्या किंवा उपक्रमाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावत असते. आमची ती बाजू प्रचंड भक्कम होती. माझा भाऊ आणि आमचा तो अवलिया मित्र ह्यांना आपण ह्यापुढे कोहली आणि रोहित म्हणूया. लिहायला सोपं जाईल. तर कोहली आणि रोहित जमेल तशी आणि तितकी माहिती त्यांच्या कार्यबाहुल्यातून वेळ काढून ग्रुपवर शेअर करत होते. हॉटेल बुक झाली. वाहने बुक झाली. सगळी अपडेट मिळत होती. परिक्रमेला येताना काय काय घ्यायचे ह्याची लिस्ट रोहितने ग्रुपवर टाकली. त्यात पांढरा कुर्ता आणि लेंगा आणावा असं लिहिलं होतं.
माझ्याकडे असलेल्या पंधरा कुर्त्यांमध्ये नेमका पांढरा कुर्ता नव्हता. मी गिरगाव किंवा भुलेश्वरला जाऊन एक स्वस्त कुर्ता आणि लेंगा घेण्याचा विचार करत होतो पण मला वेळ मिळत नव्हता आणि जाण्याचा दिवस रोज थोडाथोडा जवळ येत होता. शेवटी बायको म्हणाली, मी आणू का? माझ्याकडे हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. मी कपडे हे लज्जारक्षण इतक्याच हेतूने वापरत असलो तरी माझी बायको आणि मुलगी ते घालून (तरी) मी प्रेझेंटेबल दिसावा अशा हेतूने माझ्यासाठी खरेदी करतात. मी किंमत आधी बघतो आणि त्यातल्या त्यात स्वस्त कपडे घेतो. त्या चांगले कपडे घेतात आणि किमतीच्या लेबलकडे बघत नाहीत. आमची वहिनी तर ह्या बाबतीत ultra max pro आहे. ती सर्वात आधी किमतीचं लेबल बघते. सर्वात महाग असतील असे तीन ऑप्शन्स निवडते आणि मग त्यातील जो बेस्ट असेल तो घेते. तिच्या मते किंमत आणि दर्जा हे नेहमीच समप्रमाणात असतात. आणि तिने खरेदी केलेल्या वस्तू पाहिल्या की तिचे विचार योग्य आहेत हे प्रत्येक वेळी जाणवतं. अर्थात तिची चॉईस अफलातून आहे हे तिने आमच्या बंधुराजांची नवरा म्हणून निवड केल्यावरच माझ्या लक्षात आलं होतं. तर आमच्या बायको आणि मुलीने माझं भुलेश्वरला किंवा बाबू कान्होबा ठाकूर ह्यांच्या ठोकबंद व्यापाराच्या दुकानात कॉटनचा लेंगा-कुर्ता घ्यायचं बजेट चार-पाच पटींनी वाढवून एका प्रसिद्ध ब्रँडच्या दुकानातून माझ्यासाठी लिनेनचे कुर्ता आणि ट्राउझर आणले. पण वेळ नसल्याने आणि फिट आवडल्याने मी फारशी खळखळ न करता ते स्वीकारले.
जाण्याचा दिवस जवळ येत होता. वस्तूंची जुळवाजुळव सुरू होती. आमचे प्रवासाचा खर्च मॅनेज करण्याचे ॲप सर्वांना इन्स्टॉल करायला सांगितले, जेणेकरून हिशोब खूप सोपा होतो. सर्वांनी ते इन्स्टॉल केलं. इतक्यात ऑर्थोपेडिक सर्जन आणि आणखी एका मित्राने त्यांना यायला जमत नसल्याचं सांगितलं. सर्वांनाच जरा वाईट वाटलं. पण त्यांना काहीतरी महत्त्वाचं काम असणार होतं म्हणून त्यांनी न येण्याचा निर्णय घेतला होता. रोहितने त्यांची रेल्वे तिकिटे आणि हॉटेल रूम रद्द केली. आता जाणं अगदी उद्यावर आलं होतं. १६ ला रात्री आम्ही निघणार. इतक्यात मला वाटतं, १४ तारखेला त्या प्रसिद्ध ब्रँडचा मालक असलेल्या मित्रानेदेखील एक अत्यंत महत्त्वाची मीटिंग अचानक उद्भवल्याने न येण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्याबरोबर त्याची पत्नी देखील ड्रॉप झाली. आता आम्ही आठ जण उरलो. सीएसटी स्थानकात सगळे आलेले पाहिल्यावर माझ्या जीवात जीव आला. म्हणजे अजून गळती लागली नव्हती. आम्ही ट्रेनमध्ये बसलो. इतक्यात तो ब्रँड मालक मित्र आणि त्याची पत्नी आमचा निरोप घ्यायला ट्रेनमध्ये आले. त्यांना आलेले पाहून मला त्याचं खूपच कौतुक वाटलं. अपरिहार्य परिस्थिती उद्भवल्याने बिचारे येऊ शकत नव्हते. पण आम्हाला निरोप द्यायला मात्र आवर्जून हजर राहिले. येताना आमच्यासाठी खाऊ घेऊन आले होते. आम्ही निघालो त्याच दिवशी रोहितचा वाढदिवस होता. त्याने डब्यातच केक कापला. आम्ही त्याला शुभेच्छा दिल्या. ते दोघे आमचा निरोप घेऊन उतरले. आम्ही नर्मदे हर असा जयघोष केला आणि मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस सीएसटी स्थानकाच्या फलाट क्रमांक १७ वरून निघाली. ती आमच्या एका अविस्मरणीय ट्रिपची सुरुवात होती. तारीख होती १६ एप्रिल २०२५.
भाग २- नागपूर ते मंडला. संकल्प आणि नर्मदा आरती.
मी अक्कलकोटला जाण्यासाठी सोलापूर ट्रेनचे तिकीट काढतो तेव्हा सर्वात वरचा बर्थ बुक करतो. खाली दुनिया इकडची तिकडे झाली तरी आपण अढळ स्थानावर असतो. खालच्या कोणाशीही अजिबात संबंध येत नाही. सकाळी उतरलो खाली की निघालो. वर लोकांना थंडी जास्त वाजते असं म्हणतात. मला थंडी भयंकर आवडत असल्याने मी अनेकदा एसीची हवा खात पांघरूण न घेताही झोपलो आहे. ह्यावेळीसुद्धा जणू नर्मदा मैय्याने माझी आवड ओळखली होती आणि मला आपसूक वरचा बर्थ मिळाला होता. ट्रेनमध्ये चढल्यावर अर्थात आम्ही सगळे खालीच बसलो होतो. शाळेतील सवंगडी आणि नातेवाईक असा ग्रुप असल्याने मी आणि भाऊ सगळे कंफर्टेबल होतील ह्याची काळजी घेत होतो. अर्ध्या तासातच सर्वांची एकमेकांशी ओळख झाली आणि मंडळी स्थिरावली. आता अनोळखी कोणीच नव्हतं. आमच्या hit man रोहितने रेल्वेतील जेवण फार ग्रेट नसतं म्हणून घरून येताना एका चांगल्या रेस्टॉरंटमधून सर्वांसाठी टिफिन बॉक्स आणले होते ज्यात आमरसाचा समावेश होता. Can you beat that? And to top it all त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याने त्याच्यातर्फे सर्वांसाठी अत्यंत मऊसूत रुचकर सांज्याच्या पोळ्या आणल्या होत्या. मी त्याला कोपरापासून नमस्कार केला. माणसाने चांगलं असावं पण ते किती ह्याला त्याच्याकडे सीमा नाहीये. He is born to give and help! डिनरनंतर अर्थात गप्पांचा फड रंगला. आणि मग रात्री सगळेजण आपापल्या बर्थवर झोपी गेले. समोरच्या बाजूला जे दोन बर्थ असतात तिथे वरच्या बर्थवर झोपलेला माणूस रात्रभर इतका घोरत होता की त्याने आम्हा सर्वांना बऱ्यापैकी जागे ठेवले. शेवटी सकाळी आमची एक मैत्रीण म्हणालीच की रेल्वेने तिकीट काढताना “घोरता का?” असा प्रश्न विचारून घोरणाऱ्या माणसांसाठी वेगळी बोगी लावावी.
ट्रेनमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे डबा. खाण्याचा नाही. टाकण्याचा. ट्रेनमध्ये सकाळी डबा टाकायला इतकी गर्दी होते की विचारू नका. त्यात बहुतांश लोकांना संडास कसे वापरावे ह्याचा सिव्हिक सेन्स नसल्याने काही वेळातच शौचालयाचा उकिरडा होतो आणि कोणीही civilised मनुष्य तिथे जाऊ शकत नाही. सोलापूर प्रवासात हा अनुभव एक-दोनदा आल्यावर मला रात्रीच्या ट्रेन प्रवासात आपसूक ४/४.३० ला जाग येते. ह्या प्रवासातही ती आली आणि मी संडास स्वच्छ असताना जाऊन आलो. त्यातही कमोड आणि जेट स्प्रे असल्याने मला स्वर्ग दोन बोटे उरल्यासारखं वाटत होतं. मी त्याच आनंदात प्रशांतचं “मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं” हे गाणं गुणगुणत परत माझ्या बर्थवर येऊन झोपलो. गाडी वेळेवर होती. सकाळी नागपूर स्थानकात आम्ही उतरलो. स्टेशनपासून कार बुक केल्या होत्या. रोहितने गाडीवाल्याला फोन केला. आम्ही रस्त्यावर येऊन उभे राहिलो. गाड्या ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या. स्टेशनबाहेर अत्यंत बेशिस्त ट्रॅफिक होता. त्याला मुख्य कारण रिक्षावाले होते. खरं तर हे वेगळं सांगायची गरज नाही. ट्रॅफिक, बेशिस्त हे दोन शब्द वाचल्यावर चाणाक्ष लोक रिक्षावाला हा तिसरा शब्द आपोआप ओळखतात. त्यात आम्हाला अशी माहिती मिळाली की पूर्वी स्टेशनबाहेर वाहनतळ होता जिथे रिक्षा, टॅक्सी आणि बसदेखील थांबत. पण सध्या त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी होते. असो. पंधरा मिनिटे त्या रिक्षा आणि बाईकच्या बेशिस्त गर्दीत स्वतःला आणि सामानाला सांभाळल्यावर गाड्या आल्या. आमचं सामान आत टाकून आम्ही चार चार जण एकेका गाडीत बसलो आणि प्रवास सुरू झाला. रोहितने ब्रेकफास्टसाठी नागपूरमधील हरदेव नामक हॉटेलात जायचं ठरवलं होतं. आम्ही त्या हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्टला गेलो. उत्तम ambiance, झकास स्प्रेड, courteous सर्व्हिस, आणि अत्यंत affordable price असा value for money ब्रेकफास्ट करून आम्ही मध्य प्रदेशातील मंडला ह्या शहराकडे निघालो. नागपूरला गेल्यास इथे ब्रेकफास्ट अवश्य करा. खरं तर जबलपूरवरून मंडला जास्त जवळ आहे. पण आम्हाला ट्रेनची जबलपूरची तिकिटे आम्हाला पाहिजे त्या दिवशी आणि पाहिजे तितकी न मिळाल्याने आम्ही नागपूरवरून मंडलाला जात होतो.
हळूहळू ऊन वाढू लागलं. गाडीत फुल एसी असला तरी बाहेरच्या झळांचा अंदाज येत होता. आम्हाला कोणालाही लंच करायची इच्छा नव्हती इतका पोटभर ब्रेकफास्ट झाला होता. पण ड्रायव्हरना जेवायचं होतं. साधारण एक वाजता आम्ही गाडीत बसून राहिलो आणि ड्रायव्हर्स जेवायला गेले. मी आणि एक मित्र सहज गंमत म्हणून बाहेर पडलो आणि आम्हाला heat जाणवली. मुंबईत असलेली हवेतील आर्द्रता तिथे अजिबात नव्हती. कोरडी हवा, डोक्यावर तळपता सूर्य आणि गरम वारे… आम्ही शिस्तीत परत गाडीत जाऊन बसलो. ड्रायव्हर आले आणि पुढील प्रवास सुरू झाला. दुपारच्या सुमारास आम्ही मंडला शहरात पोहोचलो. तिथे श्रीजी इन नामक हॉटेलमध्ये बुकिंग केलं होतं. ते हॉटेल मंडलामधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बरोब्बर समोर आहे. रोहित आणि कोहली गेल्या वर्षी परिक्रमेला गेले होते तेव्हा त्याच हॉटेलमध्ये राहिले होते. हॉटेल छान आहे. एसी कडक, बाथरूम, संडास, बेड स्वच्छ आहेत. पण फार काही ग्रेट नाहीये. पण माणशी फक्त रु. ८०० मध्ये ते हॉटेल “कम में बम” आहे. रोहित आणि कोहलीच्या मते दोन वर्षांपूर्वी खूप मस्त होतं. पण नीट मेंटेन न केल्याने त्याची थोडी रया गेली होती. पण माझ्या मते तरीही ते चांगलं होतं barring few small things. थोडक्यात दोन वर्षांपूर्वी कियारा अडवाणी असलेलं ते हॉटेल फार नीट मेंटेन न केल्याने आता काजोल वाटत होतं. पण काजोल अजूनही stardom टिकवून आहेच. असो. ह्या हॉटेलमध्ये राहायला अजिबात हरकत नाही.
गाड्या त्यांच्या घरी गेल्या होत्या. संध्याकाळी आम्ही परिक्रमेचा संकल्प ठेवायला व्यास नारायण मंदिराकडे निघालो. जाताना मंडलामधील वडाप रिक्षा पकडली. आठही जण त्या एका वडापमध्ये अंग चोरून बसलो होतो. हॉटेल ते व्यास नारायण मंदिर या प्रवासाचे वडापवाल्याने रुपये दोनशे घेतले. “शहरी बाबू और मादाम” पाहून त्याने कदाचित दुप्पट पैसे लावले असतील. पण आम्ही खुशीने राजी झालो आणि निघालो. व्यास नारायण मंदिर हे किले घाट नामक ठिकाणी आहे. गुगल मॅपवर उपलब्ध आहे. अवश्य बघा. आम्ही मुंबईतून निघायच्या आधीच बुक केलेल्या तिवारी भटजींची वाट बघत मंदिराच्या बाहेर थांबलो. एका लहानशा गावात ते शंकराचं मंदिर आहे. तिथेच वर हनुमान आणि इतर काही मंदिरं आहेत. मंदिरापासून काही पावलांवर नर्मदा नदी आहे. अखेर तिवारी भटजी आले. त्यांच्यासह मंदिरात जाऊन आम्ही संकल्प केला. दुसऱ्या दिवशी पहाटे पाचपासून परिक्रमा सुरू करायचा निर्धार केला आणि तिथून दुसरी वडाप पकडून आम्ही रपटा घाट किंवा महिष्मती घाट नामक घाटावर आलो. तिथे मैय्याची मनोभावे आरती केली. खूप प्रेक्षणीय आणि श्रवणीय असा अनुभव आहे तो. त्यानंतर नर्मदा मैय्याला दीप अर्पण केले. तिथून निघून आमच्या हॉटेलजवळ असलेल्या अत्यंत साध्या, सामान्य अशा मारवाडी भोजनालय नामक थाळी रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो. तिथे येणारे बहुतांश लोक श्रमिक असावेत असं मला तरी वाटलं. पण जेवण बऱ्यापैकी चविष्ट होतं. नव्वद रुपयांत अमर्याद थाळी असणारं ठिकाण जसं असू शकेल तसंच ते होतं. पण आम्हाला भटकायला वेळ नव्हता आणि सकाळी लवकर उठून जायचं होतं म्हणून आम्ही तिथेच जेवून हॉटेलवर परतलो. कोणीही वाचक जर आमची itinerary follow करत असतील तर त्यांनी ह्या ठिकाणी जेवायला जायला काहीच हरकत नाहीये. आम्ही आमच्या बरोबर असलेल्या महिलांसकट तिथे गेलो होतो. व्यवस्थित जागा आहे. मालक जातीने वाढायला येतात मधेच. असो. तर आम्ही हॉटेलवर येऊन सकाळी चारचा गजर लावून झोपी गेलो. डोळे मिटल्यावर आज केलेली मैय्याची आरती कानात निनादत होती आणि तिच्या किनाऱ्यावर उभे राहून तिला ओवाळत असलेली महा निरांजने डोळ्यासमोर येऊन मनाला त्यांच्या प्रकाशाने न्हाऊ घालत होती. उद्या मैय्याची परिक्रमा करायची ओढ मनाला प्रफुल्लित करत होती. जणू मैय्या हात पसरून आम्हा सर्वांना स्वतःकडे बोलावत होती. त्याच आनंदात जणू मैय्याच्या कुशीत आम्हा सर्वांना गाढ आणि शांत झोप लागली. उद्या परिक्रमा. नर्मदा आम्हाला बोलावत होती!
भाग ३- परिक्रमा
ज्यासाठी केला होता हा सगळा अट्टाहास ती उत्तरवाहिनी परिक्रमा करण्याचा आजचा दिवस. पहाटे चार वाजता उठलो. अंघोळ वगैरे आटपून पाच वाजता शुभ्र वस्त्र लेवून आम्ही सगळेच तयार होतो. माझा एक विचित्र प्रॉब्लेम आहे. मी एखाद्याला वेळ दिली की त्या वेळेआधी पाच मिनिटं पोहोचण्याचे लक्ष्य ठेवतो आणि त्यानुसार त्या आधीची सगळी कामे आणि planning करतो. मग ती क्लायंटबरोबर मीटिंग असो की मित्राला नाक्यावर भेटायची वेळ दिलेली असो. मी प्रत्येक ठिकाणी वेळेआधी किंवा वेळेवर उपस्थित असतो आणि माझी तीच अपेक्षा लोकांकडून असते. पण इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर असं जाणवलं की लोकांना वेळेची फार किंमत नसते. मग मला एखाद्याला पाच वाजता भेटायचं असेल तर मी त्याला साडेचारची वेळ सांगतो. विशेषतः व्हेंडर, सप्लायर्स आणि आधी अनुभव आलेले मित्र तसेच इतर लोक. आमच्या रोहितला देखील मी सांगितलं होतं की आपल्याला पाच वाजता निघायचं असेल तर ड्रायव्हरना साडेचारची वेळ सांगून ठेव. पण रोहित हा आधुनिक युगातील संत माणूस असल्याने त्याने ड्रायव्हरला “आप पाच बाजे आओ” असं प्रचंड आदर, आस्था आणि अपार करुणा असलेल्या सुरात सांगितलं असल्याने ड्रायव्हर पण आपल्या वृत्तीला जागत अर्धा तास उशिरा आले. असो. आम्ही हॉटेलमधून निघालो.
गाडीने आम्हाला राधा कृष्ण मंदिराच्या बाहेर सोडलं, जे कालच्या व्यास नारायण मंदिराच्या समोर आहे. एकतर तिथे बोटीने जावं लागतं किंवा गाडीनेही जाता येतं. आम्ही गाडीने गेलो. ते मंदिर इतक्या पहाटे बंद असल्याने आम्ही बाहेरूनच नमस्कार केला आणि आमच्या परिक्रमेला सुरुवात केली. पहाटेची वेळ असल्याने वातावरण प्रसन्न होतं. चालायला मजा येत होती. सुरुवातीची वाट एका गावातून जात असल्याने सकाळी गावातील मंडळी भेटत होती. आमची पंढरी वेशभूषा पाहून भेटणारे “नर्मदे हर” असा हाकारा देत होते आणि आम्हीही “नर्मदे हर” म्हणून त्यांना प्रतिसाद देत होतो. हा अनुभवच मस्त होता. मध्य प्रदेशातील एका लहानशा गावात आम्ही मुंबईतील आठ लोक चालत होतो आणि गावकरी आम्हाला साद देत होते. अर्थात सगळेच यात्रेकरू त्या गावातून यात्रा सुरू करत असल्याने गावकऱ्यांसाठी ती काही नवीन गोष्ट नसेल. आम्ही चालत चालत अखेर गावातून बाहेर आलो आणि डांबरी रस्त्याला लागलो.
आता थोडं उजाडलं होतं. ह्या परिक्रमेचं एकूण अंतर जवळपास ४४ किलोमीटर आहे. त्यातील सुरुवातीचे साधारण २८ किलोमीटरनंतर वाट राष्ट्रीय महामार्गावर येते, जिथे वाहने जोरात जात असतात. मला प्रचंड किडा असूनही सर्वानुमते आम्ही परमुलुखात राष्ट्रीय महामार्गावर चालायची रिस्क न घ्यायचं ठरवलं असल्याने आम्ही परिक्रमेचे सुरुवातीचे २८ किलोमीटर चालत करणार होतो आणि तिथून आमच्या गाड्या आम्हाला पिकअप करून पुढील परिक्रमा गाडीतून पूर्ण होणार होती. आम्ही त्या रस्त्याने चालायला सुरुवात केली. कधी फोटो काढत, कधी व्हिडिओ बनवत आम्ही चालत होतो. हळूहळू प्रत्येकाच्या वेगानुसार आम्ही वेगळे झालो. रोजची चालायची सवय आणि हौस असलेले मी आणि एक मित्र नकळत पावले जोरात पडून पुढे निघालो होतो. रोहित आणि एक मैत्रीण एकत्र होते. जे हळू चालणारे होते ते सर्वात मागे एकटे चालत होते. बाकी चौघे दोघा-दोघांच्या जोडीने पुढे मागे होते. मला शक्य तितकं अंतर सूर्य डोक्यावर यायच्या आधी पूर्ण करायचं होतं. आमच्या गाड्यांना आम्ही आमचा रूट सांगितला होता. गाड्यांमध्ये पाणी, खाण्याचे पदार्थ हे सगळं ठेवलेलं होतं. गाड्या आमच्याच रस्त्यावर एका ठिकाणी पार्क केल्या होत्या. गरज लागल्यास त्यांना फोन करून बोलावून पाणी किंवा खाण्याची सोय होती. एखाद्याला चालायचं नसेल, दमायला झालं तर गाडीत एसीची हवा खात बसायची सोय होती. पण प्रत्येकाच्या मनात परिक्रमा चालत पूर्ण करण्याची जिद्द होती. मी, माझ्याबरोबर असलेला मित्र नियमित लांब अंतर चालणारे/धावणारे आहोत. त्यानंतर आमचे बंधुराज. नियमित नसले तरी लांब अंतर चालण्याचा, धावायचा त्यांना सराव आहे. बाकी मंडळी चालण्याचा सराव नसलेली होती. त्यातही आम्हाला तो प्रवास पहाटे सूर्य आग ओकायच्या आधी किंवा संध्याकाळी सूर्य कलल्यावर करायचा नसून आम्हाला तो प्रवास सूर्य उगवल्यावर त्याच्या रखरखीत उन्हात करायचा होता आणि तेच मोठं आव्हान होतं. अगदी आमच्यासारख्या walkers साठी देखील. पण आमचा मैय्यावर विश्वास आणि श्रद्धा होती. आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत होतो.
हळूहळू सूर्य उगवला. आता रस्ता अगदीच ओसाड होता. आजूबाजूला एकही झाड नसलेले, सुकलेले खुरटे गवत असलेले विस्तीर्ण पठार. आणि त्याच्या मधोमध पेन्सिलीने रेष काढल्यासारखा क्षितिजापर्यंत जाणारा आमचा रस्ता. लांबवर दिसत असलेले मृगजळ, आकाशातून आग ओकत असलेला सूर्य आणि “नर्मदे हर” जप करत त्या रस्त्यावर चालत असलेले आम्ही. असेच दहा किलोमीटर झाले आणि एक झोपडी दिसली. मी आणि माझ्याबरोबर पुढे असलेला मित्र थांबलो. मागच्यांना आम्ही थांबलो असल्याची कल्पना फोन करून दिली. नशीब अजून तरी नेटवर्क जिवंत होतं. अन्यथा व्होडाफोनचं नेटवर्क आणि महावितरणची वीज गुल होण्याच्या बाबतीत आजही एकमेकांना तुल्यबळ स्पर्धा देऊ शकतात. हळूहळू सगळे त्या झोपडीत जमा झालो. ते एक रेस्टॉरंट होतं. लाकडाचे दोन ओंडके बसायला होते. तुरळक प्लास्टिक खुर्च्या. फक्त डोक्यावर गवताचं छप्पर होतं ही जमेची बाजू. तिथे खायला सामोसे होते आणि चहा. मुंबईतही सामोसे न खाणाऱ्या आम्ही तिथे काहीही खाणं अशक्य होतं. आमचे चिवडा वगैरे ड्राय snacks तसेही आमच्या गाडीत होते. आणि गाड्या आता आम्ही झोपडीजवळ बोलावल्या होत्या. आम्ही तिथे चहा प्यायला. गाडीतून काढून पाणी प्यायलो. आमच्यातील दोघे आता गाडीत बसले आणि पुढील यात्रा गाडीने करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. बाकीचे सहा जण चालू लागलो. आता कुठेही न थांबता घांघा गावातील घांघी घाटापर्यंत पोहोचायला.
आम्ही चालायला सुरुवात केली. आताच ऊन इतकं कडक होतं तर दुपार झाल्यावर ते काय असेल ह्या कल्पनेने थरकाप उडत होता. खरं तर पहिल्याच दिवशी गाडीतून दोन मिनिटे उतरून मी त्याचा अनुभव घेतला होता. आम्ही ऊन आणखी तापायच्या आधी घांघी घाटावर पोहोचायच्या निर्धाराने निघालो. मधेच लागलेलं एखादं विरळ वस्तीचं आणि आठ-दहा घरांचं गाव वगळता त्या रस्त्यावर गाड्या सोडा, माणसेही दिसत नव्हती! डोक्यावर सूर्य, पायाखाली तापलेला रस्ता आणि नर्मदेचे नामस्मरण करत चालणारे आम्ही इतकंच विश्व होतं. मुंबईहून निघताना आम्हाला अपेक्षा होती की आमच्यासारखे आणखी लोकही असतील आणि आम्हाला वाटेत भेटतील. पण त्या वैराण रस्त्यावर चिटपाखरू देखील नव्हतं. मित्राच्या जिओ फोनमध्ये असलेल्या नेटवर्कच्या जोरावर आम्ही map फॉलो करत घांघा घाटाकडे निघालो होतो. कालच ज्या उन्हात केवळ दोन मिनिटे उभा राहिल्यावर मी गाडीच्या गारव्यात पळून आलो होतो त्याच उन्हात मी आज अनेक किलोमीटर्स चालत होतो. मैय्याची शक्ती किंवा आमची श्रद्धा ते जे काही होतं ते आमच्याकडून तो प्रवास करून घेत होतं. Trust me, मुंबईत इतक्या उन्हात मला एक किलोमीटर चालण्याचे लाख रुपये दिले तरी मी चालणार नाही. आणि कोणीही चालू नये. मुंबईच्या हवेत आर्द्रता असल्याने घाम तरी येतो. आम्ही चालत होतो तिथे हवा अतिशय कोरडी होती. त्यामुळे फक्त उन्हाच्या झळा लागत होत्या. शरीरात जात असलेल्या उष्णतेचा घामावाटे निचरा देखील होत नव्हता. पण like I said… आम्ही भारावल्यागत किंवा possessed असल्यासारखे चालत होतो. माश्याचा फक्त डोळा दिसणाऱ्या अर्जुनासारखा आम्हाला map वर फक्त घाघा घाट दिसत होता आणि आम्ही चालत असताना कमी होणारा remaining distance चा आकडा आम्हाला उभारी देत होता. “आता सातच उरलेत. म्हणजे रोज चालतो त्याच्या इतके किंवा कमी.” “हे ऊन नसतं ना तर कधीच पोहोचलो असतो.” “ए, थोडं अंतर धावूया का?” “नको ए बाबा, sun stroke होईल. स्टंट नको. गुपचूप चाल.” अशा गप्पा मारत लक्ष्यावर लक्ष ठेवून आम्ही चालत होतो. शेवटचे दोन ते तीन किलोमीटर रस्ता दगडातून, खडबडीत असा आहे. तो पार करून आम्ही घाघा घाटाच्या जवळ आलो आणि आम्हाला मैय्याचं अथांग पात्र दिसलं. उन्हाळ्यातही इतकं विस्तीर्ण होतं तर पावसाळ्यात दुथडी भरून वाहताना ते किती सुंदर दिसत असेल ह्या कल्पनेनेच त्या उन्हात अंगावर थंड तुषार उडाल्यासारखं वाटलं.
आम्ही दोघे इतरांची वाट पाहू लागलो. हातात वेळ असल्याने मी आणि मित्राने यथेच्छ फोटो काढले एकमेकांचे. मग थोड्या वेळात गाडीत बसलेले दोघे गाडीतून आले. आणखी फोटो सेशन झालं. आम्हाला एका मोठ्या झाडाच्या सावलीत आसरा मिळाल्याने जरा थंड वाटत होतं. मग साधारण अर्ध्या तासाने चालणाऱ्यांची पहिली batch आली. मग थोड्या वेळात आणखी दोघे आले. तिथेच एक घर आहे. आम्ही तिथे जाऊन “पाण्याचा पंप” नामक खुणेची जागा नक्की कुठे आहे ह्याची चौकशी केली. त्या घरात एक आजी आणि आजोबा होते. त्यांनी आस्थेने आम्हाला बसायला सांगितलं. आम्हाला पाणी दिलं. इतक्यात शेवटची batch पण आली. आजींनी आम्हाला काळा चहा दिला. पपई कापून पुढे केली. शेजारीच असलेल्या मारुतीच्या लहानशा देवळात आजोबा आणि आमचा रोहित ह्यांचा भक्तिमय सत्संग संवाद सुरू झाला. आमच्याबरोबर असलेल्या मुली बूट वगैरे काढून आजींशी गप्पा मारत त्यांच्या घरात स्थिरावल्या आणि पंख्यासमोर बसून आजींशी गप्पा मारू लागल्या. शेवटी मी विचारलं त्यांना की “आजींना यंदा हळदीकुंकवाचं आणि आजी-आजोबांना मेहुण म्हणून आमंत्रण दिलं की नाही?”
आमच्या गाड्या आमचा लंच आणायला मंडलाला परत गेल्या होत्या. तिवारी गुरुजींनी आमच्यासाठी लंच पाठवायची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली असल्याने आमचा लंच सोर्स करण्याचा एक मोठा त्रास वाचला होता. गाड्या यायला किमान एक-दीड तास अवकाश असल्याने आम्ही त्याच घराच्या बाहेर आणि बायका मस्तपैकी आत पंख्यासमोर गप्पा मारत बसलो होतो. थोड्या वेळात आधुनिक हरिश्चंद्र रोहितने त्या देवळाचे पुजारी कम केअरटेकर असलेल्या आजोबांना घसघशीत दक्षिणा दिली आणि आम्ही नदीच्या सुकलेल्या पात्रातच शेड उभारून तयार केलेल्या बोटीच्या त्या धक्क्याकडे निघालो. तिथून बोटीने तट परिवर्तन केल्यावर पैलतीरावर पाण्याचा पंप नामक सुप्रसिद्ध जागा होती, जिथे आमचे ड्रायव्हर आमचं जेवण घेऊन येणार होते. आम्ही बोटीत बसून पैलतीरावर आलो. तट परिवर्तन पूर्ण झालं होतं. परिक्रमेतील चालण्याचा भाग संपला होता. आम्ही सर्वांनी अंदाजे २८ किलोमीटर अंतर उन्हात पायी चालत पार केलं होतं!
मी, बंधुराज आणि नियमित चालणारा मित्र वगळता बाकी सर्वांसाठी ही बाब निश्चितच अत्यंत अभिमानाची आणि समाधान देणारी होती. सगळे आता त्या हातपंपाने पाणी शेंदून, थंड पाण्याने चेहरा धुऊन, ते पाणी पिऊन झाडाच्या सावलीत जेवणाची वाट बघत बसलो. तिथे बसल्यावर समोर संथपणे वाहत असलेली नर्मदा मैय्या जणू आम्हाला “शाब्बास! मी प्रसन्न आहे” असंच सांगत असावी असं वाटत होतं. पण इतक्या प्रचंड उन्हात, मध्ये मध्ये फार कठीण असलेल्या वाटेवर आम्ही सर्वांनी आणि विशेषतः चालण्याचा अजिबात सराव नसलेल्या आमच्याबरोबरच्या काही लोकांनी इतकं अंतर चालत पार केलं ते मैय्यानेच करून घेतलं होतं. पण तरीही ती आम्हालाच शाबासकी देत होती. आम्हा सर्वांच्याच मनात त्यावेळी एक कृतकृत्य, काहीतरी साध्य केल्याची, परिपूर्ण आणि समाधानाची भावना होती. कदाचित आम्हाला काय वाटत होतं ते शब्दांत सांगायला थोडं कठीण आहे. पण ते जे काही होतं ते अनुभवण्यासारखं आहे. थोड्याच वेळात जेवण घेऊन गाड्या आल्या. तिवारी गुरुजींनी बटाट्याची भाजी, पोळी, दही, पापड, लोणचे, केळी असं साधं पण सात्त्विक जेवण पाठवलं होतं. आम्ही ड्रायव्हरना प्रत्येकी दोन असे ताकाचे टेट्रा पॅक आणायला सांगितले होते. पत्रावळीवर झकास आणि पोटभर जेवून त्यावर ताक पिऊन आम्ही हॉटेलकडे कूच केली. हॉटेलला पोहोचल्यावर मस्त अंघोळ करून सगळ्यांनीच झकास ताणून दिली. संध्याकाळी व्यास नारायण मंदिरात जाऊन संकल्प पूर्ण करायचा होता आणि कन्या पूजन देखील करायचं होतं.
संध्याकाळी आम्ही परत वडापने निघालो. व्यास नारायण मंदिरात कन्या पूजनासाठी लागणारे खाद्यपदार्थ तिवारी गुरुजीच आणणार होते. मला वाटतं तिवारी गुरुजी हा आम्हाला नशिबाने मिळालेला हुकुमाचा एक्का होता. केवळ आमच्या धार्मिक बाबींची पूर्ण जबाबदारी घेऊन न थांबता आमच्या जेवणाचीही सोय स्वखुशीने करणारा. आज तिवारी गुरुजी त्यांची पत्नी, दोघी जुळ्या मुली, त्यांचा भाऊ, त्याची बायको आणि त्यांची मुलगी सर्वांना घेऊन आले. आमच्याबरोबरही स्त्री वर्ग असल्याने त्यांना घराच्या स्त्रियांना आणायला अडचण वाटली नसावी. त्यांनी सर्वांची ओळख करून दिली आणि म्हणाले, “ह्या गावात जर कन्या पूजनाला लहान मुली मिळाल्या नाहीत तर तुमची गैरसोय व्हायला नको म्हणून आमच्या चिमुरड्यांना घेऊन आलो.” इतका आमचा विचार करणारा माणूस त्या परक्या मुलुखात भेटलेला पाहून मला फार बरं वाटलं. यथासांग संकल्पपूर्ती केली. तिवारी गुरुजींनी कन्या पूजनासाठी खीर आणि पुरी आणली होती. त्यांनी गावात जाऊन काही लहान मुली येऊ शकतात का ह्याची चौकशी केली आणि अचानक पंधरा-वीस मुली आणि त्याच वयाची चार-पाच मुलं देखील मंदिराच्या अंगणात हजर झाली. आम्हाला चार-पाच मुलींची अपेक्षा असताना इतक्या मुली आल्याने आमचं कन्यापूजन आम्हाला तीन-चार पट जास्त पुण्य देऊन गेलं. सगळ्या चिमुरड्यांना खीर-पुरी, पेढा, काहींना कॅशची पाकिटं, काहींना काही भेटवस्तू दिल्या. पोरांना पण खाऊ दिला. खूप समाधान वाटलं. मग वर जाऊन त्याच परिसरात असलेल्या इतर देवळांना भेट देऊन दर्शन घेतलं. निघताना तिवारी गुरुजींना आम्हाला पाठवलेल्या लंचचे किती पैसे विचारल्यावर त्यांनी, “त्याचे काही पैसे नाहीत. ती आमच्या तर्फे परिक्रमा करणाऱ्यांची म्हणजेच मैय्याची सेवा होती,” असं उत्तर दिलं. पण आम्हाला विनाकारण आमच्या जेवणाचा भार त्यांच्या खिशावर टाकायचा नसल्याने आम्ही त्यांच्या भावनेचा मान राखत त्यांना दक्षिणा आणि जेवणाचे व्यवस्थित पैसे UPI ने ट्रान्सफर केले आणि त्यांचा निरोप घेऊन निघालो. इतकी चांगली माणसं आम्हाला प्रवासात भेटली ही पण मैय्याचीच कृपा.
आता मुख्य परिक्रमा सुफळ संपूर्ण झाल्यावर आमच्याबरोबर असलेल्या महिलांमधील shopping freak Mumbai girls जाग्या झाल्या. त्यांनी कालच वाटेत हेरून ठेवलेल्या एका इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानात जाऊन न भूतो ना भविष्यती अशी खरेदी केली. ती इतकी केली की दुकानाचा मालक त्याची गाडी घेऊन स्वतः आम्हाला हॉटेलवर सोडायला तयार झाला असता आणि आमचा डिनर देखील त्याच्यातर्फे त्याने आनंदाने दिला असता. असो, हा गमतीचा भाग सोडल्यास आम्ही हॉटेलच्या जवळच असलेल्या आणि संध्याकाळीच जाऊन मेन्यू बघितलेल्या चतुरे नामक रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो. मला हॉटेलमध्ये येऊन laptop वर थोडं काम असल्याने मी मसाला डोसा ऑर्डर केला, जेणेकरून तो पटकन संपवून मी हॉटेलला येऊ शकेन. पण नेमके आम्ही गेलो त्याच वेळी आणखी वीस-पंचवीस लोकांचा एक ग्रुप तिथे लग्नाचा वाढदिवस साजरा करायला आला होता. इतर वेळी एका तासात एक इडली सांबार, दोन चहा इतकाच वर्कलोड असणाऱ्या त्या रेस्टॉरंटचा स्टाफ अचानक त्यांच्यावर चाळीस-पन्नास पंजाबी, चायनीज, भारतीय, दक्षिणी पदार्थांच्या ऑर्डर्स आदळल्यावर भंजाळला. आता वेळ लागणार लक्षात आल्यावर मी माझी ऑर्डर कॅन्सल करून काढता पाय घेतला. वाटेतून फोन करून मी बंधुराजांना माझ्यासाठी दोन प्लेन रोटी आणि एखादी भाजी पार्सल आणायला सांगितली आणि रूमवर गेलो. मी रूमवर माझं काम संपवलं तरी ह्या लोकांचा पत्ता नव्हता. ते परत यायला जवळजवळ सव्वा ते दीड तास गेला. आणि माझा वेळेत हॉटेलवर येऊन काम संपवायचा निर्णयच योग्य होता हे लक्षात आलं. ते येईपर्यंत मी पण काम संपवून गप्पा मारायला, झोपायला मोकळा झालो होतो. थोडा वेळ गप्पा मारून सगळे आपापल्या खोलीत झोपायला गेले. दिवसभर उन्हात चालून आलेल्या थकव्यामुळे अंथरुणावर पाठ टेकताच झोप लागली. उद्या अकरा वाजता चेक आउट करून जबलपूरला जायचं होतं. त्या आधी वाटेत बेडाघाटमध्ये बोट राईड करायची होती. धुवादार नावाचा धबधबा पाहायचा होता आणि लड्डू गोपाल नामक एका विलक्षण ठिकाणाला भेट द्यायची होती.
आजचा दिवस मात्र अविस्मरणीय आठवणींचा आणि आध्यात्मिक, धार्मिक पातळीवर काहीतरी साध्य केल्याचा आनंद आणि समाधान देणारा होता. आम्ही फक्त चाललो होतो. परिक्रमा आमच्याकडून मैय्याने पूर्ण करून घेतली होती. माझ्या बकेट लिस्टमधील एका इच्छेसमोर आज टिकमार्क लागला होता. त्याचं पूर्ण श्रेय मी आमच्या कोहली आणि रोहितला देतो. चांगली संगत आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडवते हे आज परत सिद्ध झालं होतं. असो. बेडवर पडल्यावर आमच्या डोळ्यांवर झोप होती आणि मनात मैय्याचे कोटीकोटी आभार होते. डोळ्यासमोर नर्मदेचं ते विशाल पात्र दिसत होतं आणि त्या उजाड रस्त्यावर आमचं बोट धरून आम्हाला चालवणारी तेजःपुंज नर्मदा मैय्या दिसत होती!
(© मंदार जोग)
लेखाची लिंक अवश्य कॉपी करून नर्मदा परीक्रमा करण्याची इच्छा असलेल्या सर्वांना पाठवा. सर्वांना माहितीचा उपयोग होऊ द्या.
आमचे whatsapp channel join करा- whatsapp.com
आम्हाला फेसबुकवर फॉलो करा- https://www.facebook.com/mandar.jog.31
इतर प्रवास वर्णने- प्रवास वर्णन
हे पण वाचा- वेळ
