गणपती, उत्सव कि इव्हेंट?
आमच्या दक्षिण मुंबईत, माझ्या घरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या भुलेश्वर भागातील भुलेश्वरचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपतीची २२ फूट उंचीची मूर्ती आगमन मिरवणुकीत पडून तिच्याखाली दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आणि अनेक लोक जखमी झाले!
ही घटना ऐकून, पाहून प्रचंड वाईट तर वाटलंच, पण त्याहूनही जास्त संताप आला. ज्या लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने आमच्या गिरगावातच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती, त्या हेतूला, टिळकांच्या त्या विचारसरणीलाच हरताळ फासणारे इव्हेंट आता गणपती उत्सव म्हणून साजरे होताना बहुतांश ठिकाणी दिसू लागलेले पाहून टिळकांची आणि गणपतीची माफी मागतो मी मनातल्या मनात!
श्रद्धेचा बाजार मांडणारी धंदेवाईक गणेशोत्सव मंडळे गणेशोत्सवापेक्षा आपापल्या तंबूत मनोरंजन आणि झगमगाट निर्माण करून जास्तीत जास्त गर्दी खेचण्याच्या प्रयत्नात असतात. अर्थात, त्यामागे गर्दीच्या श्रद्धेतून मिळणारी रोख रक्कम, दागदागिने आणि त्यातून गब्बर होणारे कार्यकर्ते हा धंदा असतो. सगळीच मंडळे तशी नाहीत. पण तशी नसलेली मंडळे खूप दुर्मिळ आहेत, असं नक्कीच म्हणता येईल. अशा बाजारू मंडळांच्या तंबूत जिथे बाप्पा लपवून ठेवून लोकांना रांगांमध्ये तिष्ठत उभं ठेवलं जातं, तिथे मला तरी देवाचं अस्तित्व जाणवत नाही. गणपती बुद्धीची देवता आहे. ती अशा बाजारू झगमगाटात कधीच थांबणार नाही!
मग ह्या श्रद्धेच्या बाजारात देवाचेच राजे, महाराजे, सम्राट निर्माण केले जातात. लोकांना आकर्षित करायला त्याच देवाला मग नवसाला पावणारा, मागाल ते देणारा, विघ्नहर्ता, कृपाकर्ता, रोग बरा करणारा, संकट दूर करणारा अशी बिरुदं चिकटवली जातात. त्याचं भरपूर मार्केटिंग आणि ब्रँडिंग केलं जातं. सिनेमातील नट-नट्या, राजकारणी ह्यांना बोलावून फोटो काढून प्रसिद्ध केले जातात. आगमन, विसर्जन मिरवणुकांच्या व्यतिरिक्त तंबू पूजन, ट्रॉली पूजन, हातगाडी पूजन, पाय पूजन आणि काय-काय पूजन असे लक्ष आणि गर्दी खेचायचे नवनवीन उद्योग तयार केले जातात. आणि सर्वात वाईट म्हणजे प्रचंड आकाराच्या, प्लास्टर ऑफ पॅरिस ह्या सहज विघटन न होणाऱ्या पदार्थाच्या, अवाढव्य उंचीच्या मूर्ती बनवल्या जातात. त्यात प्रचंड स्पर्धा असते. आज झालेला अपघात देखील अशाच एका मोठ्या २२ फूट उंच मूर्तीला झाला आहे!
सरकार आणि न्यायव्यवस्था वर्षानुवर्षे होणारे अपघात बघूनही काही कडक नियम का करत नाही? मूर्तीची उंची जमिनीपासून जास्तीत जास्त १० फुटांची असावी आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पूर्ण बंद कराव्या, असा आदेश का काढत नाही? मतांचं राजकारण म्हणून चुकीच्या प्रघातांना प्रोत्साहन देताना निष्पाप लोकांचे जीव जातात, त्याबद्दल सरकार आणि व्यवस्था गप्प का बसतात? की एखादा नेता, अभिनेता किंवा एखादा शोबाजी करणारा व्यापारी मूर्तीखाली चिरडून मेल्यावरच सरकारला जाग येणार आहे? तसं असेल तर ते पण….
तीच गोष्ट आता धंदा, तमासगीर बायका नाचवण्याचा दहीहंडी इव्हेंट झालेल्या गोकुळाष्टमी सणाची. दर वर्षी थर लावायच्या भिकार जिवघेण्या स्पर्धेत भाग घेणारे अनेक मराठी तरुण खाली पडून आयुष्यभर जायबंदी होताना आणि जीव गमावताना आपण बघतो. पण हे इव्हेंट भरवणारे स्वतःच सरकार आणि लोकप्रतिनिधी असल्याने त्यावर वचक कोण बसवणार, असा प्रश्न पडतो. काढा की नियम, का पाच थरांपेक्षा जास्त थर लावायला कायद्याने बंदी आहे म्हणून. त्यातही थरांच्या बाजूला गाद्या किंवा जाळी लावणे अनिवार्य आहे. मग बघा हे भंपक, बाजारू आणि तरुणांच्या जीवाशी धंदे बंद होतात की नाही ते!
आणि ह्यात धार्मिक भावना वगैरे कोणाच्याही दुखावल्या जात नाहीत. असे कडक नियम करून बघा तर. गणपती मिरवणुकीत स्पीकरच्या भिंतींवरही बंदी टाकून बघा तर. ज्यांचे हितसंबंध गुंतले आहेत, ज्यांचे हे धंदे आहेत, ज्यांना ह्यातून पैसे मिळतात, ते मूठभर लोक सोडून इतर कोणीही हिंदू, मराठी माणूस ह्या निर्णयाला विरोध करणार नाही. उलट सरकारला शाबासकीच देतील. कारण सुजाण, विचारी आणि खरी भक्ती असलेल्या सर्वांचा देव त्यांच्या मनात आणि त्यांच्या अस्तित्वात असतो. त्यांना तो धंदेवाईक इव्हेंटमध्ये शोधावा लागत नाही!
सरकारने गणपतीची मूर्ती आणि गोविंदाच्या थरांची उंची ह्यावर कडक बंधने घातल्यास राज्यातील जनता, उंचीच्या हव्यासाने बळी गेलेल्या लोकांचे नातेवाईक तसेच स्वतः गणपती आणि बाळकृष्ण हे देव देखील सरकारला आशीर्वाद देतील! पण कोणत्याही पक्षाच्या सरकारमध्ये ही हिंमत आणि इच्छाशक्ती असेल का, हा खरा प्रश्न आहे!
कालच्या घटनेत बळी गेलेल्या मृतांच्या आत्म्यांना सद्गती लाभो आणि जखमी लवकर बरे होवोत आणि सरकारला वर उल्लेख केलेली बंदी घालायची हिंमत आणि बुद्धी द्या इतकीच त्या गजाननाच्या चरणी प्रार्थना!
