आजी | Mandar Jog

आजी…(©मंदार जोग)

लहानपणी उन्हाळा, हिवाळा, दिवाळी सगळ्या सुट्टीत आम्ही आजोळी जायचो. मी माझा भाऊ बॅग भरून तयार असायचो. कधी आई सोडायची तर कधी बाबा. कधी मामा किंवा आजोबा आम्हाला न्यायला यायचे. आमचा मावस भाऊ देखील त्याच दिवसात आजोळी येत असे. आजोळी आजोबा, मामा, मामी, आमच्याहून लहान मामेभाऊ आणि आजी होते. सगळे आमच्यावर प्रेम करत. पण आजीची माया वेगळीच होती. मी तर आजोळी जाण्याला “आजीकडे जाऊया” असे म्हणत असे. 

उन्हाळ्याची सुट्टी असेल तर आजोबा डझनावारी आंबे आणून आम्हाला आमरसाची अंघोळ करता येईल इतका आमरस करायचे. मामा आणि मामी ऑफिसातून येताना काहीतरी खाऊ घेऊन यायचे. दिवसा सगळे कामावर गेले की आम्ही नातवंड आणि आजी घरी असायचो. आमची आजी कर्णबधीर होती. कानाला यंत्र लावायची. गोरी गोरी पान, शिडशिडीत देहाची आजी खूप सात्विक वाटायची. आजी आमच्या आवडीचा स्वयंपाक करायची. आम्हाला न आवडणाऱ्या भाज्या केल्या तर त्या खाल्यावर आम्हाला एक एक रुपया द्यायची! फार मस्ती केली की धपाटे देखील द्यायची. आम्हाला पकडायला आमच्या मागे धावणारी आजी म्हातारी आहे हे तेव्हा जाणवायचं नाही. ती आमच्यातलीच एक वाटायची! बिचारी दमायची कधीतरी. पण खुप प्रेम करायची!

दुपारी दार, खिडक्या लावून अंधार करून आम्हाला गोष्टी सांगत झोपवायची. संध्याकाळी उठल्यावर चहा आणि त्यात बिस्कीट किंवा बनपाव खाऊन झाला की संध्याकाळी आम्हाला चौपाटीवर न्यायची. तेव्हा फार गर्दी नसे चौपाटीला. आम्ही वाळूत खेळताना आजी बरोबर आणलेला अंक किंवा पुस्तक वाचायची! संध्याकाळी घरी आल्यावर अंगभर अडकलेली वाळू काढत अंघोळी झाल्या की आजी परवचा म्हणून घ्यायची! 

रात्री आजी आणि आजोबा पत्ते खेळत. रमी! आजोबांचे दोन चष्मे होते. त्यांचा चाळीशीचा चष्मा आम्हाला खास पत्ते खेळण्यासाठी घेतलेला चष्मा वाटत असे. मला तर अनेक वर्षे तो पत्ते खेळायचा चष्मा वाटत होता आणि मी एका दुकानात जाऊन त्या विषयी चौकशी देखील केली होती! आजोबा फुल इंव्हॉल्व्ह होऊन खेळत आणि आजी एखाद्या लहान मुलाशी खेळावं तशी खेळत असे. एखादं पान अडकलं की आजोबा हायपर होत. घाण पत्ता आला की तो जोरात आपटत. ते पाहून आजी खुसफूसत हसत असे. आम्ही आजीच्या आजूबाजूला तिच्या मांडीवर डोकं ठेऊन पसरलेले जोरात हसत असू. मग आजोबा आमच्यावर चिडत. आजी म्हणायची “कोणतं पान हवंय? मी देते!” ह्यावर आजोबा आणखी चिडत. म्हणत “मला काय तुझा नातू समजतेस का?” आजी हे ऐकून आणखी हसत असे. अनेकदा आजोबांची रमी कमी वेळा लागल्यास मग आजी हातातील रमी झाली तरी आजोबांची झाल्याशिवाय दाखवत नसे. 

रात्री आम्ही जमिनीवर गाद्या घालून त्यावर लायनीत झोपत असू. आजोळी दोन्ही बाजूला ग्यालारी होती. पुढला दरवाजा बंद असला तरी मागील दरवाजा अनेकदा उघडा असे. त्यातून आकाश आणि चंद्र दिसायचा. आजोळी दोन्ही बाजूला नारळाची अनेक झाडं होती. त्या झावळ्यातून रात्री दिसणारा चंद्र थोडा भयावह वाटायचा. पण आजी त्या कडेला असे. आजी डोक्याशी टेबल लॅम्प लावून रात्री वाचन करायची. त्या लॅम्पच्या उजेडात आजीचा देवीसारखा चेहरा दिसला की चंद्राची भीती पळून जायची! मस्त झोप लागायची!

आजीला वाचनाची प्रचंड आवड होती. विविध विषयांवरची पुस्तकं, दिवाळी अंक, इतर अंक आजी वाचत असे. ती सावरकर भक्त होती. तिच्याकडे सावरकरांच्या, त्यांच्या बद्दलच्या शेकडो पुस्तकांचा खजिना होता जो मामाने आजी गेल्यावर काही वर्षांनी योग्य व्यक्तीला देऊन टाकला. आजी फार शिकली नव्हती. पण तिच्या मुलांचं चांगलं शिक्षण व्हावं ह्या हेतूने ती जिद्दीने कोकणातून मुलांना घेऊन मुंबईला आली. मुलांची शिक्षण योग्य होतील ह्याची तिने काळजी घेतली. 

तिला यंत्र न लावता ऐकू यायचं नाही. पण यंत्र लावून ती जे जे चांगलं ऐकायला मिळेल ते ऐकायचा प्रयत्न करायची. जे जे चांगल आहे ते ते लोकांना द्यायची. तेव्हा फक्त दूरदर्शन हे एकच चॅनल होतं. त्यावर दर रविवारी आठवड्याभराच्या कार्यक्रमाची माहिती सप्ताहिकी नामक कार्यक्रमात देत. आजी तो कार्यक्रम मशीन लावून मनापासून बघत असे आणि भक्ती बर्वे ने सांगितलेली लिस्ट पाटीवर लिहून घेत असे. खरं तर ठराविक कार्यक्रम होते आणि त्यांच्या वेळाही ठरलेल्या होत्या. पण आजीचा तो एक विरंगुळा होता. 

आजीने तिच्याकडे कामाला येणाऱ्या बाईंच्या मुलीला लिहा वाचायला शिकवलं तर ती आम्हाला कशी सोडेल? आम्ही फुल सुट्टीच्या मूड मध्ये आणि आजी अभ्यासाच बोलू लागे. मी आणि भाऊ मराठी शाळेत प्रायमरीत होतो. इंग्रजी विषय पाचवी पासून होता. पण आजीने आम्हाला इंग्रजी मुळाक्षर प्रायमरीच्या कोणत्यातरी सुट्टीत शिकवली. आमचे पाढे, पावकी, निमकी, पाऊणकी आजीने खूप लहान वयात करून घेतले. रामरक्षा, गणपती स्तोत्र, अनेक श्लोक आजीने पाठ करून घेतले जे आयुष्यभर लक्षात आहेत! बरं ह्या सगळ्यासाठी बक्षीस पण असायचं. त्यामुळे आम्ही मनापासून सर्व पाठ करायचो. बक्षीस म्हणून कधी एक रुपया, कधी मोठ्या दादर चौपाटीवर फिरायला जाणे तर कधी घराजवळ असलेल्या थिएटर मध्ये सिनेमा बघणे. मला बक्षीस म्हणून आजीबरोबर जीतेंद्रचा हिंदी भाषेतील आतिष सिनेमा आणि जावयाची जात नामक मराठी सिनेमे पाहिल्याची आठवण आहे! अजूनही काही पाहिले असतील पण समहाऊ हे दोन लक्षात राहिलेत!

आजी प्रचंड प्रोग्रेसिव्ह विचारांची होती. मृत्यूनंतर नेत्रदान, देहदान करावे हे तिने लिहून ठेवले होते. त्यानुसार आम्ही ते केलं! ती प्रचंड निडर, तत्वाला चिकटून जगणारी तरीही खुप भोळी आणि प्रेमळ होती. आजी अत्यंत उत्तम आणि हौशी सुगरण होती. मुळात अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शक मन आणि आत्मा असलेल्या दुर्मिळ लोकांपैकी ती एक होती! पुण्यात्मा असल्याने ती गेली देखील कोणताही रोग न होता. कोणताही त्रास न होता. एका सकाळी शांतपणे पलंगाला टेकून बसली आणि तशीच गेली!

ती तिच्या गावातील शाळेची पाहिली विद्यार्थिनी (फक्त मुलं जात असलेल्या शाळेत शिकायला आलेली पाहिली मुलगी) होती. ती गेल्यावर “आपल्या शाळेतील पाहिली विद्यार्थिनी गेली” असा बोर्ड शाळेत लागला होता! 

आजही पाढे म्हणताना, चौपाटीवर गेल्यावर कधीतरी आजीची आठवण येते. अष्टमीला महालक्ष्मी पाहिली की त्यात आजी दिसते. आजी तशीच होती. गोरी, तेजस्वी आणि प्रेमळ! आजी आहे ह्या जगात. देहदान केलेल्या तिच्या देहावर human anotomy शिकून डॉक्टर झालेल्या मुलांच्या रुग्णसेवेत आजी आजही आहे. आमच्या जडणघडणी आणि संस्कारात, आमच्या इंग्रजी आणि वज्रलेप झालेल्या पाढ्यात, आजही कॅल्क्युलेटर पेक्षा जास्त वेगाने सामान्य आकडेमोड आम्हाला करता येण्यात आजी आजही जिवंत आहे आणि कायम राहील!

हे पण वाचा-

सख्या रे …

ट्वेंटी थ्री

गुंतता हृदय – सर्व भाग

मृगजळ- सर्व भाग

व्हॅलेंटाईन डे- भाग १

रिफ्लेक्शन भाग १

आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा

आमच्या लघुकथा लघुकथा

माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख

आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

ललित

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!