बाप्पा | Mandar Jog

बाप्पा –

माधव- वसंता, नाही रे जमणार यंदा. भाऊंच काही खर वाटत नाहीये to be honest.. आणि आता हातात दिवस पण नाहीयेत. गणपती चार दिवसांवर आले.

वसंत- अरे दादा पण भाऊंच्या शिवाय गणपती म्हणजे…गेली साठ वर्ष तेच करत आहेत ना पूजा?

माधव- (हुंदका आवरत) काही उपाय आहे का? डेंग्यू च निमित्त आणि दोन दिवसात मल्टीपल ऑर्गन फेल्युअर…व्हेंटिलेटर आणि कोमा…विश्वास बसत नाहीये…पण जे आहे ते आहे… आम्ही गणपतीला यायचं ठरवून सगळी तयारी केली होती. सर्वांच्या रजा टाकल्या होत्या. नवे कपडे शिवायला टाकले होते. भाऊंसाठी नवी टोपी, धोतर आणि कुर्ता घेतला होता. त्याचं आवडत हिना अत्तर घेतलं होत…पण आता सगळंच निरर्थक झालंय वसंता…..

वसंत- पण काहीच होप नाहीत का रे?

माधव- मल्टीपल ऑर्गन फेल्युअर आणि त्यात वय त्याचं. अरे भाऊ सोड…आज मी साठीचा झालो आणि तू चार वर्षे मागे. आपल्या कीशीने पण पन्नाशी ओलांडली. भाऊ एटी सिक्स रे आता. आणि तोच प्रॉब्लेम आहे असं डॉक्टर म्हणाले. वय कमी असतं तर चान्सेस जास्त होते. बॉडी रीस्पोंड करायला पाहिजे ना औषधांना.

वसंत- हम्म..म्हणजे तुम्ही नाही येणार तर यंदा कोकणात?

माधव- शक्य नाहीये. फक्त गणपती निर्विघ्न उरकून जाऊ देत. मला तर सुतक लागायची भीती…

वसंत- दादा अरे काय बोलतो आहेस तू?

माधव- जे बघतोय ते बोलतोय वसंता. अरे आपले भाऊ…इतका जॉली माणूस त्या नळ्यांमध्ये गुरफटलेला नाही बघवत रे वसंता. सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही. अगदी ताप आला त्या दिवशी सकाळी पण पंचवीस सूर्य नमस्कार घातले होते त्यांनी. अशी दणदणीत तब्बेत! पण गेल्या चार दिवसात अर्धे झालेत रे…

वसंत- होतील बरे भाऊ…

माधव- हम्म…पण जरा मनाची तयारी करा आणि गणपती मात्र व्यवस्थित करा. भाऊंनी केला असता तसा यथास्थित. त्यांना उत्सवात काहीही कमी असलेली चालणार नाही.

वसंत- हो दादा…ठेऊ?

माधव- हम्म…

माधव ने फोन कट केला आणि समोर बेडवर नळ्यांमध्ये गुरफटलेल्या त्यांच्या वडिलांना म्हणजे भाऊंना बघून आलेला हुंदका आवरला. दापोलीला जोश्यांच्या घरी जन्मलेल्या माधवचं शालेय शिक्षण दापोलीत झालं. भाऊंच्या वडिलांनी सुरू केलेली खानावळ होती दापोलीत. ती ते चालवत. माधवच्या नंतर वसंत आणि त्याच्या पाठीवर धाकटी कुसुम. तिला सगळे कीशी म्हणायचे. कीशीच्या जन्मानंतर वर्षभरात तिन्ही पोरांना भाऊंच्या मांडीवर सोडून त्यांची बायको एका लहानश्या आजारात गेली. त्या नंतर भाऊंनी पोरांची आई, वडील, मित्र, गुरू बनून त्यांना वाढवलं.

माधव पुढे इंजिनियरिंग करायला मुंबईत त्याच्या मावशीकडे राहायला गेला. वसंताला शिक्षणात फार गती नव्हती. तो भाऊंना खानावळीत मदत करू लागला. कीशी पुण्यात आत्याकडे राहून ग्रॅज्युएट झाली आणि त्याच बिल्डिंग मधल्या मनोहर आपटेशी लग्न करून सेटल झाली. गेली पंधरा वर्षे न्यू जर्सीला असते सहकुटुंब. माधव लार्सन अँड टूब्रो मध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून लागला आणि प्रमोशन मिळवत आज चांगल्या पदावर होता. भाऊंना त्याच्या हिरानंदानी मधल्या सत्तावीसाव्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीत बसून आरामाचं आयुष्य जगता यावं म्हणून काही वर्षांपूर्वी त्यांना हॉटेल मधून सक्तीची निवृत्ती घ्यायला लावून माधव मुंबईला घेऊनला होता. वसंताने आता त्या खानावळीचं उत्तम हॉटेल केलं होतं. दहा बारा अद्यावत एसी खोल्या होत्या. व्यवसाय तुफान होता. भाऊ मुंबईत सुना नातवंडात रमले. पण दर वर्षी गणपतीला कोकणात घरी जाऊन स्वहस्ते गजाननाची पूजा करायचा शिरस्ता मधीच मोडला नव्हता. पण यंदा मात्र ते व्हेंटिलेटरच्या मदतीने मृत्यूशी झुंज देत होते.

आणखी तीन दिवस तसेच गेले. गणेश चतुर्थीच्या आदल्या रात्री भाऊंची तब्बेत अचानक खालावली. पल्स खूप लो झाली होती. डॉक्टर तोंडाने होप्स देत होते पण त्यांची बॉडी लँग्वेज वेगळा संदेश देत होती! माधव वॉर्डच्या बाहेर बसून होता रात्रभर! त्याने वसंताला मेसेज केला होता. वसंताने विचारलेल्या “दादा आणू ना गणपती?” ह्या प्रश्नाला “हो” असा रिप्लाय लिहिताना माधवच्या गळ्यात आवंढा आला होता!

आज गणेश चतुर्थी. सकाळी डॉक्टरांनी माधवला स्पष्ट सांगितलं की कोणी नातेवाईक असतील तर कळवा. काही होप्स नाहीयेत. आम्हाला व्हेंटिलेटर काढायची परवानगी द्या.

माधव- पण डॉक्टर…

डॉक्टर- प्लीज. मी तुमच्या भावना समजू शकतो. मेडीकली he is alive पण फक्त व्हेंटिलेटर आहे म्हणून he is breathing. Else….

माधव- else काय डॉक्टर? म्हणजे?

डॉक्टर- प्लीज. तुम्ही व्हेंटिलेटर काढायची परवानगी द्या. There is no point…its over…तुम्ही निर्णय घ्या आणि कळवा…

हे बोलून डॉक्टर निघून गेला. माधव पायातील त्राण जाऊन तिथेच जमिनीवर बसला. हॉस्पिटल मधील गर्दी, नर्स, डॉक्टर, स्ट्रेचर्स हे सर्व आता स्लो मोशन मध्ये चालत असल्याचा त्याला भास होत होता. त्या गजबजलेल्या हॉस्पिटल मध्ये अचानक प्रचंड शांतता झाल्यासारखा त्याला कसलाही आवाज ऐकू येत नव्हता. माधव शून्यात नजर लावून बसला होता. अचानक त्याला खिशात मोबाईल व्हायब्रेट होत असल्याची जाणीव झाली. तो भानावर आला. वसंताचा मुलगा यशचा व्हिडीओ कॉल होता. माधव ने फोन घेतला.

यश- काका पूजा झाली. आरती सुरू करतोय. भाऊंना आरती करता येईल का?

हे ऐकून माधव ने फोन खिशात टाकला आणि तो ढसाढसा रडू लागला. मग रुमालाने डोळे पुसून त्याने फोन परत हातात घेतला आणि म्हणाला-

माधव- यश अरे शक्य नाहीये ते. भाऊ कोमा मध्ये आहेत. काही उपयोग नाहीये. मला त्यांना त्या अवस्थेत बघवतही नाहीये. तुम्ही करा आरती.

हातात आरतीचे ताम्हन घेतलेल्या वसंत ने फोन घेतला. माधवला गणपती दाखवला. माधव ने आपसुक हात जोडले आणि त्या तेजःपुंज बाप्पाला नमस्कार केला.

वसंत- दादा बघ ना काही करता येत असेल तर. भाऊंना आवडेल रे निदान आरती बघायला मिळाली तर.

माधव- मी म्हणालो ना वसंता. अरे शक्य नाहीये. आयसीयू मध्ये ते अलाऊ करणार नाहीत फोन वगैरे वर आरती लावण…आणि …आणि तसाही काही उपयोग नाहीये…भाऊ कोमात आहेत…त्यांना काहीच कळणार नाही…तुम्ही करून घ्या आरती पटापट.

वसंत- पटापट? का रे?

माधव- क..काही नाही. म्हणजे थांबू नका उगाच. भाऊंना आरती दाखवणं आता अशक्य आहे…

“अशक्य आहे” म्हणताना त्याच्या आवाजाला आलेला कंप वसंताला जाणवला.

वसंत- काय झालंय दादा? तुझा आवाज…

माधव- काही नाही रे. जरा खोकला झाला आहे मला. तुम्ही करा सुरू.

वसंत- दादा भाऊंना आरती…

माधव- वसंता मी म्हणालो ना त्यांना आरती दाखवणं शक्य नाहीये म्हणून? तू नको हट्ट करू..प्लीज आरती करून घ्या तुम्ही आणि उद्या विसर्जन झाल की मला कळवा..

इतक्यात माधवच्या मागून आवाज आला-

आवाज- साहेब मी नेऊ का तुमचा फोन?

माधव ने वळून पाहिलं तर एक वॉर्डबॉय होता.

माधव- तू..तुम्ही?

माणूस- मी मनोमय. आयसीयू मध्ये वॉर्ड बॉय आहे. आत्ताच आलो ड्युटीवर. तुम्ही चौदा नंबरच्या आजोबांचे रिलेटिव्ह ना?

माधव- हो पण…

मनोमय- मग द्या ना फोन. मी दाखवतो त्यांना आरती.

माधव – अरे पण आयसी यु मध्ये फोन…आणि भाऊ तर कोमात आहेत..

मनोमय- सर तुम्ही मला फोन द्या आणि इथे बसा शांत…मी बघतो काय करायचं ते..

माधव काही बोलायच्या आत मनोमय तो फोन घेऊन गेला देखील. इथे दापोलीच्या घरात वसंताने आरती सुरू केली. झांजा, घंटा आणि शंखनादात सुखकर्ता दुःखहर्ता सुरू झाली. मनोमय ने फोन भाऊंच्या छातीवर नळ्यांच्या आधाराने उभा ठेवला. निरांजन आणि समईच्या प्रकाशात बाप्पा तेज:पुंज दिसत होता. धुपाने वातावरण मंगलमय झालं होतं. इथे आयसीयू मध्ये देखील आरती दुमदुमत होती. अचानक भाऊंचे डोळे थोडे किलकिले झाले. हातापायांची बोटं हलली. आरतीचे स्वर त्यांच्या कानात घुमू लागले. भाऊंनी सावकाश डोळे उघडले. समोर फोनमध्ये घरचा बाप्पा ज्याची ते साठ वर्ष न चुकता भक्तिभावे पूजा करत त्याला पाहून भाऊंचे डोळे भरून आले आणि आपासूक हात जोडले गेले. पुढल्या सर्व आरत्या भाऊ मनातल्या मनात म्हणत बाप्पाला आपल्या अश्रूंनी न्हाऊ घालत होते.

इथे माधव डॉक्टरांसमोर कंसेंट फॉर्म सही करत होता. सही करता करता तो डॉक्टरना म्हणाला-

माधव- तुमचा स्टाफ खरंच चांगला आहे. आयसीयू वॉर्डचा वॉर्ड बॉय मनोमय आमच्या भाऊंना माझ्या फोन मधून आरती दाखवायला घेऊन गेलाय…तुम्ही प्लीज त्याला रागावू नका..

डॉक्टर- कोण वॉर्ड बॉय?

माधव- मनोमय म्हणाला तो.

डॉक्टर- ह्या नावाचा कोणीच वॉर्डबॉय नाहीये इथे कामाला.

माधव- हे कसं शक्य आहे डॉक्टर. तो…तो माझा फोन घेऊन गेला…म्हणजे तो चोर होता की काय?

माधव आता घाबरला होता.. इतक्यात आयसीयू मधून सिस्टर धावत आली आणि म्हणाली-

सिस्टर- सर १४ नंबर पेशंट रिवाईव झालाय. शुद्धीवर आहे. पल्स आणि सर्व व्हायटल्स परफेक्ट आहेत.

डॉक्टर- what? Its a mircle!

डॉक्टर तिच्याबरोबर धावत गेला. माधव त्यांच्या मागे गेला. भाऊ त्याला पाहून हसले. फोन त्यांच्या पोटावर होता. माधवाचा डोळ्यावर विश्वास बसला नाही. तो सिस्टर ला म्हणाला-

माधव- सिस्टर इथे तो एक माणूस आला होता ना मनोमय..ह्या फोन मध्ये त्याने भाऊंना आरती दाखवली…

सिस्टर- कोण मनोमय? इथे कोणीही आलेलं नाही आणि आयसीयू मध्ये आम्ही फोन अलाऊ करत नाही..

माधव फोन घेऊन बाहेर गेला. त्याने घाईत वसंताला व्हिडिओ कॉल लावला.

वसंत- बोल दादा.

माधव – वसंता मला आपला बाप्पा दाखव.

वसंताने फोन गणपती समोर धरला. माधव घरच्या गणपतीची मूर्ती पाहून गहिवरला. त्याने मनापासून नमस्कार केला आणि वसंताने फोन बाजूला घेताना त्याला काहीतरी दिसलं.

माधव- वसंता…मला मूर्ती परत एकदा दाखव रे…

वसंताने मूर्ती दाखवली. माधव ने नीट पाहून घेतलं आणि कॉल कट केला. आता माधव पायातील त्राण जाऊन खाली बसला होता. भाऊ दर वर्षी घरच्या बाप्पाला स्वतःच्या गळ्यातील गोफ घालत आणि उत्तर पूजेनंतर परत तो स्वतःच्या गळ्यात घालत. माधवला गळ्यात भाऊंचा गोफ घालून, ward boy च्या वेशातला मनोमय त्यांच्या दापोलीच्या घरातल्या मखरात बसलेला दिसला होता! माधव ने हात जोडले होते. तो ढसाढसा रडत होता. आयसीयू मध्ये डॉक्टरांनी भाउंचा व्हेंटिलेटर काढला होता!

©मंदार जोग

हे पण वाचा-

सख्या रे …

ट्वेंटी थ्री

गुंतता हृदय – सर्व भाग

मृगजळ- सर्व भाग

व्हॅलेंटाईन डे- भाग १

रिफ्लेक्शन भाग १

आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा

आमच्या लघुकथा लघुकथा

माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख

आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

ललित

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

One thought on “बाप्पा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!