चांद मातला भाग १०
चौदवी का चांद हो .. ” अभिसागर रेडिओ मिर्ची वर लागलेल्या गाण्याबरोबर गुणगुणत गाडी चालवता चालवता मधेच मीराकडे कटाक्ष टाकत होता..
दिवसभराच्या मानसिक दगदगीने शिणून गेलेल्या मीराला गाडीतल्या ए सी चा थंडावा मिळताच तिच्याही नकळत डुलकी लागली.. सीटवर मागे रेलून बसलेल्या मीराचा चेहरा लोभस आणि निरागस दिसत होता. क्षणभर अभिसागरला वाटलं गाडी थांबवावी आणि हे आपल्या शेजारीच पहुडलेलं चंद्रचांदणं असंच पाहत राहावं.. !!
त्याला अचानक पूर्वाची आठवण आली ..तीही अशीच गोड आणि लोभस मुलगी ! त्याच्या सोसायटीत राहणारी ! जराशी सावळी…. पण तरतरीत ..स्मार्ट !!
‘जब वि मेट ‘ मधल्या करीना कपूरची आठवण यावी तशी खट्याळ, अल्लड आणि सगळं जग आपल्यासारखंच चांगलं आहे असं मानत डोळे झाकून प्रत्येकावर विश्वास ठेवत जगणारी… उत्साहाचा नुसता धबधबा म्हणजे पूर्वा !!
सोसायटीच्या एका पार्टीमध्ये भेट झालेली अभिसागर आणि पूर्वा ची ! त्या पार्टीतच त्याला पूर्वा खूपच आवडली आणि पूर्वाला अभिसागर!
अभिसागर होताच तसा अवडण्यासारखा! लालगोरा.. घारा … उंच ! समोरच्यावर पटकन छाप पडेल अशी त्याची personality!!
त्यानंतर अभिसागर ला भेटायची एकही संधी पूर्वा सोडत नसे … प्रत्येक भेटीत पूर्वीपेक्षा जास्त आवडायची त्याला पूर्वा !
पण अभिसागरला अफेअर, लग्न वगैरे भानगडीत सध्या गुंतायचं नव्हतं. त्याला त्याचं संपूर्ण लक्ष त्याच्या करिअर वर केंद्रित करायचं होतं त्यामुळे त्याने पूर्वशी फार सलगी वाढवली नाही ..
तिला तो कधी टाळत नसे पण कधी स्वतःहून भेटायचा प्रयत्नही करत नसे.. तसंही प्रचंड वर्कलोड मुळे त्याला ह्या सगळ्याचा साधा विचार करायलाही वेळ नव्हता..
दिवस असेच जात होते आणि एक दिवस ऑफिसमधून घरी येताना त्याला बालगंधर्वच्या पुलावर एकटीच उभी असलेली पूर्वा दिसली …
ती पूर्वा आहे ह्याची खात्रीच वाटत नव्हती त्याला इतकी ती शांत बसली होती .. त्याला वाटलं भास झाला आपल्याला.. एवढी शांत बसलेली पूर्वा कशी असेल ?
तो ब्रिज क्रॉस करून पुढे गेला खरा पण तिचा चेहरा काही त्याच्या डोळ्यासमोरून जाईना. सरळ गाडी बाजूला पार्क करून तो परत उलट्या दिशेने पुलावर चालत गेला … आणि हो ..ती पूर्वाच होती ..
भराभर पावलं टाकत अभि तिच्याजवळ पोचला आणि म्हणाला ” hi पूर्वा ..कुणाची वाट बघत्येस का ? मी घरीच चाललोय ..तुला लिफ्ट देऊ का ? ”
ती काही बोलणार तोच तिथे बाईकवरून एकजण आला. त्याची ओळख करून देत पूर्वा म्हणाली
” अभि .. meet my best friend रो ..म्हणजे रोहन! He is a professional photographer …सध्या मी ह्याच्याबरोबर काम करत्येय… एका advertisement चं फोटोशूट चालू आहे.”
” Hello Rohan..nice to meet you..”
तेवढ्यात पूर्वा म्हणाली ” अभि.. मी जरा कामाला चालले आहे ‘ रो ‘ बरोबर… ! But thanks for your concern!
अभिला बाय करत पूर्वा रोहन च्या मागे बसून निघून गेली..
अभिच्या मनात आलं ” ज्या प्रकारे बाईक वर पूर्वा रोहनला चिकटून बसल्ये त्यावरून हा रोहन पूर्वाचा फक्त बेस्ट फ्रेंड मुळीच वाटत नाही..
त्याच्या त्या हेल्मेट मुळे धड चेहरा सुद्धा दिसला नाही त्या ‘ रो ‘ चा!
..well..!आपल्याला काय करायचंय..!!”
त्यानंतर पूर्वा त्याला भेटली ती एकदम सोसायटीच्या new year च्या पार्टीत! पण मागच्यावर्षी सारखी उत्साही नव्हती..चेहऱ्यावर खोटं हसू आणून वावरत होती.
अभि स्वतःहून तिच्याशी बोलायला गेला तेव्हा त्याला तिच्या बोलण्यातून जाणवलं की रोहन ने हिला फसवलेलं दिसतंय..
पण त्यानेही फारसा विषय वाढवला नाही. न जाणो त्यामुळे पूर्वाने परत मैत्री वाढवायचा प्रयत्न केला तर आणि तसंही त्याला मुलींशी मैत्री, अफेअर ह्यापेक्षा करिअर महत्वाचं होतं.. पण पूर्वा बदलली होती एवढं खरं!
मीरा ला बघताना पूर्वाची आठवण आली इतकंच तेवढ्यात..
समोरची गाडी अचानक थांबल्यामुळे करकचून ब्रेक लावताना अभिने कचकचून एक शिवी घातली आणि त्या आवाजाने मीरा जागी झाली.
मीराने गाडीबाहेर बघितलं तर सगळा काळोख झालेला..नक्की किती वेळ आपण गाडीत आहोत हे न कळून तिने अभिला विचारलं
” सर, कुठपर्यंत पोचलोय आपण आणि किती वेळ लागेल अजून?”
अभिने तिच्याकडे बघून हसत म्हटलं
” अगं आपण तासभर झालाय तरीही अजून कल्याणीनगर पर्यंत सुद्धा पोचलो नाही…
असाच ट्रॅफिक असेल पुढे तर वाघोलीत जायला अजून किमान अर्धा तास तरी नक्की..माझ्या अंदाजे 7 तरी वाजतीलच”
मीराला टेन्शन आलं..तिच्या मनात आलं ..मानस वाट बघत असेल ..परत यायला 10 तरी वाजतीलच.. एवढे वाजतील ह्याची प्रणालीला सुद्धा कल्पना दिली नाही आपण ..काय करावं ? जावं का परत?
पण नको..आज छडा लागलाच पाहिजे..प्रणालीला सांगून ठेवते.. असं स्वताशी म्हणत तिने पर्स मधून फोन काढला पण त्या फोन ने कधीच ‘राम ‘म्हटलेलं..
मानसच्या विचाराने ती अस्वस्थ झाली ..अभिच्या मोबाईल वरून फोन करायचा म्हटलं तर प्रणालीचा नंबर सुद्धा पाठ नव्हता..
” सर,आपण परत जायचं का? माझा फोन डिस्चार्ज झालाय आणि माझा नंबर पाठ नाही..”
अभि ने हसत म्हटलं
” माझ्या गाडीत चार्ज होईल की फोन 10 मिनिटात मग मानसला फोन करून सांग ..पण आता परत फिरायचं नाही” हे ऐकून मीराला जरा हुश्श झालं .
तिने पटकन फोन चार्जिंगला लावला आणि पुन्हा विचारांच्या गर्दीत बुडून गेली.
अभिला तिच्या मनाची घालमेल जाणवत होती..तिचा रडवेला चेहरा बघून तिला जवळ घेऊन थोपटावं असा सतत मनात येणारा विचार निग्रहाने बाजूला करत तो गाडी चालवत होता..
इकडे साईटवर मोहित,रोहन आणि माया गप्पा मारत होते..
मीरा आज वाडेश्वर मध्ये कशी बोलत होती हे रोहन तिची नक्कल करून दाखवत होता.
स्वतःच्या सौंदर्याची स्तुती केल्यावर जाळ्यात अडकलेल्या मीराची रोहन चेष्टा करत होता आणि माया खो खो हसत होती..
मोहितनेच हे सगळं करायला सांगितलं होतं रोहनला तरीही त्याला तिची चेष्टा होताना पाहून कुठंतरी आत तुटत होतं..वाईट वाटत होतं..!
माया आणि रोहन सारखं त्याला हसू येत नव्हतं..
तेवढ्यात मोहितला फोन वाजला..वेगळाच नंबर बघून त्याने आधी घेतलाच नाही पण पुन्हा दोनदा रिंग आल्यामुळे त्याने फोन उचलला ..
पलीकडून मानस बोलत होता ” बाबा,तुम्ही कुठे आहात? आई दुपारी गेली आहे ती अजून आली नाही. तिचा फोन सुद्धा लागत नाहीये बाबा .. मी प्रणाली मावशीकडे आहे पण आता मला आईची आणि तुमची आठवण येत्ये. बाबा घरी या ना आईला घेऊन”
मानसचं रडणं ऐकून मोहित अस्वस्थ झाला
” येतो हा बाळा लवकर येतो मी! तू रडू नको …ऐक माझं..मावशीकडे फोन दे “
प्रणालीशी बोलून मोहितने फोन ठेवला आणि मायाला म्हणाला
” मला निघायला हवं माया..मीरा कुठे गेलीये कळत नाहीये आणि मानस आमच्या शेजारी आहे ..रडतोय..मीराचा फोनही लागत नाहीये. “
हे ऐकून माया वैतागून म्हणाली
” मोहित, तू नंतरही असाच वागणारेस का? मीराला सोडणारेस तसं मानसलाही सोडावं लागेल. एव्हढ्यातेव्हढ्या कारणांवरून मला सोडून मानसकडे जाणारेस का तू?”
” हे बघ माया..नंतर बोलू आपण ह्या विषयावर.. आत्ता मानस रडतोय आणि मीराचा फोन लागत नाही म्हणून अजूनच घाबरलाय तो….! मला निघायलाच हवं”
असं म्हणून मोहित मायाच्या उत्तराची वाटही न बघता निघाला..
इकडे कल्याणीनगर च्या पुढे ट्रॅफिक कमी मिळाल्यामुळे गाडी वाघोलीच्या साईटच्या दिशेने सुसाट चालली होती.
मानसला फोन करण्यासाठी थोडाफार चार्ज झालेला फोन मीराने स्विच ऑन केला तोच अभि म्हणाला” मीरा, थांब आता ..खाली उतरलीस की कर फोन..हे बघ आलोच आहोत आपण. मी गाडी पार्क करून येतों. तू इथेच उतरून थांब गेटपाशी!
खाली उतरल्यावर पटकन फोन करावा म्हणून मीराने पर्स उघडली तर मोबाईल नव्हता ..उतरण्याच्या गडबडीत पर्स ऐवजी तिचा फोन तसाच सीट वर राहिला.
इकडे फोटोशूट चालल्या फ्लॅटच्या टेरेसवर मायाने रोहनला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली
” बघ , मी म्हटलं होतं ना आपल्याकडे दोन सावज आहेत..मोहित काही मानसच्या आणि त्याच्या घरच्यांच्या पाशातून स्वतःला सहजी सोडवू शकणार नाही..आणि मोहितच्या नकळत आज आमच्या दोघांचे तू काढलेले फोटो म्हणजे आपल्या हातातील लॉटरी आहे लॉटरी!! त्या येड्याला वाटतंय मी त्याच्याशी लग्न बिग्न करणारे! अरे मानसच्या वाढदिवसाला आलेल्या मोहितच्या आईबाबांकडून त्यांचे फोन नंबर घेतले आहेत मी माझ्याकडे. योग्य वेळ आली की वापरू! “
रोहनला मायाचं बोलणं ऐकू येत होतं पण …
दिसत होती मीरा.. त्यांच्या बिल्डिंगच्या दिशेने चालत येणारी.. !
तिच्या बरोबर असलेल्या माणसाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं त्याला पण नीटसं आठवत नव्हतं…त्याने मायाला मीरा येत असल्याचं दाखवलं..
मीरा बरोबर अभिसागर ला बघून माया हबकलीच! सरांबरोबर मीरा इकडे साईटवर का आलीये? सर यायच्या आत इथून बाहेर कसं पडायचं तिला कळेना..
” रोहन ..अरे तिच्या बरोबर आहे तो बॉस आहे माझा..अभिसागर! तू नुसतं ऐकलं आहेस त्याच्याबद्दल….जेवढा चांगला आहे तेवढा विचित्र आहे ..तो इथे आला तर त्याला उत्तरं देणं अवघड आहे अरे.. थापा पचत नाहीत त्याच्यासमोर!!
मीरा आणि अभि लिफ्ट पर्यंत पोचलेसुद्धा!
रोहन आणि माया काय अभिसागर ला काय सांगायचं ह्याचा विचार करत होते..
काय सांगेल माया अभिसागरला?
मोहित नव्हता ह्यावर मीराचा विश्वास बसेल का?
रोहन आणि माया ह्याचं नक्की काय नातं आहे?
काय प्लॅन आहे दोघांचा?
रोहन आणि अभिसागर एकमेकांना ओळखतील का?
काय होईल ह्या कोजागिरी च्या रात्री??
उत्तरांसाठी …वाचा पुढील भाग…
क्रमश:
लेखिका- यशश्री मनोज भिडे.
पुढील भागाची लिंक- चांद मातला भाग १०
मागील भागाची लिंक- चांद मातला भाग ९
हे पण वाचा-
आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा
आमच्या लघुकथा लघुकथा
माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख
आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

[…] मागील भागाची लिंक- चांद मातला भाग १० […]