अक्षय कुमार
मला आठवतंय आमचा एक कॉलेज मित्र राज सिप्पीचा सहाय्यक होता. आता तो हिंदी सिनेमातील मोठा दिग्दर्शक आहे. पण गोष्ट तो सहाय्यक होता तेव्हाची आहे. मला वाटत गोरेगावला एका स्टुडिओ मध्ये थानेदार सिनेमाच्या तम्मातम्मा लोगे ह्या सिनेमाचं शूटिंग सुरू होतं. ते गाणं आमच्या त्या मित्रानेच एका इंग्रजी गाण्याची नक्कल बप्पी लाहिरी कडून करून घेऊन सिनेमात टाकलं होतं. आम्ही कॉलेज फ्रेंड्स शूटिंग बघायला जाणार होतो. त्यावेळी गोरेगाव म्हणजे आम्हा टाऊनी पोरांना खूप लांब वाटे. लोकल ट्रेन बिन ने प्रवास म्हणजे चांद्रयानात बसल्याचा विस्मयजनक अनुभव असे. आणि रिक्षा म्हणजे उडत्या तबकडीत बसल्याचं सुख. आम्ही स्टुडिओ जवळ पोहोचलो. मुख्य दारात आम्हाला गार्ड ने अडवल्यावर मित्राचं नाव सांगून आत प्रवेश केला. तिथे आत मोठमोठया “स्टेज” नामक जागा होत्या. आम्ही मित्राचं शूटिंग होतं त्या स्टेज वर गेलो. कदाचित स्टुडिओ फिल्मीस्तान असेल. आता नक्की आठवत नाही. पण आतील नजारा आठवतोय!
तर त्या स्टेज वर आतमध्ये काळोख. खूप लोक. जोरजोरात सुरू असलेले पंखे. वर फळ्यांवर लाईट धरून बसलेले लोक. आणि मोठ्ठा सेट. आम्ही बिचकून मित्राचं नाव सांगितलं. मित्र आला. आम्हाला एका जागी नेऊन बसवलं आणि म्हणाला इथून हलू नका. मग आमच्यासाठी कोल्ड ड्रिंक वगैरे आलं. आम्हाला “सर और कुछ चाहीये क्या?” अस विचारल्यावर आपण फिल्म हिरो असल्याचा फील आला. इतक्यात दिवे लागले. समोरचा सेट चकाकायला लागला. मला वाटत सरोज खान नृत्य दिग्दर्शन करत होत्या. संजय दत्त आणि माधुरी (हायsss) आले. अगदी आमच्यापासून काही हातांच्या अंतरावर! सरोज खान नी शिट्टी मारली आणि गाणं वाजू लागलं. संजय दत्त आणि माधुरी त्यांच्या समोर असलेल्या खुर्च्या हातात धरून स्टेप्स करू लागले. कोणीतरी आकडे मोजत होतं. शॉटच्या शेवटी मला वाटतं दोघांना खुर्चीवर बसून आपापल्या टोप्या आपापल्या पावलांवर टाकायच्या होत्या! अनेक री टेक झाले. सगळे संजय दत्त मुळे. मधुरीचा प्रत्येक टेक ओके होता!
मग ओके टेक झाल्यावर मित्राने आमची त्यांच्याशी ओळख करून दिली. संजय दत्त आठवत पण नाही कारण माझी नजर माधुरी वरून हटत नव्हती. मग तिने तिच्या गुलजार हाताने शेक हॅन्ड केलेला माझा हात मी आठवडाभर बांधून ठेवला होता. अंघोळ करताना धुतला नव्हता! असो. तर आम्ही तासाभराने तेच तेच बघून बोअर होऊन निघालो. त्या मित्राला बाय म्हणून बाहेर पडलो. आणि आम्हाला एक उंच, लांब केसवाला, शर्टची चार बटणे उघडी टाकलेला आणि अत्यंत देखणा मुलगा राज सिप्पीला भेटायला जाताना दिसला. मित्राने तो अक्षय कुमार असल्याचं सांगितलं! कसला देखणा होता तो. म्हणजे तो फक्त आणि फक्त सिनेमाचा हिरो म्हणूनच शोभेल असा. जर तो बँकेत क्लार्क, विमा एजंट, गॅस मीटरच रिडींग घेणारा अश्या भूमिकेत समोर आला असता तरी लोकांनी त्याला “जानी तुम फिल्मो में ट्राय क्यो नही करते?” असा सवाल केला असता!
नशिबाने तो नट झाला आणि पुढे तोच अक्षय कुमार अनेक सिनेमातून दिसत राहिला. खिलाडी सारखे काही अपवाद वगळता त्याचे तेव्हाचे बहुतांश सिनेमे फुटकळ ह्या कॅटेगरी मधले. तो कित्येक वर्षे मुख्य रेस मध्ये नव्हता. तो तेव्हा बी ग्रेड नट समजला जात होता. अक्कीची खिलाडी सिरीज थोडीफार हिट होती. एखादा धडकन चालत होता. त्याचं नाव लिडिंग लेडीज बरोबर जोडलं जात होतं. पण तो स्टार बनायला अनेक वर्षे लागली. खरं तर सर्व खानांपेक्षा दिसायला कित्येक पट उजवा, उत्तम ऍक्शन करणारा असूनही अभिनयात मात्र सलमानच्या तोडीसतोड वाईट असल्याने तो फार ग्रो झाला नव्हता!
मला वाटत प्रियदर्शनच्या सिनेमातून तो वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर आल्यावर लोकांना भावला. बहुधा लग्नानंतर सुपरस्टार बापाचा स्टारडम ह्याची डोळा पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या त्याच्या बायको ने त्याला सिनेमांच्या निवडी बाबत थोडा चोखंदळ बनवला असावा. मग हळू हळू सक्सेस फॉर्म्युला गवसलेला अक्की स्वतःची निर्मिती संस्था काढून त्या द्वारे वेगळ्या धाटणीचे, वेगळ्या विषयांचे पण आशयपूर्ण आणि मुख्य म्हणजे त्याच्या नट म्हणून असलेल्या मर्यादा लपवून वेगळी वाट चोखळणारा तरीही त्याला कमर्शियल सक्सेस हमखास देणारा नट अशी ओळख मिळवून देणारे सिनेमे करू लागला. कडक स्क्रिप्ट, स्लीक दिग्दर्शन आणि अक्की हे हमखास यशाचा फॉर्म्युला ठरले. आणि अक्की एका सिनेमाचे जवळपास शंभर सव्वाशे कोटी घेणारा खान मंडळीच्या वरचढ सुपरस्टार झाला! लोक त्याच्या नावावर थिएटर मध्ये येतात आणि अगदी welcome to the jungle सारखं भंगार देखील १८६ कोटींचा धंदा करतं! हा खरा सुपरस्टार.
वेगळे सिनेमे निवडण्या बरोबरच त्याची खाजगी आयुष्यातील बदललेली इमेज त्याच्या कामी आली. आयेशा, रविना, शिल्पा, प्रियांका पासून रेखापर्यंत नाव जोडलं गेलेला एकेकाळचा लफडेबाज चिकणा गुलछबु अक्की आता एक शिस्तप्रिय, निर्व्यसनी, सकाळी लवकर उठणारा, व्यायाम करणारा, कुटुंबाला वेळ देणारा, लफडी नसलेला, फिल्मी पार्टीला न जाणारा, नियोजनपूर्ण काम करून काही दिवसात सिनेमा पूर्ण करणारा, प्रचंड बिदागी घेणारा नट, एक आदर्श नवरा आणि बाप तसेच हुशार निर्माता म्हणून प्रसिद्ध झाला! व्यसनाधीनता, लफडी, बेशिस्त ह्यांनी बदनाम असलेल्या फिल्मी दुनियेत राहून ह्या तीनही गोष्टींपासून आता स्वतःला दूर ठेवणारा अक्की आज साधारण अडीच हजार कोटींची वैयक्तिक नेटवर्थ बनवून आहे! लोकांना शिस्तीचे धडे देणाऱ्या अक्कीचा फिटनेस विशितील तरुण मुलांना लाजवेल असा आहे. त्याची दिनचर्या हा चर्चेचा विषय आहे. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन अचंबित करणारं आहे. सिनेमा जगात कोणीही गॉडफादर नसताना शाहरुख प्रमाणेच स्वतःच्या हुशारी, टॅलेंट आणि हिमतीच्या जोरावर प्रचंड यश, पैसा आणि पत मिळवलेला अक्की इथे करियर करायला येणाऱ्या मुलांसाठी नक्कीच एक आदर्श आहे. फिल्मी दुनियेच्या रंगात संपूर्ण रंगूनही आपला वेगळा रंग निर्माण करणाऱ्या अक्किला शुभेच्छा.
हे पण वाचा-
आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा
आमच्या लघुकथा लघुकथा
माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख
आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण
