खोल खोल पाणी | भाग 4| मराठी सस्पेन्स कथा
खोल खोल पाणी | भाग 4 | मराठी सस्पेन्स कथा
पोलिसांना नरपतची बॉडी मिळाली. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून पोलिसांनी बस ड्रायव्हर, कंडक्टर आणि प्रवासी यांचा जाब नोंदवून घेतला. त्याच्या मोबाईलमधून केलेल्या लास्ट कॉल्सपैकी दोन नंबर अपर्णा आणि नंदन यांचे होते.
नरपतच्या मृत्यूची बातमी पत्रकार वर्तुळात लगेच पसरली. दर्शनला देखील ती बातमी मिळाली. ती बातमी ऐकून दर्शन हादरला. त्याने अंजूला फोन लावला.
अंजू- बोल रे.
दर्शन- तू बातमी ऐकलीस तर वेडी होशील.
अंजू- करून टाक.
दर्शन- काय करू?
अंजू- वेडी करून टाक मला.
दर्शन- तुझी बहीण भेटली ना, तो ब्लॅकमेलर मेला थोड्या वेळापूर्वी.
अंजू- व्हॉट?
दर्शन- हो. तो बसमध्ये होता आणि शिरवळजवळ त्याचा गळा चिरून त्याला मारून टाकलं कोणीतरी.
अंजू- ओह… मोटिव्ह काय वाटतोय पोलिसांना?
दर्शन- अजून काहीच कळलं नाहीये. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली आहे. पोलिसांना मोबाईलमध्ये काही नंबर्स मिळाले आहेत.
अंजू- हे अपूला सांगायला हवं.
दर्शन- त्याने काय होणार? तिने थोडाच मारला असेल त्याला?
अंजू- अरे हो. पण अलर्ट नको का करायला?
दर्शन- म्हणजे तिला कळायला की आपल्याला सगळं माहीत आहे? माझं ऐकशील तर तू अंदाज घे फक्त. ती आज कुठे होती, काय केलं वगैरे विचार. पण आडूनआडून. आपल्याला सत्य शोधायचं आहे ना? मग थोडा पेशन्स आणि थोडी बुद्धी वापरायला हवी.
अंजू- हम्म… ओके….
फोन कट करून अंजू विचारात हरवली.
नंदनला पोलिसांचा फोन गेल्यावर त्याला नरपतचा मर्डर झाल्याचं समजलं. नंदनला प्रचंड शॉक बसला. तो तसाच घरातून बाहेर पडला आणि कोल्हापूरकडे निघाला. गाडी चालवत असताना मनात विचार येत होते. नरपतबरोबरचे संवाद आणि तुरळक भेटी आठवत होते. नरपत त्याचा बाप असला तरी कधीच बापासारखा वागला नाही. त्याने नंदन लहान असल्यापासून त्याला पुण्याजवळ बोर्डिंग स्कूलमध्ये घातला होता. तो सुट्टीत देखील नंदनला घेऊन जात नसे. पुण्यात कोणाकडेतरी नंदनची सोय करत असे. क्वचित दोघे भेटत. नरपत त्याला एकच सांगायचा की तुला मोठं व्हायचं आहे. मोठा माणूस. माझ्यासारखा नाही. मला भेटू नको. मोठ्या लोकात राहा. फाटका दिसणारा आपला बाप आपल्या शाळा-कॉलेज फीचे, हॉस्टेलचे, इतर खर्चाचे पैसे कुठून आणतो, हा प्रश्न मोठा झाल्यावर नंदनला पडत असे. नंदन फायनल इयरला होता. नरपत त्याची फी द्यायला आला होता. नंदन भेटल्यावर नरपतने नेहमीप्रमाणे पैशाचं पुडकं त्याला दिलं आणि म्हणाला-
नरपत- सहा महिन्याचे आहेत ह्यात. बाकी मी देतो पुढल्या खेपेला. येतो रे बाळा. काळजी घे. मोठ्या लोकात राहा. मोठा हो.
हे बोलून नरपत आजूबाजूला बघत, घाईघाईने निघाला. तेव्हा त्याला थांबवत नंदन म्हणाला-
नंदन- बाबा थांबा. मला बोलायचं आहे.
घाईत निघालेल्या नरपतचं पाऊल रेंगाळलं.
नरपत- नको. माझी बस चुकेल.
नंदन- चुकली तर चुकू दे. मला आज बोलायचं आहे. थांबा प्लीज.
नरपतला थांबावं लागलं. नंदन आणि तो एका चहाच्या टपरीवर गेले. नंदनने चहा मागवला. गरम चहा घशाखाली गेल्यावर नरपतला तरतरी आली. तरीही त्याची नजर आजूबाजूला भिरभिरत होती. काहीतरी शोधात होती.
नंदन- बाबा मला विचारायचं आहे की तुम्ही मला लहानपणापासून पुण्यात ठेवला. नेहमी मोठ्या लोकात राहा असं सांगता. माझ्याशी फार बोलत नाही. मला भेटत नाही. असं का आहे? माझे वडील असून मला तुमच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. आज मला माहिती हवी आहे.
नरपत- माझ्याबद्दल सांगायला लागलो तर सुरू व्हायच्या आधीच संपेल इतकं थोडं आहे.
नंदन- मग तेच ऐकायचं आहे मला. तुम्ही काय करता? गावाला आपला बिझनेस आहे का? तुम्ही नोकरी करता का?
नरपत- (खिन्न हसून) नाही रे पोरा. आपला बिझनेस वगैरे काही नाहीये. मी मजुरी करतो मालकांच्या शेतात.
नंदन- मग हे… हे इतके पैसे कुठून येतात?
नरपत- (थोडासा टेन्स होत) मी… मी जमा केलेत ना…
नंदन- बाबा मजुरी करून इतके पैसे कमावणं देखील शक्य नाहीये. जमा कुठून करणार? खरं काय ते सांगा. नाहीतर मी कॉलेज आणि पुणे सोडून गावाला येतो आणि मजुरी करतो तुमच्याबरोबर.
हे ऐकून नरपत अचानक चिडला आणि रागाने थरथरत म्हणाला-
नरपत- तू मजुरी नाही करणार. तू मोठ्या लोकात राहणार. मोठ्या लोकांचा बदला घेणार.
नंदन- (चकित होत) बदला? हे काय बोलताय बाबा?
आपण काय बोलून गेलो हे लक्षात आल्यावर सावरून घेत नरपत म्हणाला-
नरपत- मी… मी बदला म्हणालो का? मला तसं म्हणायचं नव्हतं. मला म्हणायचं होतं की तू मोठ्या लोकात राहा. तसाच मोठा हो. मजुरी करायला मी आहे ना.
हे बोलत असताना नरपत चोरत असलेली नजर आणि त्याची अस्वस्थता नंदनच्या लक्षात आली. नंदनने त्याच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला-
नंदन- बाबा मी मोठा झालोय आता. मला दुनियादारी कळते. तुमच्या मनात काहीतरी आहे जे बाहेर येऊ इच्छित आहे पण तुम्ही थांबवताय. मला सांगा. प्लीज…
नंदनने नरपतचा हात थोपटला. नरपतने खिशातून बिडी काढून पेटवली. बिडीच्या धुराकडे बघत विषण्णपणे नंदनला त्याचा जन्म, कुंदा आणि माधवराव याबद्दल सगळं सांगितलं. नरपत जवळजवळ तासभर बोलत होता. त्याच्याकडून एक-एक गोष्ट ऐकल्यावर नंदनचं काळीज पिळवटून निघत होतं. निव्वळ पैशाच्या जोरावर झालेलं त्याच्या आईचं एक्स्पलॉयटेशन त्याच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. नरपत शेवटी म्हणाला-
नरपत- मी माधवरावला धमक्या देऊन पैसे मिळवून तुझा खर्च केला आहे इतकी वर्षं. माझा व्यसनाचा खर्च देखील त्यातूनच सुटतो. माधवराव डेंजर माणूस आहे. जितके त्याचे दाखवायचे धंदे आहेत तितकेच त्याचे दोन नंबरचे धंदे आहेत. कोल्हापुरात ते सगळे मी बघतो.
नंदन- मग धमकी काय देता त्याला?
नरपत- मी माधवरावला सांगितलं आहे की त्याचा आणि कुंदाचा मुलगा जिवंत आहे. तो जिथे आहे तिथे मी सांगून ठेवलं आहे की मला काही बरंवाईट झालं तर ते मूल माधवरावाच्या बायकोकडे द्या. म्हणून माझं तोंड बंद ठेवायला माधवराव इतकी वर्षं पैसे देत राहिला. मी तुला न भेटायचं कारण देखील हेच होतं. तुझ्याबद्दल त्याला ज्या दिवशी कळेल तो माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. माधवराव मला सोडणार नाही.
हे ऐकून नंदनच्या काळजात चर्र झालं. नंदन घाई करत म्हणाला-
नंदन- बाबा तू जा. मला परत कधीच भेटू नको….
नरपत त्या दिवशी गेला पण नंदनच्या मनात बदल्याचा अंकुर फुलवून गेला. नंदनने माधवरावाबद्दल सगळी माहिती काढायला सुरुवात केली. तेव्हा त्याला राहुल सापडला. साधारण सारख्या वयाचा. माधवरावांच्या दुनियेची पोलादी भिंत ओलांडायचा सोपा स्टेपिंग स्टोन. राहुल.
मग त्याने राहुल जात असे अशा सोशल क्लब्स, हॉटेल्स अशा ठिकाणी जायला लागून काही ना काही कारणाने त्याला भेटून त्याच्याशी मैत्री वाढवली. ती मैत्री इतकी वाढली की आता नंदनला राहुल गे आहे ही महत्त्वाची माहिती त्याच्याकडूनच मिळाली. नंदन टेकी होता. एकट्याने राहून राहून त्याला पोर्न साइट बघायचा छंद होता. ह्या धंद्यात असलेल्या प्रचंड पैशाबद्दल त्याला माहिती होती. फक्त इन्व्हेस्टर हवा होता. राहुलने इन्व्हेस्ट करायची तयारी दाखवली. धंदा कोणताही असो. पैसे मिळत असतील तर बिनधास्त करायचा हा माधवरावांचा गुण राहुलमध्ये आपोआप आला होता. मग शूटच्या निमित्ताने त्या फिल्म्समध्ये काम करणाऱ्या गे मॉडेल्सबरोबर राहुलच्या ओळखी झाल्या. त्यातून मग हौस म्हणून मास्क लावून त्यात काम करायला सुरुवात झाली. जगात कोणावरही विश्वास न ठेवणाऱ्या राहुलने नंदनवर पूर्ण विश्वास ठेवला!
आज संध्याकाळी शूट संपवून राहुल गेल्यावर नंदनला नरपतचा फोन आला होता. नरपत आणि तो भेटले होते. नरपतने अपूकडून मिळालेल्या पैशांतले तीन लाख रुपये त्याला देऊ केले होते. ते घेताना नंदन म्हणाला देखील होता-
नंदन- बाबा आता मी कमावतो. तुम्ही कशाला देता पैसे?
नरपत- हे पैसे नाही. ही शिक्षा आहे. त्या माधवरावला आपण देत असलेली. हा आनंद आहे त्याने आपल्याला दिलेल्या दुःखाची किंमत म्हणून आपण वसूल करत असलेला. तो तू देखील अनुभव. ठेव हे पैसे.
नंदनच्या हातात नोटांची बंडलं खुपसून नरपत काश्मिरी गांजा घ्यायला कॅम्पात निघाला. त्याच वेळी तुळशीबागेपासून त्याच्या मागावर असलेल्या माधवरावांच्या माणसाने त्याचे आणि नंदनचे फोटो रावसाहेबांना पाठवून नरपतचा पाठलाग सुरू केला. रावसाहेबांचा रिप्लाय आला. आज ह्याला संपव. त्या मुलाचं पुढे बघुया. रावसाहेबांच्या माणसाने शिरवळमध्ये गेम साधला होता!
घरात (माधवराव) आणि अपर्णा अजूनही बोलत होते. माधवराव अपर्णाला त्यांचा व्यवसाय, तो त्यांनी कसा उभा केला वगैरे मोठ्या अभिमानाने सांगत होते. अपर्णा ते सर्व ऐकून स्तिमित होत होती. आपले सासरे खरंच खूप कर्तृत्ववान आहेत याबद्दल तिला मनापासून आदर वाटत होता. दोघे बराच वेळ बोलत होते. तिला काही वेळापूर्वी माधवराव आपल्याला बघत आहेत असं वाटून त्यामुळे येत असलेली शिसारी नाहीशी झाली होती. तिला अंजूचे दोन-तीन फोन येऊन गेले. प्रत्येक वेळी तिने “मग करते. कामात आहे” इतकं सांगून फोन कट केला होता. आताही ती माधवराव सांगत होते ते ऐकत होती. इतक्यात एका अनोळखी नंबरवरून फोन आला. ती कट करणार इतक्यात माधवराव म्हणाले-
माधवराव- घे ना फोन घे….
अपूने फोन घेतला-
अपू- हॅलो…
आवाज- मी इन्स्पेक्टर जगदाळे बोलतोय. तुम्ही नरपत मानेला ओळखता का?
अपू- (कन्फ्युज होत) नरपत माने?
हे नाव ऐकून माधवराव पुढे आले. त्यांनी फोन अपूच्या हातून काढून घेतला आणि म्हणाले-
माधवराव- नमस्कार मी मांडववाले कुलकर्णी बोलतोय. काय काम आहे? कोण बोलतंय?
जगदाळे- साहेब नमस्कार. मी पीएसआय जगदाळे बोलतोय साहेब.
माधवराव- बोला.
जगदाळे- हा तुमचा नंबर आहे होय?
माधवराव- हो. काय काम काढलं?
जगदाळे- साहेब एक बॉडी मिळाली आहे. मयत माणसाचं नाव नरपत माने आहे. त्याच्या कॉल रेकॉर्डमध्ये संध्याकाळी ह्या नंबरवरून कॉल आला होता त्याला म्हणून फोन करतोय.
माधवराव- अरे बापरे. नरपत गेला? कुठे?
जगदाळे- शिरवळजवळ. एसटीमध्ये त्याचा गळा चिरला कोणीतरी साहेब. तुम्ही ओळखता का त्याला?
माधवराव- हो. तो आमच्या कोल्हापूर फार्मवर लेबर होता. आज दुपारी त्याचा फोन आला होता पुण्यात आलोय म्हणून. पण मी कामात असल्याने फार बोलणं झालं नाही. म्हणून संध्याकाळी फोन केला तर म्हणाला निघालोय. फार बोलणं नाही झालं संध्याकाळी.
जगदाळे- आभारी आहे साहेब.
माधवरावांनी फोन कट करून अपूच्या हातात दिला. तिला टोटल लागत नव्हती की हे नक्की काय आहे. तिने न राहवून विचारलं-
अपू- बाबा हे काय आहे? कोण नरपत माने? पोलिसांनी मला का फोन केला?
माधवराव- तू आज संध्याकाळी ज्या माणसाला पुडकं दिलंस त्याचं नाव नरपत होतं.
हे ऐकून हादरलेली अपू म्हणाली-
अपू- तो… तो माणूस गेला? बापरे… पण तो आपला लेबर कसा असेल? तो तर इन्कम टॅक्स ऑफिसरचा माणूस होता ना?
माधवराव- नाही. तो आपला लेबर होता. पैसे तो देणार होता ऑफिसरला.
अपू- पण….
माधवरावांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती ग्रीप इतकी मजबूत होती की अपूच्या तोंडून पुढे एक शब्द बाहेर नाही पडला. आणि का कोणास ठाऊक माधवरावांचा तिच्या खांद्याला होणारा स्पर्श तिला किळसवाणा नाही वाटला. ती डोळे मिटून तशीच बसून राहिली. त्याच वेळी तिचा फोन परत रिंग होत होता. अंजूचं नाव डिस्प्ले करत होतं.
अपूला आयुष्यातील एका खोल खोल विहिरीच्या काठावर बेसावधपणे आणून बसवलेली नियती काळाचा रहाट ओढत त्या अंधाऱ्या विहिरीच्या खोलीचा अंदाज घेत हसत होती.
क्रमशः ©मंदार जोग
पुढील भागाची लिंक- खोल खोल पाणी | भाग 5 | मराठी गूढ कथा
मागील भागाची लिंक- खोल खोल पाणी | भाग 3 | थरारक मराठी कथा
सर्व भागांची लिंक- खोल खोल पाणी | सर्व भागांची लिंक |
आमचे whatsapp channel join करा- whatsapp.com
आम्हाला फेसबुकवर फॉलो करा- https://www.facebook.com/mandar.jog.31
कादंबरी- ट्वेंटी थ्री
कादंबरी- सख्या रे….
हे पण वाचा- वेळ
