मृगजळ भाग १९
श्रीरंगच्या तोंडून रखेल शब्द ऐकून मानसीच्या डोक्यात तिडीक गेली आणि तिने जोरात त्याच्या कानाखाली मारली आणि ती ओरडली-
मानसी- रंगा..Enough..
मानसी रागाने थरथरत त्याच्याकडे बघत होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. श्रीरंग अजूनही शांतपणे तिच्याकडे बघत उभा होता…घड्याळात पहाटेचे चार वाजले होते. काही क्षण तसेच गेले. आणि मानसी कोलमडली. श्रीरंगला मिठी मारून ढसाढसा रडू लागली.
मानसी- sorry रंगा…मला माफ कर…मी..मी तुला..
श्रीरंग- it’s ok…मी समजू शकतो. आणि आपली मैत्री एका slap ने संपणारी नाहीये. तू शांत हो प्लीज…इट्स ओके.
श्रीरंगने तिला हाताला धरून सोफ्यावर बसवली. तिला पाणी प्यायला दिलं.
श्रीरंग- ऐक…रात्र खूप झाली आहे. रात्र का, आता थोड्या वेळात सकाळ होईल. मला वाटतं आपण झोपायला हवं. उठल्यावर बोलू ओके? तू आत जा आणि झोप. मी इथे सोफ्यावर..
मानसी- सोफ्यावर? नको मी…
श्रीरंगने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला-
श्रीरंग- it’s ok. थोडा वेळ झोपायचं आहे. आणि तुझा सोफा छान soft आहे. मी झोपतो इथे. तू आत जा आणि झोप आता. उद्या बोलू.
मानसी मनात प्रचंड गिल्ट घेऊन झोपायला गेली. जाताना तिने दिवा बंद केला. मानसी आणि सौरभ दोघांनाही एका मिनिटात गाढ झोप लागली.
सकाळी मानसीला जाग आली ती सौरभच्या फोनमुळे. तिने फोन घेतला.
मानसी- हेलो…
सौरभ- हाय…काल उशिरा झोपलात का?
मानसी- हम्म..चार वाजले झोपायला.
सौरभ- ओके. श्रीरंग आहे की गेला?
मानसी- आहे. बाहेर सोफ्यावर झोपला आहे बिचारा.
सौरभ- ओह आय सी. बरं ऐक. मी फोन अशासाठी केला की एक प्रॉब्लेम झालाय.
मानसी उठून बसली आणि टेन्स होत म्हणाली-
मानसी- काय?
सौरभ- आज आई येते आहे आमच्याकडे राहायला. जरा चेंज म्हणून.
मानसी- ओके. मग प्रॉब्लेम काय आहे?
सौरभ- प्रॉब्लेम असा आहे की आई इथे असेपर्यंत मी घर नाही सोडू शकणार.
मानसी- का?
सौरभ- तुला तिची तब्येत माहित्येय ना? ती इथे असताना मी घर बीर सोडलं आणि तिला काही झालं तर मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकणार नाही. So…
मानसी- so काय?
सौरभ- so आपल्याला थांबावं लागेल अजून काही दिवस किंवा महिने. मी तेच सांगायला फोन केला. नाहीतर तू वाट बघशील की हा कधी घर सोडतोय आणि मी निघू शकणार नाही घरातून.
मानसी- तू घरातून कधीच निघू शकणार नाहीस सौरभ. आणि मला त्याबद्दल पूर्ण खात्री आहे. मीच एक मूर्ख आहे जी गेली दहा वर्ष तुझ्या खोट्या वचनांना, आश्वासनांना भुलून तुझ्यात अडकून पडले आहे. पण आता कंटाळा आलाय मला ह्या सगळ्याचा. आपलं हे जे काही नातं आहे ते आता आनंद, सुख कमी आणि स्ट्रेस, गिल्ट जास्त देतंय मला. खरंच मी कंटाळले आहे, थकले आहे.
सौरभ- प्लीज मानसी असं नको बोलू. तुला माहित्येय माझं किती प्रेम आहे तुझ्यावर ते. पण प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. आपण एकत्र यायची पण योग्य वेळ येईल.
मानसी- जी वेळ दहा वर्षांत नाही आली ती पुढे का येईल? सोड. तुला हवं ते कर तू.
असं म्हणून तिने फोन ठेवला आणि डोळे पुसत वळली तर बेडरूमच्या दारात रंगा उभा होता. त्याला पाहून तिने पटकन डोळे पुसले आणि घाईघाईत म्हणाली-
मानसी- अरे तू कधी उठलास? Good morning.
श्रीरंग- good morning..चल मी निघतो.
मानसी- निघतो? अरे थांब. मस्त ब्रेकफास्ट करते मी. तो खाऊन जा.
श्रीरंग- नाही नको…मला बाकी पण काही मीटिंग आहेत. मी निघतो. तू काळजी घे.
हे बोलून तो जायला वळला. मानसीने त्याला हाक मारली-
मानसी- रंगा…एक मिनिट..
तो थांबला. मानसी त्याच्यासमोर येऊन उभी राहिली आणि त्याच्याकडे बघत म्हणाली-
मानसी- खरंच sorry काल रात्रीसाठी…तू चिडला नाहीयेस ना रंगा?
श्रीरंग- मी चिडलोय मानसी. पण तुझ्यावर नाही, स्वतःवर. आयुष्यात दुसऱ्यांदा तुला चुकीच्या माणसामध्ये इंव्होल्व्ह होताना बघतोय मी आणि दुसऱ्यांदाही मी तितकाच हेल्पलेस आहे. काहीच करू शकत नाहीये म्हणून स्वतःचा खूप राग येतोय मला.
मानसी- रंगा…प्लीज…आपण सौरभचा विषय आपल्या दोघांत अवोइड करुया का? तुझी काळजी कळते आहे मला. पण let me handle it. प्लीज त्यामुळे आपल्या दोघांमध्ये वाद नको ना यार.
श्रीरंग- ठीक आहे. As you wish. बाय…
श्रीरंग निघून गेला. मानसी सोफ्यावर बसली. तिला सौरभचा राग येत होता. आता आईचं कारण पुढे करून घरातून निघणं पुढे ढकलत होता. तो फट्टू आहे हे तिचं एक मन सांगत होतं आणि दुसरं मन नेहमीप्रमाणे सौरभ वाईट नाहीये. त्याच्या आईला खरंच काही झालं तो बाहेर पडून तर फार वाईट होईल. थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. आई परत गेल्यावर तो सोडे घर, हे सांगत होतं. पण ती चिडली होतीच. तिने सौरभशी अजिबात न बोलायचा निर्णय घेतला. आज ती दिवसभर आराम करणार होती.
सौरभची आई ठरल्यानुसार त्याच्याकडे राहायला आली. हर्षदने आजीचं स्वागत केलं. आणि आज अंकिताही सासूबाईंची प्रेमाने चौकशी करत असलेली पाहून सौरभच्या आईला आश्चर्य वाटलं. तिने तिच्या फटकळ स्वभावानुसार तिला विचारलं-
आई- काय ग अंकिता, आज अचानक माझ्यावर इतकी मेहेरबानी कशी काय?
अंकिता- कसली मेहेरबानी आई? हे घर तुमचंच आहे ना? म्हणून तुम्हाला कम्फर्टेबल करते आहे.
आई- तेच ग बाई. पण अचानक का? हे बघ, पैसे वगैरे हवे असतील ना माझ्याकडून तर ते माझे डोळे मिटल्यावरच मिळतील तुम्हाला.
अंकिता- आई, प्लीज असं नका ना बोलू.
आई- मला कळत नाहीये की माझ्याशी भांडणारी तू आता अचानक इतकी प्रेमाने कशी काय वागू लागली आहेस.
अंकिता- माणसं बदलतात आई. (हे बोलताना तिने सौरभकडे पाहिलं.) ज्यांना आपण आपले समजतो ते परके होतात आणि ज्यांच्याशी भांडतो ते आपले निघतात. जे झालं ते विसरा तुम्ही. आता मला तुमचा आणि तुम्हाला माझा आधार आहे.
आई- आणि सौरभ? तो आपल्याला आधार देणार नाहीये का?
अंकिता- ते तुम्हीच विचारा त्याला. माझा हल्ली कोणावरही विश्वास राहिलेला नाही. शेवटी बाईचा जन्म आपला. कितीही मोठ्या झालो आपण तरी पुरुष अन्याय करणारच.
असं म्हणून ती रडू लागली. आईने लगेच तिला जवळ घेतली आणि आई म्हणाली-
आई- अजिबात रडू नकोस तू. कोण तुझ्यावर अन्याय करतो ते मी बघतेच आता. इथे आले आहे ना मी? मग तू माझ्यावर सोड सगळं.
अंकिताने आईला मिठी मारली आणि समोर उभ्या असलेल्या सौरभला एक लूक देऊन ती आईला म्हणाली-
अंकिता- आई, तुमचा खूप आधार वाटतोय मला. आता आल्यासारख्या इथेच रहा. परत जायचा विचारही करू नका.
आई- नाही ग बाई. जायला तर हवं मला. पण तू म्हणते आहेस तर थोडे जास्त दिवस राहते मी इथे.
आई आणि अंकिता आत निघून गेल्या. सौरभ वैतागला-
सौरभ- हे काय नवीन नाटक आहे अंकिताचं? आता आईला पण आपल्या बाजूला घेते आहे. आधीच आईचा डिव्होर्सला विरोध आहे आणि आता तर तिला अंकिता आवडायला लागेल. मग तर वाटच लागेल. मला ह्या घरात राहावं वाटत नाहीये. डोक्याचा भुगा झालाय. पण काय करू?
एवढ्यात अंकिता ऑफिसला जायला निघाली. जाताना सौरभला तोऱ्यातच म्हणाली-
अंकिता- आई घरात आहेत तोवर जरा जबाबदारीने वाग. त्यांचं वय आणि तब्येत दोन्हीला कोणताही त्रास सहन होणार नाहीये.
हे ऐकून वैतागलेला सौरभ म्हणाला-
सौरभ- हे तुला मला शिकवायची गरज नाहीये. ती माझी आई आहे आणि तिचं बरं वाईट मला कळतं, इतकी काळजी होती ना तर लग्न झाल्यावर वाद घालायचे नव्हते तिच्याशी. ती घरीच राहिली असती. एकटी राहिली आणि तिची तब्येत बिघडली.
अंकिता- इथे राहून कोणतं स्वर्गसुख देणार होतास तू? तुझी लफडी कानावर आल्यावर त्या जागल्या तरी असत्या का? लांब होत्या म्हणून जागल्या तरी.
सौरभ- (ओरडून) हे बघ अंकिता, तोंड सांभाळून बोल.
इतक्यात त्याची आई बाहेर आली. त्या दोघांना भांडताना पाहून काळजीने म्हणाली-
आई- काय रे, काय झालं? भांडताय कशाला?
सौरभ- छे भांडण नाही. Just लहानसा वाद. आई, आता नवरा बायकोमध्ये वाद होणारच ना? तू जा ना आत. तू नको ह्यात पडू. प्लीज…
अंकिता- हो आई. तुम्ही आराम करा. मी पण आता क्लासला जाते आहे.
आई आत गेली आणि अंकिताने सौरभची कॉलर पकडली आणि दात ओठ खात म्हणाली-
अंकिता- परत माझ्या अंगावर ओरडलास ना तर मी ऐकून घेणार नाही. मी काही बोलत नाहीये म्हणजे तुझे धंदे मला मान्य आहेत असं नाहीये. जास्त नाटकं केलीस ना तर इतका तमाशा करेन की तुझी लाडकी आई इथेच हार्ट अटॅक येऊन मरेल हे लक्षात ठेव.
इतकं बोलून ती निघून गेली. सौरभ छातीजवळ चुरगळलेला शर्ट नीट करू लागला. तेवढ्यात बेल वाजली. सौरभने जाऊन दार उघडलं तर दारात काळ्या उभा होता. त्याला अचानक घरी आलेला पाहून सौरभ घाबरला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून काळ्या म्हणाला-
काळ्या- काय रे, काय झालं? असा भूत पाहिल्यासारखा काय बघतो आहेस? घरात नाही का घेणार मला?
सौरभ- त…तू…तू इथे कसा अचानक?
काळ्या- अरे बाबा, अचानकच आलो. माझं कुठेथाराल होतं. सकाळची फ्लाईट घेतली आणि आलो. काम झालं, मग म्हणालो आलोच आहे इथे तर सौरभला भेटतो. म्हणून आलो इथे. आता आत घेतोस की जाऊ मी परत?
सौरभ- य..ये..ये ना आत ये क..काळ्या..
काळ्या आत येत सोफ्यावर बसला आणि म्हणाला-
काळ्या- हे काय तू क क किरण सारखं क क काळ्या सुरू आहे? तुझी तब्येत बरी आहे ना?
सौरभ- हो एकदम मस्त आहे.
काळ्या- पाणी दे ना यार. जाम तहान लागली आहे.
सौरभ- हो देतो..आलोच मी…तू तू इथेच बस हा..
हे बोलून सौरभ किचनमध्ये पाणी आणायला गेला. काळ्या घर बघत होता. सौरभ पाणी घेऊन आला. काळ्याने पाणी प्यायला. ग्लास बाजूला ठेऊन म्हणाला-
काळ्या- मानसी वहिनी आत आहेत का? त्यांना सांग ना मी आलोय म्हणून.
त्याच्या तोंडून मानसीचं नाव आणि वहिनी ऐकून सौरभ आणखी घाबरला.
सौरभ- न…नाही..ती नाहीये…ती कामावर गेली आहे.
काळ्या- हा बरोबर आहे. आज working day आहे ना. ए सौरभ, तू आणि मानसी या ना एकदा गोव्याला. खूप दिवस झाले यार. रोझी पण आठवण काढते तुमची. मस्त भटकू चौघे. मानसी वहिनी गाणं पण सॉलिड म्हणते आता. Last time karaoke मध्ये काय ते गाणं म्हटलं होतं तिने?
काळ्या फुलं गप्पांच्या मूडमध्ये होता आणि सौरभ हा इथून कधी कटेल त्याची वाट बघत होता. त्याचं काळ्याकडे लक्षच नव्हतं. त्याचं लक्ष नसलेलं पाहून काळ्या म्हणाला-
काळ्या- ए सौरभ, बरा आहेस ना तू? साल्या, मी इथे बोलतोय आणि तुझं लक्षच नाहीये. थांब, आता मानसी वहिनी भेटल्या ना की त्यांना सांगतो मी की ह्याला जरा सुधारा म्हणून.
काळ्याच्या तोंडून मानसी वहिनी हे शब्द तितक्यात बेडरूममधून बाहेर आलेल्या आईने ऐकले. तेवढ्यात आईला पाहून काळ्या उभा राहिला. सौरभने ओळख करून दिली.
सौरभ- तू आईला ओळखतोस ना?
काळ्या- अरे हो…तुझी आई ना? अरे किती वर्षांनी बघतोय मी काकूंना. काकू, नमस्कार करतो.
असं म्हणत काळ्याने आईला वाकून नमस्कार केला. आईने जुजबी आशीर्वाद देत सौरभकडे जळजळीत कटाक्ष टाकला.
सौरभ- अ..आई..हा काळ्या…काळ्या म्हणजे संदीप रेगे…आम्ही कॉलेजला एकत्र होतो.
आई- हो का? छान…
इतकं बोलून आई सौरभला खुन्नस देऊन आत निघून गेली. आता काळ्या सौरभकडे आश्चर्याने बघत होता. काहीतरी सारवासारव करायला सौरभ म्हणाला-
सौरभ- वय झालंय ना तिचं. फार मूडी होतात लोक ह्या वयात. कधी कधी आमच्याशी पण दोन दोन दिवस बोलत नाही ती…
काळ्या- हो यार, म्हातारपण वाईट असतं.
तेवढ्यात बेल वाजली. इस्त्रीवाला असेल असं वाटून सौरभने इस्त्रीच्या कपड्यांचं गाठोडं घेत दार उघडलं. दारात अंकिता उभी होती. तिला पाहून सौरभच्या पायातले त्राण गेले आणि तो म्हणाला-
सौरभ- तू?
क्रमश:
पुढील भागाची लिंक- मृगजळ भाग २०
मागील भागाची लिंक- मृगजळ भाग १८
मृगजळ सर्व भाग- मृगजळ- सर्व भाग
हे पण वाचा-
आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा
आमच्या लघुकथा लघुकथा
माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख
आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

ata saurabh che kahi khare nai pan he kadhitari honar hotech …. nasheeb itke hi sath det nahi pratekveli
[…] आधीच्या भागाची लिंक- मृगजळ भाग १९ […]