विठोबा धोंडिबा शेलार… हॉस्पिटलच्या ऍडमिशन फॉर्म वर पोलिसांनी नाव लिहिल आणि म्हाताऱ्याला ठेवलेलं स्ट्रेचर आतमध्ये नेलं. डॉक्टरांनी चेक केलं आणि लगेच ओपन हार्ट सर्जरी करायचा निर्णय घेतला!
विठोबा शेलार. वय पंचाहत्तर. पन्नास साठ वर्षांपासून दर वर्षी न चुकता वारी करत असे. इतक्या वर्षात न चुकलेली वारी यंदा चुकली. म्हणजे वारीला त्याने यंदाही सुरुवात तर केली. रोज ठराविक अंतर चालत, गळ्यात तुळशीच्या माळा घालून, हातात टाळ घेऊन तो चालत होता. लग्न कार्य काहीच नाही. आई वडील गेल्यावर एकटा जीव. लहानसा जमिनीचा तुकडा होता. त्यात जे पिकवायचा ते खायचा आणि उरलेल विकून चार पैसे कमवायचा.
पहाटे उठून गावातल्या विठ्ठल मंदिरात जाऊन साफसफाई केली, पाणी भरून ठेवलं की त्याच विठोबाला नमस्कार करून त्याचा दिवस सुरू होत असे. दिवसा शेतीची काम वगैरे करून संध्याकाळी मीठ भाकर खाल्ली की रात्री देवळात विठोबाची भजन म्हणत तो तल्लीन होत असे. भजन झालं की झोप. असाच त्याचा वर्षानुवर्ष शिरस्ता होता. विठ्ठलावर त्याची निस्सिम भक्ती. आताशा वय झाल्यावर शरीर साथ देत नसे. रोज मंदिर साफ करून अंग दुखून येत असे. रात्री भजन गाताना अनेकदा खोकला लागत असे. तो हल्ली पांडुरंगाला सांगायचा की ” पांडुरंगा सगळं आयुष्य तुझ्या चरणांची पूजा करण्यात गेलं. मला मृत्य पण तुझ्या चरणांशी येऊ दे!” अशी गेली पाच सात वर्ष गेली. शरीर थकत होत पण भक्ती कमी होत नव्हती!
यंदाही तो वारी बरोबर निघाला. अठरा वीस दिवस वारी बरोबर प्रवास केला. उद्या पंढरीला पोहोचायच आणि विठूरायाच दर्शन घ्यायचं. आणखी एक वारीच वर्ष पदरात पाडून घ्यायचं. ह्याच आनंदात तो टाळ वाजवत, विठोबाच नाव घेत चालत होता. आज पाऊस अजिबात नव्हता. आकाश निरभ्र होतं. ऊन प्रचंड होतं. त्या उन्हात चालता चालता त्याच्या छातीत कळ आली आणि तो कोसळला! बाकी वारकऱ्यांनी फोनाफोनी करून अँब्युलन्स बोलावून त्याला जवळच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केला. पोलिसांनी त्याचं नाव वगैरे माहिती दिली आणि डॉक्टरांनी हार्ट सर्जरीचा निर्णय घेतला. विठोबाला हार्ट अटॅक आला होता. हृदयाचा स्नायू बराच damage झाला होता. त्याचे वाचायचे चांसिस खूप कमी होते. पण डॉक्टर शस्त्रक्रिया करत होते.
ऑपरेशन नंतर त्याला आय सी यू मधे हलवण्यात आलं. तोवर रात्र झाली होती. त्याला बेडवर झोपवला आणि आय सी यू चे डॉक्टर आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर रूम मधे जाऊन बसले!
आज आषाढी एकादशीची पहाट. मुख्यमंत्री सपत्नीक पूजेसाठी पंढरपूरच्या देवळात पोहोचले. त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत झालं. मुख्यमंत्री, त्यांच्या पत्नी आणि यंदा पूजेचा मान मिळालेलं दांपत्य गाभाऱ्यात पूजेला बसले. पूजा सुरू झाली.
इथे हॉस्पिटल मधे विठोबा शेलार अर्धवट शुद्धीत विठ्ठलाची माफी मागत होता. तो म्हणत होता की “विठुराया यंदा तब्बेतीने दगा दिला आणि तुझी वारी पुरी करू शकलो नाही. मला माफ कर. इथूनच तुला नमस्कार करतोय तो स्वीकार कर!” त्याच्या डोळ्यातून अश्रुंच्या धारा वाहत होत्या. तेवढ्यात डॉक्टर नाईट फेरीसाठी आले. त्यांनी विठोबाच्या छातीला स्टेथस्कोप लावला. त्यांना ठोके लागले नाही. त्यांनी परत तपासल. विठोबा गेला होता! तो जगण्याची तशीही अपेक्षा नव्हती! तेव्हा पहाटेचे तीन वाजले होते!
डॉक्टरांनी फॉर्मलिटी पूर्ण केल्या. विठोबाच्या गावच्या सरपंचांनी बॉडी गावाला न्यायाला लोक धाडले. गावकरी आल्यावर सकाळी विठोबाचा देह त्यांच्या हवाली करायला बेड वरून उचलला तेव्हा वॉर्डबॉयना त्याच्या उशीवर पाऊले उमटलेली दिसली. आणि त्याच वेळी हेलिकॉप्टर मधून मुंबईकडे निघालेले मुख्यमंत्री आणि पत्नी एकमेकांशी बोलत होते की पूजा करताना साधारण तीन वाजता दोन क्षण विठ्ठलाची मूर्ती समोरून नाहीशी झाल्याचा दोघांनाही भास झाला होता! विठोबा शेलारचा आत्मा शरीर सोडून पहाटेच वैकुंठाकडे निघाला होता. आणि तो आत्मा कुडी सोडत असताना भक्ताची इच्छा पूर्ण करायला प्रत्यक्ष पंढरीनाथ क्षणभर स्वतःची होत असलेली पूजा सोडून भक्ताच्या डोक्याखाली आपले पाय ठेऊन उभा होता! आता पंढरपुरच्या मंदिरातला गाभारा विठूच्या गजराने दुमदुमत होता आणि आकाशात विरळ होत जाणारा विठोबा शेलारचा तृप्त आत्मा मोक्षाच्या वाटेवर केव्हाच निघाला होता!© मंदार जोग
