सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर – देव रिटायर झाला तेव्हा.

सचिन तेंडुलकर – देव रिटायर झाला तेव्हा.

आजच्याच दिवशी १३ वर्षांपूर्वी आमच्या दृष्टीने क्रिकेट संपलं. अर्थात पुढे विराट आणि रोहित दोघांनी ते जिवंत ठेवलं. पण क्रिकेटबद्दल वाटणारे प्रेम, उत्सुकता, उत्साह तेरा वर्षांपूर्वी आजच्या दिवशी जवळजवळ संपले. क्रिकेट म्हणजे सचिन, इतके आम्ही त्यात गुंतलो होतो. आम्हाला क्रिकेट म्हणजे काय हे कळायला लागल्यावर, १९८३ चा विश्वचषक भारताने जिंकल्यावर गावस्कर, कपिल, वेंगसरकर, विश्वनाथ, किरमाणकर, श्रीकांत, मोहिंदर ह्यांची कारकीर्द एखाद-दोन अपवाद वगळता जवळजवळ उताराला लागली होती. त्यावेळी आमच्याच वयाचा, आमच्याच पार्श्वभूमीचा, आमच्याच संस्कारातला, सचिन तेंडुलकर असं अगदी आपल्या मित्राचं वाटेल अशा नावाचा कुरळे केस आणि नाजूक आवाज असलेला, लाजऱ्या स्वभावाचा एक मुलगा आमच्याच समोर क्रिकेटचा देव बनण्याच्या मार्गावर मार्गस्थ होत होता. आम्ही देव आमच्या डोळ्यांदेखत घडताना अनुभवत होतो. खरं तर आम्ही देखील त्याच्या घडण्यात हातभार लावत होतो. टीव्हीवर रामायण, महाभारत आणि सचिनची बॅटिंग सुरू असली की देशभरात कर्फ्यु लागत असे. आणि ते संपल्यावर लोक टीव्ही बंद करत असत! मॅच बघताना आबालवृद्ध सचिन आऊट होऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवत असत. आणि त्या देवांना थंडी भरून ताप येत असे कारण सचिन आऊट होत नसे! तो आऊट होण्याचा क्षण म्हणजे संपूर्ण भारत एका सुरात हळहळत असे. त्यावेळी शेजारच्या देशात कदाचित भारतातील सामूहिक “आह” ऐकून लोक दचकत असतील अशी मला शंका वाटते!

टूथपेस्ट म्हणजे कोलगेट, चॉकलेट म्हणजे कॅडबरी, फोटोकॉपी मशीन म्हणजे झेरॉक्स, नूडल्स म्हणजे मॅगी, तसं क्रिकेट म्हणजे सचिन झालं होतं तमाम भारतीयांसाठी! हल्ली अर्ध्या हळकुंडाने आणि दोन-चार अर्धशतकांनी पिवळे होऊन, बीसीसीआय नामक धंदेवाईक कंपनीच्या आयपीएल नामक सर्कसमध्ये जोकर बनून नाचणारे लायकीपेक्षा कित्येक पटीने जास्त मिळालेल्या पैशांची शोबाजी करत मुजोर आणि स्वैर वागताना दिसतात, तेव्हा फक्त गुणवत्तेच्या जोरावर खेळाचा अनभिषिक्त सम्राट बनलेला सचिनचा सार्वजनिक वावर आठवतो आणि सॅल्युट केला जातो! अत्यंत दुर्मिळ गुणवत्ता असलेल्या सचिनला मध्यमवर्गीय, सुशिक्षित मराठी घरातले संस्कार देखील मिळाले, जे त्याला जमिनीवर ठेवायला आणि त्याच्या नम्र वागणुकीला कारणीभूत ठरले! त्यासाठी त्याचे आईवडील आणि संपूर्ण कुटुंबाचे देखील कौतुक. आज आपल्या मुलांना क्रिकेटमध्ये करिअर करायला पाठवताना त्या मुलांच्या आई-वडिलांनी आपले चिरंजीव वागणुकीत सचिन बनावे की हार्पिक आणि तत्सम जोकर बनावे, हे आधीच ठरवून तसे संस्कार मुलांवर करणे आवश्यक आहे!

सचिनच्या क्रिकेटबद्दल, त्याच्या रेकॉर्ड्सबद्दल गुगल केल्यास माहितीचा महापूर येईल. त्याचे अनेक रेकॉर्ड आपल्याला पाठही आहेत. क्रिकेटर म्हणून तो देवच आहे. पण करोडो लोकांच्या अपेक्षांचं ओझं पाठीवर घेऊन २४ वर्षं क्रिकेट खेळणं, त्यात मिळणाऱ्या यशाने हुरळून न जाता प्रत्येक मॅच ही पहिलीच मॅच आहे ह्या तयारीने मैदानात उतरणं, विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न दोन दशके उराशी बाळगणं, खेळातून येणाऱ्या दुखापतींवर मात करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेन्युइनली अत्यंत विनम्र असणं, हे त्याला माणूस म्हणून देखील उत्तुंग बनवतं!

आमच्या ऐन तारुण्यात आमच्यासाठी आपल्या खेळातून मनोरंजन, प्रेरणा, उत्साह, ईर्षा, उत्सुकता, उत्कंठा, खुन्नस, चिकाटी, आत्मविश्वास देणारा सचिन करोडो भारतीयांच्या गळ्यातला ताईत होता आणि आजही आहे! सचिन खेळाडू नाहीये. सचिन ही एक भावना आहे, सचिन हा विश्वास आहे, सचिन म्हणजे अभिमान आहे, सचिन म्हणजे आदर्श आहे, सचिन म्हणजे भारतीयांचा श्वास आहे! त्याला निवृत्त होऊन १३ वर्षं झाली तरी आजही सचिन हे नाव ऐकताच कोट्यवधी भारतीयांच्या मनात आनंद आणि अभिमान निर्माण होतो! त्याच्या आधी, त्याच्या बरोबर आणि त्याच्या नंतर खेळलेले, खूप चांगले खेळाडू असलेले देखील अनेकजण निवृत्त झाले; पण सचिन इतके कोणीच लक्षात राहिले नाहीत! म्हणूनच लता, अमिताभ, बाळासाहेब, रतन टाटा आणि सचिन उत्तुंग आहेत, त्यांचा कधीच विसर पडणार नाही!

मला आठवतं, १६ नोव्हेंबर २०१३ रोजी मॅच नंतर सचिन वानखेडेवर आला. त्याने वाकून खेळपट्टीला नमस्कार केला. खूप मनापासून बोलला. आभारप्रदर्शन केलं. भावूक झाला होता तो. त्याने डोळे पुसले तेव्हा संपूर्ण स्टेडियमला हुंदका आला! सचिनचं भाषण थांबलं आणि वानखेडेवर काही क्षण शांतता पसरली, कारण त्या क्षणानंतर क्रिकेटचा देव खेळातून कायमचा अंतर्धान पावणार होता! आणि मग स्टेडियम ‘सचिन… सचिन…’ च्या गजराने दुमदुमला. आजही कोणत्याही सामन्याच्या वेळी स्टेडियम ‘सचिन… सचिन…’ ने दुमदुमतो. आम्हाला तर मरीन ड्राइव्हवर फिरायला गेलो तरी तो गजर प्रत्येक वेळी ऐकू येतो; पण सचिन स्टेडियममध्ये नसतो, कारण देव आजच्या दिवशी २०१३ साली वानखेडेवर अंतर्धान पावला होता! ©मंदार जोग

आमचे whatsapp channel join करा- whatsapp.com 

हे पण वाचा-

सिने जगताशी संबंधित लेख- फिल्लमबाजी

ही वाट दूर जाते- ही वाट दूर जाते- भाग १ | सुरुवात

प्रेमकथा- प्रेम कथा

भयकथा- भयकथा

दीर्घकथा- दीर्घ कथा

ललित लेख- ललित

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

One thought on “सचिन तेंडुलकर – देव रिटायर झाला तेव्हा.”
  1. अगदी हेच ते शब्द शोधत होतो.. प्रेयसी-प्रियकराला सुद्धा विरहाच दुःख कमी होत आसेल इतक मन भरुन आल त्या दिवशी.. देवान माझ्या आयुष्यातली काही वर्ष त्याला फक्त मैदानावर खेळण्या साठी देण्याची व्यवस्था केली आसती तर लायनित मी पुढे उभा रहिलो आसतो..

    छान लीहिलाय… 🙏🙂

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: © Mandar Jog - All Rights Reserved