वारसा
४२, राफेल स्ट्रीट ह्या फिलाडेल्फिया मधील घरात “ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त…” असे देवे सुरू झाले आणि वत्सलाबाईंच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. समोर मखरात बसलेला बाप्पा धूसर होऊन त्यांना त्यांचे यजमान अभिराम वझे गेल्या वर्षी गेल्यानंतर साधारण सहा महिन्यांनी अमेरिकेहून आलेल्या त्यांच्या एकुलत्या एका लेकीचा, आर्याचा व्हिडिओ कॉल आठवला. अर्थात आर्याबरोबर जावई जतिनदेखील होता कॉलवर.
आर्या – हॅप्पी बर्थ डे, आई…
वत्सला – थँक यू…
जतिन – आई, वाढदिवसाच्या शुभेच्छा.
वत्सला – थँक यू, जतिन राव…
जतिन – परवा होळी आहे ना? त्याच्याही शुभेच्छा ह्याच कॉलवर देतो.
वत्सला – धन्यवाद… मिहिर कसा आहे?
आर्या – मस्त मजेत आहे. मस्ती करून आत्ताच झोपलाय. विचारत होता आजी कधी भेटणार म्हणून… बाबा गेले तेव्हा आम्ही आलो होतो, तेव्हा तुझी आणि त्याची भेट झाली होती ना? त्यालाही आता सहा महिने झाले.
जतिन – हम्म… पण बाबांनी जायचा मुहूर्त मात्र अगदी शोधून निवडला. तुमच्या घरचे गणपती, गौरी झाले. मिहिरला मी चौपाटीवर अनंत चतुर्दशीच विसर्जन दाखवलं आणि दुसऱ्या दिवशी बाबा गेले. गणपतीत कोणतंही विघ्न न आणता.
वत्सला – हम्म… ते गेले आणि त्यांच्या बरोबर आमचा वझ्यांचा गणपती देखील गेला. कारखान्यातून फोन आला होता मूर्ती बुक करायला. मी सांगितलं की यंदापासून आमचा गणपती नाही म्हणून. एक परंपरा त्यांच्या बरोबर संपली.
आर्या – आई, खरं तर हा विषय मला नंतर बोलायचा होता. पण आता निघालाच आहे तर आताच बोलते. बाबा गेल्यावर गणपती बंद का करायचा?
वत्सला – का म्हणजे? आमची तू एकुलती एक मुलगी. तू लग्न करून आहेस सातासमुद्रापार. आम्हाला मुलगा असता तर त्याने परंपरा पुढे सुरू ठेवली असती.
आर्या – आई, असं कुठे लिहिलं आहे का की मुलीने परंपरा पुढे नेऊ नये म्हणून?
वत्सला – म्हणजे?
आर्या – म्हणजे आपला गणपती मी माझ्या घरी आणायला सुरुवात केली तर?
वत्सला – अगं, पण तू तर आता आपटे आहेस. मग वझ्यांचा गणपती तुमच्या घरी…
आर्या – आई, गणपती गणपती असतो. त्याला आडनाव आपण लावतो. आपल्या घराण्यात पिढ्यानपिढ्या गणपती येतो आहे. मी ती परंपरा पुढे सुरू ठेवायला काय हरकत आहे?
वत्सला – अगं, पण जतिन राव…
जतिन – आई, मीच हे सुचवलं आर्याला. गणपती ही एक चांगली परंपरा आहे. लास्ट इयर आम्ही आलो होतो तेव्हा मी आणि मिहिरने खूप एन्जॉय केलं ते वातावरण, आरत्या, मोदक अँड ऑल. मिहिर यंदाही गणपतीला इंडियाला तुमच्या घरी जायचं म्हणत होता. बाकी घराण्याबद्दल बोलायचं तर आर्या तुमच्या घराण्याचीच आहे ना? लग्न झाल्यावर ती जशी आमच्या घराण्याची झाली, तसा मी पण तुमच्या घराण्याचा झालो ना? ती अर्धी आपटे आहे तर मी पण अर्धा वझे झालोय ना? आणि गणपती जरी आमच्या घरी आला तरी त्याची पूजा मुळची वझे म्हणजे आर्याच करेल. आपटे गुरुजी फक्त पूजा सांगतील.
वत्सला – जतिन राव…
आर्या – ए आई, प्लीज, नाही नको म्हणू. आडनावाने श्रद्धेत फरक पडत नाही. आणि बाबा म्हणायचे ना की माझी आर्या मुलगी असली तरी दहा मुलांपेक्षा भारी आहे म्हणून. मग मी मुलगी आहे म्हणून मला परंपरा पुढे न्यायची परवानगी नाकारलीस तर ते बाबांना आवडेल का? ते बघत आहेत ना वरून?
जतिन – आई, मिहिरची हौस आणि इच्छा म्हणून मी आपटे घराण्याचा म्हणून एक गणपती इथे आणून सुरुवात केली असती. पण नव्याने सुरुवात करण्याऐवजी आर्याचे बाबा गेल्यानंतर अनेक दशके सुरू असलेली परंपरा पुढे नेणं आम्हाला संयुक्तिक वाटतंय. गणपती वझ्यांचाच असेल, फक्त आता तो वझे अँड आपटे असा पार्टनरशिपमध्ये साजरा होईल.
ग्लोबल बिझनेस हेड असलेल्या जावयाचे हे शब्द ऐकून वत्सलाबाईंनाही हसू आलं.
आर्या – मग तयारी सुरू करतो आम्ही, आई. तुझा गाईडन्स लागेलच. मी तिकीट पाठवते. जुलैमध्येच ये इथे. कशाला पावसाळ्यात मुंबईत राहतेस? गणपती, नवरात्र, दिवाळी आणि ख्रिसमस करूनच परत जा इथून.
त्या आठवणीने डोळ्यांत आलेलं पाणी वत्सलाबाईंनी पुसलं. आरती संपली होती. त्यांच्या समोर लहानसं नाडीने बांधलेलं कद नेसलेला छोटुला मिहिर प्रसादाचा पेढा हातात धरून उभा होता. वत्सलाबाईंनी हात पुढे केल्यावर त्यांच्या हातात अर्धा पेढा तोडून देत तो म्हणाला –
मिहिर – तुला शुगर आहे ना? अर्धाच पेढा खायचा.
हे ऐकून वत्सलाबाईंना त्यांचे यजमान अभिराम वझ्यांची आठवण आली. आर्या लग्न करून अमेरिकेला गेल्यावर ते दोघेच असत मुंबईला गणपतीची आरती करायला. आरती झाल्यावर अभिराम असेच वत्सलाबाईंना अर्धा पेढा देऊन म्हणायचे, “तुला शुगर आहे ना? अर्धाच पेढा खायचा!” त्या आठवणीने वत्सलाबाईंना भरून आलं. त्यांनी मिहिरला उचलून घेतलं. समोर पूजा केलेला बाप्पा खूप प्रसन्न दिसत होता आणि मागे असलेल्या भिंतीवर लावलेल्या फोटोमधील अभिराम वझ्यांच्या चेहऱ्यावर जणू समाधानाचं हसू होतं. एक परंपरा, एक वारसा न थांबता अखंड सुरू राहिला होता.
© मंदार जोग
हे पण वाचा-
आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा
आमच्या लघुकथा लघुकथा
माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख
आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

tumchya katha sarv chhan astat punha punha vachlya tari pahilyandach vachli ashi vatate pratek katha kiva lekh …dhanyawaad
[…] वारसा […]