तुळशीच लग्न का लावतात?

तुळशीच लग्न का लावतात?

तुळशीच लग्न का लावतात?

लहान असताना आम्हा मुलांसाठी भाऊबीज संपली की दिवाळी संपायची. पण आई सांगायची, “तुळशीचं लग्न लागल्यावर दिवाळी संपते. तोवर कंदील काढायचा नाही.” तेव्हा तुळस म्हणजे चाळीत, कठड्याला बांधलेल्या डालडाच्या डब्यात असलेलं एक झाड, अशीच आमची ओळख होती. आता झाडाचं लग्न म्हणजे काय आणि का, असे प्रश्न पडायचे. मग एकदा चाळीतल्या एका आजींनी त्यामागची कथा सांगितली आणि आम्हाला तुळस म्हणजे काय, तिचं लग्न का लावतात याची माहिती मिळाली. आज या पोस्टमधून ती माहिती आणि कथा लिहित आहे. ज्यांना याबद्दल फारशी माहिती नाही, त्यांना नक्की आवडेल. GenZ ला लिंक अवश्य पाठवा.

खरं तर भाऊबीजे नंतर घराघरांत पुन्हा एकदा रोजच्या धावपळीला सुरुवात होते. फराळाचे डबे हळूहळू रिकामे होतात, पाहुण्यांची ये-जा कमी होते आणि दिवाळीच्या सुट्ट्यांचा मूडही मागे पडू लागतो. पण सणासुदीचा उत्साह अजून पूर्णपणे संपलेला नसतो. कारण कार्तिक महिन्यात तुळशीच्या लग्नाचा सोहळा बाकी आहे हे मनात माहित असत. दिवाळी सरलेली नसते तर अजूनही उरलेली असते. जस जसा तुळशी विवाह जवळ येतो तसतशी महाराष्ट्रातल्या अनेक घरांच्या अंगणात असलेल्या तुळशी वृंदावनाभोवती लग्नघरासारखी लगबग सुरू होते. कुठे तुळशीला साडी नेसवली जाते, कुठे उसाचा मांडव उभारला जातो, कुठे रांगोळी काढली जाते, तर कुठे तुळशी विवाहाच्या दिवशी चक्क मंगलाष्टकांच्या सुरात तुळशीचा विवाह लावला जातो. कार्तिक महिन्यातील द्वादशीच्या मुहूर्तावर तुळशीविवाह साजरा केला जातो. काही ठिकाणी देवउठणी एकादशीच्या दिवशीच हा सोहळा केला जातो. तुळशीचं लग्न म्हणजे खऱ्या अर्थाने दिवाळीच्या सणासुदीला निरोप आणि लग्नसराईच्या हंगामाची सुरुवात!

पण तुळशीचं लग्न लावण्याची प्रथा नेमकी सुरू कशी झाली? एका रोपाचा चक्क विवाह का लावला जातो? त्यामागे कोणती कथा आहे? आणि या लग्नात नवरदेव कोण असतो? आमच्या चाळीतल्या आजीनी सांगितलेली तुळशीविवाहामागे असलेली एक रंजक आणि काहीशी नाट्यमय पौराणिक कथा थोडक्यात खाली देत आहे. या कथेत वृंदा, तिचा पती जालंधर आणि भगवान विष्णू ही तीन महत्त्वाची पात्र आहेत.

वृंदा ही भगवान विष्णूची निस्सीम भक्त होती. तिचा विवाह जालंधर नावाच्या एका पराक्रमी असुराशी झाला होता. वृंदा अत्यंत पतिव्रता होती. तिच्या पतिव्रतेच्या सामर्थ्यामुळे जालंधराला एक प्रकारचं अभेद्य संरक्षण मिळालं होतं. त्याच्या शक्तीपुढे देवांचाही टिकाव लागत नव्हता. त्याने स्वर्गावर आक्रमण करून देवांना त्रस्त केलं होतं. त्याचा पराभव कसा करायचा, हा देवांपुढचा मोठा प्रश्न बनला होता.

अखेर देवांनी भगवान विष्णूंकडे मदत मागितली. जालंधराचा पराभव करण्यासाठी वृंदाच्या पतिव्रता धर्माचा भंग होणं आवश्यक होतं. त्यासाठी भगवान विष्णूंनी जालंधराचं रूप धारण केलं आणि वृंदेची फसवणूक केली. आपल्यासमोर आलेला पती जालंधरच आहे, असं समजून वृंदेच्या पतिव्रत्याचा भंग तिच्या नकळत झाला आणि लगेचच तिच्या पतिव्रतेच्या सामर्थ्यामुळे मिळालेलं जालंधरचं संरक्षण नष्ट झालं  आणि देवांना त्याचा वध करणं शक्य झालं.

विष्णुकडून आपली झालेली फसवणूक कळल्यावर वृंदा संतापली. तिने भगवान विष्णूंना शाप दिला. या शापामुळे विष्णूंना शिळेचं रूप प्राप्त झालं. त्यालाच शालिग्राम म्हणतात. पुढे वृंदा सती गेली आणि तिच्या राखेतून तुळशीचं रोप निर्माण झालं, अशी मान्यता आहे. काही कथांमध्ये वृंदेचं रूपांतरच तुळशीमध्ये झाल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर भगवान विष्णूंनी वृंदेला वर दिला की “तुझं स्थान कायम माझ्या पूजेत असेल. तुळशीशिवाय माझी पूजा पूर्ण होणार नाही.” तेव्हापासून तुळशीला विष्णुप्रिया असंही म्हटलं जाऊ लागलं. याच वृंदेचा विवाह भगवान विष्णूंच्या प्रतीकात्मक स्वरूपाशी म्हणजेच शालिग्रामाशी लावला जातो. म्हणूनच तुळशीच्या लग्नात नवरदेव म्हणून शालिग्रामाची पूजा केली जाते. शालिग्राम हा एक विशिष्ट प्रकारचा काळा, गोलसर दगड असतो. तो नेपाळमधील गंडकी नदीच्या परिसरात आढळतो. वैष्णव संप्रदायात शालिग्रामाला भगवान विष्णूंचं स्वरूप मानलं जातं. काही घरांमध्ये शालिग्रामाऐवजी श्रीकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवूनही तुळशीचा विवाह लावला जातो. एका बाजूला तुळस नवरी आणि दुसऱ्या बाजूला भगवान विष्णूंचं प्रतीक असलेला शालिग्राम नवरदेव! दोघांच्या विवाहासाठी घरात अगदी लग्नासारखाच माहोल तयार केला जातो.

हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवउठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी म्हणतात. आषाढी एकादशीपासून सुरू होणाऱ्या चार महिन्यांच्या काळाला चातुर्मास म्हणतात. या काळात भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि कार्तिक शुक्ल एकादशीला जागे होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. ह्या चातुर्मासात विवाह, गृहप्रवेश यांसारखी मंगलकार्यं करण्याचे मुहूर्त अनेक परंपरांमध्ये टाळले जातात. देवउठणी एकादशीला भगवान विष्णू जागे झाल्यानंतर शुभकार्यांचे मुहूर्त पुन्हा सुरू होतात. त्यामुळे तुळशीविवाहाला विशेष महत्त्व आहे. काही घरांमध्ये एकादशीला, काही ठिकाणी द्वादशीला, तर काही ठिकाणी कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीविवाह केला जातो. पण तुळशीचं लग्न झालं की लग्नसराईचा हंगाम सुरू झाला, असं समजलं जातं.

महाराष्ट्रात तुळशीविवाहाचा सोहळा अगदी घरगुती लग्नासारखा असतो. अनेक घरांमध्ये अंगणात तुळशी वृंदावन असतं. काही घरांमध्ये बाल्कनीत किंवा गॅलरीत कुंडीत तुळस लावलेली असते. जागा कोणतीही असो, या दिवशी तुळशीला विशेष सजवलं जातं. सर्वप्रथम तुळशी वृंदावन स्वच्छ केलं जातं. त्याला रंगरंगोटी केली जाते. आजूबाजूला सुंदर रांगोळी काढली जाते. तुळशीला छोटीशी साडी नेसवली जाते. फुलांचे हार, बांगड्या, कुंकू, हळद आणि इतर दागिन्यांनी तिचा साजशृंगार केला जातो. काही घरांमध्ये तुळशीला मंगळसूत्रही घातलं जातं. तुळशीभोवती उसाचे चार तुकडे रोवून मांडव उभारण्याची प्रथा आहे. हा मांडव पाहिला की एखाद्या लहानशा लग्नमंडपाची आठवण होते. तुळशीच्या बाजूला शालिग्राम किंवा श्रीकृष्णाची मूर्ती ठेवली जाते. त्यानंतर हळद-कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करून विवाहविधी केला जातो. मंगलाष्टकं म्हटली जातात आणि उपस्थित मंडळी अक्षता टाकतात. शेवटी आरती करून प्रसाद वाटला जातो. काही घरांमध्ये या दिवशी पुरणपोळी, लाडू, आवळा, ऊस आणि इतर पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. शेजारच्या महिलांना हळदीकुंकवासाठी बोलावलं जातं. लहान मुलांसाठी तर तुळशीचं लग्न हा एक वेगळाच आनंदाचा कार्यक्रम असतो. उसाचा मांडव, सजवलेली तुळस, फुलं आणि प्रसाद यामुळे त्यांनाही घरात लग्न असल्यासारखं वाटतं.

भारतीय घरांमध्ये तुळशीला फार पूर्वीपासून महत्त्वाचं स्थान आहे. पूर्वी जवळपास प्रत्येक घराच्या अंगणात तुळशी वृंदावन असायचंच. सकाळी अंगण झाडून तुळशीला पाणी घालणं, संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावणं ही अनेक घरांमधली रोजची परंपरा होती. घरातल्या ज्येष्ठ महिलांसाठी तुळस ही केवळ एक वनस्पती नव्हती, तर घराच्या मांगल्याचं आणि समृद्धीचं प्रतीक होती. धार्मिक महत्त्वाबरोबरच तुळशीचे औषधी गुणधर्मही आहेत. आयुर्वेदात तुळशीचा विविध कारणांसाठी उपयोग केला जातो. सर्दी, खोकला यांसारख्या किरकोळ त्रासांमध्ये तुळशीचा काढा किंवा तुळशीची पानं वापरण्याची पद्धत अनेक घरांमध्ये आजही आहे. आपल्या घराच्या अंगणात सहज उपलब्ध असलेल्या या वनस्पतीचा दैनंदिन जीवनात उपयोग होत आला आहे. तुळशीविवाहाच्या निमित्ताने वर्षातून एकदा या रोपाला नवरीसारखं सजवणं, त्याभोवती सगळ्यांनी एकत्र येणं आणि आनंद साजरा करणं ही परंपरा खरोखरच सुंदर आहे.

यंदा देखील दिवाळीचे सगळेच दिवस उत्साहात साजरे झाले. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे सण पार पडले. दिवाळीचा फराळ, फटाके, रोषणाई आणि नातेवाईकांच्या भेटीगाठी यांची लगबग आता संपली आहे. देवउठणी एकादशी आणि तुळशीविवाहानंतर देखील कार्तिक महिन्यातील उत्सवांची परंपरा पुढे सुरू राहते. कार्तिक पौर्णिमा आणि देवदिवाळी नंतर त्याला पूर्णविराम मिळतो. दिवाळीचा उत्साह ओसरला की लग्नसराईचे दिवस सुरू होतील. खरेदी सुरू होईल, हॉल बुक होतील, बाजारपेठ गर्दीने ओसंडू लागतील आणि घराघरांत लग्नाच्या निमंत्रणपत्रिका येऊ लागतील.

काळ बदलल्यावर आजच्या काळात अनेक घरांमध्ये अंगणच राहिलेलं नाही. फ्लॅट संस्कृतीत तुळस एखाद्या छोट्याशा कुंडीत बाल्कनीत उभी असते. तरीही तिचं महत्त्व कमी झालेलं नाही. कारण परंपरा टिकवण्यासाठी मोठं अंगण किंवा प्रशस्त घर असण्याची गरज नसते. थोडीशी जागा, एखादं तुळशीचं रोप आणि घरातल्या माणसांनी एकत्र येण्याची इच्छा एवढं पुरेसं असतं. शेवटी तुळशीचं लग्न हा आपल्या सणसंस्कृतीमधला एक पवित्र सोहळा आहे. यात देवधर्म आहे, पौराणिक कथा आहे, निसर्गाबद्दलची आस्था आहे आणि घरातल्या माणसांना एकत्र आणण्याचे एक कारणही आहे. दिवाळीच्या रोषणाईनंतर तुळशीपाशी लागणारा हा छोटासा दिवा आपल्याला पुढे येणाऱ्या एका नव्या आणि आनंदाच्या पर्वाची चाहूल देतो. तर मंडळी तुळशीचं लग्न झालं की दिवाळीला निरोप आणि लग्नसराईला सुरुवात! आता पुढचे काही महिने मंगलाष्टकांचे सूर, सनई-चौघड्यांचा आवाज आणि लग्नाच्या जेवणावळींची रेलचेल अनुभवायला मिळणार आहे. अर्थात, लग्नसराईत जायचं म्हटलं की कपडे कोणते घालायचे आणि आहेर किती द्यायचा ह्या बरोबरच दिवाळी आणि लग्नात पोटभर खाऊन वाढलेलं वजन घटवायला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सालाबादप्रमाणे पुढील वर्षी देखील किमान महिनाभर तरी जिम जॉईन करुया ना? आपल्याला सर्वांना तुळशी विवाहाच्या शुभेच्छा.

आमचे whatsapp channel join करा- whatsapp.com  

आम्हाला फेसबुकवर follow करा- https://www.facebook.com/mandar.jog.31

हे पण वाचा-

इतर माहितीपूर्ण लेख- माहितीपूर्ण लेख

विनोदी कथा – विनोदी कथा

भयकथा – भयकथा

कादंबरी- सख्या रे….

कादंबरी- ट्वेंटी थ्री

सिनेमा विषयक लेख- फिल्लमबाजी

दीर्घकथा – दीर्घ कथा

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

One thought on “तुळशीच लग्न का लावतात?  ”
  1. माहितीपूर्ण लेख तुळशी विवाह कसा साजरा करायचा याची माहिती मिळाली धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: © Mandar Jog - All Rights Reserved