मराठी रोमँटिक कथा - ही वाट दूर जाते भाग ९

ही वाट दूर जाते भाग 7: अपूर्ण | मराठी दीर्घ कथा

ही वाट दूर जाते भाग 7: अपूर्ण | मराठी दीर्घ कथा

रात्री अश्विनी तिच्या रूममध्ये पडून विचार करत होती. म्हणजे असे खास काहीच विचार नव्हते. पण तरीही मन ओक्युपाइड होते. इतक्यात फोनमधून मेसेज टोन आला. तिने फोन पाहिला. मेसेज आदित्यचा होता-

आदित्य- Hi. झोपलीस का?

अश्विनी- नाही.

आदित्य- ओके.

अश्विनी-हम्म

आदित्य- मग काय ठरवलं आहेस?

अश्विनी- ठरवलं त्याने आहे. मी फक्त जे समोर येईल त्याचा सामना करणार आहे.

आदित्य- मी चित्राबद्दल विचारलं.

अश्विनी- ओह. I am sorry!

आदित्य- You don’t have to be. Its okay.

अश्विनी- अरे नाही. काही सुचत नाहीये.

आदित्य- Okay. Let us leave it to Williams. पण एक विचारू?

अश्विनी- हम्म

आदित्य- तुला अविनाशचा राग नाही का आला? काय वेडेपणा आहे हा त्याचा!

अश्विनी- आला. खूप राग आला. पण नंतर लक्षात आलं की रागावून प्रश्न सुटणार नाही. दुःख करून घेऊन सुख मिळणार नाही. मग जे आहे त्याचा सामना करणे, त्यातून काहीतरी शिकणे असा अप्रोच झालाय माझा.

आदित्य- हम्म. काय शिकलीस ह्यातून?

अश्विनी- आपल्या मनाचा कौल ऐकावा. मन कुठेतरी आपल्याला आगाऊ सूचना देत असतं. अनेकदा परावृत्त करत असतं. ते शक्यतो ऐकावं. कारण आपलं मनच आपल्याला सर्वात चांगलं ओळखत असतं.

आदित्य- हम्म

अश्विनी- आदित्य, अविनाशशी लग्न न करण्यासाठी माझं मन मला आतून सूचना देत होत. पण आईबाबांकडे बघून मी मनाकडे दुर्लक्ष केलं!

आदित्य- ओह! ओके!

अश्विनी- अजून एक शिकले ह्यातून.

आदित्य- काय?

अश्विनी- Marriage is nothing but legalisation of sex! लग्नामुळे सेक्स करायचा कायदेशीर अधिकार प्राप्त होतो. जबाबदारी, भावना, प्रेम, आपुलकी, आदर मात्र right किंवा कर्तव्य न बनता चॉईसच रहातात!

आदित्य- हम्म

अश्विनी- आणि सर्वात मजेशीर गोष्ट अशी की ज्यात जबाबदारी, भावना, प्रेम, आपुलकी हे कर्तव्य वाटतात त्या नात्याला कायदेशीर चौकटीची गरज उरत नाही. अगदी अश्या नात्यातील सेक्सला सुद्धा! अविनाशने आमच्या कायदेशीर नात्याने त्याला दिलेला हक्क बजावला. पण आमचं नातं मात्र एखाद्या निर्जीव लीगल पेपर सारखं निर्जीव, भावनाशून्य बनून राहिलं. श्रेडरमध्ये गेल्यावर क्षणार्धात नष्ट होणारं! झालेलं!

आदित्य- हम्म!

काहीवेळ कोणीच बोलत नव्हतं. दोघेही फक्त “ऑनलाईन” होते.

आदित्य- Are you feeling better after speaking it all out?

अश्विनी- हम्म

आदित्य- मग झोप आता शांत. उद्या वर्कशॉपला भेटू. गुड नाईट!

अश्विनी- गुड नाईट….and thanks!

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दोघेही वर्कशॉपला पोहोचले. आज शेवटचा दिवस होता. विल्यम्स समोरच्या स्टँडवर दोघांची चित्रे ठेवून गोलाकार ठेवलेल्या खुर्च्यांच्या मधोमध उभा होता. सगळे विद्यार्थी सभोवताल बसलेले होते.

विल्यम्स- तर मित्रांनो कसा काय वाटला अनुभव एकत्र चित्र काढायचा?

सगळे- खूप मस्त!

विल्यम्स- गुड. पण एक चित्र आहे जे अजून अपूर्ण आहे. (त्या दोघांकडे बघून) आदित्य आणि अश्विनी काय ठरवलंय तुम्ही?

दोघांनी एकमेकांकडे पाहिले. मग विल्यम्सकडे बघून हसले.

आदित्य- Nothing. आम्हाला लक्षात येत नाहीये काय करायचं ते.

विल्यम्स- ओके. मी मदत करतो. दोघेही इथे या.

दोघे त्याच्याजवळ गेले.

विल्यम्स- आदित्य, हे तुझे चित्र आहे ना? आणि अश्विनी हे तुझे? (दोघांनी होकारार्थी मान हलवली)

विल्यम्स- (सर्वांना उद्देशून) मित्रांनो, ह्या दोघांना मी दोन वेगवेगळी चित्र काढायची असाईंमेन्ट दिली होती. त्या दोन चित्रांना नंतर एक करायचे अशी टास्क होती. त्यांना सुचत नाहीये काय करायचे. ही चित्र एकरूप कशी करायची. मित्रांनो चित्र अनेकदा चित्रकाराची मनस्थिती सांगतात. ह्या चित्रांवरून हे दोघेही कुठेतरी एकटे असल्याचा एक फील येतो. मग त्यांना आपण चित्रातूनच आपला संदेश द्यायचा का?

सगळे- येस!

विल्यम्स- ओके. (हातात ब्रश घेतो) आदित्य हे तुझे चित्र राईट? आणि अश्विनी हे तुझे. आदित्यच्या चित्रात एक समुद्रकिनारी एकटा धावणारा मुलगा आहे आणि अश्विनीच्या चित्रात किनाऱ्यावर उभी असलेली एकटी मुलगी. ह्यातील कॉमन फॅक्टर काय तर समुद्र आणि मावळता सूर्य! समुद्र म्हणजे खरे तर अथांगता! पण ह्या दोघांना त्यात मावळता सूर्य सापडला. उजेड संपवणारा, अंधार पसरवणारा! एकटेपणाला अधिक गहिरेपणा देणारा! आपण एक आयडिया करूया! (आदित्यकडे वळून) आदित्य तुझ्या चित्रात सूर्य मावळतोय ती दिशा पश्चिम आहे?

आदित्य- हो.

विल्यम्स- अश्विनी, तुझ्या चित्रातही सूर्य पश्चिमेला मावळतोय?

अश्विनी- हो.

विल्यम्स- चला म्हणजे दोन्ही चित्र संध्याकाळची आहेत. आता आपण गंमत करूया.

इतके म्हणून विल्यम्सने दोन्ही चित्र एकमेकांशेजारी ठेवली. दोन्ही चित्रांतील सूर्य आकाशाच्या रंगाने मिटवून टाकला. आदित्यच्या चित्रात एकट्या मुलाच्या मागे असलेल्या पूर्वेकडील इमारतींच्या मधून एक सूर्य काढला. त्याची किरणे अश्विनीच्या चित्रातील मुलीवर, किनाऱ्यावर आणली. समुद्राचा रंग सारखा केला. जणू दोघेही एकाच किनाऱ्यावर सकाळच्या प्रसन्न वेळी आहेत असे भासावे. आणि चित्राच्या खाली मधोमध चित्रकाराचे नाव म्हणून आदित्यच्या कॅनव्हासवर A लिहिले आणि त्याच्याच बाजूला अश्विनीच्या कॅनव्हासवर ditya आणि त्याच्याच खाली shwini लिहिले. जणू तो एक A ह्या दोन्ही नावांना पूर्ण करत होता!

सगळे उभे राहून टाळ्या वाजवत होते.

विल्यम्स- (त्या दोघांकडे बघून) आता हे चित्र पूर्ण झाले. ह्याला तुम्हाला आवडेल त्या फ्रेममध्ये बसवा. ते स्वातंत्र्य तुमचे आहे. पण चित्र हेच ठेवा.

विल्यम्स कौतुकभरल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहात सूचक हसत होता. दोघेही पुढे होऊन त्याला थँक्स म्हणून शेक हॅन्ड केले.

आदित्य ती दोन्ही पेंटिंग घरी घेऊन आला. अजूनही त्याला कोणत्या फ्रेममध्ये लावावे हे ठरत नव्हते. त्यांच्या मैत्रीचे किंवा नात्याचेही असेच होते. फोनवर अनेक तास चॅट, गप्पा, काही भेटी ह्यातून ते खूप जवळ येत गेले. एकमेकांना ओळखू लागले. एकमेकांचा एकाकीपणा, एकलकोंडेपणा संपवत होते. त्यांना एकमेकांचा सहवास आवडू लागला होता. पण नात्याला नाव काय द्यायचे हे कळत नव्हते. मैत्री हे नाव वरकरणी असले तरी नाते त्या पलीकडे गेलेले दोघांनाही जाणवत होते. ह्यात काही दिवस गेले.

आदित्यबरोबर रोजचा चॅट संपवून अश्विनीने फोन बाजूला ठेवला. रात्रीचे बारा वाजून गेले होते. दिवा मालवून डोळे मिटले. इतक्यात फोन वाजला. आदित्यचा फोन असणार म्हणून तिने घाईघाईत फोन उचलला. फोनवर “अविनाश” हे नाव दिसत होते. तिला जवळजवळ विसर पडलेले नाव! अश्विनी फोनकडे बघत राहिली. फोन रिंग होत राहिला. काही वेळाने आपोआप थांबला. अश्विनीने शांतपणे फोन बाजूला ठेवून डोळे मिटून घेतले.

आदित्यचा फोन वाजला. आदित्यने फोन बघितला. फोन अविनाशचा होता.

आदित्य- हाय अविनाश. इतक्या रात्री फोन? All well?

अविनाश- Yes yes. अरे मी वाचलो. ह्या अमेरिकन पोरी बेकार असतात. Good I realised it before sending the divorce notice to Ashwini. प्रणव उद्या नोटीस पाठवणार आहे. मी त्याला मेसेज केला आहे to stop. पण तू प्लिज उद्या त्याला कॉल करून नोटीस नको पाठवू म्हणून सांगशील? I don’t want to mess up this time!

आदित्य- (उत्तर देत नाही)

अविनाश- Adi, ars you there? प्लिज प्राणवला first thing in the morning फोन करशील?

आदित्य- ओके. करतो.

अविनाश- Thanks bro. Love you.

अविनाशने फोन ठेवला. आदित्य अजूनही चौकटीची वाट बघत समोरील चित्रांकडे पाहत होता. तितक्यात अश्विनीला मेसेज आला. तिने मेसेज वाचला. मेसेज अविनाशचा होता “मी पुढील आठवड्यात इंडियाला येत आहे. तुला बरोबर घेऊन जायला. विसा वगैरे प्रोसेस माझी कंपनी बघेल. Get ready!”

आदित्य त्याच्या चित्रातील A च्या पुढे vinash लिहून चित्राकडे बघत बसला!

क्रमश:

आमचे whatsapp channel join करा- whatsapp.com  

आधीच्या भागाची लिंक- ही वाट दूर जाते – भाग ६ – उधाण – मराठी कथा

पुढील भागाची लिंक- ही वाट दूर जाते – भाग ८ – आय लव्ह यु – मराठी कथा

सगळे भाग एकत्र – ही वाट दूर जाते – सर्व भागांची लिंक

हे पण वाचा-

कादंबरी- सख्या रे …

कादंबरी- ट्वेंटी थ्री

वेळ

कच्छी

बाप्पा

वारसा

गणपती – तथास्तु

गणपती – तथास्तु

कृष्ण जन्म

गणपती, उत्सव कि इव्हेंट?

आजी

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: © Mandar Jog - All Rights Reserved