मराठी रोमँटिक कथा - ही वाट दूर जाते भाग ९

ही वाट दूर जाते भाग 4: आदिम | हृदयस्पर्शी मराठी कथा

ही वाट दूर जाते भाग 4: आदिम | हृदयस्पर्शी मराठी कथा

अश्विनीने डोळे उघडले तेव्हा तिचं तेच जग आता पूर्ण बदललेलं भासत होतं. काही तासांपूर्वी एक विवाहित स्त्री असलेली अश्विनी आता नवऱ्याने त्यागलेली होती. त्यावर काही महिन्यांत कायदेशीर मोहोर उठणार होती आणि ती विभक्तीच्या मार्गावर जाणार होती. एखादा सेकंद एखाद्या व्यक्तीचं आयुष्य कसं बदलून टाकू शकतो, याचा प्रत्यय अश्विनीला येत होता!

बरं, अविनाशचा निर्णय हा फोनवर झालेल्या भांडणातून आलेल्या रागामुळे घेतलेला तात्कालिक निर्णय असेल, असा एक भोळा आशावाद तिच्या मनात कुठेतरी होता. त्यामुळे त्याचा निर्णय सासू-सासऱ्यांना सांगायला तिचं मन धजावत नव्हतं. आई-बाबांना तर प्रचंड धक्का बसेल, या भीतीने त्यांनाही काही सांगण्याची तिची हिंमत होत नव्हती.

नोटीस यायला अजून एक महिना होता. अविनाशने जणू अश्विनीच्या मनात, तिच्या आयुष्यात एक महिन्यानंतर स्फोट होणारा टाइमबॉम्ब लावून ठेवला होता. त्याच्या घड्याळाची टिकटिक तिला प्रचंड अस्वस्थ करत होती. पण त्या बॉम्बचं अस्तित्व, त्यातून होणारा त्रास आणि मनातली भीती ती कोणालाच सांगू शकत नव्हती!

अश्विनीने अविनाशला फोन लावला. त्याने फोन उचलला नाही. तिने पुन्हा पुन्हा प्रयत्न केले, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी फोन लागणंच बंद झालं. जणू त्याने तिचा नंबर ब्लॉक केला होता!

तिला प्रचंड रडायला आलं. इतक्यात बाहेरून सासूबाईंनी जेवायला हाक मारली. अश्विनीने स्वतःला सावरलं.

“मला भूक नाहीये. जरा डोकं दुखतंय. मी झोपते!”

इतकं उत्तर तिने आतूनच दिलं आणि दिवा मालवला. तिच्या मनात, आयुष्यात साठलेला अंधार आता खोलीतही पसरला होता!

दुसऱ्या दिवसापासून अश्विनीने ठरवलं, जे होईल त्याचा त्या त्या वेळी सामना करायचा. बॉम्ब जेव्हा फुटायचा तेव्हा फुटून आपली शकले होऊ देत. पण त्या भीतीने रोज थोडं थोडं मरत राहण्यात काहीच अर्थ नव्हता, हे तिच्या लक्षात आलं.

हा वैचारिक बदल घडायला आणि मन कठोर व्हायला काही दिवस गेले. या काळात अश्विनी अविनाशला फोन करण्याचा प्रयत्न करत होती. पण त्याने तिचा नंबर आणि फेसबुक प्रोफाईलही ब्लॉक केलं होतं. शेवटी तिने त्याचा नाद सोडला.

आता पुढे काय करायचं, हा प्रश्न तिच्यासमोर होता. अविनाशला सहजासहजी घटस्फोट द्यायचा की त्याच्या संमतीच्या प्रस्तावाला विरोध करायचा, याचा ती विचार करत होती. हे सगळं कळल्यावर आई-बाबांना काय वाटेल, त्यांना किती त्रास होईल आणि अशा वेळी त्यांना धीर कसा द्यायचा, हेही ती मनाशी ठरवत होती.

या सगळ्या वैचारिक द्वंद्वात ती एकटीच लढत होती.

अश्विनी हळूहळू इतर जगापासून दूर गेली. पूर्वी हसत-खेळत, सगळ्यांत मिळून-मिसळून वागणारी मनस्वी अश्विनी गेल्या काही दिवसांत एकलकोंडी झाली होती. ती कोणाशीच काही बोलत नव्हती. तिच्यातला हा बदल सासू-सासरे, आई-वडील आणि ऑफिसमधल्या काही सहकाऱ्यांच्याही लक्षात आला.

“काही प्रॉब्लेम आहे का?” असा प्रश्न कोणी विचारला की ती, “काही नाही. जरा बोर झालंय हल्ली,” असं उत्तर देऊन वेळ मारून नेत होती.

अविनाशचा तो फोन येऊन आता पंधरवडा झाला होता. लोकांत राहूनही आयुष्यात आलेल्या एकटेपणाची अश्विनीला आता सवय होऊ लागली होती!

हल्ली ऑफिस सुटलं की ती चौपाटीच्या कट्ट्यावर एकटीच जाऊन बसायची. मावळत्या सूर्यात तिला कुठेतरी स्वतःचं सुख दिसत होतं… मावळतीला आलेलं!

तिच्या आयुष्यातल्या एकाकीपणाला समोर पसरलेल्या समुद्राचा मोठा आधार वाटत होता. आयुष्य फारच गुंतागुंतीचं झालं तर हाच समुद्र आपल्याला स्वतःत सामावून घेईल आणि आयुष्य संपवायला मदत करेल, असे नकारात्मक विचारही तिच्या मनात येत होते. असे विचार आले की ती आणखी अस्वस्थ व्हायची.

त्या दिवशीही ती अशीच समुद्राकडे एकटक बघत बसली होती. किनाऱ्यावर आपटून मागे जाणाऱ्या लाटा जणू तिला आपल्याकडे ओढत होत्या. समुद्रकिनाऱ्यावरच्या वाळूत उभं राहिलं की परत जाणाऱ्या लाटांची ओढ पायांना जाणवते. तशीच काहीशी ओढ तिच्या मनालाही जाणवत होती. जणू समुद्र तिला खुणावत होता.

समुद्राबद्दल तिला एक गूढ आकर्षण वाटत होतं. तो आपल्या दुःखाचा अंत करेल, असे विचार तिच्या मनात येत होते. मावळत्या सूर्यासोबत पसरत जाणाऱ्या अंधाराचं मळभ तिच्या मनावरही दाटत होतं.

आणि मग तो एक फसवा क्षण आला.

तिने समुद्रात सामावून जायचा निर्धार केला. आयुष्यातली गुंतागुंत, दुःख आणि एकाकीपणा यांवर एकच इलाज होता, असं तिला त्या क्षणी वाटलं. आयुष्यच संपवून टाकायचं!

अश्विनी उठून उभी राहिली. भरतीच्या लाटा किनाऱ्याच्या दगडी भिंतीवर धडका देत होत्या. उडी मारली की लाटेच्या धक्क्याने दगडावर डोकं आपटेल, बेशुद्ध पडू आणि मग काही कळायच्या आत सगळं संपेल, असा विचार तिच्या मनात आला. तिला तो मृत्यू वेदनारहित असेल, असं वाटत होतं.

ती समुद्राकडे बघत उभी होती. तिच्या मनातून विश्वास ही गोष्ट इतकी उडून गेली होती की समुद्र खरंच मृत्यू देऊ शकेल की नाही, याबद्दलही ती साशंक होती!

तिने डोळे मिटून घेतले. आई-बाबांचे चेहरे तिच्या डोळ्यांसमोर आले. तिने पुन्हा डोळे उघडले. डोळ्यांसमोर अश्रूंचा धूसर पडदा होता. समुद्र आता अस्पष्ट दिसत होता… अगदी तिच्या भविष्याप्रमाणे!

तिने पुन्हा एकदा शेवटचे डोळे बंद केले. मनात आकडे मोजले.

एक… दोन…

इतक्यात मागून आवाज आला.

“तीन!”

अश्विनी दचकून मागे वळली. मागे आदित्य उभा होता. ट्रॅक सूट घातलेला, हातात एनर्जी ड्रिंकची बाटली धरलेला. ती वळून बघताच तो हसला.

आदित्य: हाय! तुला अशी उभी असलेली बघून मी उगाच जोक मारला. जणू तू सुसाइड करायला उभी होतीस आणि मनात आकडे मोजत होतीस, म्हणून मी लास्ट नंबर म्हणालो. I know it was a bad joke. Anyway, I am not good at all this. पण तू इथे काय करते आहेस? I mean, एकटीच चौपाटीला?

अश्विनी: (भानावर येत) अ… अरे, काही नाही. आले सहज फिरायला. बंदी आहे का मला चौपाटीला यायची?

आदित्य: Of course not. पण ही वेळ एकतर कपल्सची किंवा आमच्यासारख्या एकट्या जॉगिंगवाल्यांची. म्हणून आश्चर्य वाटलं. बाकी, you are most welcome. तुला मी कोण थांबवणार? उलट, तुला मी बोलवायला काही दिवसांपूर्वी फोन केला होता, पण तू उचलला नाहीस.

आदित्यच्या बोलण्याने अश्विनीला तो दिवस आठवला. त्याचा फोन आल्यावर तिने तो न घेताच बेडवर भिरकावून दिला होता. आता त्याच्यासमोर काय उत्तर द्यावं, हे तिला सुचत नव्हतं. शेवटी तिने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

अश्विनी: अरे हो! मला दिसला तुझा मिस्ड कॉल. मी करणार पण होते. पण मग काहीतरी आलं आणि राहून गेलं. I am so sorry! पण का केला होतास फोन?

आदित्य: अगं, फ्रान्सचा प्रसिद्ध चित्रकार विल्यम्स इंडियात आलाय. तो भारतभर पेंटिंगची वर्कशॉप्स घेत आहे. मी लास्ट टाइम अटेंड केलं होतं. अमेझिंग अनुभव! अविनाश केव्हातरी म्हणाला होता की तुला पेंटिंगमध्ये इंटरेस्ट आहे. म्हणून तुला विचारायला कॉल केला होता की अटेंड करणार का म्हणून. बाकी खास काही नाही.

अश्विनी: Oh! Then I missed a good opportunity! माझं नशीबच खराब!

आदित्य: नशीब खराब, हे मान्य. पण कर्म तुझ्या हातात आहे. नशिबाला दोष सगळेच देतात. तुला कर्म करून नशिबावर विजय मिळवायचा चान्स आहे.

अश्विनी: What do you mean?

आदित्य: विल्यम्स दिल्लीला आहे. बंगलोरला जायच्या आधी परवापासून तो मुंबईत तीन दिवसांचं अजून एक वर्कशॉप घेत आहे. संध्याकाळी सात ते दहा. मी जाणार आहे. तुला संधी आहे अटेंड करायची. नशिबावर कर्म करून मात करायची. Think about it. I will message you the address. Time for my run. See you!

इतकं बोलून आदित्य धावत दूर निघून गेला.

अश्विनीच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. अविनाश, घटस्फोट, आई-बाबा, सासू-सासरे, एकाकीपणा, आत्महत्या… आणि आदित्य!

आदित्य? तो या सगळ्यात कुठून आला? आत्ताच तर भेटला होता. पण तो भेटला नसता तर?

आपण काय करणार होतो, याची जाणीव होताच अश्विनीच्या अंगावर शहारा आला. आपण किती मोठा वेडेपणा करायला निघालो होतो, हे तिला उमगलं. पुन्हा कधीही असा विचार करायचा नाही, असा तिने निर्धार केला.

नशिबावर कर्माने मात करायची!

हे कोणाचे शब्द होते? आदित्यचे? किती महत्त्वाची गोष्ट तो एका वाक्यात सांगून गेला होता! अश्विनीने मनाशी ठरवलं, ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायची.

थँक्स, आदित्य! मी ते वर्कशॉप अटेंड करेन. नशीब त्याला हवं ते करू दे. मी माझं कर्म करण्यात चुकणार नाही!

सूर्य आता मावळला होता. म्युनिसिपालिटीच्या दिव्यांत रस्ते अंधुक दिसत होते. पण पुढचा मार्ग दिसत असल्यामुळे पुढे जाण्याचा आत्मविश्वास मिळत होता.

समुद्रकिनाऱ्याच्या एका टोकाला एक एकलकोंडा जीव जॉगिंग करत होता. दुसऱ्या टोकाला एक एकाकी मुलगी उभी होती. आयुष्यात पुन्हा एकदा सकारात्मकता मिळाल्यामुळे तिने एकाकी असलं तरी सकारात्मक जीवन जगायचा निर्णय घेतला होता.

त्या दोघांना जोडणारा समुद्र नशिबाच्या भिंतीवर धडका देत होता.

वर्कशॉप नावाचं कर्म त्या दोघांचंही नशीब बदलणार होतं का? याचं उत्तर माहीत असलेला समुद्र आपल्या गाजेतून “हो!” म्हणत हसत होता.

आता किनाऱ्यावरचा क्वीन्स नेकलेस प्रकाशाने उजळून निघाला होता!

क्रमश:

आमचे whatsapp channel join करा- whatsapp.com  

पुढील भागाची लिंक- ही वाट दूर जाते – भाग ५ – कॅनव्हास – मराठी कथा

मागील भागाची लिंक- ही वाट दूर जाते – भाग ३ – सत्य – मराठी कथा

हे पण वाचा- वेळ

कच्छी

बाप्पा

वारसा

गणपती – तथास्तु

गणपती – तथास्तु

कृष्ण जन्म

गणपती, उत्सव कि इव्हेंट?

आजी

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: © Mandar Jog - All Rights Reserved