ही वाट दूर जाते भाग 3: सत्य | मराठी दीर्घ कथा
ही वाट दूर जाते भाग 3: सत्य | मराठी दीर्घ कथा
सकाळ उजाडली तीच मुळी दुरावा आणि उदासी घेऊन. वातावरणात एक असह्य तणाव पसरला होता. अविनाश फारसं न बोलता मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसला होता. त्याचे आई-वडील भेटवस्तू बघण्यात आणि नातेवाईकांचे फोन घेण्यात मश्गुल होते. अश्विनी मात्र नव्या जागेत, नव्या माणसांत हरवून गेली होती. तिला मार्ग दाखवणारा माणूसच तिच्यापासून खूप लांब जाऊन उभा राहिला होता!
अश्विनीने चहा केला आणि एक कप घेऊन ती बेडरूममध्ये अविनाशकडे गेली.
अश्विनी – (चहाचा कप पुढे करत) गुड मॉर्निंग!
अविनाश – (मान वर न करताच) ठेव तिथे.
अश्विनी – इतका का रे रागावलास? मला थोडा वेळ दे ना.
अविनाश – माझ्याकडे तोच नाहीये. मी गेल्यावर तुझ्याकडे वेळच वेळ असेल.
अश्विनी – (त्याच्या शेजारी बसून, त्याचा मोबाईल बाजूला ठेवत) किती ती घाई!
अविनाश – I told you I don’t have time.
अश्विनी – (मिश्किल हसत त्याच्या डोळ्यांत बघत) चहा घेण्याइतका तरी वेळ आहे की चहा न घेताच… (लाजली)
अविनाशला दोन क्षण तिच्या बोलण्याचा अर्थ लक्षात आला नाही. पण लक्षात येताच त्याने चहा घेण्यात वेळ फुकट घालवला नाही. दोघंही प्रेमाच्या त्या अलौकिक आनंदात आकंठ बुडून गेले.
शेवटी दरवाजावर बाहेरून टकटक झाली. अविनाशच्या आईने जेवण तयार असल्याचं सांगितलं.
अविनाशने आतूनच, “पोट भरलंय!” असं ओरडून सांगितलं आणि शेजारी झोपलेल्या अश्विनीकडे बघून डोळा मारला. ती प्रचंड लाजली. उठून कपडे गोळा करू लागली. अविनाशने तिला मागून मिठी मारली.
पुन्हा एक तास कसा गेला, ते दोघांनाही कळलं नाही. डायनिंग टेबलवरचं जेवण आणि बेडरूममधला चहा थंड झाले होते. चहावर दुधाची साय जमली होती, तर या दोघांच्या मनावर प्रेमाच्या सायीचा गोड थर चढला होता! दुपारही त्या सायीच्या दुलईत विरून गेली.
संध्याकाळी केव्हातरी अविनाशला तृप्त झोप लागली. अश्विनी विस्कटलेले, इतस्ततः विखुरलेले कपडे आणि दागिने सावरत बेडरूममधून बाहेर आली. तिचं शरीर आणि मन दोन्ही तृप्त होतं. नशीब, तेव्हा सासरे बाहेर गेले होते.
सासूबाईंनी तिच्याकडे बघितलं आणि त्या सूचकपणे हसल्या. अश्विनी लाजेने चुर्र झाली. तिने मान खाली घातली आणि पायाच्या अंगठ्याने जमीन उकरण्याचा प्रयत्न करू लागली.
सासूबाई – चला, दमली नसशील तर स्वयंपाकाला लागूया. दमली असशील तर इथेच बसून आराम कर. बेडरूममध्ये अविनाश आराम करू देणार नाही!
इतकं बोलून सासूबाई जोरात हसल्या. अश्विनी लाजून त्यांच्या मिठीत शिरली. मग दोघी स्वयंपाकाला लागल्या.
रात्री सगळे एकत्र जेवायला बसले.
अविनाश – अरे वा! अश्विनीच्या हाताला मस्त “चव आहे!”
‘चव आहे’ या शब्दांवर जोर देत अविनाशने अश्विनीकडे बघून डोळा मारला. त्याचे आई-वडील एकमेकांकडे बघून हसले.
अशा प्रेमाच्या पावसात उरलेले दिवस कसे उडून गेले, ते कळलंच नाही. आणि अखेर अविनाशच्या जाण्याची रात्र येऊन ठेपली.
अश्विनी खूप उदास होती. अविनाशने तिला समजावलं. लवकरच तिला अमेरिकेला बोलावून घेईल, असं वचनही दिलं.
सगळे त्याला सोडायला एअरपोर्टला गेले. तिथे आदित्यही भेटला. नेहमीप्रमाणे शांत, एकलकोंडा आणि स्वतःच्याच विचारांत हरवलेला.
अविनाशने सामान घेतलं, सगळ्यांचा निरोप घेतला आणि तो निघून गेला. त्याच्या जाण्याने अश्विनीच्या अश्रूंचा बांध फुटला. सासूबाईंनी तिला जवळ घेतलं.
आदित्य हे सगळं शांतपणे बघत होता. तो पुढे आला आणि अश्विनीला म्हणाला,
आदित्य – Everything will be all right. You don’t worry!
सगळे घरी परतले.
अश्विनीची नोकरी सुरू होती. पण नोकरीचा हेतू आता फारसा बदलला नव्हता. मन रमवायचं आणि वेळ घालवायचा, एवढंच!
अविनाश व्हॉट्सॲप आणि फेसबुक मेसेंजरवर भेटत होता. सुरुवातीला बोलणं होत होतं. अशात सहा महिने कसे गेले, ते अश्विनीला कळलंही नाही.
ती सतत त्याच्या मागे लागली होती.
“मला कधी बोलावणार?”
पण अविनाश आता तिला टाळायला लागला होता. आई-वडिलांनी विचारलं की, “सध्या प्रॉब्लेम आहे. काही दिवसांत कळवतो,” असं ठरलेलं उत्तर देऊन तो वेळ मारून नेत होता.
पूर्वी रोज येणारे अविनाशचे फोन हळूहळू कमी झाले. मग आठवड्यातून एकदा, त्यानंतर महिन्यातून एकदा आणि शेवटी जवळजवळ बंदच झाले. अश्विनीने फोन केला की, तो बिझी असल्याचं उत्तर मिळायचं.
लग्नाच्या पहिल्या वाढदिवशीही त्याचा फोन आला नाही. साधा मेसेजसुद्धा नव्हता.
अश्विनी खूप खचली. सासू-सासरेही अगतिक झाले होते. त्यांच्या हातात काहीच नव्हतं.
हल्ली फेसबुकवर अविनाशचे अमेरिकन मित्र-मैत्रिणींबरोबरचे फोटो दिसू लागले होते. त्यात एका मुलीशी असलेली त्याची जवळीक तर अगदी स्पष्ट दिसत होती.
बरेच दिवस हे फोटो पाहिल्यानंतर अश्विनीने मनाचा हिय्या केला आणि अविनाशला फोन लावला.
त्याने फोन उचलला.
अश्विनी – काय चाललंय तुझं?
अविनाश – काम खूप आहे.
अश्विनी – मी कामाबद्दल नाही बोलत आहे.
अविनाश – मग?
अश्विनी – ती फोटोत कोण असते?
अविनाश – कुठल्या फोटोत?
अश्विनी – अविनाश, फेसबुकवरच्या फोटोत तुझ्या मांडीवर बसलेली, तुला मिठ्या मारणारी मुलगी कोण आहे?
अविनाश – Oh, that! She is Sylvia. माझी colleague आहे.
अश्विनी – colleague? तुमच्याकडे colleague मांडीवर बसतात?
अविनाश – Oh, come on! What’s wrong in it? We are close friends.
अश्विनी – अविनाश, मी तुझी बायको आहे. मला हे पाहून खूप त्रास होतो.
अविनाश – झाली तुझी टिपिकल सती-सावित्री स्टोरी सुरू? म्हणूनच मी तुला US ला आणलं नाही.
अश्विनी – हो. मी तिथे असते तर तुला असे रंग उधळता आले नसते.
अविनाश – चला, बरं झालं. तूच विषय काढलास. So listen now. Sylvia and I are planning to get married. त्यामुळे माझं ग्रीन कार्ड लवकर प्रोसेस होईल. मी तुला घटस्फोटाची नोटीस पाठवून देतो. Mutual consent ने divorce घे. मी दर महिन्याला पैसे तुझ्या अकाउंटमध्ये जमा करेन.
अश्विनी – (पायाखालची जमीन सरकल्यासारखी होऊन) अविनाश, अरे काय बोलतो आहेस तू?
अविनाश – जे तू ऐकलंस तेच. I will send the notice next month. Please accept the divorce and make my life easy. I will make yours.
अविनाशने फोन कट केला.
अश्विनीचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. क्षणात ती पूर्ण कोलमडून गेली. तिने फोन बेडवर फेकला आणि मटकन खाली बसली.
इतक्यात फोन पुन्हा वाजला.
फोन आदित्यचा होता.
काय करावं, हेच अश्विनीला कळत नव्हतं. तिने फोन उचलला नाही. तो तसाच बेडवर ठेवून ती ग्लानी आल्यासारखी झोपी गेली.
फोन काही वेळ वाजत राहिला आणि मग बंद झाला.
संपूर्ण खोलीत एक भयाण शांतता पसरली होती!
क्रमशः
आमचे whatsapp channel join करा- whatsapp.com
पुढील भागाची लिंक- ही वाट दूर जाते – भाग ४ – आदित्य – मराठी कथा
आधीच्या भागाची लिंक- ही वाट दूर जाते – भाग २ – लग्न – मराठी कथा
हे पण वाचा- वेळ
