pithur | Mandar Jog

पिठूर | भयकथा

पिठूर | भयकथा

अजिंक्य म्हणजे आधुनिक नारायण धारप. अनेक भयकथा लिहिलेला प्रसिद्ध लेखक. अनेक पुस्तकं प्रकाशित होऊन त्यातील एकाला धारप ह्यांच्या नावाने असलेला पुरस्कार मिळवलेला. त्याला वाचक सांगतदेखील की, “तुमच्या कथा वाचताना भूत आपल्या शेजारी असल्याचा भास होतो, इतक्या त्या खऱ्या वाटतात!” अजिंक्यला आता त्या सगळ्याची सवय झाली होती. गेल्या कोजागिरीच्या रात्री घडलेली ती घटना मात्र त्याच्या मनावर कायमची कोरली गेली होती! आजही कोजागिरी होती! त्या घटनेनंतर बरोब्बर एक वर्षाने!

अक्षरा म्हणजे अजिंक्यची बायको. दिसायला सुंदर, श्रीमंत बापाची लाडकी मुलगी. सामान्य पार्श्वभूमीच्या अजिंक्यच्या लिखाणाच्या प्रेमात पडली आणि वडिलांचा विरोध पत्करून अजिंक्यशी लग्न करून त्याच्या म्हाडा कॉम्प्लेक्समधील भाड्याच्या घरात संसार करू लागली. अजिंक्यने शहा बिल्डरच्या एका अपकमिंग प्रोजेक्टमध्ये घर बुक केलं होतं. पण प्रोजेक्ट डिले होत होतं! लग्नानंतर तीन महिन्यांत पझेशन अपेक्षित असताना आता दोन वर्षे झाली होती! अजिंक्य शहा बिल्डरच्या ऑफिसात सतत खेटे घालायचा. चिराग शहा म्हणजे शहा बिल्डरचा मुलगा. एक दिवस अजिंक्य अक्षराला बरोबर घेऊन शहा बिल्डरच्या ऑफिसात गेला. पाहताक्षणी अक्षरा चिरागच्या नजरेत भरली. ते अक्षरा आणि अजिंक्य दोघांच्या लक्षात आलं!

त्या दिवसानंतर अक्षराला चिराग नियमित फोन करू लागला. काही ना काही गिफ्ट पाठवू लागला! श्रीमंतीत वाढलेली अक्षरा चिरागकडे आकृष्ट झाली! त्यांच्या भेटीगाठी आणि चॅट नियमित होऊ लागले. एक दिवस अजिंक्यने सिग्नलवर त्याची बाईक थांबलेली असताना त्या दोघांना चिरागच्या गाडीत अंगचटीला जाऊन मस्ती करताना पाहिलं! अजिंक्य ते पाहून प्रचंड दुःखी झाला. त्याने अक्षराला त्याला कळल्याचं कळू दिलं नाही. तो आता तिच्यावर लक्ष ठेवून होता. ती कुठे जाते, ते दोघे कोणत्या हॉटेलात भेटतात हे सर्व तो बघत होता. आपलं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचं त्याच्या लक्षात आलं!

मग आली गेल्या वर्षीची कोजागिरी! अजिंक्यने अक्षराला आदल्याच दिवशी एक मोतिया रंगाची साडी गिफ्ट दिली आणि कोजागिरीच्या रात्री ती नेसून गच्चीवर सगळे यायच्या आधी यायला सांगितलं! कोजागिरीच्या रात्री अक्षरा ती साडी नेसून गच्चीत आली! गच्चीवर कोणीच नव्हतं. तिला अजिंक्यची हाक ऐकू आली. चांदण्यात तिला अजिंक्य दिसत नव्हता. पण गच्चीचा कठडा एका ठिकाणी तुटलेला होता, तिथून त्याचा आवाज येत होता. अक्षरा पुढे सरकली. वाकून खाली बघू लागली. इतक्यात तिला मागून अजिंक्यने धक्का दिला आणि अक्षरा तळात लावलेल्या लादीवर डोकं आपटून, मेंदू बाहेर येऊन जागीच मेली! अजिंक्य तिथून खाली बघत असतानाच त्याला अक्षरा गच्चीतच असल्यासारखा तिच्या पर्फ्युमचा वास त्याला जाणवला. हृदयाचे ठोके जोरात पडू लागले. त्याने भीतीने आकाशात पाहिलं तर चंद्र पिठूर हसत होता. अजिंक्यच्या अंगावर शिरशिरी आली. इतक्यात त्याच्या खांद्यावर एक हात पडला. अजिंक्य प्रचंड दचकून वळला तर समोर अक्षरा उभी होती. मोतिया रंगाची साडी नेसून, केस मोकळे सोडलेले आणि हातात मसाले दुधाचा ग्लास!

तिला पाहून क्षणभर दचकलेला अजिंक्य तिच्या हातातून दुधाचा ग्लास घेत म्हणाला-

अजिंक्य- काय टायमिंग आहे तुझं! मी स्वतः एक क्षण घाबरलो. माझ्या गोष्टीत मी वर्णन केलं आहे तशीच मोतिया रंगाची साडी नेसून तू समोर आलीस.

अक्षरा- म्हणजे?

अजिंक्य- म्हणजे काही नाही ग. त्या नालायक शहा बिल्डरचा नालायक चिराग, तू आणि मी अशी एक भयकथा लिहिली आहे.

अक्षरा- What? तू बरा आहेस ना?

अजिंक्य- हो. कथा अशाच सुचतात. काहीतरी एक ट्रिगर लागतो. तो चिराग तुझ्याकडे जसा बघत होता, त्यावरून मी आपला ट्रायंगल बनवला आणि एक स्टोरी लिहिली.

अक्षरा- शी. काय मूर्खपणा आहे हा? आणि काय स्टोरी केलीस तू?

अजिंक्य- हेच की तुझं आणि चिरागचं अफेयर होतं. ते मला कळतं आणि मी कोजागिरीच्या रात्री तुला मारून टाकतो. पुढे काय असा विचार करत होतो आणि तू आलीस! म्हणून घाबरलो मी!

अक्षरा- काय रे अजिंक्य? माझं आणि त्या लंपट चिरागचं अफेयर? Give me a break!

अजिंक्य- अग फिक्शन कथा आहे ती.

अक्षरा- तरीही. मला नाही आवडली ही कथा. आणि मला मारलंस कसं? विष देऊन मार. म्हणजे जास्त त्रास नाही होणार. जिवंत जाळू वगैरे नको. प्लीज.

हे ऐकून अजिंक्य अक्षराला कठड्याजवळ घेऊन गेला आणि म्हणाला-

अजिंक्य- हे बघ, इथून तुला मी ढकलतो असं लिहिलं आहे मी.

अक्षरा- (वाकून खाली बघत) ए नको ना रे! इथून पडले तर लादीवर आपटून डोकं फुटेल माझं आणि मेंदू बाहेर येईल!

अजिंक्य- (आश्चर्याने) हे… हेच लिहिलं आहे मी. Exactly हेच. आता माझ्याबरोबर राहून तू पण लिहायला शिकलीस? (खाली बघत) इथून खाली डोक्यावर पडल्यावर तुझा मेंदू बाहेर येतो आणि तू जागीच गतप्राण होतेस असं लिहिलं आहे मी! फक्त माझ्या कथेत कठडा तुटलेला होता. आपला कठडा तुटलेला नाही.

अक्षरा- त्या ऐवजी कथा अशी केली तर की मी आणि चिराग मिळून तुला तुटलेल्या कठड्याजवळून ढकलून देतो आणि तुझा मेंदू बाहेर येऊन तू मरतोस.

अजिंक्य – हम इंटरेस्टिंग आहे हा पण शेवट, पण परत तेच. आपल्या टेरेसचा कठडा तुटलेला नाही.

अक्षरा – हो कारण ही फिक्षन कथा आहे. खरी नाहीये. फिक्षन कथा काल्पनिक असतात. त्या खऱ्या होत नाहीत. आपला कठडा तुटलेला नाही. ते सोड तू हे दूध घे आणि आपण कोजागिरी एन्जॉय करू. मग तुला पुण्याला जायचं आहे ना?

अजिंक्य – नाही. प्लॅन कॅन्सल आहे. आज कोजागिरीची रात्र तुझ्याबरोबर घालवणार आहे मी.

हे ऐकून अक्षरा टेंस झाली.

अक्षरा – अरे पण..

अजिंक्य – पण बिण काही नाही. ए चंद्र बघ किती छान दिसतोय. आपला एक सेल्फी काढूया. माझा फोन खाली राहिलाय. तुझा फोन दे जरा.

असं म्हणून अजिंक्यने तिचा फोन घेतला आणि तो तिच्या खांद्यावर हात ठेवून दोघांचा सेल्फी काढू लागला. तेव्हाच अक्षराला चिरागचा मेसेज आला.

चिराग – हाय बेबी. मी तुझ्या बिल्डिंगमध्ये आलोय. टेरेसवर जातोय. तू तिथेच ये. चंद्राच्या साक्षीने आज दूध नाही तर तुझ्या ओठांचं अमृत पिणार आहे मी. आज नेमका अजिंक्य पुण्याला गेला हे मस्त झालंय.

अजिंक्यने तो मेसेज वाचला. तो रागाने थरथरू लागला. इतक्यात अचानक त्यांच्या टेरेसच्या कठड्याचा एक तुकडा तुटून खाली कोसळला. ते पाहून अक्षराच्या मणक्यातून एक चमक गेली. कानाच्या बाजूला घामाचा ओघळ आला! तितक्यात चिराग टेरेसच्या दारात पोहोचला! आणि तेव्हा फक्त ज्याला कथेचा शेवट माहीत होता, तो कोजागिरीचा चंद्र मात्र आकाशात पिठूर हसत होता! ©मंदार जोग

आमचे whatsapp channel join करा- whatsapp.com 

हे पण वाचा-

कादंबरी – सख्या रे …

कादंबरी- ट्वेंटी थ्री

दीर्घकथा – गुंतता हृदय – सर्व भाग

दीर्घकथा-मृगजळ- सर्व भाग

दीर्घकथा- व्हॅलेंटाईन डे- भाग १

दीर्घकथा- रिफ्लेक्शन भाग १

आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा

आमच्या लघुकथा लघुकथा

माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख

आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

ललित

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा- https://www.facebook.com/mandar.jog.31

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: © Mandar Jog - All Rights Reserved