ही वाट दूर जाते भाग 5: कॅन्व्हस | मराठी प्रेमकथा
ही वाट दूर जाते भाग 5: कॅन्व्हस | मराठी प्रेमकथा
अश्विनी कॉफीचे घोट घेत खिडकीतून बाहेर बघत बसली होती. घरात सासू-सासरे होते. आई-बाबांचे रोज फोनही येत होते. तरीही ती खूप एकटी पडली होती. आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलं होतं, याची तिला कल्पना आली होती. पण त्याचे परिणाम काय होतील, याचा अंदाज मात्र येत नव्हता.
अशा वेळी आदित्यचे शब्द तिला खूप धीर देऊन गेले होते. कर्माने नशिबावर विजय मिळवायचा विचार तिच्या मनाला उभारी देत होता. त्या दिवशी ऑफिस सुटल्यानंतर विल्यम्सच्या वर्कशॉपला जायचं, असा तिने निर्णय घेतला होता.
ती उठली आणि कपाट उघडलं. त्यातली आजवर कधीही न उघडलेली एक बॅग तिने बाहेर काढली. बॅगेत तिने लिहिलेल्या कवितांची वही, तिने रेखाटलेल्या चित्रांचे कॅनव्हास आणि वह्या होत्या. तिच्या बाबांनी विसाव्या वाढदिवशी भेट दिलेले विविध प्रकारचे ब्रश, रंग कालवायचा ट्रे, काही कोरे कॅनव्हास आणि रंगांच्या बाटल्याही त्यात होत्या.
ते सगळं पाहून तिला त्या परिस्थितीतही थोडा आनंद झाला. तिने काही ब्रश, रंगांच्या काही बाटल्या, दोन छोटे कॅनव्हास आणि एक वही बाजूला काढून ठेवली. मग बॅगेत घडी करून ठेवलेली तिची चित्रकलेची झोळी बाहेर काढली. त्या पिशवीला तिच्या बाबांनी समर्पक नाव दिलं होतं. तिने बाजूला काढलेलं सगळं सामान त्यात भरलं. बॅग पुन्हा कपाटात ठेवली आणि ती ऑफिसला जायच्या तयारीला लागली.
संध्याकाळी आदित्यने मेसेज केलेल्या हॉलमध्ये ती पोहोचली. स्वागतकक्षातल्या मुलीने तिचं तयार असलेलं आयडेंटिटी कार्ड तिला दिलं. तिची फी आदित्यने आधीच भरली होती.
हॉलमध्ये खुर्च्या अर्धगोलाकार मांडलेल्या होत्या. पांढरी दाढी आणि निळे, शांत डोळे असलेला विल्यम्स मधोमध बसला होता. त्या खुर्च्यांवर इतर विद्यार्थी बसले होते. अश्विनीला आदित्य दिसला. ती त्याच्यापासून दूर, समोरच्या खुर्चीवर जाऊन बसली.
बरोब्बर सात वाजता विल्यम्सने बोलायला सुरुवात केली.
विल्यम्स – मित्रांनो, मी विल्यम्स. एक चित्रकार. जगभर फिरतो. लोक, घटना, जागा, परिसर आणि वातावरण मनात भरून घेतो आणि मग माझ्या कल्पनेनुसार ते कागदावर उतरवतो. प्रत्येक चित्रामागे एक विचार असतो. अगदी अॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंगमागेसुद्धा!
एकाच विचाराची किंवा कल्पनेची मांडणी प्रत्येक चित्रकार वेगवेगळ्या रूपात करू शकतो. तुमच्या देशातलं एक साधं उदाहरण देतो. गणपती हा तुमचा देव आहे. हत्तीचं डोकं आणि तुंदिल तनू असं त्याचं साधं वर्णन करता येईल. पण तुमच्या देशात त्याची कोट्यवधी रूपं आढळतात. प्रत्येक चित्रकार आपल्या आवडीनुसार त्याला चितारतो. आणि मुख्य म्हणजे, त्याची सगळीच रूपं आपल्याला भावतात.
चित्रकला किंवा कोणतीही कला केवळ कला, आवड किंवा छंद म्हणून न जोपासता पॅशन म्हणून जोपासली, तरच कलाकार त्याचा खरा आनंद घेऊ शकतो. आणि जो कलाकार आपल्या कलेचा पुरेपूर आनंद घेऊ शकतो, तोच त्यातून इतरांनाही आनंद देऊ शकतो!
त्यामुळे आपण कलाकार आहोत, हे स्वतःशी मान्य करा. लोक काय म्हणतात, याकडे दुर्लक्ष करा. आपल्या पॅशनशी प्रामाणिक राहा. आणि मग बघा, कॅनव्हासवरचं प्रत्येक चित्र जिवंत होतं की नाही!
विल्यम्सचं बोलणं ऐकून सगळे भारावून गेले. टाळ्यांचा कडकडाट झाला.
विल्यम्स – मी या तीन दिवसांत तुम्हाला काहीही नवीन शिकवणार नाही. फक्त तुमच्यातली पॅशन जागृत करणार आहे. ज्यांना हे नको असेल, त्यांना फी रिफंड मिळू शकेल. Does anyone want to back out?
विल्यम्सने सगळ्यांवरून नजर फिरवली. सगळे स्तब्ध बसले होते.
विल्यम्स – So, let’s start our journey through the passion. Let me know you guys first. सर्वांनी थोडक्यात आपापली ओळख करून द्या. आणि चित्रकलेशी असलेल्या आपल्या नात्याबद्दल सांगा.
एकेक जण आपली ओळख करून देऊ लागला. विल्यम्स सगळ्यांच्या बोलण्याच्या नोंदी करत होता. ओळखीचा कार्यक्रम संपला.
विल्यम्स – I am very happy to be among such talented painters. माझ्या मनात एक कल्पना आली आहे. आपल्या प्रत्येकात काही ना काही साम्य असतं. आपल्याला ते सहसा लक्षात येत नाही. पण मी त्याची नोंद केली आहे. आपण सगळे नेहमीच एकट्याने चित्र काढतो. यावेळी मी समान स्वभाववैशिष्ट्यं असलेल्या लोकांच्या जोड्या बनवणार आहे. त्यांचं पॅशन एकत्र आल्यानंतर, त्या दोघांनी मिळून काढलेलं चित्र काही वेगळं सांगतं का, ते बघायचं आहे. चालेल ना सगळ्यांना?
सगळ्यांनी होकार दिला. विल्यम्सने नावं जाहीर करत जोड्या बनवायला सुरुवात केली. शेवटी आदित्य आणि अश्विनी उरले.
विल्यम्स – And the last pair is Mr. Loner and Mrs. Lonely. That is Aditya and Ashwini. Did I guess it right? (हसला.)
अश्विनी आणि आदित्यला काय बोलावं, हे सुचलं नाही. ते नुसतेच हसले.
विल्यम्स – The time will draw the true picture. Let us get started.
प्रत्येक जोडीला एक मोठा कॅनव्हास देण्यात आला. त्या दिवशी फक्त चर्चा करायची होती. चित्र काढायला सुरुवात दुसऱ्या दिवसापासून होणार होती. चित्राचा विषय होता – You, me and us!
आदित्य आणि अश्विनीला या विषयावर काय बोलावं, हेच सुचत नव्हतं. दोघंही काही न बोलता बसून राहिले. शेवटी काहीतरी बोलायचं म्हणून अश्विनीने त्याला विचारलं.
अश्विनी – तू माझी फी का भरलीस?
आदित्य – सहज. तू जाता जाता रिफंड कर मला. ही घे रिसीट.
अश्विनी – Cool. But thanks. तू मला हे वर्कशॉप सुचवलंस, माझे पैसे भरलेस. Thanks a lot.
आदित्य – ते थँक्स गिव्हिंग नंतर कर. काही सुचतंय का या सब्जेक्टवर? विषय जरा विचित्र आहे. आता आपण दोघं काय विचार करणार You, me and us वर? अविनाश आणि तू यात भाग घ्यायला हवा होता. पण अविनाशला एक रेघसुद्धा सरळ काढता येत नाही. त्यामुळे तुझं लाईफ कठीणच झालं असतं. By the way, how is he? बऱ्याच दिवसांत काही खबर नाही.
अश्विनी – (त्याची नजर चुकवत) तो मजेत आहे. सध्या काम खूप असल्याने बिझी असतो. (त्याच्याकडे बघत) आपण चित्राबद्दल विचार करूया.
आदित्य – Yes. काय बरं करता येईल?
इतक्यात विल्यम्स त्यांच्याजवळ आला. त्यांना काही सुचलं का, असं त्याने विचारलं. दोघांनीही काहीच सुचलं नसल्याचं कबूल केलं.
विल्यम्सने त्यांना दोन वेगवेगळे कॅनव्हास घ्यायला सांगितले. दोघांनी ते घरी न्यावेत आणि त्यावर स्वतःबद्दलचं एक चित्र काढून आणावं, अशी त्याची सूचना होती. मग दोन्ही चित्रं शेजारी ठेवून त्यातून दोघांचं मिळून एक चित्र तयार करायचं, असं त्याने सुचवलं.
त्या दिवसाचं सेशन संपलं.
बाहेर पडल्यावर अश्विनीने आदित्यने भरलेले फीचे पैसे त्याला दिले. त्याने ते घेतले आणि म्हणाला,
आदित्य – बघ, मी पैसे घेतले ना गुपचूप. मग आता तू गाडीत बस गुपचूप. मी तुला घरी सोडतो.
अश्विनी गाडीत बसली. ती आपल्याच विचारांत हरवली होती. आदित्यही त्याच्या विचारांत गुंतला होता. दोघंही काही बोलत नव्हते. थोड्याच वेळात अश्विनीचं घर आलं.
अश्विनीने त्याला “थँक यू” म्हटलं आणि ती गाडीतून उतरली.
रात्री जेवण झाल्यावर अश्विनीने विल्यम्सने दिलेला कॅनव्हास बाहेर काढला. त्यावर स्वतःचं चित्र रेखाटायला सुरुवात केली.
निळाशार समुद्र… त्यात अस्ताला जाणारा सूर्य… आणि त्या समुद्रकिनाऱ्यावर एकटी उभी असलेली तरुणी!
अश्विनी चित्रात रंग भरत होती.
तिकडे आदित्यही आपलं चित्र काढत होता. समुद्रकिनारा, मावळता सूर्य आणि त्याच्या पार्श्वभूमीवर धावणारा एक मुलगा… एकटा!
दोघांनीही आपापलं एकटेपण कॅनव्हासवर चितारलं होतं.
एकमेकांची चित्रं बघण्याची उत्सुकता दोघांनाही लागली होती. उद्याचा दिवस त्या दोन चित्रांमधल्या एकट्या माणसांना एकत्र आणणार होता. त्या दोघांच्या एकटेपणातून काहीतरी नवं निर्माण होणार होतं. त्या चित्रांना You, me and us या विषयाचा खरा अर्थ मिळणार होता का?
आपल्या हॉटेलच्या खोलीत आरामखुर्चीवर बसून बीयरचे घोट घेणारा विल्यम्स हे सगळं मनातल्या मनात अनुभवत होता. त्याच्या निळ्या डोळ्यांत मिश्किलपणा उतरला होता. पांढऱ्या दाढीतून तो हसत होता.
त्याच्या समोर एक चित्र आकार घेत होतं!!!
क्रमश:
पुढील भागाची लिंक- ही वाट दूर जाते – भाग ६ – उधाण – मराठी कथा
मागील भागाची लिंक- ही वाट दूर जाते – भाग ४ – आदित्य – मराठी कथा
क्रमश:
आमचे whatsapp channel join करा- whatsapp.com
हे पण वाचा- वेळ
