मराठी रोमँटिक कथा - ही वाट दूर जाते भाग ९

ही वाट दूर जाते भाग 2: लग्नाचा वाढदिवस | मराठी रोमँटिक कथा

ही वाट दूर जाते भाग 2: लग्नाचा वाढदिवस | मराठी रोमँटिक कथा

त्या रात्री गोपाळराव, मंजुषाकाकू आणि अश्विनी एकत्र बसले होते. कोणीच काही बोलत नव्हतं. घरात एक भकास शांतता पसरली होती. शेवटी गोपाळराव शांतपणे बोलले.

गोपाळराव – (अश्विनीला) काय ठरवलं आहेस तू?

अश्विनीने काहीच उत्तर दिलं नाही. ती आपल्याच विचारांत हरवली होती.

मंजुषाकाकू – आशू, बाबा काय विचारतायत?

अश्विनी – मी उद्या सांगितलं तर चालेल का?

गोपाळराव तिच्याजवळ आले. त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला जवळ घेतलं. अश्विनी त्यांना बिलगली आणि इतका वेळ अडवून ठेवलेला अश्रूंचा बांध फुटला.

मंजुषाकाकूही उठून तिच्याजवळ आल्या. त्यांनी अश्विनीच्या डोक्यावर हात ठेवला आणि दुसरा हात गोपाळरावांच्या हातावर ठेवला. गोपाळराव अगतिकपणे त्यांच्याकडे बघत राहिले. मंजुषाकाकूंनी त्यांचा हात दाबला. जणू आपल्या भावना आवरून धरा, असंच त्या त्यांना सांगत होत्या. गोपाळरावांनी उगाच घसा खाकरल्यासारखं केलं आणि हुंदका दाबत ते म्हणाले,

गोपाळराव – आशू, तुला योग्य वाटेल तो निर्णय घे. आम्ही तुझ्या बरोबर आहोत.

त्या रात्री सगळे झोपायला गेले. खरं तर झोप कोणालाच लागली नव्हती.

अश्विनीच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. इतक्या वर्षांत तिचं लग्न जमलं नव्हतं. त्यामुळे आई-बाबा खूप काळजीत असायचे. आता लग्न ठरलं तर हे असं झालं होतं!

जर अविनाशने मला अमेरिकेला नेलंच नाही तर? तो मला किती दिवसांनी नेणार, हेही सांगत नव्हता. मग नकार द्यावा का? पण तसं केलं तर आई-बाबांना किती वाईट वाटेल? या वयात त्यांना हे टेन्शन झेपेल का?

तिच्या मनात एकामागोमाग एक प्रश्न येत होते.

आणि मी वाईट किंवा नकारात्मक विचार तरी का करायचे? अविनाश चांगला मुलगा आहे. त्याने आधीच सगळं सांगून मला नाही म्हणायचा पर्याय दिला आहे. मग मी त्याच्यावर अविश्वास का दाखवावा? मी लग्न केलं तर आई-बाबांना समाधान वाटेल. देव इतकाही निष्ठुर नाहीये. तो सगळं व्यवस्थित करेल. आई-बाबांच्या सुखासाठी मी हो म्हणणं आवश्यक आहे.

अश्विनीने डोळे उघडून देव्हाऱ्याकडे पाहिलं. निरांजनाची ज्योत अजूनही फडफडत होती. तिने मनाशी निर्णय घेतला आणि पुन्हा डोळे मिटले.

दुसऱ्या दिवशी तिने आई-बाबांना आपला निर्णय सांगितला आणि मग अविनाशला फोन लावला.

अविनाश – Hi!

अश्विनी – अविनाश, माझा निर्णय झाला आहे. I trust you!

अविनाश – Oh great! I knew you are a mature modern girl. Great! आज संध्याकाळी ड्राइव्हला जायचं का? I will pick you up at 6 pm sharp.

अश्विनी – Okay!

अश्विनीने फोन ठेवला.

चारच दिवसांनी नवरा होणाऱ्या माणसाबरोबर आज पहिल्यांदाच ड्राइव्हला जायचं होतं. पण त्या कल्पनेने रोमांचित होणं तर दूरच, तिला फारसं एक्साइटेडही वाटत नव्हतं.

संध्याकाळी अविनाश आला आणि दोघे ड्राइव्हला निघाले. अविनाश अमेरिकेबद्दल, तिथल्या आपल्या आयुष्याबद्दल आणि आपला देश किती मागासलेला आहे, याबद्दल भरभरून बोलत होता. अश्विनी शांतपणे ऐकत होती.

गाडी बँडस्टँडला थांबली. अविनाशने काहीतरी जोक मारला, पण अश्विनी हसली नाही.

अविनाश – Hello! Are you all right?

अश्विनी – हो. अरे, बोल ना. मी ऐकते आहे.

अविनाश – मी इतका मस्त जोक मारला, but you didn’t even smile!

अश्विनी – अरे नाही. मी जरा लग्नाच्या तयारीचा विचार करत होते.

अविनाश – (तिचा हात हातात घेत) Oh, so already dreaming about “it”?

‘It’ या शब्दावर त्याने दिलेला जोर अश्विनीच्या लक्षात आला. तरीही ती निश्चल बसून राहिली.

अविनाशने तिच्या केसांतून हात फिरवला. त्याचा हात तिच्या गालांवर आला. त्याने तिच्या हाताचं चुंबन घेतलं. मग पुढे सरकून तिच्या गालाचं चुंबन घेतलं आणि आवेगाने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले.

अश्विनीने विरोध केला नाही. ती तशीच बसून राहिली.

तिच्याकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अविनाश आश्चर्यचकित झाला.

अविनाश – What’s wrong, Ashwini? We are getting married within a couple of days, damn it! मग यात चूक काय आहे?

अश्विनी – काहीच चूक नाही, अविनाश. मला जरा टेन्शन आलंय, इतकंच!

अविनाश – कसलं टेन्शन? की मी तुला अमेरिकेला नेणार नाही? तुला कधीच भेटणार नाही? Oh, come on! I have told you the situation. तू विचार करूनच decision घेतला आहेस ना?

अश्विनी – हो.

अविनाश – मग काय प्रॉब्लेम आहे? Everything will be fine. You just relax, okay?

अश्विनी – (हसत) ओके.

अविनाशने तिला जवळ ओढलं आणि अश्विनीनेही आवेगाने स्वतःला त्याच्या मिठीत झोकून दिलं.

लग्नाला मोजके नातेवाईक आणि अविनाश व अश्विनीचे जवळचे मित्र-मैत्रिणी आले होते. लग्न लागलं. गोपाळराव आणि मंजुषाकाकू भरून पावले होते. अश्विनीच्या सगळ्या मैत्रिणी चेष्टा-मस्करी करत सभागृहात भिरभिरत होत्या. बाकीचे लोक आपापल्या ओळखीच्या लोकांच्या कोंडाळ्यात बसून गप्पा मारत होते.

या सगळ्या गदारोळापासून दूर, एका कोपऱ्यात तो एकटाच बसला होता.

अविनाशचा कॉलेजमधला मित्र. आदित्य!

अविनाशच्या अनेक मित्रांपैकी आदित्य एक होता. पण आदित्यचा मात्र अविनाश हा एकच मित्र होता.

आदित्य इंजिनिअर होता. त्यानंतर त्याने एमबीए केलं होतं. एका बहुराष्ट्रीय कन्सल्टन्सी कंपनीत तो प्रिन्सिपल म्हणून काम करत होता. नोकरी पैसे कमवण्यासाठी होती, पण त्याची खरी आवड पेंटिंगमध्ये होती. त्या रंगांच्या दुनियेत रमणारा तो एकटा जीव होता.

सभागृहात चाललेली लगबग तो शांतपणे बघत बसला होता. त्याच्या मनाच्या कॅनव्हासवरही एक चित्र आकार घेत होतं.

स्टेजवर ओळख करून देण्याचा आणि फोटो काढण्याचा औपचारिक कार्यक्रम सुरू असताना अविनाशने अश्विनीला आदित्यची ओळख करून दिली.

अविनाश – हा माझा दोस्त आदित्य!

अश्विनीने हसून त्याला ‘हाय’ म्हटलं.

इतर लोकांचे ग्रुप फोटो काढले जात असताना या तिघांचाही एक फोटो काढला गेला. योगायोग असा की त्या फोटोत अविनाश एका बाजूला, आदित्य दुसऱ्या बाजूला आणि मध्ये अश्विनी उभी होती!

फर्स्ट नाइटसाठी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वीट बुक केलं होतं. रात्री मित्र-मैत्रिणींच्या गराड्यातून सुटून अश्विनी आणि अविनाश त्या स्वीटमध्ये आले. दिवसभराच्या धावपळीनंतर दोघे थोडे रिलॅक्स झाले.

नववधूच्या रूपात अश्विनी खूप लोभस आणि आकर्षक दिसत होती. अविनाशने तिला जवळ ओढलं. नव्याने, पहिल्यांदाच एकमेकांच्या सहवासात आलेले ते दोघे एकमेकांना ओळखण्याचा प्रयत्न करत होते. ओळख वाढत होती, ओढही वाढत होती. एकमेकांशी एकरूप होण्याची वेळ आली होती.

अविनाश मात्र त्या क्षणी अगदी बेभान झाला होता.

पण अचानक अश्विनीला काय झालं कोण जाणे! ती एकदम बर्फासारखी थंड पडली.

तिच्यातला हा बदल अविनाशच्या लक्षात आला. तो प्रचंड रागावला आणि बाजूला होत तिला विचारू लागला.

अविनाश – काय प्रॉब्लेम आहे, अश्विनी? I am not liking this.

अश्विनी – मला माहीत नाही, अविनाश. पण मला खूप भीती वाटते आहे. सगळं अनिश्चित वाटतं आहे.

अविनाश – What the f@%k is this?

अश्विनी – मला समजून घे, अविनाश. तू दोन दिवसांत जाणार आहेस. मी इथे एकटी किती दिवस राहणार, हेही माहीत नाही. मला खूप भीती वाटते आहे. त्या एकटेपणाची जाणीव आतून मला छळते आहे. I am sorry, Avinash. I hope you understand!

अविनाश – Yes, I do! Bloody typical Indian women mentality. Emotional blackmail!

अश्विनी – अरे, तसं नाहीये. प्लीज समजून घे…

अविनाश – समजलंय मला सगळं. आणि मी तुझ्या या जाळ्यात फसणार नाही. You want to deny sex? Okay. I won’t beg for it!

अविनाश उठला आणि रागाने बाहेर निघून गेला.

अश्विनी मात्र तिथेच बसून हमसून हमसून रडत राहिली.

त्याच वेळी आदित्य आपल्या घरात एका प्रणयी जोडप्याचं सुंदर चित्र काढत होता. अचानक त्याच्या हातातून रंगांचा ट्रे निसटला आणि त्यातले रंग कॅनव्हासवर उडाले. क्षणात त्याचं चित्र खराब झालं.

आदित्यने शांतपणे बिघडलेलं चित्र नीट करण्यासाठी पुन्हा सुरुवात केली.

आणि नियती? ती कुठेतरी दूर बसून आपण रेखाटत असलेलं चित्र छान आकार घेत असल्याचं पाहून मनोमन सुखावत होती!

क्रमशः

आमचे whatsapp channel join करा- whatsapp.com  

पुढील भागाची लिंक- ही वाट दूर जाते – भाग ३ – सत्य – मराठी कथा

आधीच्या भागाची लिंक- ही वाट दूर जाते- भाग १ | सुरुवात

हे पण वाचा- वेळ

कच्छी

बाप्पा

वारसा

गणपती – तथास्तु

गणपती – तथास्तु

कृष्ण जन्म

गणपती, उत्सव कि इव्हेंट?

आजी

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: © Mandar Jog - All Rights Reserved