चांद मातला भाग १२ आणि १३ –
भाग १२
इकडे मोहितसमोर रडवेल्या झालेल्या मानसीचा हिरमुसलेला आणि कंटाळलेला चेहरा सारखा दिसत होता, त्याचबरोबर मानसी कोणाबरोबर मजा मारत असेल असे वाटल्याने रागही येत होता. त्यात ही रेडिओवर लागलेली १८५६ ची जूनकट गाणी. रागारागात मोहितने रेडिओचे स्टेशन बदलले. त्यावर मराठी गाणे सुरू झाले, “चांद मातला मातला त्याला कशी आवरू, अंगी वणवा पेटला त्याला कशी सावरू”
हे गाणे लागल्याने आता आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांशी संबंधित सगळे जुळून येत आहे असे वाटून त्याला अजूनच राग येऊन त्याने रेडिओ बंद केला व घराच्या दिशेने मानसीच्या ओढीने गाडीची स्पीड जरा अजून वाढवली.
इकडे वाघोलीच्या साइटवर अचानक रोहनला समोर पाहिल्यावर मानसीला जबरदस्त धक्काच बसला. शिवाय आता मोहित तिथे भेटल्यावर आपल्याला पाहून त्याची नेमकी प्रतिक्रिया काय असेल, त्याचे आणि मायाचे नेमके संबंध कितपत पुढे गेलेत, रोहन तिथे काय करतोय अशा अनेक विचारांच्या आवर्तनात सापडलेल्या मानसीला मनावरचा ताण असह्य होऊन ती क्षणातच चक्कर येऊन तिथेच कोसळली.
त्याचवेळी तिच्याकडे वळलेल्या अभिने पटकन पुढे होऊन तिला सावरून धरले आणि जवळच असलेल्या सोफ्यावर तिला निजवले. अभि सर समोर असल्याने मायानेही खोटी का होईना काळजी दाखवत मानसीला पाणी दिले व पंख्याचा स्पीड वाढवला.
मानसीला थोडी तरतरी वाटल्यावर तिने फ्लॅटवर नजर फिरवली तेव्हा तिला भिंतीवरचा पूर्वाचा फोटो दिसला पण अर्थातच तिला कल्पना नव्हती हा फोटो तिला फोन करून सावध करणाऱ्या पूर्वाचा आहे. अभिने मानसीला रिलॅक्स व्हायला सांगितले आणि त्याला अचानक क्लीक झाले, पूर्वा त्याच्याबरोबर फोटो शूट करायला जाणार होती तो रो म्हणजे हा रोहन तर नव्हे? त्याला रोचे एकूण व्यक्तिमत्त्व पुसटसे दिसले होते ते रोहनशी मिळतेजुळते वाटले आणि या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन पाळेमुळे खणून काढायची त्याने मनाशी पक्के केले.
“Mr. रोहन, हार्डकॉपी पाठवालच हो ना नंतर, आता अनायसे आलोच आहे तर सध्या काय शूट केलंय ते तर दाखवा म्हणजे काही फेरबदल, सूचना असतील तर सांगता येतील, म्हणजे तुम्हाला त्यानुसार त्यावर फायनल टच देता येईल. काही सिक्रेट तर नाही ना अजून?”
आता प्रत्यक्ष अभिनेच मागणी केल्यावर रोहनचा नाईलाज झाला व थोड्या अनिच्छेनेच पण वरवर हसून त्याने आजचे पिक्स दाखवायला सुरुवात केली.
मानसीने रोहनला पाहून न पाहिल्यासारखे करून मनात निश्चय केला, आता असे खचून न जाता आलेल्या परिस्थितीला सामोरे जात भरकटलेल्या मोहितला आपणच आपल्या घरट्यात परत आणले पाहिजे त्याचबरोबर रोहनला कायम लक्षात राहील असा धडा शिकवला पाहिजे. त्यामुळे अगदी सहज होऊन तिने विचारले, “अभि सर, मी पाहू शकते का क्लिप्स? तसं मी तुमच्या ऑफिशियल कामात पडायला नाही पाहिजे पण सहज एक उत्सुकता म्हणून पाहू का?”
“अर्थातच मानसी, यात काही पर्सनल नाही,” असे म्हणून अभिने तिच्या हातात कॅमेरा दिला. त्याला मानसीने सगळी कल्पना दिल्याने त्याने मुद्दामच ही कृती केली.
या सगळ्या गोष्टी अचानक घडल्याने माया आणि रोहनच्या मात्र पायाखालची जमीन हादरली. पण अभि सर समोर असल्याने त्यांना काहीच करता आले नाही. सहज स्क्रोल करत असल्यासारखे दाखवत मानसीने पिक्स पाहायला सुरुवात केली आणि तिच्याबरोबर कॅमेरात डोकावणाऱ्या अभिला आणि तिला धक्का बसून थक्क व्हायची वेळ आली, कारण त्यात माया आणि मोहितचे असंख्य आक्षेपार्ह फोटोज होते….
आता काय होणार यापुढे…
मानसी मोहितला जाब विचारणार, माया मोहितचे पितळ उघडे पडणार, माया-रोहनचे षडयंत्र यशस्वी होणार, अभि यावर काय ॲक्शन घेणार, अभि रोहनला ओळखून पूर्वा आणि मानसी दोघींना न्याय मिळवून देणार या सगळ्या घटनांची उकल पुढच्या भागात…
आपण मात्र आशा करूया मानसीची कोजागिरी आनंदाने साजरी होऊन मोहित परत घरट्याकडे नक्की परतणार…
क्रमश:
लेखिका- सौ. मुग्धा दिवाणजी …
भाग १३
माया आणि मोहितचे आक्षेपार्ह फोटोज बघून मानसीच्या मनामध्ये ज्वालामुखी भडकला होता. तिच्या कानाच्या पाळ्या आणि गाल संतापाने लालबुंद झाले होते. तरीही स्वतःवर संयम ठेवत तिने एक एक करत सर्व फोटोज बघितले. रोहनवर धारदार नजर रोखत, मानसी म्हणाली, “वाह मिस्टर रोहन, तुमचे फोटो काढण्याचे स्किल अगदी वाखाणण्यासारखे आहे. फक्त मॉडेल्स चुकली तुमची. काय माया, बरोबर बोलतीये ना मी??”
हे ऐकून माया त त प प करायला लागली. ती मानसीजवळ येऊन म्हणाली, “मानसी, लेट मी एक्सप्लेन. तू समजतीयेस तसं काहीच नाहीये. इट्स जस्ट अ फोटोशूट.”
मानसीने हे ऐकून, तिच्या लांबसडक बोटांनी खाड्कन तिच्या मुस्काडात मारली आणि म्हणाली, “लाज वाटत नाही का गं तुम्हा दोघांना, असली ही थेरं करताना? तुम्हाला काय वाटलं, मानसी म्हणजे धुळ्याला राहणारी, साधी भोळी मुलगी आहे?? आपण तिला कशीही नाचवू तशी ती नाचेल??. आणि तू रे….रो. तुला काय वाटलं, तुझ्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात मी अडकेन का??”
तिच्या तोंडून ‘रो’ हे ऐकून आणि तिचा एकूणच आत्ताचा अनपेक्षित अवतार बघून तो चांगलाच चपापला. त्याचं मगाचचं छद्मी हास्य कुठच्या कुठे लोप पावलं.
हे ऐकून अभिसागर मानसीला म्हणाला, “वन मिनिट मानसी, तू काय म्हणालीस याला?? रो?? हे नाव मी ऐकलंय… येस… तू पूर्वाचं फोटोशूट केलं होतंस ना??”
रोहन एव्हाना पार गर्भगळीत झाला होता.
अभिने मग मायाकडे मोर्चा वळवला आणि आपल्या घाऱ्या डोळ्यांची धारदार नजर रोखत तिला म्हणाला, “ऑफिसच्या फोटोशूटच्या निमित्ताने चांगले उद्योग चाललेत तुमचे.. हाऊ चीप.. आज जर मी साईटवर अचानक आलो नसतो, तर मला हे कळलंच नसतं. आणि तुमच्याबरोबर मोहितसुद्धा?? मी त्याला काय समजत होतो आणि तो काय निघाला?? कुठाय तो? व्हेर इज ही??”
मानसीची नजरही त्याला इकडे तिकडे शोधू लागली. तेवढ्यात मायाचा फोन वाजला.. तिने तो कट केला… असं दोन तीन वेळा झालं. शेवटी अभिने तिला फोन घ्यायला सांगितलं. मायाने फोन घेतला पण भेदरल्यामुळे चुकून तिच्या हातून स्पीकर ऑन झाला.
पलीकडून मोहित बोलत होता. “अगं माया, फोन का उचलत नव्हतीस? तू फोन केलेले माझ्या लक्षात आले नाहीत. मला मानस सारखा फोन करत होता. मी कधी एकदा घरी पोचून त्याला ताब्यात घेईन असं झालं होतं. बिचारा, रडून रडून डोळे सुजलेत त्याचे. मी घरी पोचलोय आणि मानस आता ओके आहे. सॉरी स्वीटहार्ट, मला असं अचानक तुला सोडून जावं लागलं. मस्त मजा आली शूटला. पण ती मानसी कुठे गेलीये कळत नाहीये. आपला आजचा प्लॅन फसला यार. कुणाबरोबर भटकतीये देव जाणे. आता घरी आली की बघतोच तिच्याकडे.”
माया काही बोलणार एवढ्यात मानसीने तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि मोहित काय बोलतोय हे शांतपणे ऐकत राहिली.
मोहित म्हणाला, “चला, आता मी फोन ठेवतो. आई-बाबा पण घरी आलेत. आता मानसीची काही खैर नाही एवढंच सांगतो. मानसला एकट्याला शेजारी प्रणालीकडे ठेवून कुठे गेलीये ते बघितलंच पाहिजे.”
मोहितचं सगळं बोलणं ऐकून मानसी खिन्नपणे हसली. मोहितची ही दुसरी नकारात्मक बाजू बघून तिला धक्का बसला होता. कुठे तो आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा मोहित आणि कुठे हा? नक्की खरा मोहित कुठला? पण मानस आता ठीक आहे हे ऐकून तिला हायसं वाटलं.
मानसीने फोन कट केला आणि मायाकडे देत तिला विचारलं, “कसला प्लॅन होता तुमचा? अं? समजता कोण तुम्ही सगळे स्वतःला? साध्या सरळ लोकांना फसवून काय साध्य करणार आहात तुम्ही? बाहेरगावी कामासाठी जातोय सांगून तुझ्याबरोबर मोहितचं मॉलमध्ये जाणं, तुझी लायकी नसताना तुला एवढी महागडी ब्रँडेड हॅन्डबॅग देणं आणि बरंच काही.
आणि काय रे रो, किती मुलींना तू असं फसवलंयस? तुम्हाला काय वाटलं, मला हे काहीच माहीत नाहीये? शी.. पैशासाठी एवढ्या खालच्या थराला गेलात तुम्ही?? आज मला सगळं कळलंच पाहिजे.”
हॅन्डबॅग आणि मॉल हे शब्द ऐकून मायाला घाम फुटला.. मानसीला हे सगळं कसं कळलं या विचारांनी ती अवाक झाली. आपण समजतो तितकी साधी आणि बावळट नाहीये ही, हे तिला समजून चुकलं.
अभिसागरनी रोहन आणि मायाला त्याच्याबरोबर गाडीतून मोहितकडे चलण्यास फर्मावलं. आज काय तो शहानिशा होऊनच जाऊदेत. दोघांचा काहीच इलाज चालला नाही. दोघेजण निमूटपणे अभिसागरच्या गाडीत मागे जाऊन बसले. मानसी आणि अभि पुढे बसले.
गाडी ट्रॅफिकमधून मार्ग कापत वाडेश्वरच्या दिशेने निघाली होती. मानसीने तिच्या सासूबाईंना फोन केला आणि ती सुखरूप असून थोड्या वेळाने घरी येत असल्याचं सांगितलं. त्या घरी असल्यामुळे तिला आता मानसची काळजी नव्हती. मग तिने प्रणालीला फोन करून तिचे आभार मानले आणि डॉ. आनंदी आणि पूर्वाला मेसेज केला.
इकडे अभिसागरनी रोहनला, मोहितला वाडेश्वरला बोलवून घ्यायला सांगितलं. आणि बाकी काही बोलू नकोस असंही बजावलं. माया आणि रोहनला, जे काही साईटवर घडलं ते सगळं मोहितला सांगावंसं वाटत होतं.. पण कसं सांगावं ते त्यांनाही काही सुचत नव्हतं. दोघेही स्वतःची कातडी वाचवून सगळं खापर मोहितच्या डोक्यावर कसं फोडता येईल याचा विचार करत होते.
मानसीच्या चेहऱ्यावर खिन्न हसू होतं. ती एका भयानक संकटातून वाचली होती. आता तिला मोहितला परत स्वतःकडे खेचून आणायचं होतं आणि त्याला आणि या दोघांना जन्माची अद्दल पण घडवायची होती.
काय असेल मानसीच्या मनात? तिने पूर्वा आणि डॉ. आनंदी यांना काय मेसेज केले असतील? त्या दोघींची तिला काय मदत होईल? माया आणि रोहन मोहितला अडकवण्यासाठी काय प्लॅन करतील? मानसीला सगळं कळलं आहे, हे मोहितला कळल्यावर त्याची काय प्रतिक्रिया असेल? सत्य काय असेल? पाहुयात या सगळ्या प्रश्नांची उकल पुढील भागात.
क्रमश:
लेखिका- सौ. कांचन आनंद बदामीकर
पुढील भागाची लिंक- चांद मातला- भाग १४ – शेवटचा भाग
आधीच्या भागाची लिंक- चांद मातला भाग ११
हे पण वाचा- वेळ

[…] आधीच्या भागाची लिंक- चांद मातला भाग १२ आणि १३ […]