चांद मातला | Mandar Jog

चांद मातला- भाग १४ – शेवटचा भाग

मानसीला विचारांनी भोवळ आली होती एवढं मानसिक ताण तिला सहनच होत नव्हता. अभि तिच्या बरोबर असल्यामुळे आणि अभि व मानसीने मोहित आणि मायाचे विविधरंगी विविधढंगी फोटो पाहिल्यामुळे मायाची बोलतीच बंद झाली होती.

अभिने या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा ठरवले. पण माया आणि रोहनला इथून घेऊन जाणे सोपे नव्हते. अभिने फोन करून त्याच्या ऑफिसमधील दोन हत्यारबंद सिक्युरिटींना जीपसह बोलावून घेतले. त्यांच्या जीपमध्ये त्याने मायाला व रोहनला बसायला सांगितले. त्यापूर्वी त्या दोघांचे मोबाईल काढून घेतले. स्वतःच्या गाडीत मानसीला घेऊन तो वडेश्र्वरच्या दिशेने निघाला.

अभिची गाडी आणि रोहन-मायाची जीप अशी वरात निघाली. “मी मोहितला बोलावून घेतोय,” अभिने मानसीला सांगितले. “मलाही माझ्या मैत्रिणींना बोलवायचे आहे,” असे बोलून मानसीने डॉ. आनंदींना व पूर्वाला फोन केला व दोघींनाही वाडेश्र्वरला बोलावून घेतले.

मोहितच्या फोनवर अभिचे नाव झळकले. अवेळी आलेल्या बॉसच्या फोनने मोहितला आश्चर्य वाटले. ‘यस सर’ – मोहित.

अभि: मोहित ताबडतोब वडेश्र्वरला ये.

मोहित: सर, मानसी अजून घरी आलेली नाही आणि मानस पण रडतोय. मला आता येणं शक्य नाही.

अभि: अत्यंत महत्त्वाचे काम आहे. अगदी थोड्या वेळात काम होईल. लगेच निघ, वेळ घालवू नकोस.

मोहितचा नाईलाज झाला. तो चडफडतच निघाला. गाडीत बसण्यापूर्वी त्याने मायाला फोन केला पण तिने तो उचललाच नाही. मोहितला अजूनच राग आला. ‘ही मानसी कोणाबरोबर मज्जा मारत फिरते काय माहीत,’ असे पुटपुटत त्याने गाडी स्टार्ट केली.

मायाच्या फोनवर मोहितचे नाव दिसताच मानसी आणि अभिने एकमेकांकडे पाहिले. मानसी सीटला मागे टेकून बसली. तिने डोळे मिटून घेतले. इनमिन चार वर्षांचा तिचा संसार. मोहितच्या प्रेमाने फुललेला. तिला तिच्यावर प्रेमाची बरसात करणारा, तिला जपणारा तिचा मोहित आठवला. तिला हुंदका दाटून आला. मायाचे प्रकरण समजेपर्यंत मोहितच तिचं सर्वस्व होता. ‘माझ्या मोहितला मी परत माझ्याकडे खेचून आणीन. चुकला असेल तो, झाला असेल त्याला मोह – मी पण चुकलेच की, पण मी माझ्या मोहितला सुधारण्याची एक संधी देईन, त्याला इतकं प्रेम देईन की तो मला सोडून जाणारच नाही,’ – मानसीने मनोमन ठरवून टाकले.

अभिने डोळे मिटलेल्या मानसीकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावरचे झरझर बदलणारे भाव त्याने टिपले. त्याला मानसीची कीव आली. मानसीकडे बघता बघता त्याला अचानक पूर्वाची आठवण आली. ‘कुठे असेल पूर्वा? ती तिच्या संसारात रमली असेल,’ त्याला ती व तिचा बाईकवरचा प्रियकर आठवला. अचानक त्याला वाटले की त्यावेळी पूर्वासोबत रोहन तर नव्हता? त्याने खांदे झटकले व तो विचार मनातून काढून टाकला.

अभिची गाडी वडेश्र्वरला आली तेव्हा मोहित तिथे हजर होता. अभिची गाडी जशी जवळ आली तशी पुढच्या सीटवर बसलेल्या मानसीला पाहून मोहितला धक्काच बसला. तो गाडीजवळ येत असतानाच मागून माया-रोहनची जीप आली. अभिने खूण करताच जीपमधून दोघांना खाली उतरवलं. खाली उतरताच रोहन पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला पण सिक्युरिटींनी त्याला अडवून तिथेच पकडून ठेवले. जीपमधून उतरलेली माया आणि तिचा उतरलेला चेहरा बघून मोहित अवाक् झाला.

अभि: मोहित, मी तुला अत्यंत कर्तबगार आणि जबाबदार व्यक्ती समजत होतो पण तो माझा गैरसमज होता हे तूच सिद्ध केलंस. रोहनच्या कॅमेऱ्यातले तुझा आणि मायाचे फोटो पाहून मला शरम वाटली. इतकी सालस आणि चांगली पत्नी असताना तू ह्या मायाच्या जाळ्यात अडकलास? ज्या मायासाठी तू तुझ्या पत्नीला फसवत होतास ती माया आणि हा रोहन एकमेकांना सामील आहेत, तुझ्यासारखे सावज हेरायचे आणि त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळायचे हाच त्यांचा धंदा आहे.

मोहित: क्काय????? माया, सर बोलताहेत ते खरं आहे? माया, खरं सांग….

माया: (रडत रडत) नाही नाही सर, मला माफ करा…. मोहित, प्लीज माझा विश्वास ठेव… मोहित…. मोहित….

अभि: मोहित, ही नाटकं करतेय, अजूनही वेळ गेली नाही, सावध हो, हिचा नाद सोडून दे आणि माया, उद्यापासून ऑफिसला यायची गरज नाही. तुझा हिशोब चुकता केला जाईल.

माया: सर सर (हुंदके देत) प्लीज सर, मला माफ करा सर… मला नोकरीची गरज आहे सर….. मी तुमच्या पाया पडते सर……

इतक्यात डाव्या बाजूने आलेल्या रिक्षातून पूर्वा खाली उतरली. उतरल्यावर पूर्वाला समोरच अभि दिसला. तिला मेल्याहून मेल्यासारखे झाले. अभि पण पूर्वाला पाहून चकित झाला. पूर्वाची रया गेलेली आणि भेदरलेली अवस्था पाहून त्याला कसंसंच झालं.

पूर्वाला पाहून रोहन सटपटला. तो पळून जायचा प्रयत्न करू लागला पण सिक्युरिटी सावध होते. त्यांनी रोहनला घट्ट पकडून ठेवले. रोहनला पाहून पूर्वाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती रोहनच्या अंगावर धावून गेली नी त्याला मारू लागली, जोरजोरात रडू लागली. अभिने पुढे जाऊन पूर्वाचे हात धरले, तिच्या पाठीवर थोपटून तिला शांत केलं.

पूर्वा: अभि, या नीच राक्षसाने माझे सर्वस्व लुटले. मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून माझा गैरफायदा घेतला. याच्या गोड बोलण्याला मी भुलले, मला गोड गोड बोलून, फसवून यांनी माझी इज्जत लुटली आणि लग्नाचं आमिष दाखवून माझे नको त्या अवस्थेतले फोटो काढले. आणि यांनी माझ्याशी लग्न तर केलं नाहीच उलट आता मला माझे फोटो दाखवून ब्लॅकमेल करतो, माझ्याकडून पैसे उकळायची एकही संधी सोडत नाही. यांनी माझं आयुष्य बरबाद केलं. आता मी कोणाला तोंड पण दाखवू शकत नाही..

किती जणींना फसवशील रोहन? अजून किती बायकांच्या आयुष्याशी खेळणार आहेस? या मानसीच्या पाठी मी उभी राहीन. चल मानसी, आपण पोलिसांकडे जाऊया. पोलिसांचं नाव ऐकून रोहन घाबरला.

रोहन: मी काही केलं नाही, या मोहितने पैसे दिले मला मानसीला फसवण्यासाठी. म्हणून मी हे केलं. मोहित, बोल आता, आता का गप्प बसलास?

मानसी: क्काय…..? मोहित, मोहित, तू मला फसवलंस?? माया धबकन खाली बसली.

इतक्यात एक अजून एक गाडी तिथे आली. त्या गाडीतून डॉ. आनंदी खाली उतरली आणि दुसऱ्या बाजूने उतरला संतोष – मानसीचा भाऊ. त्याला पाहताच मानसीचे अश्रू थांबेनात. तिला दुःखाने भोवळ आली.

सर्व जण तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागले. या संधीचा फायदा घेऊन माया पळाली. रोहनला सिक्युरिटींनी घट्ट धरून ठेवल्यामुळे त्याचा नाईलाज झाला.

संतोष: मानसी, डॉ. मॅडमनी मला सर्व काही सांगितलं आहे. चल, मी तुला न्यायला आलो आहे. आपल्या घरी चल, मग बघू काय करायचं ते.

मोहित: (हादरून) मानसी… मानसी, मला माफ कर. मी चुकलो ग, मी वाहत गेलो. पण आता मी तुला कधीच त्रास देणार नाही. एकदा मला माफ कर. एक संधी दे मला. मानसी…. मनू…… म….

संतोष: मानसी, चल आपण मानसला घेऊ आणि धुळ्याला जाऊ.

मोहित: संतोष, अरे मानसी आणि मानसला राहू दे इथेच, मी पण आहे, आईबाबा पण आले आहेत.

संतोषने मोहितकडे लक्ष न देता मानसीला धरून धरून डॉ. आनंदीच्या गाडीत नेऊन बसवले आणि स्वतः पण बसला.

अभि पूर्वाच्या जवळ जाऊन म्हणाला, पूर्वा, आपण रोहनला पोलिसांच्या ताब्यात देऊया.

आणि तिथून तू माझ्याबरोबर माझ्या घरी चल.

सर्वजण तिथून निघाले. घरी आल्यावर मानस मम्मी… मम्मी म्हणत मानसीला घट्ट बिलगला. सासूबाई तिच्या जवळ येऊन बसल्या, मोहित समोरच बसला आणि संतोष तिला लवकर निघ म्हणून खुणावू लागला. मानसी निस्तब्ध होऊन सर्वांकडे पाहत राहिली……….

आकाशात पौर्णिमेचा चंद्र त्याच्या शीतल चांदण्यासह निस्तब्ध झाला होता.

समाप्त.

लेखिका- संपदा सातघरे

आधीच्या भागाची लिंक- चांद मातला भाग १२ आणि १३

हे पण वाचा- वेळ

कच्छी

बाप्पा

वारसा

गणपती – तथास्तु

गणपती – तथास्तु

कृष्ण जन्म

गणपती, उत्सव कि इव्हेंट?

आजी

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

2 thoughts on “चांद मातला- भाग १४ – शेवटचा भाग”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!