काही लोक जन्माला येतानाच जबरदस्त नशीब घेऊन जन्माला येतात. त्या नशिबाच्या जोरावर त्यांना आयुष्य संधी देत जातं. ते योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य लोकांच्या संपर्कात येतात आणि त्यांचं आयुष्य एक सुंदर स्वप्न बनून जातं. तनुजाची मुलगी, अजय देवगणची बायको, राणी मुखर्जी आणि अयान मुखर्जीची चुलत बहीण, नायसाची आई, शाहरुख आणि करण जोहरची खास मैत्रीण असलेली काजोल (खरं नाव काजल) अशा चांगलं नशीब आंदण घेऊन जन्माला आलेल्या दुर्मिळ लोकांपैकी एक आहे. तिची सख्खी बहीण आज कुठे आहे आणि ती कुठे आहे, ह्यातूनच चांगलं नशीब एखाद्याला सढळ हस्ते किती देऊ शकतं ह्याचा अंदाज येईल.

ती १९९२ साली लॉन्च झाली. तो सिनेमा किरकोळ होता. काजल स्वतः सावळी, म्हणजे हिंदी सिनेमा हिरोईनच्या इमेजच्या विरुद्ध होती. अभिनय ठिकठाक. नृत्य यथातथाच. ती आली तेव्हा माधुरी आणि श्रीदेवी राज्य करत होत्या. आयेशा जुल्का, दिव्या भारती जोरात होत्या. दिव्या भारती जर अपघातात (??) गेली नसती तर ती श्रीदेवीला रिप्लेस करेल, अशी अटकळ बांधली जात होती. त्या काळात काजल लॉन्च झाली. तनुजाची मुलगी, नूतनची भाची ह्या तिच्या जमेच्या बाजू होत्या. रूपाचं म्हणाल तर तिचे डोळे खूप सुंदर होते आणि पूर्वी दक्षिणी सिनेमातील हिरोईन दिसत तशी ती बऱ्यापैकी आडदांड होती. म्हणूनच हिंदी सिनेमा लायनीत नटी म्हणून फार जम बसेल अशी शक्यता कमी होती. पण नशिबाला काही वेगळंच मान्य होतं!

त्याच काळात शाहरुख खान नामक एका युगाचा उदय होत होता. त्याचे दिवाना, राजू बन गया जेंटलमन वगैरे सिनेमे लोकांनी उचलून धरले होते. गाणी हिट होती. आणि शाहरुख अँटी हिरो म्हणून अब्बास-मस्तानच्या बाजीगर मध्ये आला. बरोबर पॉर्न सिनेमा निर्माता-दिग्दर्शक असा शिक्का बसलेल्या, काही वर्षे मास्क लावून थोबाड लपवून फिरणाऱ्या राज कुंद्राची, योगपटू, कमनीय बांध्याची आणि तेव्हा जुन्या नाकाची असलेली बायको शिल्पा शेट्टी होती आणि बरोबर होती काजल. बाजीगरची गाणी आणि सिनेमा तर हिट झालेच. पण त्याबरोबर शाहरुख आणि काजल ही जोडी हिट झाली. शिल्पाला सिनेमाचा फारसा फायदा झाला नसला तरी निर्माता रतन जैन ह्याची तिच्यावर खास मर्जी असल्याच्या खुमासदार चर्चा तेव्हा रंगल्या होत्या. खरं-खोटं अक्कीलाच माहीत. असो. तर काजल.

तिची आणि शाहरुखची गट्टी अशी काही जमली की शाहरुखच्या करिअरच्या उंच उडणाऱ्या पतंगाची काजल शेपूट बनली. मग ऐतिहासिक DDJL ने शाहरुखबरोबर तिचंही आयुष्य बदलून टाकलं. अचानक ती A-lister नटी बनली. मग पुढे कुछ कुछ होता है ने आणखी इतिहास घडवला. मग माय नेम इज खान, आमिरबरोबर फना आणि पुढे अनेक सिनेमे. शाहरुख विवाहित होता. करण अविवाहित असून निरुपयोगी होता. त्यामुळे त्यांची मैत्री मैत्रीपुरतीच राहिली. एकमेकांची पाठ खाजवत तिघांनी आपापला उत्कर्ष साधला. त्या मैत्रीचं off-screen प्रदर्शन करून ते चर्चेतही राहिले. काजलने आपली फटकळ, इम्पल्सिव्ह, थोडी बालिश वगैरे इमेज छान बनवली आणि टिकवली देखील.

पुढे तिचं नशीब परत मदतीला आलं आणि योग्य वयात तब्बूचा मित्र, रविना आणि लोलोच्या कॅट फाईटच तथाकथित कारण असलेला अजय देवगण तिच्या आयुष्यात आला. त्यावेळी अक्की आणि सल्लू लफडेबाज, बाकी खान, हृतिक वगैरे विवाहित असल्याने त्यातल्या त्यात सोयीचा, उपवर, श्रीमंत आणि उपलब्ध असलेल्या अजयच्या ती प्रेमात पडली. यथावकाश लग्नही झालं. त्यानंतरही तिने शाहरुख आणि करणच्या मैत्रीला जागत त्यांच्या बरोबर सिनेमे केले. इतरांचेही तुरळक सिनेमे केले. मग दोन अपत्यं झाल्यावर त्यांच्या संगोपनात गुंतल्यावर सिनेमापासून जवळजवळ ब्रेक घेतला. अजय ढिगाने पैसा ओढत होता. मग काजल कधी कॉफी विथ करणमध्ये शाहरुखबरोबर किंवा कपिल शर्मा शोमध्ये अजयबरोबर येऊन प्रचंड आगाऊपणा करत, लाडेलाडे बोलत लोकांच्या नजरेत राहिली, तर कधी नवरात्रीच्या मांडवात रडतोंड्या जयाबरोबर दर्शनाला जाऊन पापराझींना खाद्य पुरवत चर्चेत राहिली.

नायसा मित्र-मैत्रिणींबरोबर मध्यरात्री पार्टीतून थोडी डगमगत चेहरा लपवत गाडीत येऊन बसण्याइतपत मोठी झाल्यावर काजल पडद्यावर जास्त दिसू लागली. तिने आता वेब सिरीज करायला सुरुवात केली. मग सिनेमाऐवजी वेब सिरीजच कशी भारी, त्यात काम करण्याचे नटी म्हणून काय फायदे वगैरेबद्दल पॉडकास्टमध्ये सांगू लागली. मोठमोठ्या गाड्यांमधून उतरत पापराझी पोरांना पोझ देऊ लागली. अक्कीच्या बोलभांड बायकोबरोबर भंगार शोदेखील केला तिने, ज्यात त्या दोघींमध्ये आगाऊपणा आणि पाचकळपणा करण्याची जणू स्पर्धाच लागली होती! असो!

आज काजलचा वाढदिवस. एका नशीबवान बाईचा वाढदिवस, जी एक सुखी आयुष्य देवाकडून आंदण घेऊन जन्माला आली आहे. जिने लोकांच्या दृष्टीनं आजवरच्या आयुष्यात फक्त सुख, आनंद आणि प्रगती अनुभवली आहे. ती नेहमीच योग्य वेळी, योग्य ठिकाणी पोहोचून योग्य लोकांना भेटली आहे आणि भरभरून पदरात पाडून घेत आली आहे. ती बिनधास्त आहे, जे मनात येईल ते बोलते, जे पटेल आणि झेपेल तेच काम घेते. कारण असं वागून ते निभावून न्यायला लागणारं जबरी नशीब तिच्याकडे आहे! कारण ती काजल आहे!

आज तिचा ५२ वा वाढदिवस आहे. काजलला तिच्या समस्त फॅन्सकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुझ्या नशिबाला कोणाचीही नजर न लागो, असे आशीर्वाद!

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. MandarJOG.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!