तनु, मानू आणि जानू | Mandar Jog

तनु, मनु आणि जानु अशी गँग होती तिघांची. म्हणजे कॉलेजात इतर मित्र मैत्रिणी अनेक होते पण ह्या तिघांची मैत्री खास. नुसती खास नाही तर हल्ली थोडी गुंतागुंतीची, कंगोरे निर्माण झालेली…थोडक्यात ऍक्शन पॅक्ड!

तनु म्हणजे तनया. नैसर्गिक सुंदर, हुषार, लाघवी, कलासक्त, पेंटिंगची आवड असलेली, त्यामुळे अनेकांना इंजीनियरिंग ड्रॉइंगला मदत करणारी, साहसाची खूप इच्छा असली तरी वडिलांच्या कडक शिस्तीत बालपण गेल्याने आज हॉस्टेलमधेही चाकोरीबद्ध आयुष्य जगणारी. तरीही स्मार्ट आणि ऍसर्टिव्ह.

मनु म्हणजे मनोज. गरीब घरात जन्मलेला. कष्टाने, बुद्धीच्या जोरावर चांगले मार्क्स मिळवून, स्कॉलरशिपच्या जोरावर इतक्या चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळवलेला. त्याने आपल्या गरीबीचे कधीच भांडवल केले नाही किंवा तिला आपल्या चेष्टेचा विषय होऊ दिले नाही. त्याच्या बुद्धि, सेन्स ऑफ ह्यूमर आणि आकर्षक व्यक्तिमत्वाने तो समोरच्याला आपलेसे करत असे.

जानू म्हणजे जान्हवी. आजोबा आणि बाप आमदार. घरची हजारो एकर जमीन. प्रचंड पैसा, गाड्या, आणि पैसा विकत घेऊ शकतो ते सर्व! हिच्या आधी तिघे भाऊ. सर्वात लहान म्हणून लाडाने वाढलेली. पोरांच्या संगतीत वाढून बिनधास्त झालेली. वरून सत्ता गाजवायचा गुण रक्तात घेऊन जन्मलेली. बापाच्या एका फोनवरच कॉलेजात प्रवेश मिळाला. त्याचं काय आहे की हिचा बापच कॉलेजचा चेयरमन आहे हे फार कमी पोरांना माहीत आहे. पण जानू टेचात फिरते. तिला बापाचे नाव सांगायची वेगळी गरज पडत नाही. तिच काफी आहे तिचे रक्षण करायला. दिसायला आयटम. गोर्‍या गोर्‍या उजव्या गालावर छानसा तीळ. लेटेस्ट कपडे आणि फॅशन करणारी, बिनधास्त वागणारी, फटकळ. कॅन्टीनच्या मागे पोरांबरोबर लपून बिड्या फुकणारी, कधी कोणी जॉइंट भरला तर दोन कश मारून कॅन्टीन मध्ये येऊन अर्धा तास डोके धरून बसणारी! पोरांना थोडी डेंजर वाटायची ती. जास्त कोणी वाटेला जायचं नाही तिच्या.

अशी ही तीन सर्वार्थाने विभिन्न पात्रे कशी एकत्र आली आणि त्यांची मैत्री कशी जमली हे त्यांनाही आठवत नाही आता. And it doesn’t matter anymore! त्यांचे म्हणणे होते की ‘We compliment each other! And they were happy with the way the were!’  जाम धमाल करायचे ते. मनुच्या हॉस्टेलच्या रूमवर गप्पा मारत केलेला टाईमपास, एकत्र पाहिलेले अनेक सिनेमे, एकत्र केलेला अभ्यास, इतर पोरापोरींवरून एकमेकांना चिडवणे, चित्रविचित्र पैजा लावणे, धुळवडीच्या दिवशी हॉस्टेलवर हळूच भांग पिऊन दिवसभर अनुभवलेली गांडू नशा, फालतू गोष्टींवरून केलेली भांडणे आणि पॅचअप्स आणि काय काय! आयुष्य मस्त सुरु होतं त्यांचं!

डोळ्यातील अश्रुंनी पाणीदार बनवलेल्या चितेच्या ज्वाळांच्या पार्श्वभूमीवर मनुच्या मनःपटलावर हे सर्व दिवस उमटत होते! हातातील चिठ्ठी त्याने दाबून, चुरगळून धरून ठेवली होती. ती तो कोणालाच कधीच दाखवणार नव्हता. त्याने डोळे पुसले. थोडा पुढे होऊन त्याने ती चिठ्ठी विझत असलेल्या त्या चितेत टाकून दिली. क्षणभर थोडा भडका उडाला…तिला जाणीव झाल्यासारखा…मग चिता शांत झाली!

फायनल ईयर. मैत्री जोमात होती. बहरत होती. आणि त्याच बरोबर बहरत होती काही नाती. मैत्रीच्या पलीकडे जाण्याची इच्छा धरणारी. आताशा तनुला मनु ‘तशा’ अर्थाने आवडू लागला होता. अनेकदा ट्रेकला ज्याच्या पाठुंगळीला बसून काही अंतर बिनदिक्कत पार केले त्या मनुने हल्ली अगदी सहज उठायला मदत म्हणून दिलेला हात धरताना तनुला शहारून येत असे. त्याच्याशी मस्ती, चिडवाचिडवी अचानक बंद झाली होती. म्हणजे आता तिला तो थिल्लरपणा वाटू लागला होता. आपण असे वागलो तर मनु आपल्याला बालिश समजेल. आपले इम्प्रेशन खराब होईल असे विचित्र, टिपिकल प्रेमी, कन्फ्यूज्ड विचार तिच्या मनात येत होते. ती फक्त मनुला पहात राही, ऐकत राही, आठवत राही. इतरांना तिच्या अलिप्त राहण्याची जाणीव झाली असली तरी ते लास्ट इयरचे प्रेशर असेल असे वाटत होते. कधी विचारले तर ती देखिल हेच कारण सांगे!

दुसर्‍या दिवशी मनुचा वाढदिवस होता. रात्रीचे पावणेबारा वाजले होते. रूमच्या दारावर टक टक झाली. मनुने दरवाजा उघडला. समोर मोठ्ठा बुके आणि केक घेऊन जानू उभी होती. तिला ह्या वेळी हॉस्टेल मधे पाहून मनुला आश्चर्यापेक्षा भीती जास्त वाटली. त्याने हात धरून तिला आत ओढली आणि दार बंद केले. तिने कम्पाउंड वॉल फांदून, वॉचमनला शंभर रुपये देऊन हॉस्टेलमधे कसा प्रवेश मिळवला त्याची गंमत साग्रसंगीत सांगितली. इतक्यात बारा वाजले. तिने मिठी मारून मनुला विश केले. त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले. तेव्हा मनुच्या सर्वांगात एक शिरशिरी आली. त्याची मिठी उगाच घट्ट झाली!

जानुने मिठीतून सहज बाजूला होत केक उघडला. कॅण्डल लावल्या. मनुने एका विचित्र धुंदीत केक कापला. जानुने केक भरवताना थोडा केक त्याच्या चेहर्‍यावर फासला. मग त्यानेही तिच्या चेहर्‍यावर लावण्यासाठी केकचा तुकडा हातात घेतला. ते पाहून जानू पळू लागली. मनुने तिला कमरेत हात घालून पकडली. तिने हाताने चेहरा लपवून घेतला. म्हणून त्याने तो केक तिच्या सर्वांगावर चोपडला. ते करताना त्याला वेगळेच आकर्षण जाणवले. गेले काही दिवस त्याच्या मनात गुदगुल्या करणारी जानुची फँटसी प्रत्यक्षात आल्यासारखे वाटत होते. ह्या झटापटीतून जानुने स्वतःला सोडवून घेतले. एका बॅगेतून आणलेली शॅम्पेन आणि दोन ग्लास काढले. केकवरच्या मेणबत्त्या स्टडी टेबलवर नीट लावल्या. शॅम्पेन ग्लासात ओतून एक ग्लास मनुच्या हातात दिला. चीयर्स! दोघे शॅम्पेन घेत होते. जानू भरभरून बोलत होती. नेहमीची बडबड करत होती. पण मनुला फक्त मेणबत्त्यांच्या प्रकाशात अधिकच सुंदर दिसणारा तिचा चेहरा दिसत होता. गेल्या काही दिवसात त्याच्या डोळ्यासमोर सतत तरळत असलेला लाडका चेहरा!

मनुने अचानक जानुचा हात हातात घेतला. दुसरा हात तिच्या बडबड करणार्‍या ओठांवर ठेवला आणि म्हणाला “जानू आय थिंक आय ऍम इन लव्ह विथ यु!” जानुला काय बोलावे सुचत नव्हते. मनु आपल्या जागेवरून उठला. त्याने जानुला मिठीत घेतले. तिचे चुंबन घेतले. जानू बर्फासारखी थंड होती. प्रेमात भिजलेली, उत्कट क्षणांची बरसात करणारी ती रात्र सरली. मनुचा आवेग ओसरला. तो शांतपणे झोपी गेला पण रात्रभर आनंदाच्या डोहात विहार करूनही कोरडी राहिलेली जानू तशीच थंड होती!

त्या संध्याकाळी मनुच्या वाढदिवसाची पार्टी. सगळी गँग जमली होती. बीयर, ब्रीझर आणि मस्ती सुरु होती. जानू मजेत होती पण मनु तिच्याशी बोलणे टाळत होता. तनु आज खास नटून आली होती. खूप सुंदर दिसत होती. दोन ब्रीझर घेऊन जरा रिलॅक्स मूड मधे होती. डोके थोडे हलके झाले होते. तिने जानुच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, “आज मी मनुला माझ्या मनात काय आहे ते सांगणार आहे!” हे ऐकून जानू हादरली. तिने विचारले “What do you mean?” तनु म्हणाली “”I love him damn it! आज मी त्याला काय ते सांगून टाकणार. काय व्हायचं ते होऊ दे. मी आता हे मनात ठेऊन नाही जगु शकत!” हे ऐकून जानुच्या मनात जळफळाट, द्वेष ह्या भावना अचानक निर्माण झाल्या. मैत्रीवर असुयेने मात करायला सुरुवात केली. जानुने तिला सांगितले “You are late dear. तो दुसर्‍या एका मुलीवर प्रेम करतो. हे मुलगे असेच असतात. तू नको अडकु त्याच्यात. त्यांना आपले मुलींचे मन कधीच कळत नाही. तू विसर त्याला. मी तुला मदत करेन ह्यातून बाहेर पडायला!” ते ऐकून तनु पार्टी सोडून निघुन गेली!

पुढचा आठवडा असाच भकास आणि ऑक्वर्ड गेला. सर्वांना सर्व माहीत असून कोणीच काही बोलत नव्हते. एका छान मैत्रीच्या नात्याला प्रेमाचे ग्रहण लागले होते. आज रविवार. मनु आरामात उठला. रूमचे दार उघडायला गेला तर दाराच्या आत सरकवलेली एक चिठ्ठी त्याला सापडली. त्याने चिठ्ठी उघडली.  “मन्या, माझ्या मित्रा आपण काय करून बसलो रे आपल्या निखळ मैत्रीचे? तीन वर्ष जोपासलेली, जपलेली, वाढवलेली आपली मैत्री मैत्रीच्या पुढे जायला निघाली आणि घात झाला यार! बरं आता मी सांगते ते नीट ऐक. तुझ्या वाढदिवसाच्या आदल्या रात्री जे घडले ते चूक की बरोबर ह्यात मला इंटरेस्ट नाही. तुला हवे ते तू केलेस. मी मैत्रीण म्हणून विरोध नाही केला इतकेच. But I didn’t enjoy it even a bit! पण त्यातून तुला आनंद मिळाला असेल तर मला त्यात समाधान आहे. मग दुसर्‍या दिवशी तुझ्या पार्टीत तनु माझ्याशी बोलली. You know what dude? She loves you!!! तुला मी आवडते…ओके. पण तनुला तू आवडतोस हे मला नाही आवडले. I felt very jealous of YOU! कारण मला तनु आवडते!!! Yes…You read it right! मला तनु आवडते. माझे प्रेम आहे तिच्यावर. गेली दोन वर्षे. Yes dude. मी लेस्बियन आहे. मला मुलींचे आकर्षण आहे. त्यामुळे मी तनुवर प्रचंड प्रेम करते. अगदी मनापासून. मला तिच्याशीच लग्न करायचे आहे. पण माझ्या घरची पार्श्वभूमी, इथल्या लोकांचा माइंडसेट पाहता ते कधीच शक्य होणार नाही हे मी जाणते. माझ्याकडे अशा एखाद्या देशात जाऊन सेटल होण्याचा ऑप्शन आहे की जिथे समलैंगिकता टाबू नाहीये हेही मला माहीत आहे. However stupid or weird it may sound पण मी मनातून तनुला आपले मानले आहे. तिच्याशिवाय मी जगु शकत नाही आणि ती मला मिळणे शक्य नाही. राहता राहिलास तू. तुला त्या रात्री माझ्या नसलेल्या प्रतिसादातून थोडी कल्पना नक्कीच आली असेल!

Now the situation is आपला एक विचित्र ट्रायंगल झाला आहे. तनुला तू आवडतोस, तुला मी आवडते आणि मला तनु!!! हे कोडे माझ्या विचित्र लैंगिक चॉइसमुळे अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. जे मी असेपर्यंत कधीच सुटणार नाही. So I have decided to end this complicated life! तुला हे पत्र मिळेल तोवर मी ह्या जगात नसेन. पण यार घाबरु नको. मी परत येईन. तनुच्या पोटी. तुम्हा दोघांची पहिली मुलगी बनून. फक्त मला वचन दे की तू तनुशी लग्न करशील आणि मी तुला ह्या पत्रात सांगितलेली गोष्ट कोणालाही सांगणार नाहीस. अगदी तनुलाही. ती हर्ट झाली तर मला त्रास होईल. She is my first and last love after all! लवकर लग्न करा. मला परत यायचंय तुम्हा दोघांवर एकाच वेळी प्रेम करता येईल असे तुमच्या मुलीचे रूप घेऊन! चलो दोस्त! Time to exit!!!”

चिता थंड झाल्यावर मनु जड पावलांनी निघाला. यथावकाश इंजीनियरिंग संपले. एम्.बी.ए. झाले. मनु आणि तनुचे लगेच लग्न झाले. तनुला सातव्या महिन्यातच प्रीमॅच्युअर मुलगी झाली. जणू ती जगात यायची वाटच पहात असावी. त्यांनी मैत्रिणीच्या आठवणीसाठी तिचे नाव जान्हवी ठेवले. बेबी जान्हवी आणि बाबा मनुचे एक सीक्रेट होते. तिच्या उजव्या गालावरील तिळाची मनु पापी घ्यायचा तेव्हा बेबी जान्हवीच्या डोळ्यात खट्याळ चमक यायची, जुनी ओळख दिसायची, चेहर्‍यावर समाधान यायचे, ती खुदकन गोड हसायची! बाबा आणि बेबीला वचन पुरे झाल्याचा आनंद व्ह्यायचा!

…..आणि का कोण जाणे त्यावेळी घराच्या हॉलमध्ये लावलेल्या फोटोतील जानु प्रसन्न आणि समाधानाने हसत असल्याचा भास मनुला व्ह्यायचा!- मंदार जोग

हे पण वाचा-

सख्या रे …

ट्वेंटी थ्री

गुंतता हृदय – सर्व भाग

मृगजळ- सर्व भाग

व्हॅलेंटाईन डे- भाग १

रिफ्लेक्शन भाग १

आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा

आमच्या लघुकथा लघुकथा

माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख

आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

ललित

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

2 thoughts on “तनु, मनु आणि जानु”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!