मृगजळ मंदार जोग मराठी दीर्घकथा

मृगजळ भाग १८

हे बोलून तो मानसीला एक लूक देऊन निघून गेला. मानसी तो गेला त्या दिशेला बघत उभी होती. ते लक्षात आलेला श्रीरंग हळूच तिच्या कानाशी येऊन म्हणाला-

सौरभ- He won’t marry you. Bet?

हे वाक्य ऐकून धक्का बसलेल्या मानसीने त्याच्याकडे वळून पाहिलं. श्रीरंग एक honest स्माईल करत दोघांचे ग्लास भरत होता.

मानसी- What? हे..हे काय बोलतो आहेस तू? कसलं marriage? You mean मी आणि सौरभ…

एक ग्लास तिच्या हातात देत श्रीरंग म्हणाला-

श्रीरंग- That is exactly what I mean to say. खरं सांग, तुझा आणि त्या सौरभचा scene आहे की नाही.

मानसी तोंड फिरवून पुटपुटली-

मानसी- क..काहीही काय? कसला scene? We are just good friends..

श्रीरंग- हे माझ्या डोळ्यात बघत सांग. मानसी, मी हुशार आहे हे तुला माहीत आहेच. आणि इथे त्याहून महत्त्वाचं आहे की मी तुला ओळखतो. कदाचित तू स्वतःला ओळखतेस ना त्याहूनही जास्त मी तुला ओळखतो. त्यामुळे तुझ्या मनात येणारे विचार मला तुझ्या डोळ्यातून कळतात. तू बोलून दाखवतेस ते रिपीटेशन असतं माझ्यासाठी. त्यामुळे काही नाहीये म्हणायचं असेल तर आपण तो विषय इथेच थांबवू. पण मान्य करायचं असेल तर मला त्या विषयावर बोलायचं आहे. You decide.

हे बोलून श्रीरंग सोफ्यावर शांत बसला आणि आपला मोबाईल सुरू करून मेसेजीस वाचू लागला. मानसी शांतपणे वळली. त्याच्या समोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली-

मानसी- इतका वाईट आहेस ना तू, रंगा. सगळं समजतं तुला. हो…मी आणि सौरभ रिलेशनशिपमध्ये आहोत.

हे बोलून ती त्याच्या शेजारी बसली. त्याचा हात हातात घेत तिने बोलायला सुरुवात केली आणि अगदी सुरुवातीपासून, म्हणजे अंकिताने संशय घेतला तेव्हापासून आजपर्यंतच्या सगळ्या गोष्टी तिने रंगाला सांगितल्या. रंगा तटस्थपणे सगळं ऐकत होता. ते सांगत असताना तिच्या चेहऱ्यावर बदलत जाणारे भाव निरखत होता. सगळं बोलून झाल्यावर मानसी म्हणाली-

मानसी- रंगा, आज पहिल्यांदा इतक्या वर्षांत मी कोणालातरी सगळं सांगितलं आहे. काहीही न लपवता. खूप हलकं वाटतंय रे तुझ्याशी बोलून.

श्रीरंग- हम्म…कारण हे रिलेशन तुझ्यासाठी आनंद नाही, तर एक मोठं burden बनलेलं आहे. ज्यामुळे तू झुकते आहेस, पुढे जाऊ शकत नाहीयेस. अडकून बसली आहेस. बाहेरही पडता येत नाहीये आणि आत राहणं देखील आता अशक्य होतंय, इतकं ते आता आतून पण टोचू लागलंय.

मानसी- पण तू सांग ना, रंगा..एकदम honest उत्तर दे. आमच्या नात्याबद्दल काय वाटतं तुला?

श्रीरंग- गेला एक तास तुझी संपूर्ण कथा ऐकायच्या आधी मी म्हणालो होतो तेच मला अजूनही वाटतं. तो तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही. तू मृगजळाच्या मागे धावते आहेस, मानसी.

मानसी- असं नको ना बोलू, please. सौरभ मला फसवतोय असं म्हणायचं आहे का तुला? तू त्याला ओळखत नाहीस, रंगा. तो चांगला माणूस आहे. मनाचा खूप चांगला आणि दिलदार आहे. सरळ मार्गी आहे आणि माझ्यावर खरंच प्रेम आहे त्याचं.

श्रीरंग- चांगला माणूस चांगला प्रियकर आणि चांगला नवरा होईल असं थोडीच आहे. तो सौरभ मुळात फट्टू आहे. त्याच्या aggressive बायकोला घाबरतो. स्वतःच्या reputationला सर्वात जास्त महत्त्व देतो. त्याची priority त्याचं reputation, त्याची family, त्याचा peace of mind, त्याचा comfort zone, त्याचा आनंद आणि त्यानंतर कुठेतरी तू आहेस…सहाव्या, सातव्या किंवा कदाचित दहाच्याही खालच्या स्थानावर. आणि तुझ्यासाठी मात्र तो, त्याचं प्रेम, त्याने दिलेलं वचन ही top priority आहेत. त्याची मजा आहे, मानसी. एकीकडे मस्त family man चं status enjoy करतोय आणि एकीकडे तू आहेसच, जे तिथे मिळत नाही ते देणारी.

मानसी- हे काय बोलतो आहेस तू, रंगा?

श्रीरंग- जे मला कळतंय, वाटतंय ते बोलतोय.

मानसी- असं काही नाहीये. तू फार टोकाचं बोलतो आहेस. सौरभ आता घर सोडून एकटा राहणार आहे. आणि मग हळूहळू घरी सांगणार आहे.

श्रीरंग- घरी? म्हणजे त्याच्या भांडखोर बायकोला आणि divorceला विरोध करणाऱ्या त्याच्या आईला? तुला खरंच वाटतं त्याच्यात ती हिंमत आहे? दहा वर्षांत तू त्याला इतकाही ओळखू शकली नाहीस, बेब?

मानसी- बघ ना तू. काही दिवसांचाच तर प्रश्न आहे. तो घर सोडेल तेव्हाच तू किती चुकीचं बोलतो आहेस हे तुला कळेल.

श्रीरंग- चल, मी अजून एक सांगतो तुला. तो घर पण सोडणार नाही. आता दोन दिवसांत नाही आणि कधीच नाही. पैज लावतेस?

मानसी- लागली पैज. कसली?

श्रीरंग- तू हरणार आहेस. पण मला तुला लुटायचं नाहीये म्हणून ५ डॉलर…आय मीन, पाचशे रुपयांची पैज?

मानसी- Done. तू अजून सौरभला ओळखलेला नाहीस.

श्रीरंग- मी त्याला व्यक्ती म्हणून कदाचित कमी ओळखत असेन कारण आमची एकच भेट झाली. पण मी पुरुष म्हणून तर त्याला ओळखू शकतो ना? मला पुरुषांची बुद्धी कशी चालते माहीत आहे ना? थोडाफार फरक असेलही. पण शेवटी males are males.

मानसी- ओके. मग काय म्हणतो तुझ्यातला male माझ्या सौरभमधल्या male बद्दल?

श्रीरंग- सांगतो. पण आधी भूक लागली आहे यार. त्या सौरभच्या नादात अजून उपाशी आहे मी.

मानसी- अय्या हो. ते राहूनच गेलं. सौरभ मध्येच निघाला आणि मग आपण बोलत बसलो. Sorry, मी वाढते लगेच.

श्रीरंग- तू कशाला sorry म्हणतेस? विषय मी काढला ना? मग तू खूप हलकं वाटणार सगळं मला सांगितलंस. आता मस्त जेवण दे.

मानसीने पटापट जेवण गरम केलं आणि घेऊन आली.

मानसी- आता बस शांतपणे आणि पोटभर जेव. तुझ्या आवडीचं केलंय.

तिने श्रीरंगला जेवायला वाढलं. एक घास घेतल्यावर श्रीरंग थांबला आणि अचानक त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. ते पाहून मानसी काळजीच्या सुरात म्हणाली-

मानसी- काय रे रंगा, काय झालं? तिखट लागलं का?

श्रीरंग- नाही…मला माझी कॉलेजमधली मैत्रीण आठवली ह्या चवीने…गोड, सुंदर, भोळी, प्रेमळ आणि खूप स्वप्नं बघणारी…

ते ऐकून त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत मानसी म्हणाली-

मानसी- वेडा आहेस तू, रंगा. मी इतकी घाबरले की काही चुकलं की काय म्हणून…आणि मैत्रीण आठवायला कशाला हवी. इथे आहे ना ती तुझ्या शेजारीच. आता शांतपणे जेव.

मग मानसीने त्याला आग्रहाने वाढून जेवायला दिलं. पोटभर जेवून श्रीरंग शतपावली घालू लागला. मानसीने किचन आवरलं आणि ती बाहेर येऊन बसली.

मानसी- हम्म..आता सांग, सौरभ पुरुष म्हणून काय विचार करतोय असं तुला वाटतं.

श्रीरंग येऊन तिच्या शेजारी बसला आणि बोलू लागला.

श्रीरंग- तू स्वतःला सौरभच्या जागी ठेव आणि विचार कर. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं हे जे काही अफेयर वगैरे आहे ते नॉर्मल लोकांचं होतं तसं जमलेलं नाहीये. त्या अंकिताने संशय घेतला आणि तुम्ही दोघेही त्याचे victim ठरलात. ते victim होणं हा तुमच्यात common दुवा ठरला. मग त्यात थोडा रागही होता की काहीही संबंध नसताना आमच्यावर संशय घेतला काय? मग आता संबंध ठेवतो आम्ही. बघू काय करता, असा थोडा rebelपणा होता. तो बायकोपासून लांब झाला होता. तू तर ऑफिशियली divorce घेतला होतास. दोघांचा एकमेकांना emotional आधार झाला. मग physical attraction वाटणं साहजिक होतं. ते अंतर संपलं आणि मग तुमचं affair सुरू झालं. Right?

मानसी- हम्म..अगदी तसं नाहीये…पण broadly बरोबर आहे. Sequence correct आहे.

श्रीरंग- तू full on प्रेमात होतीस. तुला लग्नाची स्वप्नं पडू लागली. त्याच्या बरोबर संसार करायची इच्छा निर्माण झाली. पण तो मात्र तिथे कधीच नव्हता. तू खूप पुढे निघून गेलीस आणि तो अजूनही त्याच्या संसारात अडकून पडलेला आहे. इतकी वर्षं झाली ज्या अफेयरला, ज्या अफेयरच्या संशयावरून मूळ भांडण झालं ते अफेयर खरोखर जुळल्यावर त्याने बायकोला आणि जगाला का सांगितलं नाही? का लपवतो आहे तो? काय नुकसान होणार आहे त्याचं? त्याच्या बायकोला जे आहे असं वाटत होतं ते असल्याची कबुली देऊन तो नवीन काय सांगणार होता तिला? प्रॉब्लेम कोणाला व्हायला हवा? ज्याने घरी काहीच सांगितलं नसेल त्याला ना? इथे तर बायको त्याला नि तुला रिलेशनशिपमध्ये imagine करतच होती ना? मग त्याला तर खूप सोपं होतं तिला सांगणं. आणि त्याने सांगितल्यावर divorce तिने स्वतः दिला असता, knowing her nature, जे तुझ्याकडून ऐकलं आहे त्यावरून. पण त्याने ह्यातलं काहीही केलं नाहीये अजून. त्याने फक्त तुला झुलवत ठेवलं आहे आणि तो त्याचं family life, social status enjoy करतोय. आणि तू? तू तो लग्न करेल ह्या आशेत जगत दहा वर्षांनी म्हातारी झाली आहेस.

मानसीला काय बोलावं सुचत नव्हतं. इतकी वर्षं तिच्या मनात येणारे विचार, त्यांचा झालेला गुंता श्रीरंगने अलगद सोडवून सगळी परिस्थिती तिच्यासमोर मांडली होती. तिला तिच्या मनासमोर कोणीतरी आरसा धरल्यासारखं वाटत होतं.

मानसी- रंगा, मला कळतंय रे पण…

हे बोलून ती उठून लांब गेली. श्रीरंग उठून तिच्या मागे गेला आणि तिला स्वतःच्या दिशेला वळवून तिच्या डोळ्यात बघत म्हणाला-

श्रीरंग- नुसतं कळून काय फायदा आहे, मानसी? तो माणूस मस्त मजेत जगतोय. त्याची family आहे, status आहे, पैसा आहे, उद्या सून येईल, त्याची आई मजेत आहे, आणि ती त्याच्या आयुष्याची जगासमोर open असलेली एक बाजू आहे. दुसरी बाजू तुझ्या बरोबर आहे. जी लपवलेली, अंधारात ठेवलेली, तो चुकूनही कुठेही open करत नसलेली बाजू आहे. जिथे तो आहे आणि पैसे वगैरे न मोजता केवळ भावना आणि एका वचनाच्या मोबदल्यात त्याने ठेवलेली तू त्याची रखेल आहेस.

श्रीरंगच्या तोंडून रखेल शब्द ऐकून मानसीच्या डोक्यात तिडीक गेली आणि तिने जोरात त्याच्या कानाखाली मारली आणि ती ओरडली-

मानसी- रंगा..Enough..

मानसी रागाने थरथरत त्याच्याकडे बघत होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. श्रीरंग अजूनही शांतपणे तिच्याकडे बघत उभा होता…घड्याळात पहाटेचे चार वाजले होते.

क्रमश:

पुढील भागाची लिंक- मृगजळ भाग १९

आधीच्या भागाची लिंक- मृगजळ भाग १७  

मृगजळ कथेचा पहिला भाग. सुरुवात इथून करा आणि एकसलग सगळे भाग वाचा- मृगजळ …भाग १

हे पण वाचा-

सख्या रे …

ट्वेंटी थ्री

गुंतता हृदय – सर्व भाग

मृगजळ- सर्व भाग

व्हॅलेंटाईन डे- भाग १

रिफ्लेक्शन भाग १

ललित

आमच्या इतर लघुकथा – लघुकथा

आमचे व्यक्तिचित्रण- व्यक्तिचित्रण

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

3 thoughts on “मृगजळ भाग १८”
  1. khup chhan turn milala aahe story la … pudhe kay hoil ??? … mala vatate mansi ne nighun jave americala ranga barobar karan tyache kharech prem aahe mansi var …mansi ne pan ata kuthe tari thambayla have saurabh che vichar manatun kadhun takun pudhche ayushya jagle pahije shant pane

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!