रिफ्लेक्शन | Mandar Jog

रिफ्लेक्शन भाग १

“I beg to disagree !” अतिशय मंजुळ पण आत्मविश्वासपूर्ण आवाज कॉन्फरन्स रूम मध्ये घुमला आणि आपल्याच प्रेझेंटेशनमध्ये गुंगलेल्या हर्षदने अविश्वासाने मागे वळून पाहिले!

हर्षद क्षीरसागर, HK ग्रुपचा चेअरमन. फर्स्ट जनरेशन बिझिनेसमन. सेल्फ मेड मॅन. काही वर्षात कोट्याधीश झालेला. आपले कोणतेही निर्णय कधीच चूक नसतात ह्याचा अभिमान बाळगणारा. आणि काही चुकले तरी “मेरे मन को भाया मै कुत्ता काट के खाया” ह्या टेचात वावरणारा शहरातील मोस्ट एलिजिबल बॅचलर! थोडक्यात आलम दुनियेला फाट्यावर मारून आपल्याच धुनकीत जगणारा मस्त कलंदर. त्याला विरोधाची सवयच नव्हती. त्याचे मुख्य कारण असे की त्याला विरोध करायचा म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त अक्कल असणे आवश्यक होते किंवा नोकरी गमवायची तयारी आवश्यक होती. ह्या दोन्ही गोष्टींचा अभाव स्टाफ मेम्बर्सपैकी प्रत्येकात असल्याने कोणी त्याच्या वाटेला जात नसे. हर्षदही शक्यतो धंद्यात चुकत नसे. त्याचे आजवरचे बहुतेक निर्णय लॉन्ग टर्म मध्ये योग्यच ठरले होते. जे चुकले त्यातून त्याने स्वतः धडे घेतले होते. पण आजवर त्याला “तू चुकतो आहेस” हे सांगणारे ऑफिसात कोणीच भेटले नव्हते. त्यामुळे ते वाक्य ऐकून हर्षद अविश्वासाने मागे वळला. कॉन्फरन्स रूममध्ये दडपणयुक्त शांतता पसरली!

त्या आवाजाच्या दिशेने पाहात हर्षद म्हणाला “come again please!”

तोच आवाज आणखी निर्धाराने आला “मला हा निर्णय कंपनीच्या हिताच्या दृष्टीने जरा रिस्की वाटतो आहे. This will impact the bottom line badly!”

मानसी पटवर्धन, फक्त हुशारीच्या जोरावर सीए आणि एमबीए करून पाचेक वर्षांचा अनुभव गाठीशी घेऊन HK मध्ये व्हीपी फायनान्स म्हणून काही दिवसांपूर्वीच रुजू झाली होती. HK मध्ये, विशेषतः हर्षद समोर डेझीग्नेशला फारसा अर्थ नसे. हर्षदने घेतलेल्या निर्णयांची फक्त अंमलबजावणी करण्यासाठी पाचशेच्या वर स्टाफ पगार घेत होता. त्याच्या दृष्टीने त्यातीलच एक “जरा जास्त पगार घेणारी” ह्या पलीकडे फारसे महत्व नसलेली बाई आज त्याला मॅनेजमेंट टीम समोर चॅलेंज करत होती. चक्क तू चुकतो आहेस असे खुल्ला सांगत होती!

“ओह. आपण जे काही म्हणालात ते जरा डिटेल मध्ये समजवाल का आम्हा सर्वांना?” इतके कुत्सितपणे म्हणत हर्षद त्याच्या गुबगुबीत चेयरमध्ये कॉफी सिप करत बसला आणि मानसीला समोर येऊन बोलायची त्याने सूचना केली. मानसी शांतपणे चालत पुढे आली आणि हर्षदचेच प्रेझेंटेशन एक एक स्लाईड करत दाखवत, त्यावर आपले मत मांडत आपले मुद्दे डेटा पॉइंट्ससह शाबीत करत गेली. हर्षद शांतपणे तिचे प्रेझेंटेशन बघत होता. बाकी लोक प्रेझेंटेशन कमी आणि हर्षदच्या चेहऱ्यावरील भाव जास्त बघत होते. तिचे प्रेझेंटेशन संपले. हर्षद हातात पेन फिरवत, पेनाकडे बघत विचारात गुंगला होता. दोन मिनिटे शांततेत गेली. सगळेजण हर्षदच्या प्रतिसादाची वाट बघत होते. अचानक हर्षद उठून उभा राहिला. बाकी सर्व लगबगीने उठले. “Gentleman let me think through this. Wait for my mail tomorrow morning.” इतके म्हणून हर्षद निघून गेला. जाताना फक्त एक कटाक्ष मानसीकडे टाकून. ती शांतपणे आणि त्याच आत्मविश्वासाने उभी होती. सुंदर चेहर्यावर मोहक स्माईल लेऊन.

हर्षद गेल्यावर बाकी बोर्ड मेम्बर्स एक एक करत मानसीकडे कटाक्ष टाकत हळू हळू कल्टी झाले. आता ते तिच्याकडे दयेने बघत होते की कुणाचीही नजर एका जागी खिळू न शकणाऱ्या तिच्या आरस्पानी सौंदर्याला पुढील बोर्ड मिटिंगपर्यंत पुरेल इतके डोळ्यात आणि हृदयात साठवून घेत होते हे त्यांच्याकडे डोळ्यात डोळे घालून हसत बघत त्यांना शेवटी नजर इतरत्र वळवायला लावणारी मानसीच जाणे! ते सर्व गेल्यावर जुने जाणते कंपनी सेक्रेटरी देशपांडे आणि मानसी दोघेच रूममध्ये उरले. मानसीने HK जॉईन केल्या दिवसापासून देशपांड्यांशी तिचे सूर जुळले होते. त्यांच्यात तिला तिचे बाबा दिसत. अगदी पहिल्याच दिवशी इंडक्शन सेशन झाल्यावर एकत्र लंच करताना मानसीने त्यांना कामाव्यतिरिक्त इतर वेळी काका संबोधायची परवानगी मागितली होती. देशपांड्यानी देखील तिच्यात आपली अमेरिकेत असलेली कन्या दिसल्याने ती आनंदाने दिली होती. देशपांडे काळाजीयुक्त स्वरात म्हणाले-

देशपांडे- मानसी HK was a bit annoyed I suppose.

मानसी- काका agreed. पण मी चुकीचं बोलले का? त्याच्या प्लॅन प्रमाणे गेल्यास कॉस्ट कमीतकमी 16% ने वाढली असती. Agreed की थोडे अग्रेसिव्ह मार्केटिंग आणि डीसट्रिब्युशन कॉस्ट कंट्रोल करून, मार्जिन वाढवता येईल. पण त्यात खूप रिस्क आहे. तसंच त्याने नवे अपेक्षित टॅक्स स्ट्रक्चर जे दोन महिन्यांनी इंप्लिमेंट होऊ शकते ते पण फॅक्टर केले नव्हते.

देशपांडे- मान्य. पण ते असे सर्वांसमोर सांगणे त्याला फारसे आवडलेले नाही. मी ओळखतो त्याला इतकी वर्ष.

मानसी- हे आज सांगितले नसते तर त्याने डिसिजन घेऊन टाकले असते. I just did my duty. मी कंपनीच्या फायद्याची गोष्ट सांगितली. बाकी त्याची मर्जी.

हर्षद त्याच्या केबिनमध्ये बसून त्याचेच प्रेझेंटेशन परत बघत होता. प्रत्येक स्लाईड बघताना मानसीने मांडलेले मुद्दे त्याला आठवत होते. तो त्यावर विचार करत होता. विचार करता करता चेयरमध्ये रिलॅक्स होऊन त्याने डोळे मिटून घेतले. आजवर शेकडो वेळा भेटून देखील कधीच लक्षात न आलेले मानसीचे बोलके टपोरे काळेभोर डोळे, सुंदर रेखीव चेहरा, आकर्षक बांधा, मोकळे सोडलेले लांब केस, गोरा रंग, तिचा आत्मविश्वासपूर्वक वावर, intoxicating हास्य त्याच्या नजरेसमोरून तरळून गेले! त्याने खाडकन डोळे उघडले. लॅपटॉप मधील काही शीट्स वर काही गणिते मांडली. दोन क्षण थांबून निर्णय पक्का केला.

मीटिंगमधील सर्वांना ऍड्रेस केलेले एक मेल उद्या सकाळसाठी श्येडुल करून तो दिल्लीची फ्लाईट पकडायला एअरपोर्टला जायला निघाला! मेलबॉक्स मध्ये मेल उद्या सकाळची वाट पहात होते!

बिझनेस क्लास लाऊंजमध्ये एक पाईंट बीयर झाल्यावर फ्लाईटची बोर्डिंग अनाऊन्समेंट झाली. हर्षद निघाला. बोर्डिंग गेट जवळ लागलेल्या Y क्लासच्या रांगेला पार करून “have a good flight Mr. Kshirsagar” ह्या नेहमीच्या शुभेच्छांना थँक्स असे ठराविक उत्तर देत तो एरोब्रीजवरून चालत विमानात आला.

प्रसन्न, आकर्षक, सुगंधी हवाई सुंदरीने त्याचे सुहास्य वदनाने स्वागत केले. हर्षद गुबगुबीत सीटवर विराजमान झाला. हवाई सुंदरीने त्याचे हँड बॅगेज उचलले आणि त्याच्या डोक्यावर असलेल्या स्टोरेज मध्ये ते ठेऊ लागली. अनेक फ्लाईटमध्ये त्याच्यापासून एक इंच अंतरावर उभी राहून, दोन्ही हात वर करून, हॅन्डरेस्टवर असलेल्या त्याच्या हाताला टाचांवर उभी राहून हात वर केल्यामुळे वर झालेल्या स्कर्टमधून आपल्या मांडीचा ओझरता स्पर्श करून एअर होस्टेस नेमके काय साधतात हा प्रश्न त्याला उत्तर माहीत असल्याने कधीच पडला नाही. त्याला फक्त बिझनेस मध्ये इंटरेस्ट होता. तो असल्या प्रलोभनांनपासून दूर राहात असे. सामान ठेऊन त्याच्याकडे लाडिक आणि सूचक हसत बघणाऱ्या त्या सुंदरीकडे थंड नजरेने बघत त्याने “Get me some water please” असा हुकूम सोडला आणि तो खिडकीतून बाहेर दिसत असलेली लँडिंग्स बघू लागला.

विमान टॅक्सी वे वरून रन वे वर आले. प्रचंड शक्तिशाली इंजिन त्या सत्तर हजार किलोच्या धुडाला घेऊन अडीचशे ते तीनशे किमी वेगाने धावपट्टीवर धावू लागले. काही सेकंदात राईट बंधूंनी तमाम मानव जातीवर केलेल्या उपकारांचा तो चमत्कार हजारो फूट उंच हवेत दिसेनासा झाला!

संध्याकाळी मरीन ड्राईव्हवरून घरी जाताना मानसी गाडीत विचार करत होती. तिला देशपांड्यांचे बोलणे आणि हर्षदची बाहेर पडतानाची नजर आठवली. आपण योग्य तेच केले हे तिचे मन तिला सांगत होते. तिने कामाचे विचार झटकून टाकत रिमोटने जगजीत सिंग लावला आणि डोळे मिटून घेतले.

हर्षदने खाडकन डोळे उघडले. विमान बत्तीस हजार फुटावर क्रूझ करायला लागल्यावर त्याला झोप लागली होती. झोपेत त्याला मानसी दिसली होती. तेच रूप जे त्याच्या केबिनमध्ये काही क्षण डोळे बंद केल्यावर दिसले होते! विमानाचा डिसेंड सुरु झाला होता. आपला डिसेंड होऊ नये म्हणून त्याने काल विचारपूर्वक निर्णय घेतला होता. सीट बेल्ट बांधायची घोषणा झाली. हर्षदने सीट बेल्ट बांधला. खाली दिव्यांचे अस्पष्ट विखुरलेले पुंजके दिसत होते…काल हर्षदने घेतलेल्या पहिल्याच विचारपूर्वक असून देखील अस्पष्ट असलेल्या निर्णयासारखे! हर्षद ते जाणून होता पण संबंध जिगसॉ मध्ये कोणते भाग बसत नाहीयेत ते त्याला शोधायचे होते.

HK च्या ऑफिसमधील दुसरा दिवस सामान्य सुरु झाला. कालच्या मीटिंगमध्ये असलेल्या सर्वांना हर्षदच्या मेलची उत्कंठा होती. बरोब्बर दहा वाजता सर्वांच्या मेलबॉक्स मध्ये हर्षदचे मेल आले. त्यात स्पष्ट लिहिले होते “मीटिंग मध्ये व्यक्त केलेली सर्व मते लक्षात घेतल्यानंतर मी निर्णय घेतला आहे की माझ्या मूळ प्लॅन प्रमाणेच आपण पुढे जाणार आहोत. त्यात कोणताही बदल होणार नाहीये!”

त्याच्या निर्णयाचे मानसीला खूप आश्चर्य वाटले. त्याचा स्वभाव तसेच मेंदू कसा चालतो हे माहीत असलेल्या देशपांड्यांना त्याचा निर्णय जाणून फारसे आश्चर्य नाही वाटले. फक्त हर्षद जाणून होता की आज आयुष्यात पहिल्यांदा त्याने मेंदूचे न ऐकता थोडासा मनाच्या, भावनेच्या अंमलाखाली येऊन निर्णय घेतला होता. मनात काय आहे हे फक्त तो जाणत होता. पण हर्षद त्याचा निर्णय योग्य आहे हे शाबित करायला सक्षम होता. दिल्लीहून मुंबईकडे येणाऱ्या त्याच्या विमानाने हवेत झेप घेतली होती.

सुंदर, आकर्षक, सुगंधी हवाई सुंदरी त्याच्याकडे बघून हसत होती! तो दुर्लक्ष करायचा प्रयत्न करत होता!!!!

क्रमश:

पुढील भागाची लिंक- रिफ्लेक्शन भाग २

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

7 thoughts on “रिफ्लेक्शन भाग १”
  1. As usual another interesting story is coming up Mandarji …..very well started… Mail madhe kay lihile asel yachi utkantha mansi ani Tichya collogues barobar vachakana sudha hoti ani ek zoracha zatka haluch lagla …..pudhil bhagachi vaat baghte aahe

    1. कथेची लिंक इतरांना whatsapp वर पाठवा. सर्वाना वाचनाचा अनाद घेऊ द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!