तीन टायरवर ठेवलेला कॅरम वर माधोमध टांगलेल्या शेडमधून लटकणाऱ्या बल्बमुळे चांगलाच गरम झाला होता. ऐंशीव्या वर्षी हाताच्या बोटावर मोजता येतील किंवा भोला माव्याबरोबर तोंडात भरलेली कच्ची गीली सुपारी चावता येईल इतकेच दात तोंडात उरल्याने पांढर्या दाढीचे खूंट वाढून आत गेलेली गालफड, काथाने दोन्ही बाजू लाल झालेले सुरकुतलेले ओठ, हाडांच्या सापळ्यावर कातडी लोम्बवून बनलेल्या कृष देहावर चट्टेरीपट्टेरी लेंगा आणि त्यावर ढगळ सँडो बनियन घातलेल्या दाजीचे लक्ष त्याच्या काळ्या फ्रेमच्या बायफोकल चष्म्यातून फक्त क्वीन कड़े होते. त्याने ब्रेकलाच चार पिस पॉकेट केलेल्या होत्या. दाजीने स्ट्राइकर लाईनीवर ठेवला. तर्जनी आणि मधल्या बोटाचा ट्रिगर त्याच्या मागे धरला. एकदा डाव्या हातातील बीडीचा एक खोल कश मारत क्वीन कडे नजर मारली. इतक्यात दाजीला खोकल्याची उबळ आली. जीव जाईल असे खोल खोकून झाल्यावर डोळ्यातील पाणी डाव्या हाताने पुसून दाजीने परत स्टांस घेतला. एकच शॉट… दाजीने सर्व ताकद दोन बोटात सामावून घेतली आणि स्ट्राइकर अलगद सोडला. बोरीक पावडरवर घसरत स्ट्राइकर क्वीन बरोबर तीन कव्हर घेत, तीन काळ्या ब्लॉक करत परत त्याच्या हातात विसावला. त्याने शांतपणे अजून एक खोल दम मारला! त्याला फिनिश दिसत होता. बिडी कॅरमच्या पट्टीवर दाबून विझवत त्याने स्ट्राईकर हलके सोडला. समोरच्या व्हाईट पिसला सेकंड पॉकेटला ढकलून शेवटची पीस थर्ड पॉकेटला घेऊन दाजीने फिनिश मारला. एक बिडी पेटवून दाजी खोल गेलेल्या डोळ्यांनी कॅरमकडे तंद्री लावून हसत होता!
इथे सरकारी इस्पितळात गेली छत्तीस वर्ष खितपत पडलेल्या संपतला आज परत शुद्ध आली होती. त्याच्या डोक्यात प्रचंड कळा येत होत्या. कोणीतरी घणाचे घाव घातल्यासारख्या. तो गुरासारखा ओरडत होता. इतर दिवशी कोमात असलेला संपत महिन्यातून एकदाच दहा मिनिटे शुद्धीवर येत असे आणि डोक्यात होणाऱ्या असह्य वेदनांनी कळवळून परत कोमात जात असे. त्याच्या अजब रोगाचे निदान इतक्या वर्षात डॉक्टरांना झाले नव्हते! पण त्या ओसाड गोदामात दाजीच्या बोटातून सुटलेला स्ट्रायकर कॅरम किंवा सोंगटीवर जितके वेळा आपटे तितक्या वेळा इथे संपतच्या डोक्यात घणाचे घाव पडत! दाजी एकच बोर्ड खेळत असे…एकटाच….स्टार्ट टू फिनिश! १९८८ साली इंटर डिपार्टमेंट स्पर्धेत संपतला हरवताना खेळलेल्या लास्ट बोर्ड सारखाच!
संपत एका सरकारी कंपनीचा युनियन लीडर. नामाचीन कॅरमपटू. पण १९८८ सालच्या इंटर डिपार्टमेंट स्पर्धेत सामान्य कामगार असलेल्या दाजीकडून हरला. ती हार सहन न होऊन उगाच उकरून काढलेल्या फालतू राड्यातून संपतने त्या पडीक गोदामात डोक्यात क्वीन ठोकून दाजीचा मर्डर केला आणि मुडदा त्याच गोदामात पुरून टाकला. संपत फुल टाईट होऊन घरी आला. झोप लागत नव्हती. अचानक डोक्यात असंख्य असह्य कळा येऊ लागल्या. तो गुरासारखा ओरडू लागला आणि दहा मिनिटांनी कोमात गेला! तेव्हापासून गेली छत्तीस वर्ष तो तसाच पडून होता हॉस्पिटल मध्ये. ना जिवंत ना मृत!!
इथे दाजीने दुसरी बिडी शांतपणे संपवली. खोल गेलेल्या डोळ्यात जमा झालेले दोन अश्रू पुसून दाजी बिडीच्या धुरात विरळ होत अंतर्धान पावला! गोदामात अंधार झाला! कॅरमच्या वरची गंजलेली गरम झालेली लॅम्प शेड थंड झाली! परत गरम व्हायला, दाजीच्या पुढच्या बोर्डच्या वेळेला….पुढल्या अमावास्येला!!!-
