गणपती गावाला गेले. स्वत:बरोबर पावसाळापण घेउन जातील अशी अपेक्षा करत निळा डगला परिधान केलेला चंदू चर्नी रोड स्थानकाच्या दोन नंबरच्या फलाटावर खांबाला टेकून सकाळ पासून बसला. समोर खोका ठेवला. सभोवताली पॉलिशच्या डब्या, बूटाच्या नाड्याचे झुपके, आत घालायचे पॅकिंग आणि विविध प्रकारचे ब्रश मांडून झाले. गेले तीन महीने पावसाने गिर्हाइक खाल्ल होत. पब्लिक प्लास्टिकची पावसाळी पायताणे वापरत होत. मग पॉलिश कोण करायला येणार? आधिच कमी मिळणारे पैसे मिळेनासे झाले होते. दरवर्षी ह्या मोसमात कानजी मारवाड्याकडून पैसे उधार घेउन गावाला पाठवायला लागत. चंदूला पावसाळा आवडत नसे…..
आज आकाश निरभ्र होत. वारा छान सुटला होता. सावळा पण नीटनेटका चंदू खुश होता. सकाळी चर्नीरोडवर न थांबता जोराने बोरिवलीकडे घाईघाईने जाणार्या अप गाड्या धुरळा उडवत जात होत्या. त्याचा बसणारा राप चंदू फडक्याने पुसत होता आणि स्टेशनवर फिरणाऱ्या लोकांच्या पायाकडे पहात होता. जरा मळका बूट दिसला की हातातली काठी खोक्यावर मारून आपल्या अस्तित्वाची त्या माणसाला जाणीव करून द्यायची हा रोजचा शिरस्ता होता त्याचा.
दहा काठ्या ठोकल्या की एखादा येत असे. पाय खोक्यावर ठेउन मोबाईल वर बोलत किंवा पेपर वाचत उभा राही. एक बूट झाला की ब्रशनेच खोक्यावर ओळखिची डबल खटखट. गिर्हाइक आपसूक पाय बदलणार. आधी क्रीम, मग पॉलिश आणि शेवटी नायलॉनच्या कपड्याने घासून बूट चकाचक. दहा रुपयांची कमाई. पुरात आईबाबा, भावंड आणि सर्वस्व हरवलेला चंदू आंध्रप्रदेश मधून मुंबईला येणार्या ट्रेन मधे दहाव्या वर्षी चढला. कुठल्याश्या स्थानकात उतरला आणि मुंबईच्या रेल्वेचाच झाला. एका चांगल्या स्टेशन मास्तरने लायसंस काढायला मदत केली आणि चंदू बूट पॉलिशवाला झाला. आज वय अठ्ठावीस. गावाला बायको आणि तीन पोर आहेत. त्यांच्यासाठी दिवसभर मरत असतो स्टेशनवर. प्रसंगी उपाशी राहून गावाला पैसे पाठवतो!
आजचा दिवस मस्त होता. चंदू खुश होता. दुपार होत आली होती. सकाळपासून दीडशे रुपयाची कमाई झाली होती. हवालादाराचा हप्ता काढून देखील शंभर उरले होते. आता ज़रा आराम. थोड़ी डुलकी काढायला देखील हरकत नाही. रगडा पाव जेऊन झाला होता. शांत बसलेल्या चंदूला घराची आठवण आली. कंगव्या बरोबर चड्डीच्या मागच्या खिशात असलेल्या पाकिटात बायको आणि पोरांचा रंगीत फोटो होता. चंदू आठवण आली की फोटो हातात धरून न्याहाळत असे. त्याने आत्तापण फोटो हातात धरला. बायकोकडे पाहून मनात गुदगुल्या झाल्या. पोर निरागस दिसत होती. “काय पण झाल तरी पोरांना शिकवायच, आपल्यासारख नाही होउ द्यायच! कितीही मेहेनत करायला लागली तरी हरकत नाही!” पोरांना पाहून चंदू हळवा व्हायचा!
चंदू फोटो न्याहाळत होता. इतक्यात फ़ास्ट ट्रेन धुरळा उडवत स्टेशनात शिरली. त्या वाऱ्याने चंदूच्या हातातला फोटो उडाला. चंदू फोटोच्या मागे धावला. ट्रेन निघून गेली आणि फोटो समोरच्या रूळावर पडला. वाऱ्याने आणखी पुढे जाऊ लागला. चंदू रुळावर उतरला. फोटोमागे पळू लागला…..समोरून येणाऱ्या ट्रेनच्या मोटरमनने जीव खाऊन हॉर्न वाजवला. चंदू त्या आवाजाने तिथेच थिजला. मोटरमनने देवाचे नाव घेउन डोळे मिटून घेतले…..
चंदुचा अनेक तुकड्यात विखुरलेला देह पोर्टर एकत्र करून स्ट्रेचर वरून नेत होते….चंदुच्या कुटुंबाचे भवितव्य त्या फोटोसारखेच अधांतरी होउन उडत होते….
पाउस परत सुरु झाला होता….लोक प्लास्टिकचे बूट घालून स्टेशनात फिरत होते..
