EGR

इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स | EGR | सोन्यातील गुंतवणुक | भावनिक की आर्थिक  

इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स | EGR | सोन्यातील गुंतवणुक | भावनिक की आर्थिक  

भारतीय घरांमध्ये सोन्याला केवळ एक धातू किंवा गुंतवणुकीचं साधन मानलं जात नाही, तर सोनं म्हणजे आपली भावनिक गरज, status symbol, स्त्री धन आणि देवाला अर्पण करण्याची वस्तू असतं. अक्षय्य तृतीयेला अर्धा ग्रॅम का होईना पण सोनं घ्यायचंच, दसरा दिवाळीत घरच्या लक्ष्मीसाठी अंगठी किंवा नथ घ्यायची, मुलीच्या जन्मापासून तिच्या लग्नासाठी थोडं थोडं करून दागिने साठवायचे, किंवा लग्नकार्यात मानपानासाठी हार, तोडे, मंगळसूत्र घ्यायचं ही टिपिकल भारतीय विचारसरणी आहे. Mandarjog.com च्या माध्यमातून आपण नेहमीच रोजच्या जगण्यातल्या आणि आर्थिक व्यवहारातल्या गोष्टी सोप्या भाषेत समजून घेत असतो. आज आपण हल्लीच launch झालेली इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स म्हणजेच EGR ही संकल्पना समजून घेऊया, आणि त्याचबरोबर सोन्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज का आहे, हेही पाहूया.

आपल्याकडे सोनं खरेदी करताना भावना एवढी वरचढ असते की अनेकदा गुंतवणुकीचा विचार मागे पडतो. दागिना घातल्यावर दिसणारा रुबाब, नातेवाईकांमधली चर्चा किंवा सणासुदीची परंपरा यामध्ये आपण गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करतो. आपल्याकडे आजही सोन्याकडे केवळ आर्थिक गुंतवणूक म्हणून बघायचा दृष्टिकोन पुरेसा विकसित झालेला नाही. दागिने म्हणजेच सोनं आणि सोनं म्हणजे दागिने हा गैरसमज आपल्या समजात अजूनही पसरलेला आहे. म्हणूनच आपल्या देशात सोनं गृहिणी, देवस्थाने ह्यांच्याकडे दागिन्यांच्या स्वरूपात जास्त आढळत. सोन्यात आपली आर्थिक पेक्षाही भावनिक गुंतवणूक जास्त असते!

मग सोन्यातील या भावनिक गुंतवणुकीचा फायदा काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने घेतला जातो.  अनेकदा काही ज्वेलर्सकडून शुद्धतेत फसवणूक झाल्याचं पाहायला मिळतं. कधी दागिन्यांवर २२ कॅरेटचा शिक्का किंवा तोंडी खात्री दिली जाते, पण प्रत्यक्षात सोनं १८ कॅरेट किंवा त्याहून कमी शुद्धतेचं निघतं. कधी वजनाच्या काट्यात किंवा खड्यांच्या, मोत्यांच्या आणि रत्नांच्या वजनाच्या नावाखाली सोन्याच्या वजनात फसवणूक केली जाते. हॉलमार्किंगचे नियम आले असले तरी जुन्या पद्धतीचे व्यवहार, ओळखीपाळखीचा विश्वास किंवा बिलातील अस्पष्टता यामुळे ग्राहकाचं नकळत नुकसान होतं.

फसवणूक होत नसेल तिथेही सोन्याच्या किमतीच्या व्यतिरिक्त अनेक खर्च होत पैसे फुकट जातात. साधारणपणे दागिने घडवताना सोनार किंवा ज्वेलर्स डिझाइननुसार वेगवेगळी मजुरी घेतात. साध्या दागिन्यांसाठी सोन्याच्या किंमतीच्या सुमारे ८ ते १२ टक्के आणि नाजूक, कलाकुसरीच्या किंवा जडाऊ दागिन्यांसाठी १२ ते २५ टक्क्यांपर्यंत किंवा त्याहूनही जास्त मजुरी आकारली जाऊ शकते. याशिवाय दागिने घडवताना, सोनं वितळवताना, घासताना किंवा आकार देताना जे सोनं वाया जातं, त्यासाठी घट म्हणजेच वेस्टेज काढलं जातं. सामान्यतः ही घट २ ते १० टक्क्यांच्या आसपास असते, आणि कलाकुसरीच्या दागिन्यात ती आणखी जास्त असू शकते. मजुरी आणि घट मिळून दागिना घेताना मूळ सोन्याच्या किमतीवर सहज १५ ते ३० टक्क्यांपर्यंतचा अतिरिक्त रक्कम मोजावी लागते. ज्यामुळे सराफ पिढ्यानपिढ्या गब्बर झाले आहेत. आणि पुढे तो दागिना विकायला किंवा बदलायला गेल्यास हे मजुरीचे फुकट गेलेल्च असतात आणि घटीचे पैसे सुद्धा बहुतेकदा परत मिळत नाहीत. याच कारणामुळे सोने म्हणजे फक्त गुंतवणुक हे मान्य करून भावना, भपका, समारंभ आणि लग्नात मिरवणे ह्यासाठी एक ग्राम किंवा फॅशन ज्वेलरी वापरून हौस भागवावी. आणि दागिन्यांवर फुकट जाणारा पैसा डिजिटल माध्यमात, गोल्ड ईटीएफमध्ये, सॉव्हरेन गोल्ड बॉण्डमध्ये किंवा थेट सोन्याच्या बिस्किटांमध्ये, कॉईन्समध्ये गुंतवावा.   

हा प्रश्न केवळ वैयक्तिक बचतीपुरता मर्यादित नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेशी आणि परकीय चलनाशीही जोडलेला आहे. भारत सोन्याची मोठी आयात करतो, आणि त्यासाठी परकीय चलन म्हणजे प्रामुख्याने डॉलर्स खर्च करावे लागतात. परकीय चलनाचा साठा सांभाळण्यासाठी आणि चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी जनतेला अनावश्यक सोने खरेदी टाळण्याचं आणि पर्यायी मार्गांचा विचार करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी मे २०२६ मध्ये आवाहन केल तेव्हा १.५० लाखांच्या जवळपास असलेला सोन्याचा दर आता साधारण १.३० लाख आहे. सोनं आयात करायचं झालं तर प्रचंड परकीय चलन लागतं, आणि त्यामुळेच आयात कमी करून किंवा पर्यायी साधनांकडे वळून अब्जावधी डॉलर्सचं परकीय चलन वाचवण्याचा प्रयत्न धोरण पातळीवर आणि आवाहनातून केला गेला आहे.

EGR

अशा पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स म्हणजेच EGR ची ओळख करून घेणं महत्त्वाचं ठरतं. EGR म्हणजे तुम्ही अधिकृत व्हॉल्टमध्ये म्हणजे तिजोरीत ठेवलेल्या प्रत्यक्ष सोन्याची एक डिजिटल पावती किंवा प्रमाणपत्र आहे. आपण जसे शेअर बाजारात शेअर्स डिमॅट खात्यात ठेवतो आणि त्यांची खरेदी विक्री करतो, तसंच EGR तुमच्या डिमॅट खात्यात राहू शकतं आणि BSE तसेच NSE च्या गोल्ड सेगमेंटमध्ये शेअर्सप्रमाणेच त्याचे व्यवहार करता येतात. या संपूर्ण व्यवस्थेवर SEBI म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या नियामक संस्थेची देखरेख असते, त्यामुळे व्यवहारात पारदर्शकता आणि सुरक्षितता राहते.

ह्यात मान्यताप्राप्त व्हॉल्ट मॅनेजरकडे शुद्ध सोनं, सामान्यतः ९९५ किंवा ९९९ शुद्धतेचं, जमा केलं जातं. व्हॉल्ट मॅनेजर त्याची पडताळणी करतो आणि त्यानंतर EGR तयार होऊन गुंतवणूकदाराच्या डिमॅट खात्यात जमा होतं. डिमॅट खात्यात EGR आल्यानंतर बाजार सुरू असताना तुम्ही ते विकू शकता किंवा इतर गुंतवणूकदारांकडून खरेदी करू शकता. व्यवहाराची सेटलमेंट सामान्यतः T+1 पद्धतीने होते, म्हणजे कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी पैसे आणि EGR खात्यात जमा होतात. गरज भासल्यास हे EGR पुन्हा प्रत्यक्ष सोन्यात, म्हणजे कॉईन्स किंवा बार्समध्ये, रूपांतरित करून व्हॉल्टमधून घेण्याची सोयही असते, पण प्रत्यक्ष सोनं ताब्यात घेताना व्हॉल्टचे चार्जेस आणि लागू असलेला ३ टक्के GST द्यावा लागतो. एक्सचेंजवर केवळ EGR ची खरेदी विक्री करताना मात्र GST लागत नाही.

EGR चे काही व्यावहारिक फायदे नक्कीच आहेत. इथे शुद्धतेची खात्री मिळते, देशभरात एक्सचेंजच्या माध्यमातून दर निश्चित होत असल्याने स्थानिक दरातला मोठा फरक टळतो, लहान प्रमाणात व्यवहार करणं शक्य होतं आणि हवं तेव्हा प्रत्यक्ष सोन्यात रूपांतरित करण्याचा पर्यायही खुला राहतो. मात्र प्रत्येक गुंतवणुकीप्रमाणे याच्या मर्यादाही समजून घ्यायला हव्यात. EGR मध्ये व्यवहार करण्यासाठी डिमॅट खातं आणि गोल्ड सेगमेंटची सुविधा देणारा ब्रोकर लागतो, जो सगळ्याच ब्रोकर्सकडे लगेच असेल असं नाही. सॉव्हरेन गोल्ड बॉण्डप्रमाणे यावर व्याज मिळत नाही, परतावा हा सोन्याच्या किमतीतील चढ उतारांवर अवलंबून असतो, आणि ब्रोकरेज, डिमॅट, व्हॉल्ट किंवा विड्रॉलचे खर्च तसेच कर नियम लागू होतात, ज्यासाठी गरजेनुसार तज्ज्ञांचा किंवा चार्टर्ड अकाउंटंटचा सल्ला घ्यावा.

शेवटी सोनं घ्यायचं की नाही, आणि घ्यायचं तर दागिने, बिस्किटं, ईटीएफ, सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड की EGR यापैकी काय निवडायचं, हा निर्णय तुमची गरज, कालावधी आणि आर्थिक उद्दिष्ट यावर अवलंबून असतो. भावना जपताना गुंतवणुकीचा हिशोबही पक्का ठेवला, तर बचत अधिक अर्थपूर्ण होते आणि भविष्यातील आर्थिक नियोजनही अधिक भक्कम होतं.

टीप: हा लेख केवळ माहिती आणि शिक्षणाच्या उद्देशाने लिहिलेला आहे, ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्ला देणारी शिफारस नाही.

आमचे whatsapp channel join करा- whatsapp.com  

हे पण वाचा- वेळ

कच्छी

बाप्पा

वारसा

गणपती – तथास्तु

गणपती – तथास्तु

कृष्ण जन्म

गणपती, उत्सव कि इव्हेंट?

आजी

अधिक माहितीसाठी हि लिंक वापरा- https://www.nseindia.in/static/products-services/about-electronic-gold-receipts

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: © Mandar Jog - All Rights Reserved