अमर अकबर अँथनी मध्ये अमिताभ, विनोद आणि ऋषी तिघांच्या हातातून रक्त ओढून घेऊन ते एकत्रितपणे रियल टाइम निरुपा रॉयच्या अंगात पाईपाच्या सहाय्याने घातलं जातं आणि पिटातले प्रेक्षक टाळ्या शिट्या वाजवतात किंवा भावुक होत डोळे पुसतात. ह्यात फक्त आणि फक्त एका माणसाचं कंव्हीक्षन होतं. पडद्यावर “अशक्य ही शक्य” करून दाखवणारा तो अवलिया म्हणजे मनमोहन देसाई!
अमिताभला द अमिताभ, अँग्री यंग मॅन बनवण्यात सलीम जावेद, यश चोप्रा आणि प्रकाश मेहरा ह्यांचा जितका वाटा आहे तितकाच वाटा मनमोहन देसाईचा आहे. अमर अकबर अँथनी, परवरीश, नसीब, कूली, देशप्रेमी, सुहाग, मर्द आणि बकवास गंगा जमुना सरस्वती पर्यंतचे सिनेमे. मनमोहन देसाई ने अमिताभ बरोबर हिट्स जास्त दिले आहेत जे अमिताभच्या करियर मध्ये माईलस्टोन ठरले.
राज कपूरच्या छलिया पासून धर्मेंन्द्र बरोबर चाचा भतीजा, धरम वीर तसेच शम्मी बरोबर ब्लफ मास्टर आणि बदतमीज (पुढे शम्मी त्याचा व्याही झाला), काका बरोबर रोटी, शशी बरोबर आ गले लाग जा, रणधीर बरोबर रामपूर का लक्ष्मण वगैरे सिनेमे करणारा मनमोहन देसाई अमिताभला भेटल्यावर त्याच्या प्रेमात होता! त्याच्या सिनेमातील गाणी अजरामर वगैरे झाली नसतील पण त्याला गाण्याचा कान नक्की होता. त्याचा कोणताही सिनेमा घ्या. किमान दोन तीन गाणी हिट झालेली आहेत.
प्रचंड ताकदीचे स्टोरी टेलिंग स्किल ही त्याची ताकद होती. त्यामुळेच लॉजिक वगैरे बाजूला सारून तो पडद्यावर दाखवत असलेल्या अतर्क्य आणि अशक्य गोष्टी आम्ही प्रेक्षक आजही त्याच्या सिनेमात भक्तिभावाने बघतो! त्याने निर्माण केलेली फिल्म मेकिंगची स्टाईल मनमोहन देसाई स्टाईल म्हणून आजही ओळखली जाते. लॅमिंगटन रोडवरून मिनर्व्हच्या दिशेने निघालं की अप्सराच्या समोर एक बाग किंवा मैदान सदृश जागा होती. तिथे हा आमचा गिरगावकर अवलिया, लोकल पोरांबरोबर क्रिकेट खेळताना अनेकदा दिसायचा.
आपले पैसे आणि वेळ खर्ची घालून सिनेमा बघायला आलेल्या प्रेक्षकांना पैसा वसूल अनुभव देणे हेच कमर्शियल सिनेमाचं आद्य कर्तव्य आहे ह्याची जाण ठेऊन आपल्या प्रेक्षकांना मनमुराद रिझवणारा निर्माता दिग्दर्शक म्हणून मनमोहन देसाई ओळखला जायचा. अमिताभ असला तरी लोक “मनमोहन देसाईचा” सिनेमा आहे म्हणून आवर्जून बघायला जात.
एक दिवस अचानक बातमी आली की मनमोहन देसाई गेला! कसा गेला? तर तो त्याच्या सिनेमात लॉजिक बाजूला सारून मॅजिक दाखवायचा त्याच पद्धतीने. काय तर म्हणे तो घराच्या ग्यालरीत उभा होता आणि तिथून पडून त्याचा मृत्यू झाला. कोणी आत्महत्येची शक्यता दबक्या आवाजात बोलून दाखवली. पण लॉजिक काहीच चाललं नाही. तो गेला हेच दुःखद मॅजिक त्याच्या प्रेक्षकांनी स्वीकारलं!
तुफान आणि गंगा जमुना सरस्वती पाहून काही प्रेक्षकांनी अमिताभ आणि मनमोहन दोघांनाही मोडीत काढून ते संपले असं जाहीर करून टाकलं होतं. अर्थात दोन्ही सिनेमे अत्यंत बकवास होते. पण अमिताभ ने त्याची जादू कायम ठेवत आज तागायत अत्यंत यशस्वी अशी सेकंड इनिंग सुरू ठेवली आहे. मनमोहन तर जादू म्हणजे मॅजिकचा एक्स्पर्ट होता. काही वर्षांपूर्वी डेव्हिड धवन जे करायचा किंवा आज रोहित शेट्टी जे करतोय ते मनमोहन देसाई चाळीस वर्षांपूर्वी करायचा. तो असता तर कदाचित आज त्याने रोहितला स्पर्धा दिली असती जशी स्पर्धा अमिताभ नटांच्या तीन पिढ्यांना अजून देतोय!
कालच्या दिवशी म्हणजे १ मार्च १९९४ साली वयाच्या अवघ्या सत्तावन्नव्या वर्षी मनमोहन देसाईचं अपघाती निधन झालं. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आम्हा समस्त मनमोहन देसाई स्कुल ऑफ फिल्म मेकिंगच्या फॅन्स कडून मनमोहन देसाई ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या सिनेमातून ते आजही आम्हाला देत असलेल्या अपरिमित आनंदासाठी मनःपूर्वक धन्यवाद! – ©मंदार जोग
