मलायका अरोरा
मलायका अरोरा
दिल से मधील छय्या छय्या गाणं बघायच्या आधी तिचं नावही ऐकलं नव्हतं. पण छय्या छय्या गाण्यात तिच्या ठुमक्यांनी शाहरुखच्या एनर्जीला देखील झाकोळून टाकलं. त्याचे उडणारे केस बघायच्या ऐवजी त्याचे फॅन्स तिची थरथरणारी कंबर बघून उसासे सोडत होते. जरा शोधाशोध केल्यावर ती सलमान खानची वहिनी असल्याचा शोध लागला. म्हणजे त्याच्या मख्ख चेहऱ्याच्या मठ्ठ भावाची बायको. मख्ख चेहऱ्याचे तर त्याचे दोन्ही भाऊ आहेत. त्या दोघांपेक्षा बोलका चेहरा लेखक असलेल्या त्याच्या हुशार आणि मिश्किल वडिलांचा आहे. असो. विषयांतर नको. रोहित शर्माचा माजी साडू तिचा नवरा नसून, सलमानचा उतारवयात बाप होण्याचे(च) कर्तृत्व असलेला दुसरा भाऊ तिचा माजी नवरा आहे, हे कळलं. बरं!
नव्वदीच्या दशकात हिरॉईन स्वतःच सिनेमात आयटम साँग करू लागल्या होत्या. चोली के पीछे, धक धक, एक दो तीन, तू चीज बडी है मस्त, हवा हवाई, काटे नहीं कटते है वगैरे गाणी त्याची उदाहरणं ठरतील. पण मलायकाने आयटम गर्ल म्हणून स्वतःचं स्थान, ओळख आणि मागणी निर्माण केली. तिच्या सावत्र सासूबाईंनी तीसेक वर्षांपूर्वी सेट केलेला ट्रेंड तिने परत निर्माण केला.
पुढे अनेक सिनेमांत ती अनेक आयटम साँग करताना आढळली. काल सिनेमाचं टायटल साँग, कांटे मधलं माही वे, मुन्नी बदनाम, होंट रसिले, अनारकली डिस्को चली, सलमानबरोबर पांडे जी सिटीपासून आयुष्मान खुराणाबरोबर आप जैसा कोईमध्ये ती थिरकली. बाकी अनेक जाहिराती, टीव्ही शोची होस्ट, परीक्षक म्हणून ती सतत दिसत राहिली.
मध्ये कधीतरी तिचा घटस्फोट झाला. तशीही तिची आणि मठ्ठ अरबाझची जोडी विजोड वाटते, असं पब्लिक म्हणतच होतं. असो. तिला नक्की भरपूर पैसे मिळाले असणार सेटलमेंट म्हणून, and why not. स्त्री म्हणून तो तिचा हक्कच होता, इतर कोणत्याही स्त्रीसारखा. पण त्यानंतर मात्र तिचा एकूण वावर पिंजऱ्यातून सुटका झालेल्या पक्ष्यासारखा वाटतो मला. त्यालाही आता आठ-दहा वर्षं झाली असतील. अरबाझने पुढे आपल्या अर्ध्या वयाच्या बाईबरोबर परत संसार मांडला आहे. गेल्याच वर्षी तो बाबा पण झालाय. असो बापडा. तर मलायकाने ह्याच काळात लोकप्रिय झालेल्या सोशल मीडियाचा परफेक्ट वापर केला आणि ती सतत लोकांच्या नजरेत राहिली. ह्याच सोशल मीडियाच्या व्हिडीओ, रील आणि फोटोवर गुजराण करणारी एक पापराझी नामक ओंगळ जमात गेल्या काही वर्षांत उदयाला आली आणि त्यांना भरपेट रस्सा ओरपू देणारी अमर्याद थाळी म्हणून मलायका त्यांची लाडकी झाली!
मलायका कुठे राहते, कधी बाहेर पडते, तिच्या गाडीचा मेक आणि नंबर, तिचा कुत्रा, तो काय खातो, किती वाजता किती वेळा आणि किती ग्रॅम शी करतो, मलायका जिमला कुठे आणि कधी जाते, ती एअरपोर्टवर कधी जाते, ती पार्टी कधी करते, ती टाइट झाल्यावर कशी दिसते, तिचा मुलगा, तो कुठे आहे, कसा आहे, तो परदेशात कधी गेला, हे सर्व त्या पापराझींनी जगाला दाखवलं आणि मलायकाने देखील कोणताही आडपडदा न ठेवता ते सर्व त्यांना पुरवलं. तिने वैयक्तिक आयुष्य इतकं चव्हाट्यावर मांडलं की हॉटस्टारला तिच्या आयुष्यावर वेब सिरीज करावी वाटली आणि ती सिरीज सुपरहिट पण झाली! प्रसिद्धीशी संबंध नसलेले, वेगळ्या आडनावाचे तिचे वडील गेले तेव्हाही माध्यमांनी त्यांच्या इमारतीबाहेर वेढा घातला होता. ते सख्खे की सावत्र, अशा चर्चा रंगल्या होत्या! कदाचित खऱ्या आयुष्यात आलेला एकाकीपणा ती लोकांना आपल्या आयुष्यात आणून भरून काढत असेल! पण त्यासाठी खरं तर जान्हवी कपूरचा सावत्र भाऊ होता… की अजूनही आहे (?) तिच्या आयुष्यात. जे असेल ते. तिने कधीच ते लपवायचा फार प्रयत्न केला नाही. जे आहे ते मीडिया आणि जनतेसमोर खुल्लमखुल्ला ठेवलं. कदाचित ती प्रसिद्धीचा झोत सतत आपल्याकडे ठेवायची तिची स्ट्रॅटेजी असेल. So be it. त्यालाही हिंमत लागते.
आज तिचा वाढदिवस. चक्क त्रेपन्न वर्षांची झाली आहे मलायका. हो, त्रेपन्न! तिची फिगर, तिची एनर्जी, तिचा नाच, तिचे ठुमके, तिचं रूप बघून अजिबात विश्वास बसत नसला तरी तिने वयाची हाफ सेंच्युरी पार केलेली आहे, हेच सत्य आहे. आणि तरीही ती आजही तिच्या अर्ध्या वयाहून काही वर्षं जास्त असलेल्या तितक्याच रसरशीत नोरा फतेहीला रन फॉर मनी देऊ शकते आहे. तिला पुरेपूर कल्पना आहे की ती काम करत असलेल्या ग्लॅमरच्या बाजारात तिचं शरीर हेच तिचं रॉ मटेरियल आणि फिनिश्ड प्रॉडक्टसुद्धा आहे. आणि म्हणूनच त्याची व्यवस्थित आणि परिपूर्ण काळजी घेऊन ते मेंटेन ठेवण्यात ती जराही कसूर करत नाही. मग डाएट असो, योग असो, व्यायाम असो. मलायका ते नक्की नियमित करत असते आणि त्याचंही जगाला दर्शन देत असते.
ती नटी आहे. ती आयटम गाणी करते, क्लीव्हेज दाखवणारे कपडे घालते, तिच्या बिग बट चालण्याला काही लोक डक वॉकदेखील म्हणतात, ती बिनधास्त आहे, तिचं अफेअर आहे, ती डिव्होर्सी आहे. पण थोड्याफार फरकाने तशा अनेक नट्या आहेत आणि होत्या. पण मलायकाला आपण एक स्वतंत्र, स्वावलंबी, “लोक काय म्हणतील?” ह्या बहुतांश महिलांना सतावणाऱ्या आणि अनेकदा त्यांच्या प्रगतीत खो घालून त्यांना मागे ओढणाऱ्या प्रश्नाला फाट्यावर मारून जगणारी एक लढवय्यी स्त्री म्हणूनदेखील बघावं, असं मला वाटतं. बाकी तिची फिगर, तिची चाल, तिचे ओठ, तिच्या अदा, तिचे केस आणि किंचित वर असलेले दातही लोकप्रिय आणि प्रेक्षणीय झालेले आहेत. प्रेक्षकांनी ते सर्व अवश्य बघावं. कारण ती आनंदाने दाखवते आहे. तुम्ही नाही पाहिलं तरी बाकी करोडो लोक ते बघून आनंद घेत आहेत. तिने द्यावं, आपण घ्यावं. तिने त्या बदल्यात पैसे कमवावेत, आपण आनंद कमवावा, इतका साधा हिशेब आहे तो. तिचंच एक गाणं आहे. बोल आहेत, “मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये”. मला ना, हे गाणं मलायका आरशात बघत स्वतःसाठी म्हणत असेल, असं वाटतं. फक्त बदनामच्या जागी बिनधास्त म्हणत असेल. स्वतःच्या पायावर उभी राहून, स्वतःच्या टर्म्सवर आयुष्य जगायला स्वतःसाठीच बिनधास्त झालेली मलायका! बिनधास्त मलायकाला त्रेपन्नाव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
© मंदार जोग
हे पण वाचा –
सिनेमा जगताशी संबंधित आणखी लेख – फिल्लमबाजी
लघुकथा – लघुकथा
दीर्घकथा – दीर्घ कथा
कादंबरी- ट्वेंटी थ्री – ट्वेंटी थ्री
कादंबरी- सख्या रे- सख्या रे …
आमचे whatsapp channel join करा- whatsapp.com
आम्हाला फेसबुकवर फॉलो करा- https://www.facebook.com/mandar.jog.31
