मराठी दीर्घ कथा | मराठी सूड कथा | राजकारण कथा

खोल खोल पाणी | भाग 5 | मराठी गूढ कथा

खोल खोल पाणी | भाग 5 | मराठी गूढ कथा

अपुच्या लग्नाला आता चार दिवस झाले होते. ह्या चार दिवसात राहुल तिच्यापासून लांबच राहिला होता. तिने जवळ जायचा प्रयत्न केल्यावर स्ट्रेस आहे हे कारण काढून कुशीवर वळून झोपत होता. हे कोणाला सांगायचं हे अपुला कळत नव्हत. अंजू ने सात आठ वेळा फोन केला होता भेटायचं आहे म्हणून. पण अपु भेटू शकली नव्हती. शेवटी आज तिने अंजूला भेटायचा निर्णय घेतला. वडेश्वरला भेट ठरली. लंच भेट.

अपु वेळेआधी पाच मिनिट वडेश्वरला पोहोचली. आपलं नाव नोंदवून बाहेर अंजूची वाट पाहू लागली. इतक्यात तिथेच आधीपासून कोणाचीतरी वाट बघत असलेला एक तरुण फोनवर बोलू लागला. बोलताना “एक मिनिट पेन बघतो” अस म्हणून तो अपु जवळ आला आणि त्याने विचारलं-

तरुण- एक्स्क्यूज मी. पेन आहे का प्लीज?

अपुने पर्स मधून पेन काढून दिल. त्याने फोन खांदा आणि कानाच्या मध्ये धरत डाव्या हातावर पेनाने काहीतरी पत्ता लिहून घेतला आणि पेन अपुला परत करत तिचे आभार मानले.

तरुण- thanks.

अपु- its all right.

तरुण- technology कितीही आधुनिक असली तरी आजही पेनाला आणि लिहिण्याला पर्याय नाहीये.

अपु- हम्म…

तरुण- आपण भेटलोय का आधी?

अपु- (हि नेहमीची ट्रिक आहे हे लक्षात येऊन) नाही.

तरुण- मला अस का वाटतंय पण? Let me recollect. ह्म्म्म…ओह येस…तू राहुल कुलकर्णीची बायको ना? Of course. आपण लग्नात भेटलोय तुमच्या.

अपु- ओह…ओके…तुम्ही राहुल ला ओळखता?

तरुण- हो. माझा चांगल मित्र आहे राहुल. त्याला माझ्याइतका कोणीच ओळखत नाही.

अपु- अरे वा. काय नाव आहे राहुलच्या इतक्या खास मित्राच?

तरुण- नंदन…तू अपर्णा right?

अपु- yes…

नंदन ने त्याच कार्ड अपुला दिल आणि म्हणाला-

नंदन- मी खरच राहुलला खूप जवळून ओळखतो. त्याच्या गुण दोषांसकट (हे बोलताना नंदन तिच्या डोळ्यात बघत होता) भेटू कधीतरी. माझा नंबर आहे त्या कार्ड वर. Call me anytime.

हे बोलून नंदन निघून गेला. अपु तो गेला त्या दिशेला बघत होती. समोरच्या फुटपाथवर उभा असलेल्या माधवरावांच्या माणसाने फोन लावला-

माणूस- साहेब तो पोरगा वडेश्वरच्या बाहेर तुमच्या सून बाईशी बोलत होता. रघु आहे त्याच्या मागावर. आज उडवायचा का त्याला?

हे ऐकून माधवरावांच्या डोळ्यात अचानक चमक आली.

माधवराव- नको. त्याला इतक्यात नको उडवुया. पाठलाग बंद करा त्याचा. मी बघतो काय करायचं ते.

माधवरावांनी फोन कट केला आणि ते वेगळाच विचार करू लागले. तेवढ्यात त्यांना सचिवालयातून फोन आला. पक्षाच्या अध्यक्षांनी उद्या त्यांना भेटायला बोलावलं होत. उद्या मुंबईला जाव लागणार होत. माधवराव विचार करू लागले.

इथे वडेश्वर मध्ये अंजू बरोबर दर्शन पण आला होता अपुला भेटायला.

अपु- मी त्या माणसाला खरच ओळखत नाही. तो income tax….(अपु ला माधवरावांची खांद्यावरची ग्रीप आठवली) तो…तो आमच्या शेतात काम करायचा…

अंजू- तू त्याला दिलंस त्या पुडक्यात काय होत?

अपु- मला नाही माहित. मला राहुलच्या आईने ते पुडक त्या माणसाला द्यायला सांगितल आणि मी दिल.

दर्शन – त्यात नक्की पैसे असणार. पण तो राहुलच्या आईला black mail करत असेल?

अपु- मुळात तो राहुलच्या आईलाच black mail करत होता हे कशावरून म्हणू शकतो आपण? कदाचित तो दुसर्या एखाद्याला black mail करत असेल आणि आमच्याकडून जे पैसे घेतले ते कामाचे असतील.

अंजू- हे बघ आपण कोर्टात नाही आहोत प्रत्येक गोष्टीचा पुरावा सदर करायला. तुमच्या शेतात काम करणारा माणूस पुण्यात येतो. कोणाला तरी black mail करतो. मग कामाचे पैसे तुमच्या ऑफिसात येऊन न घेता त्याने black mail करताना जी जागा फोनवर सांगितली होती तिथे घेतो. ते पण कुलकर्ण्यांच्या नव्या सुनेच्या हातून. Come on. तुमच्या घरात काहीतरी प्रोब्लेम आहे. अपु तो माणूस मेलाय. खून झालाय त्याचा.

अपु- तुला काय म्हणायचं आहे की तो खून मी केलाय?

दर्शन- नाही. दीदी आम्हाला अस काहीच म्हणायचं नाहीये.

अपु- मग हे सर्व मला का सांगताय?

दर्शन- अंजू मी प्रेस मध्ये जातो. मला लेट होतोय. तू ये तुमच बोलून झालं की.

दर्शन गेला. आता दोघी बहिणी उरल्या.

अंजू- अपु ऐक माझ. काहीतरी सॉलिड लोचा आहे तुमच्या घरात.

अपु- असेल. मी काय करू सांग.

अंजू- तू काय करणार? फक्त सावध रहा. फसवणूक व्हायला नको.

अपु- (स्वतःच्या विचारात) फसवणूक तर झालेली आहेच…

अंजू- काय म्हणालीस? काय फसवणूक झाल्येय?

अपु- (सावरून घेत) हीच. म्हणजे त्या माणसाच्या बाबतीत तू म्हणतेस तस काही आमच्या घराशी रिलेटेड असेल तर ती आपली फसवणूक नाहीये का?

अंजू- हो. (मग तिच्या हातावर हात ठेऊन) हे बघ. तू घाबरू नको. काहीही गरज लागली तर मला फोन कर ओके?

अपु- ओके. हा दर्शन आवडतो का तुला?

ह्या अनपेक्षित प्रश्नाने अंजू जरा हडबडली.

अंजू- what?

अपु- तो दर्शन तुला आवडतो का?

अंजू- आम्ही फ्रेंड्स आहोत. बाकी काही नाहीये.

अपु- नक्की?

अंजू- of course. चल निघूया. मला प्रेस मध्ये जायचंय.

अपु- (हसत) दर्शन वाट बघत असेल ना?

अंजू- चला.

दोघी निघाल्या. अपु रिक्षातून घरी निघाली. तिला माधवरावांचा फोन आला.

अपु- हेलो…

माधव- कुठे आहेस?

अपु- fc रोडला आहे. घरी निघाले आहे.

माधवराव- एक काम कर, जरा ऑफिसला ये.

अपु- बर…

तिने फोन कट केला आणी विचार करू लागली की माधवरावांनी तिला ऑफिसला का बोलावली असेल. हा विचार सुरु असतानाच तिची रिक्षा ऑफिसच्या दारात थांबली. ती उतरून माधवरावांच्या केबिन मध्ये गेली.

माधवराव- ये ना आत ये.

अपु त्या प्रशस्त केबिनच्या आत आली. केबिन खूप छान सजवलेली होती. माधवराव अजस्त्र टेबलच्या एका बाजूला गुबगुबीत खुर्चीत बसलेले होते. अपु पुढे येऊन त्यांच्या समोर बसली.

माधवराव- काय म्हणताय सुनबाई. बरेच प्रश्न असतील ना डोक्यात.

अपु काहीच बोलली नाही. मान खाली घालून तशीच बसून राहिली. माधवराव बोलू लागले.

माधवराव- इतका मोठा व्यवसाय. मी माझ्या हातांनी मोठा केला.. वाढवला. अजूनही वाढवतो आहे. मग ते करताना काही वेळा अयोग्य, अप्रिय आणि काही वेळा अनैतिक गोष्टी देखील कराव्या लागतात. हे सगळ्याच धंद्यात होत थोड्या बहुत फरकाने. धंदेवाईक कोणीच धुतल्या तांदळाचा नसतो.

अपु आता त्यांच्याकडे बघत त्यांच बोलणं ऐकत होती. माधवरावांचे शार्प नाक, भेदक आणि जरब असलेले घारे डोळे, खणखणीत आवाज, एकेकाळी कमावलेल आणि अजूनही निरोगी असलेल शरीर ह्यामुळे त्यांची कोणावरही सहज छाप पडत असे. वय दाखवणारे काही पांढरे केस वगळता माधवराव आजही अनेक तरुणांना लाजवतील इतके राजबिंडे दिसत. आणि मुळात लग्न आणि मुल लवकर झाल्यामुळे त्यांच वय देखील पन्नाशीच्या आतबाहेरच होत. माधवराव बोलत होते-

माधवराव- हा सगळा पसारा पुढे राहुल आणि तुला सांभाळायचा आहे. आणि ती वेळ लवकरच येणार आहे. मी यंदा निवडणूक लढवणार आहे आमदारकीची. आमदार झालो की आज धंद्यावर जितक लक्ष आहे तितक देता येणार नाही. वेळ कमी आहे. त्यामुळे तुला लवकर तयार करायची आहे मला. म्हणूनच मी तुला राहुलसाठी शोधली आणि पसंत केली.

हे ऐकून अपु आश्चर्याने त्यांच्याकडे बघू लागली. माधवराव एक सिगारेट शिलगावून खुर्चीतून उठले. टेबलाला वळसा घालून अपु बसली होती त्या बाजूला आले. आता टेबलाला रेलून तिच्या शेजारी उभे राहून बोलू लागले-

माधवराव- हो…हे खर आहे. हे बघ राहुल माझा मुलगा आहे. हुशार आहे, थोडाफार धंदा बघतो देखील आहे. पण त्याचे दोन प्रोब्लेम आहेत. पहिला म्हणजे त्याच्याकडे निर्णय क्षमता शून्य आहे. आणि दुसरा….

माधव रावांनी pause घेऊन सिगारेटचा एक सखोल दम मारला. अपु बघत होती. माधवराव तिच्या डोळ्यात डोळे भिडवून म्हणाले-

माधवराव- दुसरा प्रॉब्लेम जो तुला गेल्या काही दिवसात…विशेषता: रात्री लक्षात आलाच असेल.

हे ऐकून अपु हादरली. आपली घोर फसवणूक झाली आहे ह्या जाणीवेने उभी रहायला गेली तर माधवरावांचा हात तिच्या खांद्यावर पडला. त्या वजनाने ती उठू शकली नाही. ती तशीच बसून राहिली.

माधवराव- मी सांगतोय ते शांतपणे ऐकून घे. हे बघ तू शिकलेली आहेस, हुशार आहेस, सुंदर आहेस, नोकरी करत होतीस. पण नोकरी करून तुला आमच्या बिझनेस मध्ये पार्टनर झाल्यावर जितके पैसे मिळतील तितके कधीच मिळाले नसते. जितकी power मिळेल तितकी कधीच मिळाली नसती. मी देखील राहुल साठी एखादी सामान्य मुलगी आणली असती तर कदाचित तिने संसार उत्तम केला असता. राहुल जसा आहे तसा त्याला  स्वीकार करून तशीच राहिली असती किंवा ते कळल्यावर डिव्होर्स देऊन निघून गेली असती. म्हणून तर मी तुझी निवड केली.

अपु- म्हणजे?

माधवराव- म्हणजे तू हुशार आहेस. स्मार्ट आहेस. आयुष्यात भावनिक होऊन चुकीचे निर्णय घेणार नाहीस ह्याची खात्री आहे मला. तूच माझा धंदा सांभाळशील आणि तुला मी सांभाळेन. ह्या माधवरावाकडे तितकी ताकद आहे अजून?

अपुला काही लक्षात यायच्या आधी आधीच माधवरावांनी आपले दोन्ही हात अपुच्या खांद्यावर ठेऊन तिचे खांदे दाबले. तिच्या अंगातून एक शिरशिरी गेली.

माधवराव- एक लक्षात घे. माझी ऑफर घेतलीस तर आयुष्यात यशस्वी होशील. सुखात राहशील. नाही स्वीकारलीस तर राहुलची बायको म्हणून राहशील पण कधीच सुखी होणार नाहीस आणि राहुलला सोडून जायचा विचार केलास तर डिव्होर्सी म्हणून जगाव लागेल आणि त्या आयुष्यात फार आनंद नसेल. विचार कर आणि निर्णय घे. माझी ऑफर मंजूर असेल तर उद्या सकाळी आपल्याला मुंबईला जायचं आहे. सकाळी सहाला तयार रहा.

इतकं बोलून माधवराव केबिन मधून निघून गेले. अपर्णाच्या डोक्यात विचारांचं वादळ सुरु झालं होत. ती तशीच उठून घरी निघाली.

प्रेस मध्ये अंजू आणि दर्शन नरपतच्या मृत्यूचा पोलीस रेकॉर्ड बघत होते. विचार करत होते.

अंजू- ह्या नरपतला मारलं त्यामागे नक्की black mailing आहे.

दर्शन- असेल. पण मग त्याच्याकडे पैसे कसे नाही मिळाले? कि त्याला मारणार्याने त्याचे पैसे चोरायला त्याला मारला असेल?

अंजू- कसं कळणार? त्याला मारणारा सापडला तरच कळेल ना मोटिव्ह. आणि जर तो back mailing असेल तर we have a big news.

दर्शन- हो यार. पण त्या खुन्याला कोणीच पाहिलं नाहीये ना. गाडी थांबली तेव्हा सगळे खाली उतरले होते चहा घ्यायला.

अंजू- (काहीतरी आठवून) ए दर्शन, त्या हॉटेलच्या बाहेर CC tv कॅमेरा असेल तर?

दर्शन- तर पोलिसांनी ते फुटेज कधीच घेतलं असेल.

अंजू- असेल ना. आपण पण ते मिळवून आपल्या पद्धतीने शोध घेऊया. News आपल्याला हवी आहे. पोलिसांना नाही.

दर्शन- ओके. उद्या सकाळी निघूया.

अंजू- done.

दुसर्या दिवशी सकाळी माधवराव गाडीत बसले होते. आज ते स्वतः ड्राईव्ह करणार होते. बरोब्बर सहाला अपु येऊन गाडीत त्यांच्या शेजारी बसली. तिच्या गोडट परफ्युमचा वास गाडीभर पसरला. तिच्या हातातल्या बांगड्यांची किणकिण माधवरावांच्या कानात भरून राहिली. त्यांनी अपुकडे एकदा पाहिलं.

अपु- चला. माझा निर्णय झालाय. आता बघायचं आहे की नियती अजून काय काय निर्णय घ्यायला लावते.

माधवरावांनी गाडी सुरु केली. गाडी एक्स्प्रेसवे ला लागेपर्यंत दोघे काहीच बोलले नाहीत. गाडी एक्स्प्रेसवे ला लागल्यावर माधवराव म्हणाले-

माधवराव- त्या ग्लोव्ह बॉक्स मधून नीळ एन्व्हलप बाहेर काढ. त्यात तुझ्यासाठी काम आहे.

अपुने निळा लिफाफा बाहेर काढला.

माधवराव- उघड.

तिने लिफाफा उघडून त्यातून एक फोटो बाहेर काढला.

माधवराव- तुला ह्याला संपवायचं आहे.

अपु फोटो बघून हादरली होते. तिला कशाचाच काहीच बोध होत नव्हता. ती एका वेगळ्याच अंधारात खेचली जात होती. नियती प्रारब्ध नामक खोल खोल विहिरीच्या थंड तळाशी बसून अपुला खाली येताना बघून हसत होती.

क्रमश:

©मंदार जोग

मागील भागाची लिंक- खोल खोल पाणी | भाग 4 | मराठी सस्पेन्स कथा

सर्व भागांची लिंक- खोल खोल पाणी | सर्व भागांची लिंक |

आमचे whatsapp channel join करा- whatsapp.com  

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा- https://www.facebook.com/mandar.jog.31

कादंबरी- ट्वेंटी थ्री

कादंबरी- सख्या रे….

हे पण वाचा- वेळ

कच्छी

बाप्पा

वारसा

गणपती – तथास्तु

गणपती – तथास्तु

कृष्ण जन्म

गणपती, उत्सव कि इव्हेंट?

आजी

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: © Mandar Jog - All Rights Reserved