खोल खोल पाणी | भाग 2 | मराठी सूड कथा
खोल खोल पाणी | भाग 2 | मराठी सूड कथा
दुसऱ्या दिवशी आपल्या लहानशा घरातील सामान्य रुटीनची सवय असलेल्या अपर्णाला मांडववाल्या कुलकर्ण्यांच्या घरातील वेग आणि लगबग पाहून अवघडल्यासारखं झालं. ती लिव्हिंग रूममध्ये आली तेव्हा माधवराव फोनवर बिझी होते. मंजिरी ताईंकडे गेस्ट आले होते. राहुल आजच्या ऑर्डरसाठी कार्यालयात गेला होता. अपर्णाला नोकराने ब्रेकफास्ट वाढला. इथे ब्रेकफास्टला जितके पदार्थ होते तितके पदार्थ तिच्या माहेरी आठवड्याच्या जेवणालाही बनत नसत. तिने एकटीने शांतपणे ब्रेकफास्ट केला. मंजिरी ताईंचे गेस्ट तेवढ्यात गेले. त्या अपर्णासमोर येऊन बसल्या.
मंजिरी- काय म्हणतेस? झोप लागली ना नीट?
अपर्णा- हो आई.
मंजिरी- राहुल आजच्या ऑर्डरसाठी गेलाय. आज मला वाटतं सहा ऑर्डर्स आहेत. म्हणजे त्याला यायला संध्याकाळ होणार. तू काय करणार आज? ऑफिसला रजा घेतली असशील ना?
अपर्णा- हो…
मंजिरी- मग येतेस माझ्याबरोबर? आमच्या संस्थेचं एक प्रदर्शन आहे. तुला संस्था समजेल, काही पदाधिकारी महिलांशी ओळख होईल. पुढे तुलाच सांभाळायची आहे ना संस्था.
हे ऐकून अपर्णाने चमकून त्यांच्याकडे पाहिलं. त्या त्यांच्या मोबाईलमध्ये आलेले प्रदर्शनाच्या स्टॉलचे फोटो बघत होत्या. अपर्णाला चॉइस नव्हता. ती तयार झाली. बाहेर जाताना देखील मांडववाल्या कुलकर्ण्यांची नवी कोरी सून म्हणून हेवी साडी नेसून, भरपूर दागिने अंगावर घालून तिला जावं लागलं.
अंजू ज्या वृत्तपत्रात काम करायची त्याचा खप फार नव्हता. कारण मुळात मालकाचे राजकारणी लोकांशी संबंध कमी होते. ते ब्रेकिंग न्यूज म्हणून छापत असलेल्या बातम्या आदल्या दिवशी टीव्हीवर येत असल्याने लोकांसाठी शिळ्या असायच्या. स्वतःला कितीही निर्भीड म्हणवलं तरी त्यांच्या दृष्टीने निर्भीड असलेल्या बातम्या वाचकांच्या दृष्टीने फुटकळ होत्या. त्या वृत्तपत्राचे मालक दिलीप लिमये ओळखीच्या, वर्षानुवर्षं बांधलेल्या जाहिरातदारांच्या उपकार खात्यातील जाहिराती आणून तर कधी स्वतःच्या खिशाला चाट लावून वृत्तपत्र चालवत होते. त्यांचा मुलगा दर्शन अंजूबरोबर जर्नलिझम शिकत होता. त्याच्या ओळखीतूनच अंजू इथे काम करू लागली होती. अंजू आणि दर्शन एकत्र लपूनछपून सिगारेट फुकायचे, एक बियर दोघांत शेअर करून प्यायचे. दर्शनला वडील ज्या पद्धतीने पेपर चालवतात ते अजिबात आवडत नव्हतं. त्याला जगाला न मिळणाऱ्या बातम्या आपल्या पेपरात हेडलाइन म्हणून छापायची इच्छा होती. पण दिलीप लिमयांचे पारंपरिक पत्रकारितेचे विचार त्याला दाबून ठेवतात असं त्याला वाटत होतं. तो आपलं हे फ्रस्ट्रेशन अंजूला नेहमी बोलून दाखवत असे.
आजदेखील दर्शन आणि अंजू बातमीच्या शोधात भटकत होते. ऊन डोक्यावर आलं होतं. साधी उंदीर मेल्याची बातमी पण हाती लागली नव्हती. अंजू वैतागून म्हणाली-
अंजू- ए दर्शन चल ना एक बियर मारू.
दर्शन- गप ए. तुला आता व्यसन लागायला लागलंय. गेल्या महिन्यातच बियर प्यायलो ना आपण?
अंजू- तू येतोस की मी एकटी जाऊ?
दर्शन- कुठे?
अंजूने समोर दिसत असलेल्या टपरीवजा पत्र्याच्या एका शेडकडे बोट दाखवलं. त्यावर बोर्ड होता “अंजली बियर शॉपी”
दर्शन- तू कधी काढलंस बियरचं दुकान? आयला हीच ब्रेकिंग न्यूज टाकूया. पांढरपेश्या ब्राह्मण घरातील तरुणीचा यल्गार. दुकानात बियर थंडगार.
अंजू त्याला “चुत्यागिरी पुरे” अशा नजरेने बघत म्हणाली-
अंजू- झालं?
दर्शन- हो.
अंजू- मग चला. घसा सुकला आहे माझा.
दोघे दुकानात गेले. थंड बियरची बाटली घेऊन टपरीच्या मागे उभे राहिले.
दर्शन- यार अंजू काहीतरी सनसनाटी पाहिजे यार.
अंजू- सध्या ही बियर घे. स्ट्राँग आणि सनसनाटी आहे.
दोघे बियर पीत असताना त्यांना एका माणसाचा आवाज आला.
माणूस- एक लाखाने काय होणार साहेब. आता ना हे तोंड इतकं मोठं होतंय ना की एक लाखाने शिवलं जात नाही….
हे ऐकून अलर्ट झालेले अंजू आणि दर्शन हळूच वाकून बघू लागले. एक चाळीस-पंचेचाळीस वर्षांचा केस अस्ताव्यस्त वाढलेला, खादीचा झब्बा आणि जीन्स घातलेला माणूस बियर पीत बाकड्यावर बसून फोनवर बोलत होता. हे दोघे ऐकू लागले.
माणूस- साहेब पाच लाख पायजे ह्या खेपेला. परत नाही येणार सहा महिने तरी….. हो साहेब मला माझी औकाद माहिती आहेच. पण तुमची पोजिशन पण माहितीये ना….. आता तुमच्या लाख रुपयांनी माझं तोंड पूर्ण बंद नाही झालं आणि चुकून कुठे उघडलं तर…… धमकी नाही साहेब व्यवहार आहे हा… तुमचा पार्टनर आहे मी शेवटी….. काय?
माणूस हातातल्या विडीचा कश मारून खोकला येईपर्यंत हसला. मग डोळ्यात खोकून आलेलं पाणी पुसत म्हणाला-
माणूस- कुठे? तुळशी बागेत? ..बरं… कावरे कोल्ड्रिंकच्या बाहेर? पाच वाजता? ठीक आहे. येतो मी….
त्याने फोन ठेवला आणि म्हणाला-
माणूस- असे दोन चार अजून भेटले तर मी पुण्यात घर विकत घेईन.
तो शांतपणे बियर सिप करू लागला. अंजू आणि दर्शन हे ऐकून खुश झाले होते.
अंजू- काय रे काय वाटतं? ब्लॅकमेलिंग?
दर्शन- हो. मला तेच वाटतंय.
अंजू- कोण असेल ह्याचा मासा?
दर्शन- माहित नाही. पण कोणी प्रसिद्ध माणूस असेल तर आपल्याला ब्रेकिंग न्यूज मिळेल.
अंजू- (बियरचा मोठा घोट घेत) येस. आज संध्याकाळी पाच वाजता….
दर्शन- तुळशी बाग, कावरे कोल्ड्रिंक…. फिंगर्स क्रॉस्ड.
ह्या आनंदात दोघांनी आणखी एक स्ट्राँग बियर घेतली तेव्हा तो माणूस समोर असलेल्या पीएमटीच्या स्टॉपवर थांबलेल्या बसमध्ये चढला होता. त्याचा फोटो मात्र अंजूच्या फोनमध्ये सेव्ह झाला होता.
मंजिरी ताईंनी अपर्णाची त्यांच्या संस्थेच्या इतर संचालिका आणि अधिकारी महिलांशी ओळख करून दिली. दिवसभर अपर्णा मंजिरी ताईंबरोबर होती. वेगवेगळे स्टॉल, त्यात असलेल्या वस्तू, भेट द्यायला येणारे उच्चभ्रू लोक. ते प्रदर्शनातील एथनिक वस्तू विकत घेताना मंजिरी ताई करत असलेलं कौतुक ह्याचा खरं तर अपर्णाला कंटाळा आला होता. पण ती फार काही बोलू शकत नव्हती. आज मंजिरी ताईंनी सगळ्या मीटिंग्जदेखील तिथेच बोलावल्या होत्या. संध्याकाळी महत्त्वाची स्टाफ मीटिंग होती. बरोब्बर पाच वाजता. संस्थेत काम करणाऱ्या सगळ्या बायका त्या मीटिंगला उपस्थित असणार होत्या. अंजली आता पकली होती. पण हेल्पलेस होती.
राहुल दिवसभर सहा फंक्शनच्या हॉल्सवर फिरत होता. प्रत्येक ठिकाणी सगळी व्यवस्था चोख आहे ह्याची खात्री करून घेत होता. त्यांच्या स्टाफला योग्य त्या सूचना देत होता. संध्याकाळ होत आली होती. त्याला ऑफिसातून फोन आला. त्यांच्या मॅरेज पोर्टलमध्ये काहीतरी मेजर प्रॉब्लेम आला होता. साइट डाउन झाली होती. राहुल ऑफिसला निघाला. सगळे इंजिनियर्स काम करत होते. पण नक्की काय प्रॉब्लेम आहे लक्षात येत नव्हतं. साइट डाउन होऊन जवळजवळ तीन तास झाले होते. राहुल गाडीत होता. इतक्यात त्याला नंदनचा मेसेज आला. “वाट बघतोय. घरी ये. येतो आहेस ना?”
राहुल कन्फ्युज झाला. ऑफिसला जावं की नंदनला भेटायला जावं ह्याचा निर्णय होत नव्हता. दोन्ही ठिकाणी जाणं आवश्यक होतं. तो डोळे मिटून काही मिनिटं शांत बसला आणि त्याने ड्रायव्हरला गाडी बावधनकडे घ्यायला सांगितली. गाडी कर्वे रोडवरून पौड रोडला लागल्यावर त्याच्या मनातून कामाचे विचार हळूहळू जायला लागले आणि तो रिलॅक्स होऊ लागला. त्याची गाडी नंदनच्या कॉम्प्लेक्सच्या गेटमध्ये शिरताना इंजिनियरचा साइट परत सुरू झाल्याचा मेसेज आला आणि राहुल पूर्ण शांत मनाने नंदनला भेटायला निघाला.
संध्याकाळी ५ ला दहा मिनिटं बाकी. तुळशीबाग बऱ्यापैकी फुलली होती. अंजू आणि दर्शनने रिक्षातूनच दगडूशेठ गणपतीला नमस्कार केला आणि त्यांची रिक्षा लक्ष्मी रोडला वळली. रिक्षा गणपती चौकात थांबवून, पैसे देऊन दोघे कावरे कोल्ड्रिंकजवळ आले. त्या माणसाला शोधू लागले. शेजारी फुगेवाले, खेळणीवाले होते. आईस्क्रीम खायला येणाऱ्या मुलांना पिपाण्या वाजवून भुलवत होते. ताई ड्रेस बघा, जीन्स बघा असं ओरडणारी सोनेरी केसांची मुलं होती. ड्रेस, अंबाडे, विग, टिकल्या, गळ्यातले अशा असंख्य वस्तूंची दाटीवाटीने उभी असलेली दुकानं आणि स्टॉल्स होते. अंजू आणि दर्शन त्या माणसाची वाट बघत होते. त्याला शोधत होते.
इतक्यात तो आला. बिडी फुकत, बेदरकार चेहऱ्याने तो आला. तुळशीबागेत येणाऱ्या बायका आणि पोरींना आधाशी नजरेने बघत उभा राहिला. मग मधेच आत जाऊन कोन आईस्क्रीम घेऊन आला आणि एखाद्या महिलेशी नजरानजर झाली की तिच्याकडे बघत निर्लज्जपणे त्या आईस्क्रीमवरून जीभ फिरवू लागला.
अंजू- काय फालतू माणूस आहे.
दर्शन- म्हणून तर ब्लॅकमेल करतोय.
अंजू- नजर बघ त्याची.
दर्शन- तू कशाला बघतेस त्याची नजर? तू त्याला पैसे द्यायला कोण येतंय त्यावर लक्ष ठेव. आपल्याला त्या माणसाचा पाठलाग करायचा आहे. तो कोण आहे किंवा कोणाचा माणूस आहे हे शोधायचं आहे.
अंजू- हम्म…
दोघे त्या माणसाकडे बघत उभे राहिले. पाच वाजून पाच मिनिटं झाली तरी कोणीच आलं नव्हतं. हे दोघे थोडे अस्वस्थ झाले.
अंजू- येणार का कोणी की आपली बातमी फसली?
दर्शन- तू कॅमेरा तयार ठेव. मोठं डील आहे. कोणीतरी येणारच.
दोघे परत वाट बघू लागले. इतक्यात त्या माणसाला फोन आला. तो फोनवर बोलत आजूबाजूला बघू लागला. इतक्यात एक बाई त्याच्यासमोर आली. तिने त्याच्या हातात एक पुडकं दिलं. ते घेऊन तो माणूस गर्दीत दिसेनासा झाला. ती बाई शांतपणे वळून आपल्या गाडीत जाऊन बसली. तिला बघून अंजू आणि दर्शन हादरले होते. ती बाई अपु होती. अंजूची बहीण अपु.
क्रमश:
© मंदार जोग
आमची खोल खोल पाणी | भाग 2 | मराठी सूड कथा कशी वाटते आहे ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा.
आमचे whatsapp channel join करा- whatsapp.com
हे पण वाचा- वेळ
