मराठी दीर्घ कथा | मराठी सूड कथा | राजकारण कथा

खोल खोल पाणी | भाग 3 | थरारक मराठी कथा

खोल खोल पाणी | भाग 3 | थरारक मराठी कथा

अंजू आणि दर्शन नदीकाठावर खाली उतरून अंधारात सिगारेटचे कश जोरजोरात मारत होते. अंजूला तर काहीच सुचत नव्हतं. त्या फाटक्या, फालतू माणसाला अपू का भेटायला आली? तिला तो का ब्लॅकमेल करत असेल? तिचं बाहेर काही लफडं आहे का? एक ना दोन… हजारो प्रश्न तिच्या मनात येत होते. अपूची तिच्या मनात असलेली इमेज तडा जायच्या मार्गावर होती.

अंजू- (स्वतःशी विचार करत) अपू? का? काय संबंध?

दर्शन- कळेल, कळेल… तू काळजी नको करू.

अंजू- (एक जोरदार झुरका मारत) काळजी कशी नको करू? अरे, माझ्या बहिणीला कोणीतरी माणूस ब्लॅकमेल करतोय. त्यासाठी तिने पाच लाख रुपये दिलेत त्याला. तिच्याकडे इतके पैसे आले कुठून? आणि नक्की काय आहे हे प्रकरण?

दर्शन- आपण शोधूया ते. तू का काळजी करतेस?

अंजू- परत तेच. काळजी नको करू तर काय सेलिब्रेट करू?

दर्शन- तुला हवं ते कर. प्रेमाने सांगतोय तर माझ्यावर काय चिडतेस? मी घेतले का पैसे तुझ्या अपूकडून?

अंजू- तसं नाही रे. पण…

दर्शन- (शेवटचं थोटूक तिला दाखवत) गोल्डन पफ आहे. हवाय?

अंजू- (राजाराम पुलावर दिसणारे गाड्यांच्या दिव्यांचे पुंजके बघत) नको… तू मार आणि फेक. मी घरी जाते.

अंजू तिथून निघाली. दर्शनने शेवटचा दम मारल्यावर ओठ भाजल्याने त्याने थोटूक फेकलं आणि तो विचारात हरवला.

नरपत पुणे-कोल्हापूर एसटीमध्ये बसला होता. खांद्यावरची शबनम बॅग त्याने हातात घट्ट धरली होती. त्यात पाच लाखांची जोखीम होती. त्याची अनेक महिन्यांची दारू आणि चरसची सोय झाली होती. त्याने पैसे मिळाल्यावर कॅम्पात जाऊन ओरिजिनल काश्मिरी मालाचे काही दम पण मारले होते. मस्त किक बसल्यावर त्याने स्वारगेटला येऊन बस पकडली होती. चरसची नशा अजून डोक्यात होती. त्यात एसटीच्या खिडकीची काच तुटलेली असल्याने कानावर आदळणारा थंड वारा डोकं सुन्न करत होता. नरपत डोळे मिटून शांत बसला होता. झोप लागली तरी बॅगवरची पकड घट्ट होती. त्याला भूतकाळ डोळ्यासमोर दिसू लागला.

साधारण पंचवीस वर्षांपूर्वीचा काळ. पावसाळी रात्र. कुंदाचे दिवस भरले होते. पोटात कळा सुरू झाल्या. नरपत ने फोन लावला. फोन लागत नव्हता. त्याने कुंदाला रिक्षात घातलं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं. तिला ॲडमिट करून त्याने परत फोन लावला. माधवरावांच्या घरातला फोन खणखणत होता. घरात कोणीच नव्हतं. नरपतला हॉस्पिटलचं डिपॉझिट भरायचं होतं. इतक्यात मंजिरीताई घरी आल्या. त्यांनी वाजत असलेला फोन उचलला.

ताई- हॅलो….

नरपत- मालक आहेत का?

ताई- कोण बोलतंय?

नरपत- मी… मी नरपत बोलतोय.

ताई- कोण नरपत?

नरपत- फुलवाला.

ताई- (आश्चर्याने) फुलवाला? नरपत? आधी नाव नाही ऐकलं साहेबांकडून कधी.

नरपत- नवीनच आहे जी….

ताई- एक तासाने फोन कर. साहेब बाहेर आहेत. येतील.

नरपतने फोन कट केला आणि तो हॉस्पिटलमध्ये वाट पाहू लागला. कुंदा लेबर रूममध्ये होती. तो एक तास नरपतला एका युगासारखा वाटत होता. बरोबर एक तासाने त्याने फोन लावला. फोन माधवरावांनीच उचलला.

माधवराव- हॅलो…

नरपत- साहेब, मी बोलतोय…

माधवराव- बोल… घरी का फोन केला?

नरपत- कुंदाला हॉस्पिटलमध्ये आणलं आहे. दिवस भरलेत ना तिचे.

माधवराव- (आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून घेत) तिला आणि तिच्या बाळाला बाहेरच संपव. मी सांगत होतो, पण तिने ऐकलं नाही. भूक वाढली तिची. काही रात्रींची तिची औकात ती विसरली आणि गळ्यात पडू लागली माझ्या… कळतंय ना मी काय सांगतोय ते…

नरपत- हो साहेब. पण हॉस्पिटलचे पैसे भरायचे आहेत.

माधवराव- तू देशपांडेकडून घे. मी सांगतो त्याला.

नरपत- होय साहेब.

माधवराव- आणि ती कुंदा किंवा तिचं पोर घरी जिवंत परत आलं ना, तर तू जिवंत राहणार नाहीस. माझं नाव लावणारा ह्या जगात फक्त राहुल आहे आणि असेल. बाकी कोणी नाही. काय?

नरपत- हो साहेब….

नरपतने फोन कट केला. त्याला माधवरावांचा हा निर्णय शॉकिंग होता. त्याला वाटत होतं कुंदाला मूल झालं की माधवराव ते आपलंसं करतील. भले लीगली नाही, पण त्यांच्या इस्टेटीमधून कुंदाला आणि त्या मुलाला आयुष्यभरासाठी काहीतरी घसघशीत देतील. आता कुंदाला होणारं मूल त्यांचंच असलं तरी माधवरावांना ते कुठे माहीत होतं? माधवरावांना त्यांच्या कोल्हापुरातील अय्याशीच्या एखाद्या रात्री काळजी न घेतल्याने झालेला अपघात वाटत होता तो. कुंदाला दिवस राहिल्याचं कळल्यापासून ते तिच्या मागे लागले होते पोर पाडून टाकण्यासाठी. पण नरपत ने त्यांचं पोर अजिबात पाडायचं नाही असं कुंदाला बजावलं होतं. म्हणून मग कुंदा काही दिवस तिच्या नातेवाईकाकडे जयसिंगपूरला जाऊन राहिली होती. माधवराव कोल्हापूरला आल्यावर भेटली नव्हती. नरपतने देखील ती कुठे आहे याचा पत्ता त्यांना लागू दिला नव्हता. आणि आज ती हॉस्पिटलमध्ये होती.

नरपतने माधवरावांच्या मित्राकडून, देशपांडेकडून पैसे घेतले आणि हॉस्पिटलमध्ये भरले. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते. कॉम्प्लिकेशन्स वाढले होते. शेवटी रात्री उशिरा एका मुलाला जन्म देऊन कुंदा हे जग सोडून गेली. नरपत ऊर बडवून रडला. त्याचं प्रेम होतं कुंदावर. आणि तिचंही. दोघे माधवरावांच्या शेतात राबायचे. नरपत त्यांचा खास माणूस. कोल्हापुरात सगळी सोय बघणारा. माधवरावांची कुंदावर नजर पडल्यावर त्यांनी नरपतला सोय करायला सांगितली. नरपत नाही म्हणू शकला नाही. आणि तेव्हापासून माधवरावांना कुंदाच्या रूपाने कोल्हापुरात आणखी एक सोय निर्माण झाली. आज कुंदा गेल्यावर नरपत ने तिच्या आणि त्याच्या मुलाला माधवरावांच्या पैशाने वाढवायची शपथ घेतली. पुढे त्या मुलाचं नाव नंदन ठेवलं!

त्या दिवशी संध्याकाळी मंजिरीताई प्रदर्शन हॉलमध्ये मीटिंगमध्ये बिझी होत्या. अपर्णा तिथे बसून बोअर होत होती. मंजिरीताईंना माधवरावांचा फोन आला.

मंजिरी- बोला…

माधव- मी एक पाकीट पाठवतोय. ते तुळशी बागेत एका माणसाला द्यायचं आहे.

मंजिरी- कोण? तोच इन्कम टॅक्स ऑफिसरचा माणूस?

माधव- हो…

मंजिरी- अहो, पण हे किती वर्ष चाललंय? तुम्ही मिनिस्टर लेव्हलवर बोलून हे संपवून का टाकत नाही? एकदाच काय ते देऊन टाका ना.

माधव- मला अक्कल नका शिकवू. पैसे पाठवतो आहे ते तुमच्या एखाद्या बाईबरोबर पाठवा. मला माझ्या माणसांशी त्याचा संपर्क नको आहे. पुरुष गेला की तो जास्त बोलेल…

मंजिरी- आणि उगाच नको ती माहिती काढत बसेल. माहीत आहे. पाठवा तुम्ही पैसे. बघते मी.

त्यांनी फोन कट केला. त्यांच्या सर्व स्टाफ आणि व्हॉलंटियर्स मीटिंगमध्ये हव्या होत्या. म्हणून त्यांनी अपर्णाला पुडकं द्यायला सांगितलं.

मंजिरी- अपर्णा, हे पुडकं आहे. ते एका माणसाला कावरे कोल्ड्रिंक्सजवळ नेऊन दे. तुला त्याचा फोटो पाठवते.

अपर्णा- कोण माणूस?

मंजिरी- आहे एक. नंतर सांगते. हे आपल्या बिझनेसचं काम आहे. जास्त प्रश्न नको. त्याला पुडकं दे आणि एक शब्द न बोलता गाडीत बस आणि निघून ये.

अपर्णा- ओके आई.

इतकं बोलून अपर्णा ते पैसे नरपतला द्यायला गेली आणि ते देताना तिला अंजू आणि दर्शनने पाहिलं!

नंदन राहुलची वाट बघत होता. सगळी तयारी झालेली होती. टीम आणि टेक्निशियन आलेले होते. राहुल पोहोचल्यावर नंदनने त्याचं स्वागत केलं.

नंदन- हाय…

राहुल- हाय…

नंदन- ऑल वेल ना?

राहुल- येस. फक्त मॅरेज साइट जरा डाऊन झाली होती.

नंदन- अरे मग मला सांगायचं ना. बघू का मी?

राहुल- नाही. इट्स अप अँड रनिंग नाऊ.

नंदन- ओके ग्रेट. तू शॉवर घेऊन चेंज कर. टीम रेडी आहे.

राहुल ओके म्हणून बाथरूममध्ये गेला. शॉवर घेऊन बाथरोब लपेटून बाहेर आला आणि बेडरूममध्ये गेला. तिथे २ कॅमेरे आणि कॅमेरामन, एक साउंडवाला, एक लाईट बॉय आणि एक बलदंड नट अशी टीम त्याची वाट बघत होती. त्याने चेहऱ्यावर मास्क चढवला. नंदन ने “रोल कॅमेरा” अशी ऑर्डर दिली. एक कॅमेरा क्लोज आणि एक कॅमेरा वाईड अँगल टिपू लागला. राहुलने रोब काढून फेकून दिला आणि त्या बलदंड नटाच्या ओठांवर ओठ टेकले. ते किसमध्ये रममाण असताना नंदन कट म्हणाला. त्यानंतर तुकड्यातुकड्यात फिल्म शूट होत राहिली. रात्री दहाला पॅकअप झाल्यावर राहुल खूप खूश होता. सगळी टीम गेल्यावर राहुल आणि नंदन रॉ फुटेज बघत होते.

नंदन- ही फिल्म तहलका करणार बघ. ओव्हरसीज आणि इंडियन मार्केटमध्ये देखील.

राहुल- इनोव्हेशन पाहिजे लोकांना.

नंदन- आणि तोच तर आपला यूएसपी आहे. बघ. हा अँगल बघ…

राहुल- ही वॉज ऑसम. नेक्स्ट फिल्मसाठी पण त्याला बोलवूया.

नंदन- फिल्म कशाला? तू असाही बोलाव की त्याला.

दोघे हसले.

नंदन- ए, आपल्याला मलेशियामधल्या एका कंपनीचं फंडिंग मिळणार आहे. आपण आपली पोर्न साइट आता आणखी मोठी करू शकतो.

राहुल- ते सर्व तू बघ. मी इथे स्लीपिंग पार्टनर आहे.

नंदन- इन लिटरल सेन्स.

दोघे परत हसले. राहुल तिथून निघाला. नंदन आणखी एक कडक फिल्म तयार झाल्याने खूश होता. त्याने एडिट सुरू केलं.

नरपतची बस शिरवळजवळ एका हॉटेलच्या बाहेर थांबली. नरपतला गाढ झोप लागली होती. कंडक्टरने ओरडून सांगितलं, “बस दहा मिनिटं थांबेल.” सगळे प्रवासी उतरले. नरपत तसाच झोपून होता. शेवटच्या सीटवर बसलेला एक प्रवासी अंगाभोवती आणि डोक्यावर चादर गुंडाळून हळूहळू चालत नरपतच्या दिशेने येत होता. त्याने नरपत गाढ झोपेत असल्याची खात्री करून घेतली. सावकाश आपल्या पँटमध्ये मागल्या बाजूला लपवलेला वस्तरा बाहेर काढला आणि शांतपणे नरपतच्या गळ्यावर अलगद फिरवला. गळ्यातून वाहू लागलेलं रक्त पिशवीवर पडण्याआधी पिशवीतून नोटांचं पुडकं बाहेर काढून तो बस मधून उतरला आणि रस्त्यावर उभी असलेल्या गाडीत जाऊन बसला. गाडी सुरू झाल्यावर त्याने मेसेज केला. “काम झालं.” रिप्लाय आला, “ते पैसे तू ठेव आणि नंबर डिलीट कर माझा.”

माधवरावांनी रिप्लाय करून फोन बाजूला ठेवला आणि लिव्हिंग रूममध्ये समोर अपर्णाला त्यांनी विचारलं-

माधवराव- काय मग सूनबाई. कसा काय पहिला दिवस?

मान खाली घालून “छान” म्हणताना अपर्णाला उगाच माधवरावांची नजर तिच्या अंगावर फिरत असल्याचा भास होऊन खूप गिळगिळीत वाटत होतं.

क्रमशः

© मंदार जोग

आमची खोल खोल पाणी | भाग 3 | थरारक मराठी कथा कथा कशी वाटली कॉमेंट मध्ये लिहा.

पुढील भागाची लिंक- खोल खोल पाणी | भाग ४ | मराठी सस्पेन्स कथा

मागील भागाची लिंक- खोल खोल पाणी | भाग 2 | मराठी सूड कथा

सर्व भागांची लिंक- खोल खोल पाणी | सर्व भागांची लिंक |

आमचे whatsapp channel join करा- whatsapp.com  

कादंबरी- ट्वेंटी थ्री

कादंबरी- सख्या रे….

हे पण वाचा- वेळ

कच्छी

बाप्पा

वारसा

गणपती – तथास्तु

गणपती – तथास्तु

कृष्ण जन्म

गणपती, उत्सव कि इव्हेंट?

आजी

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: © Mandar Jog - All Rights Reserved