मृगजळ मंदार जोग मराठी दीर्घकथा

मृगजळ भाग १७  

रंगा डायनिंग टेबलवर चढला. आणि उडी मारून तिला पकडणार इतक्यात मानसी निसटली आणि धावत जाऊन पळून जायला म्हणून तिने घराचा दरवाजा उघडला आणि बघते तर समोर सौरभ उभा होता. ती तिथेच थबकली. इतक्यात मागून धावत आलेल्या रंगाने तिला मागून मिठी मारली आणि म्हणाला-

श्रीरंग- आता तुला माझ्या हातून कोण सोडवतं बघतो.

इतक्यात त्यालाही समोर उभा असलेला सौरभ दिसला. सौरभ आणि श्रीरंग एकमेकांकडे बघत होते. मध्ये अडकलेल्या मानसीला काय करायचं कळत नव्हतं. सौरभला डोळ्यासमोर जे दिसत होतं त्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. त्याला पाहूनही श्रीरंगने मानसीला मागून मारलेली मिठी अजिबात सोडली नव्हती. तो आश्चर्याने श्रीरंगकडे बघत होता. मानसी तशीच कन्फ्युज्ड उभी होती. शेवटी श्रीरंगने विचारलं.

श्रीरंग- येस..काही काम आहे का? तुम्ही…

सौरभ- मी सौरभ…मानसीचा मित्र…

ते ऐकून श्रीरंगने मिठी सोडली आणि आपला हात पुढे केला आणि म्हणाला-

श्रीरंग- मी श्रीरंग…मी पण मानसीचा मित्र…आणि ही मानसी आपल्या दोघांची मैत्रीण…

स्वतःच्या जोकवर रंगा जोरात हसला. सौरभ मानसीकडे टक लावून बघत होता.

सौरभ- Sorry मानसी…मला वाटतं मी चुकीच्या वेळी आलो…येतो मी…

असं म्हणून तो जायला वळला आणि रंगाचा हात त्याच्या खांद्यावर पडला.

श्रीरंग- ए सौरभ…चुकीची वगैरे वेळ नाही…आम्ही मस्त गप्पा मारत ड्रिंक्स घेत होतो. तू आम्हाला join कर. खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे तीन यार. दोस्त नंबर एक, दोस्त नंबर दो और दोनों की दोस्त मानसी…

आता मानसी पण सावरली होती. ती पटकन म्हणाली-

मानसी- हो सौरभ…तू ये ना..आम्हाला जॉईन कर…हा रंगा…म्हणजे श्रीरंग आहे. माझा खूप जुना मित्र. युएस वरून अचानक अवतरला आहे अनेक वर्षांनी. प्लीज आत ये..

सौरभ आत येऊन बसला. उगाच घरभर नजर फिरवत होता. इतक्यात श्रीरंगने भरलेला ग्लास त्याच्या समोर धरला.

श्रीरंग- म्हातारी सिंगल मोल्ट आहे. मी खास मानसीसाठी आणली होती. पण तू लकी आहेस. तुलाही मिळाली. चियर्स..

सौरभने एक घोट घेतला. तो मानसीकडेच बघत होता. मानसी नजर चोरत होती.

सौरभ- मानसी, तू कधी सांगितलं नाहीस की तुझा इतका क्लोज फ्रेंड आहे जो असा अचानक युएसवरून तुझ्या घरी येतो.

श्रीरंग- हाच प्रोब्लेम आहे मानसीचा. आता तिने मलाही हे सांगितलं नव्हतं की तिचा एक असा फ्रेंड पण आहे जो मध्यरात्री तिच्या घरी येतो. लहानपणापासून मानसी अशीच विसरभोळी आहे. हो की नाही मानसी?

मानसी- गाईज..कधी तुमचा विषयच निघाला नाही. नाहीतर मी नक्कीच सांगितलं असतं.

श्रीरंग- I agree. मानसी मनात काहीच ठेवू शकत नाही. जे आहे ते स्पष्ट बोलते. तिला लपून छपून काहीच करायला आवडत नाही. ते भांडण असो, प्रेम असो, लग्न असो, किंवा डिव्होर्स असो. मानसी बिनधास्त करते. पण मानसी, तू मला सौरभबद्दल सांग ना. म्हणजे तुम्ही कुठे भेटलात? इतकी मैत्री कशी काय झाली? वगैरे…

मानसी- सौरभ माझा एक्स कलीग आहे.

श्रीरंग- एक्स? म्हणजे? आता तुम्ही एकत्र काम करत नाही?

मानसी – नाही. सौरभने स्वतःचा बिझनेस सुरू केला. पण आमची मैत्री कायम आहे.

श्रीरंग- Wow. आपल्या सारखीच मैत्री आहे म्हण ना. So सौरभ, तू काय करतोस?

सौरभ- माझा म्युच्युअल फंडचा बिझनेस आहे.

श्रीरंग- Wow. AUM वाढवत ठेवायचं की दहा वर्षांत लोकांनी इन्व्हेस्ट केलेल्या पैशांवर आपलं कोट्यवधी रुपयांचं फिक्स्ड इन्कम होतं. बरोबर ना? You are a big man dude. Married, single or divorced?

हा प्रश्न ऐकून सौरभला ठसका लागला. मानसीने पटकन उठून त्याला पाणी आणून दिलं आणि त्याच्या पाठीवर हात फिरवत काळजीने विचारलं-

मानसी- सौरभ…are you okay? खोल श्वास घे…ठसका लागला का?

तिची ही लगबग आणि काळजी श्रीरंगच्या लक्षात आली.

श्रीरंग- मला वाटतं मी तुझ्या मनाला त्रास देणारा चुकीचा प्रश्न विचारला किंवा तुझ्या घशाला त्रास देणारी चुकीची दारू तुला दिली. I am sorry in either case.

सौरभ- Oh not at all. तुझी काहीही चूक नाहीये.

शेवटचं वाक्य त्याने मानसीकडे बघत म्हटलं आणि ते पण श्रीरंगने नोटीस केलं.

श्रीरंग- मी माझं सांगतो. मी आणि मानसी एकाच कॉलेजमध्ये होतो. सगळे मारायचे तसा मी पण तिच्यावर तेव्हा लाईन मारायचो. पण तिने मला भाव दिला नाही. म्हणून मी अमेरिकेला निघून गेलो. पण तिथे देवदास नाही बनलो. गोऱ्या लोकांना नोकरीवर ठेवणारी कंपनी बनवली आहे. अनेक गोऱ्या पोरी फिरवल्या आहेत. पण लग्न नाही केलं.

सौरभ- का? आय मीन इतका सेटल आहेस, बिझनेस आहे, कंपनी आहे, पैसा आहे. मग लग्न का नाही?

श्रीरंग- मानसीसारखी कोणी भेटली नाही ना तिथे. आणि इथे मानसी लग्न करून बसली होती. त्यामुळे मग मी लग्नाचा विचारच केला नाही.

मानसी- तू गप ना रे रंगा. काहीही बोलतोस तू. सौरभ, तू लक्ष नको देऊ त्याच्याकडे. तो वेडा आहे. त्याला ना जबाबदारी नको संसाराची. म्हणून लग्न केलं नाहीये त्याने.

श्रीरंग- असं अजिबात नाहीये. जिची जबाबदारी घ्यावी असं वाटेल अशी मुलगी मिळायला पाहिजे ना यार? चल, तू आत्ता लग्न करतेस का? लगेच घेतो तुझी आणि आपल्या आठ-दहा मुलांची पण जबाबदारी.

हे ऐकून सौरभ हादरला. त्याला काय रिअॅक्ट करावं कळत नव्हतं.

मानसी- [awkward वाटून] रंगा, तू गप्प बसणार का जरा? काहीही काय बोलतोस?

श्रीरंग- मानसी, मी सिरीयस आहे. अगं तुझ्यासारख्या मुलीशी लग्न करायला माझ्यासारखा unmarried माणूस सोड, एखादा लग्न झालेला आणि अक्कल असलेला पुरुष लग्नाच्या बायकोला सोडून तुझी जबाबदारी आनंदाने घेईल. काय सौरभ? मला माहित नाही तुझं marital status. पण असं assume करू की तुझं लग्न झालेलं आहे आणि मानसी तुझ्या आयुष्यात आली आणि लग्नाला तयार आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये तू तुझ्या लग्नाच्या बायकोला डिव्होर्स देऊन मानसीशी लग्न करशील की नाही ते सांग. As a man विचार करून सांग.

रंगाने हा प्रश्न विचारल्यावर मानसी पण सौरभकडे बघू लागली. सौरभला काय बोलावं सुचत नव्हतं. तो गप्प होता. विचार करत होता.

श्रीरंग- You lost her dude. तू इतका विचार करतो आहेस तोवर मी तिला लग्न करून यूएसला उडून पण गेलो.

हे बोलून श्रीरंग जोरात हसला. सौरभला फार कानकोंडं झालं. मानसीला त्या परिस्थितीतही हसू आलं.

सौरभ- श्रीरंग, तुझं लग्न झालं नाहीये ना म्हणून तुला त्यातली कॉम्प्लिकेशन माहित नाहीत. हे असं मनात आलं म्हणून डिव्होर्स वगैरे हिंदी सिनेमात असतो. खऱ्या आयुष्यात ते इतकं सोपं नसतं.

श्रीरंग- मित्रा, आयुष्यात सोपं काहीच नसतं. नाहीतर आपण सगळेच बिल गेट्स, मस्क किंवा तुमचे मोदी झालो असतो. पण तसं झालं नाही आणि ते तिघेच कठीण मार्गावर चालत आज आहेत त्या पोझिशनला आहेत. बाकी आपण इथे फालतू गप्पा आणि जोक्स मारत बसलो आहोत. इच्छा आहे तिथे ते काहीतरी असतं ना. काय ग ते.?

मानसी- मार्ग..

श्रीरंग- Thanks babe…तर इच्छा आहे तिथे मार्ग असतो. मार्ग कठीण असला तरी इच्छा जेन्युईन असेल तर माणूस तो मार्ग पार करतो. [अचानक काहीतरी लक्षात येऊन] मी जरा जास्तच फिलोसोफिकल बोलतो आहे का? Sorry guys…

मानसी- मी जेवायला वाढते. सौरभ, तू जेवणार आहेस का?

सौरभ- नाही. मी जेवून आलोय.

श्रीरंग- जेवून आला आहेस म्हणजे let me guess…you are married right?

सौरभ- Yes.

श्रीरंग- Wow. Who is the lucky girl?

सौरभ- अ..अंकिता…अंकिता आहे तीचं नाव..

श्रीरंग- अंकिता? Nice name. ती पण तुझ्या बिझनेसमध्ये आहे की homemaker?

मानसी- ती..ती teacher आहे. तिचे कोचिंग क्लासेस आहेत.

श्रीरंग- Wow. India मधला अजून एक evergreen business. Education. Big money. थोडक्यात नवरा म्युच्युअल फंड एजंट आणि बायको tutor. They make a rich couple. And kids?

सौरभ- एक मुलगा आहे. आता नोकरी करतो.

श्रीरंग- आणि..

मानसी- रंगा बास. तू तर त्याचा इंटरव्ह्यू घेऊ लागलास.

श्रीरंग- म्हणजे काय? घ्यायलाच पाहिजे. माझ्या जिवलग मैत्रिणीच्या घरी इतक्या रात्री येणारा माणूस कोण आहे, कसा आहे हे पाहायला नको का की? बरोबर ना सौरभ?

सौरभ- अगदी बरोबर.

मानसी- रंगा, तू जेवायला बस. मी जेवण गरम करून आणते.

श्रीरंग- ठीक आहे. आणि मी झोपायचं कुठे ते पण सांग. मला जाम झोप येते आहे. आता मी सकाळी ब्रेकफास्टला तुझ्या हातची थालीपीठे खाईन आणि मग जाईन. इतकी वर्षं झाली पण ती थालीपीठाची चव अजून जिभेवर आहे माझ्या.

तो तिथेच राहणार हे लक्षात आल्यावर वैतागलेला सौरभ म्हणाला-

सौरभ- गाईज, तुमचं चालू द्या. मी सहज हाय म्हणायला आलो होतो इथूनच जात होतो म्हणून.

मानसी – What? तू का जातोस? थांब ना तू पण. श्रीरंगला पण कंपनी होईल.

सौरभ- नको. मला सकाळी जरा लवकर निघायचं आहे.

श्रीरंग- मानसी, तो married माणूस आहे. त्याला घरी गेल्यावर पण खूप आणि छान काम असेल. आपल्यासारखा नाहीये तो. मी bachelor आणि तू डिव्होर्सी. दोघांच्याही रात्री भकास.

ह्या जोकवर तो जोरात हसला. सौरभने मानसीला एक लूक दिला आणि तो रंगाला म्हणाला-

सौरभ- Nice meeting you.

श्रीरंग- Feeling is mutual. Take care bro.

सौरभ- And thanks for the drink…

श्रीरंग—Oh…the pleasure is entirely mine…

सौरभ- बाय मानसी. Have fun…आणि लवकर झोप. दमतेस ना तू हल्ली?

हे बोलून तो मानसीला एक लूक देऊन निघून गेला. मानसी तो गेला त्या दिशेला बघत उभी होती. ते लक्षात आलेला श्रीरंग हळूच तिच्या कानाशी येऊन म्हणाला-

सौरभ- He won’t marry you. तो तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही. पैज लावतेस?

हे वाक्य ऐकून धक्का बसलेल्या मानसीने त्याच्याकडे वळून पाहिलं.

मानसी- काय?

श्रीरंग- येस. तू बरोबर ऐकलं आहेस.

मानसी आवाक होऊन त्याच्याकडे बघत होती आणि श्रीरंग एक honest स्माईल करत दोघांचे ग्लास भरत होता.

क्रमश:

पुढील भागाची लिंक- मृगजळ भाग १८

आधीच्या भागाची लिंक- मृगजळ भाग १६

मृगजळ कथेचे आधीचे भाग वाचायला पहिल्या भागापासून सुरुवात करा. त्याची लिंक- मृगजळ …भाग १

आमची कादंबरी- सख्या रे …

आमची व्यक्तिचित्र- व्यक्तिचित्रण

आमच्या लघुकथा – लघुकथा

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

3 thoughts on “मृगजळ भाग १७  ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!