मृगजळ मंदार जोग मराठी दीर्घकथा

इतका वेळ बसून सगळं ऐकत असलेला सौरभ उठून उभा राहिला. पुढे होऊन त्याने मानसीला घट्ट मिठी मारली.

सौरभ – Thank you, मानसी… तू पूर्ण वेडी मुलगी आहेस… I… I love you…

असं म्हणत त्याच्याही नकळत त्याने मानसीच्या ओठांवर आपले ओठ ठेवले…

अचानक झालेल्या या प्रकाराने मानसीला आश्चर्य वाटलं असलं तरी तिने त्याला विरोध केला नाही. तिने त्याच्या मानेभोवती असलेली आपली मिठी घट्ट केली… ते दोघे त्याच अवस्थेत एक मिनिट होते. पूर्णपणे हरवलेले. जागेचं भान नसलेले. आणि अचानक सौरभ भानावर येत लांब झाला. तो खूप खजील झाला होता.

सौरभ- Sorry… sorry मानसी.. मी…

मानसी- Sorry? का? माझा किस घेतलास म्हणून?

सौरभ- I mean…

मानसी- (त्याचा हात हातात घेत) सौरभ, relax… काहीच झालेलं नाहीये. It was a moment. तू माझ्याकडे आलास तेव्हा खूप टेन्स होतास आणि माझ्या त्या कॉलमुळे तुझं टेन्शन एकदम उतरलं. म्हणून you wanted to probably thank me आणि कदाचित किस करून तू ते मला सांगितलंस. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तर मला अशा पद्धतीने सांगितलेलं चाललं नसतं. पण मी ओळखते तुला. तुझ्या आयुष्यात काय सुरू आहे, तुझा स्वभाव काय आहे, तुझी मनःस्थिती काय आहे हे समजतं ना मला? आणि ते I love you म्हणालास ना… ते मात्र परत कधीच म्हणू नकोस. कारण love, प्रेम ह्यात अपेक्षा असतात, deliverables असतात. त्या मोमेंटला तू ते बोलून गेलास and I know you didn’t mean it. So तू chill राहा. Sorry वगैरेची गरज नाहीये.

सौरभ काहीच न बोलता शांत उभा होता.

मानसी- तू beer घेणार का?

सौरभ- नाही… नको… मी.. मी निघतो आता. गुड नाइट आणि thanks…

सौरभ मनात प्रचंड guilt घेऊन तिथून बाहेर पडला. तो घरी पोहोचल्यावर हर्षद त्याची वाट बघत होता. हर्षदने त्याला लगेच सांगितलं की आईची अंगठी तिच्याच रूममध्ये बेडच्या मागे पडली होती आणि मिळाली. अंकिता तिच्या रूममध्ये स्वतःशी बडबडत होती-

अंकिता- आज हर्षुला काय झालंय माहित नाही. काय तर म्हणे अंगठी मिळाली हे बाबांना सांगणारच, काय गरज होती सांगायची? चांगला नाचवला असता ना त्याला आणि त्याच्या त्या रखेलीला पण. पण नाही… आमचेच चिरंजीव दिवटे निघाले. हाताबाहेर गेलाय हर्षद… माझं ऐकत नाही म्हणजे काय. सौरभनेच बिघडवून ठेवलाय…

सौरभ त्याच्या रूममध्ये जाऊन शांतपणे झोपला. झोपेतही त्याला मानसीच्या घरचा तो प्रसंग… मानसीला मारलेली ती मिठी आठवत होती. नकळत तो तिला आय लव्ह यू बोलला होता ते आठवत होतं. त्याला त्यातच झोप कधी लागली ते कळलं नाही.

सकाळी तो पेपर वाचत बसला होता. हर्षद कॉलेजला निघाला. सौरभने त्याला हाक मारली.

सौरभ- हर्षद…

हर्षद थांबला.

हर्षद- काय बाबा?

सौरभ- तुला बाईक हवी आहे ना?

हर्षद ते ऐकून क्षणभर गप्प झाला. हे ऐकत असलेली अंकिता तिथूनच जोरात बोलली-

अंकिता- हर्षु सांग रे बाळा. बाबा काय विचारत आहेत? बाईक हवी आहे का म्हणून ना? सांग की त्यांना. ते आणून देतील हा.

सौरभने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि परत विचारलं-

सौरभ- काय विचारलं मी हर्षु? तुला बाईक हवी आहे ना?

हर्षद- हो बाबा…

सौरभ- काय किंमत असेल?

हर्षद- द.. दीड.. दीड लाख…

सौरभ- ठीक आहे. आपण ह्या आठवड्यात घेऊ तुला बाईक.

हे ऐकून चकित झालेली अंकिता जोरात म्हणाली-

अंकिता- काय? दीड लाखाची बाईक घेणार आहेस तू? आणि कोणाच्या जीवावर सांगतो आहेस हे? मी एक पैसा देणार नाहीये आधीच सांगते आहे. आणि माझ्या मुलाला उगाच खोटी स्वप्नं दाखवू नको. दीड रुपया नाही म्हणाला तो. दीड लाख म्हणाला, दीड लाख. हर्षु तू जा कॉलेजला. ह्याच्याकडे दुर्लक्ष कर.

सौरभ- हर्षु, ह्या आठवड्यात तुझ्याकडे बाईक असेल. माझं promise आहे ते.

ते ऐकून हर्षद खुश झाला.

हर्षद- Thank you बाबा…

तो आनंदाने कॉलेजला गेला. अंकिताने सौरभला विचारलं-

अंकिता- दीड लाखाची बाईक कुठून देणार आहेस तू? चोरी करणार आहेस की हे घर विकणार आहेस? माझ्या घराला हात जरी लावलास ना तर याद राख.

सौरभ- नाही. तू म्हणतेस त्यातलं काहीच करणार नाहीये मी.

इतकं बोलून तो बाल्कनीत निघून गेला. अंकिता आश्चर्याने बघत राहिली. तो बाल्कनीत सिगारेट ओढत असताना त्याला मानसीचा मेसेज आला. “ठीक आहेस ना?” असं विचारणारा. त्याने रिप्लाय केला-

रिप्लाय- हम्म… ठीक आहे. हर्षदशी बोललो. त्याच्या बाईकची किंमत दीड लाख आहे.

तिचा रिप्लाय आला-

रिप्लाय- ओके ग्रेट. पैसे तयार आहेत. तुझ्या बँकेत चेक टाकू का?

हर्षदने रिप्लाय केला-

हर्षद- हम्म… माझी बँक डिटेल्स…… आणि thanks मानसी…

तो संवाद तिथेच संपला… पण सौरभच्या मनात काल रात्रीची मानसी अजूनही उरली होती…

पुढे यथावकाश सौरभने हर्षदसाठी बाईक घेतली. हर्षद खुश होता. सौरभ आणि मानसीमध्ये तसं काहीच नसल्याची त्याला खात्री होती, त्यामुळे तो सौरभशी व्यवस्थित वागत होता. त्यात सौरभने बाईक घेऊन दिल्यामुळे तर अगदीच अदबशीर होता. सौरभचा बिझनेस बऱ्यापैकी सुरू होता. त्याच्या आणि मानसीच्या भेटी पण होत मधूनमधून. मानसी अगदी नॉर्मल होती. पण सौरभ मात्र प्रत्येक भेटीगणिक तिच्या अधिकाधिक प्रेमात पडत होता! आणि त्याच वेळी जाणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक अंकितापासून अधिकाधिक दूर जात होता.

आणि मानसीचा वाढदिवस आला. सौरभला तिला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं. काय द्यावं हे त्याला सुचत नव्हतं. त्याने तिच्यासाठी एक लहानशी सोन्याची चेन विकत घेतली आणि तिला फोन केला.

सौरभ- हैप्पी बर्थडे मानसी…

मानसी- Thanks सौरभ…

सौरभ- कुठे आहेस?

मानसी- कुठे असणार? ऑफिस.

सौरभ- ऑफिस? मला वाटलं आज birthday स्पेशल सुट्टी घेशील.

मानसी- नाही बाबा. सध्या इतकं काम आहे की २४ तास कमी पडतात.

सौरभ- म्हणूनच भेटायला, फोन करायला वेळ नसतो तुला हल्ली.

मानसी- बरोबर ओळखलंस तू. किती समजूतदार आहेस ना?

सौरभ- हम्म… आज संध्याकाळी काय प्लॅन आहे?

मानसी- पार्टी.

सौरभ- अरे वा.. कुठे येऊ मग पार्टीसाठी?

मानसी- अरे यार… sorry… पण ऑफिसच्या gang ला पार्टी देते आहे. तुला बोलवायला काहीच हरकत नव्हती. पण खडूस रुपेश पण लाटकेल संध्याकाळी… आणि तुझा जॉब त्याच्यामुळेच… जरा awkward होईल ना? सॉरी… आपण उद्या करूया सेलिब्रेट. तू म्हणशील तिथे. ओके?

सौरभ- ओके… ठीक आहे. परत एकदा हैप्पी बर्थडे… बाय…

मानसी- ए तू चिडला नाहीयेस ना?

सौरभ- Not really… आणि असलो तरी does it matter?

मानसी- प्लीज यार, असं नको ना बोलू. माझ्या बर्थडेला माझा मूड नको ना खराब करू. मला guilt नको ना देऊ… प्लीज समजून घे..

सौरभ- हम्म… ओके… enjoy.. बाय…

फोन कट करून सौरभने हातात असलेल्या चेनच्या बॉक्सकडे पाहिलं. हताश हसला आणि घरी जायला निघाला.

मानसी ऑफिस कलीग्सबरोबर पार्टी करून रात्री २ वाजता घरी परतली. तिने हजारदा नको सांगूनही रुपेश तिला सोडायला तिच्या घरापर्यंत आला. तिच्या बिल्डिंगजवळ गाडी थांबवून दोघे उतरले. रुपेशने तिला परत एकदा wish केलं. Hug केलं आणि तो गाडी सुरू करून निघून गेला. मानसी लिफ्टमध्ये शिरली. दोन-तीन ड्रिंक्स झाली असल्याने ती थोडी नशेत होती. दाराजवळ येऊन पर्समध्ये किल्ली शोधत असताना मागून आवाज आला.

आवाज- Happy birthday मानसी.

मानसीने आश्चर्याने मागे वळून पाहिलं तर सौरभ होता. त्याला त्यावेळी तिथे पाहून मानसीला आश्चर्य वाटलं.

मानसी- सौरभ तू? इथे? कधी आलास?

सौरभ- रुपेश तुला खाली मिठी मारत होता त्याच्या बराच आधी.

मानसी- अरे तो ना लटकू आहे. You know him. पण तू इथे काय करतो आहेस?

सौरभ- इच्छा तुला wish करायची होती. पण तू तर आधीच खूप wishes आणि आता ह्या रुपेशच्या उबदार wishes घेऊन तृप्त झालेली दिसतेस. माझ्या wishes ची गरज नाहीये तुला. जातो मी. बाय…

असं म्हणून सौरभ जायला लागला. मानसीने त्याचा हात धरला आणि म्हणाली-

मानसी- सौरभ, मूर्खासारखा बोलू नको. आणि इथे बाहेर तमाशा नको. घरात ये.

तिने दार उघडलं. सौरभला घेऊन आत गेली आणि दार लावून म्हणाली-

मानसी- काय बोललास तू? रुपेशच्या उबदार wishes? इतकं sarcastic व्हायची काहीही गरज नाहीये. मी हजारदा नको सांगूनही रुपेश मला सोडायला आला. आणि त्याने एक casual hug देऊन wish केलं तर काय प्रॉब्लेम आहे?

सौरभ- तुला मजाच आली असणार. तुला प्रॉब्लेम का वाटेल?

मानसी- प्लीज सौरभ. तू बरा आहेस ना? रुपेश आणि मोनिकाचं सिरीयस अफेअर तुला माहित आहे ना? ते लग्न करणार आहेत. आज ती पण होती पार्टीला. आम्ही तिला घरी सोडलं आधी आणि मग रुपेश मला सोडायला आला. त्याला आपण किती महान आहोत, कशी मदत करतो हे दाखवायचं असतं आणि that’s it. Please सौरभ… माझा दिवस खूप चांगला गेला आहे. तू हे असं बोलून तो spoil नको करू.

सौरभ- मी spoil करतोय तुझा दिवस? मी फोन केला की आपण बाहेर जाऊ. तर तू म्हणालीस तुझी ऑफिस पार्टी आहे. मी तिथे येऊ शकत नाही. मग मी अकरा वाजल्यापासून इथे थांबलो आहे. अर्धं पाकीट सिगारेट ओढून झालं. तू रात्री दोन वाजता घरी आलीस आणि ती पण त्या रुपेशच्या गाडीतून. आणि त्याला निर्लज्जपणे रस्त्यात मिठी मारतेस आणि म्हणतेस की मी दिवस spoil केला. तुला लाज नाही वाटत असं बोलायला?

मानसी- (ओरडून) सौरभ enough. मी काय करायचं आणि काय नाही हे तुला विचारायला मी तुझी बायको नाहीये.

सौरभ- मग बन… आहेस तयार?

त्याचा हा प्रश्न ऐकून त्याच्यावर जोरात ओरडायला तयार असलेली मानसी फ्रीज झाली. तिचे शब्द आणि आवाज तिच्या ओठात अडकून पडले. ती अविश्वासाने सौरभकडे बघत राहिली. काही सेकंद फक्त शांततेत गेले. सौरभ आत्मविश्वासाने तिच्या डोळ्यात बघत होता. तिच्या नजरेत आश्चर्य, शॉक, अविश्वास आणि आनंद अशा सगळ्या भावना होत्या ज्या डोळ्यातून अश्रूंच्या रूपाने बाहेर पडू लागल्या. ते पाहून सौरभ घाबरला.

सौरभ- स… Sorry यार… मी.. मी मनात आहे ते बोलून गेलो… तू… तू प्लीज रडू नको… मी तुला hurt केलं असेल तर खरंच sorry… ए मानसी… प्लीज.. रडू नको…

मानसी- गप… एकदम गप्प बस…

सौरभने हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवलं.

मानसी- आता परत बोल तू जे बोललास ते.

सौरभ- नको.. मी मनापासून sorry म्हणालो ना… विसरून जा ते…

मानसी- सौरभ तू जे बोललास ते परत बोल.

सौरभ- म… मी म्हणालो की तू माझी बायको नाहीयेस तर हो मग…

मानसी- आणि काय करू? तुला जेलमध्ये रोज टिफिन घेऊन येऊ?

सौरभ हे ऐकून चक्रावला.

सौरभ- जेल? म्हणजे?

मानसी- म्हणजे तुझी एक बायको असताना… ती पण अंकिता सारखी माथेफिरू असताना तू दुसरं लग्न केल्यावर तुला पोलीस उचलून नेणार नाहीत का? मग अंकिता तुला डबा देणार नाही. तेव्हा मलाच रोज जेलमध्ये डबा घेऊन यावं लागेल ना?

सौरभ- अच्छा तसं होय.

मानसी- येस, तसं आहे म्हणून आपलं लग्न होऊ शकत नाही. नको ती स्वप्नं पाहू नको. तू ड्रिंक काय घेणार सांग. मला एक ६० चालेल अजून.

असं म्हणून ती बारजवळ गेली. सौरभ अचानक म्हणाला-

सौरभ- आणि जर अंकिता माझ्या लाईफमध्ये नसेल तर?

हे ऐकून मानसी वळून म्हणाली-

मानसी- What? तू काय बोलतो आहेस कळतंय ना तुला?

सौरभ- हो… मला कळतंय मी काय बोलतोय ते. अंकिता आणि माझ्यात आता नवरा-बायको सोडून कोणत्याही प्रकारचं काहीच नातं नाहीये. आम्ही फक्त एका घरात राहतो कारण माझ्याकडे दुसरं घर नाहीये. मी तिला डिव्होर्स देईन आणि तुझ्याशी लग्न करेन.

मानसी- नाही सौरभ. मी तुझा संसार मोडायचं पान माझ्या डोक्यावर घेणार नाही.

सौरभ- जे आधीच मोडलेलं आहे ते मोडायचं श्रेय तुला तसंही मिळणार नाहीये. पण तू नाही म्हणालीस तर मी मोडून जाईन. माझं प्रपोजल accept करून मला न मोडू द्यायचं श्रेय मी तुला नक्की देईन.

मानसी- पण सौरभ…

सौरभ तिच्या जवळ गेला. तिचे हात हातात धरून म्हणाला-

सौरभ- Do you love me or no? I know you do. मी त्या दिवशी तुझ्या स्पर्शात, तुझ्या मिठीत, तुझ्या किसमध्ये ते अनुभवलं आहे. तुझ्या मनात प्रेम आहे माझ्याबद्दल हे मला जाणवलं आहे. तुझ्या प्रत्येक भेटीत, तुझ्या प्रत्येक शब्दात, तुझ्या प्रत्येक वागण्यात आणि मी तुला मिस करण्यात. I love you, Manasi. Will you marry me?

मानसी- पण अंकिता?

सौरभ- I promise I will divorce her… I promise you a marriage. Will you marry me, मानसी? Please… मी वेड्यासारखा प्रेम करतो तुझ्यावर. तुला सतत मिस करतो. तुला भेटल्यावर आपली भेट संपूच नये असं मला वाटतं. तू माझा आधार आहेस, तू माझा confidence आहेस… माझी बायको होशील मानसी? I love you…

मानसीने डोळे बंद करून घेतले होते. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. मानसी म्हणाली-

मानसी- I love you सौरभ…

सौरभने तिच्यासाठी आणलेली चेन अलगद तिच्या गळ्यात घातली.

सौरभ- माझ्याकडून ही लहानशी भेट. Happy birthday wife…

त्याच्या तोंडून ते शब्द ऐकून मानसीने त्याला घट्ट मिठी मारली…. त्या रात्री दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. खिडकीबाहेरचा चंद्र मात्र शांतपणे त्या दोघांकडे पाहत होता. सौरभने दिलेलं वचन मानसीला त्या क्षणी खरं वाटत होतं… पण त्या वचनाच्या मृगजळामागे हतबलपणे धावणाऱ्या मानसीचं खरं भवितव्य मात्र त्या चंद्राला आधीच दिसत होतं!

क्रमश:

पुढील भागाची लिक- मृगजळ — भाग १०

मृगजळ सर्व भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा- मृगजळ- सर्व भाग

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. MandarJOG.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

One thought on “मृगजळ भाग ९”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!