गुंतता हृदय ही मराठी दीर्घकथा मंदार जोग

…….. तिचं हे वाक्य ऐकून तेजस खुश झाला. त्याने रस्त्यावरची नजर हटवून मुग्धाकडे बघितलं. त्याच वेळी त्यांच्या गाडीपासून काही अंतरावर असलेल्या एका टेम्पोच्या दिशेने त्यांची गाडी ताशी दीडशे किलोमीटर वेगाने जात होती. तेजस आणि मुग्धा एकमेकांच्या डोळ्यांत हरवले होते. इतक्यात मुग्धाचं लक्ष रस्त्यावर गेलं. ती जोरात, “तेजस… गाडी!” असं किंचाळली. एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून तेजसचा पाय ब्रेकवर दाबला गेला. त्याने जोरात hand brake ओढला. तरीही त्याच्या ७ सिरीज BMWचं अजस्त्र धूड त्या टेम्पोवर मागच्या बाजूला आदळलं. वेग फार नव्हता. पण त्या धक्क्याने airbags बाहेर आल्या. गाडीचं मोठं नुकसान झालं, पण तेजस आणि मुग्धाला खरचटलं देखील नाही. त्या धक्क्यातून सावरलेल्या तेजसने काही सेकंदांनी डोळे उघडले. शेजारी बसलेल्या मुग्धाने मान टाकली होती. ते पाहून तेजस घाबरला. तिला हलवून उठवू लागला. मुग्धा बेशुद्ध होती. अपघातानंतर जमलेल्या लोकांच्या मदतीने तेजस बाहेर आला. त्याने मुग्धाला बाहेर काढून आपला कोट रस्त्यावर पसरला आणि मुग्धाला त्यावर झोपवलं व ॲम्ब्युलन्सला फोन केला.

ॲम्ब्युलन्समध्ये मुग्धा निपचित पडून होती. तेजस तिचा हात हातात घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता.

तेजस – तुला काय झालंय मुग्धा? उठ ना प्लीज मुग्धा….

तेजस खूप टेन्स होता आणि मुग्धा मात्र बेशुद्ध होती. शरीरावर एक ओरखडाही नव्हता, पण तिची शुद्ध हरपली होती. ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलच्या पोर्चमध्ये आली. तिथे तेजसचे manager, PA, पोलीस ही मंडळी आधीच पोहोचली होती. मीडियाचे लोक कॅमेरे सरसावून उभे होते. त्यांना “शहरातील एका धनदांडग्याने बेदरकारपणे गाडी चालवून ठोकली” अशी ब्रेकिंग न्यूज मिळाली होती. Ward boysनी मुग्धाला स्ट्रेचरवर घेतलं आणि ते आत निघाले. तेजसला मीडिया रिपोर्टर्सनी गराडा घालून प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. त्याच्या manager आणि PAने त्याला रस्ता करून दिला. तेजस आत गेला.

डॉक्टर मुग्धाला तपासत होते. तेजस टेन्स उभा होता. डॉक्टर तिला तपासून बाहेर आले.

तेजस – काय झालं आहे डॉक्टर तिला?

डॉक्टर – काही खास नाही. Accident च्या धसक्याने बेशुद्ध पडल्या असाव्यात. तरी आम्ही सर्व टेस्ट करतो. एक दिवस under observation ठेवतो. पण काळजी करण्यासारखं काही नाहीये. त्या दहा मिनिटांत शुद्धीवर येतील. आम्ही drips लावले आहेत.

हे ऐकून तेजसच्या जीवात जीव आला. त्याने घड्याळ पाहिलं. आठ वाजले होते. त्याने PAला मुग्धाच्या घरी जाऊन अमेयला त्याच्या घरी सोडायला सांगितलं. PA गेला. (वाचक आयांनो, बघा हा मुलाची काळजी आहे मला. 😊) तेजस सुन्न होऊन बसून राहिला. इतक्यात त्याला दांडेकर काकूंचा फोन आला.

तेजस – बोल आई.

काकू – हे काय ऐकते आहे मी? तू बरा आहेस ना? काय झालं नक्की?

तेजस – हो आई. मी बरा आहे. काळजी नको करू.

काकू – पण तू आहेस कुठे? टीव्हीवर फक्त आपली गाडी दाखवत आहेत.

तेजस – मी हॉस्पिटलमध्ये आहे.

काकू – (घाबरून) अजून हॉस्पिटलमध्ये? का? बरंच लागलं आहे का तुला?

तेजस – मला नाही, मुग्धाला.

काकू – (आश्चर्याने) कोण मुग्धा? आणि तिला कसं लागलं? तू उडवलंस का कोणाला?

तेजस – (चिडून) नाही आई. ती माझ्या बरोबर गाडीत होती.

काकू – काय? आणि तुम्ही दोघे हायवेवर इतक्या लांब कशाला गेला होतात?

तेजस – (पूर्ण चिडून) आई प्लीज. नको प्रश्न विचारू. मी घरी आलो ना की सांगतो सगळं. ओके? ठेव आता. आणि हो, मुग्धाचा मुलगा अमेय आज आपल्या घरी राहील.

काकू – का?

तेजस – मी आल्यावर बोलूया का? फक्त अमेयला जेवायला घाल आणि माझ्या रूममध्ये झोपू दे. प्लीज.

काकू – ओके.

तेजसने फोन ठेवला. पोलीस पुढे आले. त्यांनी त्याचा जबाब नोंदवून घ्यायची औपचारिकता आटोपली. त्याच्या PAने कमिशनर साहेबांना सांगून इथल्या पोलिसांना आधीच सूचना दिलेल्या होत्या. तेजस डोकं धरून डोळे मिटून शांत बसला. काही वेळाने नर्स आली आणि म्हणाली—

नर्स – मिस्टर दांडेकर, तुमच्या पेशंट शुद्धीवर आल्या आहेत. तुम्ही त्यांना भेटू शकता.

तेजस उठून घाईत मुग्धाच्या रूममध्ये आला. मुग्धा पडून होती. तेजस शेजारी येऊन बसला.

तेजस – झालं समाधान?

मुग्धा काही बोलली नाही.

तेजस – का ऐकत नाहीस माझं? तुला काही झालं असतं ना, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. थोडा विश्वास ठेव ना माझ्यावर मुग्धा. मला माझी बाजू मांडायचा चान्स पण दिला नाहीस तू. लग्नापासून अशीच हट्टी आहेस तू.

हे वाक्य ऐकून मुग्धाने चमकून त्याच्याकडे बघितलं.

मुग्धा – काय म्हणालात तुम्ही?

तेजस – काय? मी म्हणालो की मला माझी बाजू मांडायचा चान्स पण दिला नाहीस तू.

मुग्धा – नाही. त्या नंतर.

तेजस – काय म्हणालो? मला आठवत नाही. आणि मला शब्दांत नको पकडू प्लीज. आता आराम कर तू. तुला बहुतेक उद्या डिस्चार्ज देतील.

मुग्धा – उद्या? प… पण अमेय घरी एकटा आहे तेजस. मला घरी जायला हवं.

मुग्धा उठून बसू लागली. तेजसने तिला उठू दिलं नाही.

तेजस – मुग्धा, अमेय माझ्या घरी राहील आज रात्री. त्याची काळजी नको करू तू. मी व्यवस्था केली आहे.

मुग्धा – काय? तुमच्या घरी?

तेजस – हो. त्याच्या आईला माझ्यामुळे हॉस्पिटलमध्ये यावं लागलं ना? म्हणून त्याला माझ्या घरी बोलावलं आहे मी. चालेल ना?

मुग्धा – हम्म… थँक्स.

तेजस – आता कसं नॉर्मल बोललीस.

मुग्धा – पण तेजस… आर्या….

तेजसने तिच्या ओठांवर हात ठेवला आणि म्हणाला—

तेजस – मुग्धा, बास आता. प्लीज. उगाच अस्तित्वात नसलेल्या गोष्टी imagine करून स्ट्रेस घेऊ नको. तू आराम कर बघू. मी बाहेर थांबतो.

मुग्धा – तेजस प्लीज. तुम्ही थांबू वगैरे नका. मी ठीक आहे. तुम्ही जा घरी. अमेय तुमच्या घरी कोणाला ओळखत नाही. तुम्ही त्याला भेटा प्लीज. माझी काळजी करू नका.

तेजस – (तिच्या डोक्यावर हात फिरवत) ओके. सकाळी येतो मी. तू आराम कर. ओके?

मुग्धा – ओके.

तेजस तिथून निघाला. हॉस्पिटलच्या बाहेर मीडियावाले त्याची वाट बघतच होते. त्यांनी प्रश्नांचा पाऊस सुरू केला. त्यातील एकाने विचारलं—

रिपोर्टर – दांडेकर साहेब, ऑफिसातल्या बाईला बरोबर घेऊन तुम्ही गाडीत असं काय करत होतात की तुमचं गाडीवरचं नियंत्रण पण सुटलं?

हा प्रश्न ऐकून तेजसची सटकली. त्याने जाऊन त्या पोराची कॉलर धरली आणि म्हणाला—

तेजस – हे तुझ्या बापाला घरी जाऊन विचार. कळलं का भिकारड्या?

तेजसला पोलीस आणि त्याच्या managerनी धरून ठेवलं. तेजसच्या उत्तराने आणि रागाने ते पोरगं क्षणभर भेलकांडलं. तेजस त्याच्या गाडीत बसला. ड्रायव्हरने गाडी सुरू केली. तेजस गेला. ते पोरगं सावरल्यावर कॅमेऱ्यात केकाटू लागलं—

पोरगं – आपण बघितलं की धनदांडगे दांडेकर किती माजोरडे आहेत ते. आपली लफडी लपवायला ते पत्रकारांचा जीव घ्यायलादेखील तयार आहेत. ह्या देशात जोवर असे मुजोर पैसेवाले लोक आहेत, तोवर गरिबांची लूट होत राहणार. मुग्धासारख्या अनेक अबला ह्या श्रीमंत लांडग्यांच्या वासनेची शिकार होत राहणार. ह्यांच्या विरुद्ध समाज आणि सरकारने एकत्र येऊन कारवाई करणं आवश्यक आहे.

टीव्हीवर हे बघत असलेल्या दांडेकर काकांनी उद्विग्न होऊन टीव्ही बंद केला. त्यांनी त्यांच्या समोर बसलेल्या अमेयकडे बघितलं. तो गोंधळलेला होता.

अमेय – आजोबा, तेजस काकांना काय झालं? ते इतके का रागावले आहेत?

काकांनी काकूंना एक लूक दिला आणि ते त्यांच्या रूममध्ये निघून गेले.

अमेय – आजी, आजोबा पण रागावले आहेत?

काकू – नाही रे बाळा. ते दमले आहेत ना? म्हणून झोपायला गेले.

अमेय – मग तू कधी झोपणार?

काकू – तेजस काका आला ना, की मग मी झोपते. पण तू आता आत जा आणि झोप. रेणुका मावशी तुला टीव्ही लावून देतील. तो बघ थोडा वेळ आणि झोप.

अमेय – आई कधी येणार?

काकू – उद्या कळेल हं ते. मी तेजस काकाला विचारून सांगते तुला.

अमेय – माझी स्कूल बस इथे येईल का? आमच्या ड्रायव्हर काकांना इथला पत्ता दिला आहे का?

काकू – नाही. आमचा ड्रायव्हर आणि रेणुका काकू तुला शाळेत सोडतील उद्या. तू जा आणि झोप आता. ओके?

अमेय – ओके आजी. गुड नाईट.

इतकं बोलून अमेय तेजसच्या रूममध्ये गेला. तिथे त्याच्या दिमतीला रेणुकाबाई होत्या. तो गेला आणि दाराची बेल वाजली. तेजस आला. दांडेकर काकूंशी काही न बोलता आपल्या रूमकडे निघाला.

काकू – थांब तेजस.

तेजस थांबला.

काकू – इथे बस माझ्या समोर.

तेजस बसला.

काकू – आज जे झालं ते काय होतं?

तेजस – अपघात… accident. अजून काय?

काकू – आणि तू आणि मुग्धा गाडीतून इतक्या लांब हायवेवर काय करत होतात आणि का? ऑफिसातली एक मुलगी तुझ्याबरोबर गाडीत का होती?

तेजस – आई, मी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये.

इतक्यात मागून दांडेकर काकांचा आवाज आला.

काका – बांधील आहेस तेजस. आम्ही म्हणजे तो रिपोर्टर नाही आहोत, ज्याला शिव्या घालून तू निघून गेलास आणि नंतर ज्याने आपल्या नावाने गलिच्छ आरोप केले.

तेजस – हे असले पत्रकार फालतूच असतात.

काका – हे माहिती असताना त्यांना संधी का देतो आपण? आपलं वागणं चोख का नसतं? तू त्या मुलीला गाडीत घेऊन हायवेवर काय करत होतास? आणि समोर दिसत असलेल्या टेम्पोवर गाडी आपटलीच कशी?

हे ऐकून तेजस चपापला. मग जरा पॉज घेऊन म्हणाला—

तेजस – बाबा, ह्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ इच्छित नाही.

काका – ग्रेट. मग तेजस, दांडेकर ग्रुपचा चेअरमन म्हणून मीदेखील आपलं नाव ज्या मुलीमुळे बदनाम झालं, तिला ऑफिसात ठेवू इच्छित नाही. मी राधिकाला तिला टर्मिनेट करायला सांगितलं आहे. तिला तीन महिन्यांचा salary उद्या दिला जाईल आणि तिला त्यासाठी ऑफिसला यायची गरज नाही. राजीनामा मेल केला तरी चालेल.

हे ऐकून तेजस हादरला. म्हणाला—

तेजस – पण बाबा, ह्यात तिची काय चूक?

काका – तिची चूक एकच आहे, की तिने चुकीचा मुलगा निवडला. मला ती मुलगी खरंच बरी वाटली होती. आधीच्या काही अचानक झालेल्या भेटीत मला आवडली पण होती. पण तुझा तिच्याकडे असलेला झुकाव थोडाफार लक्षात आला आणि आज तर कहर झाला. तेजस, खूप मेहनतीने मी आज हे नाव आणि बाजारात पत मिळवली आहे. ती अशा एखाद्या मुलीच्या पायी घालवणार नाही मी.

तेजस – पण बाबा, ऐका तर….

काका – तू ऐक तेजस. मी आणि तुझ्या आईने तुझं आर्याशी लग्न करायचा निर्णय घेतला आहे.

तेजस – (आश्चर्याने) काय? पण…

काका – तेजस, हा माझा निर्णय आहे. आणि तुला माहिती आहे, मी निर्णय बदलण्यासाठी घेत नसतो. येत्या रविवारी तुमचा साखरपुडा होईल.

तेजस – बाबा, come on…. मला माझा choice तरी विचारा.

काका – तुझा choice मला कळला आहे आणि मला तो अमान्य आहे तेजस. Good night.

काका निघून गेले. तेजस पायातील त्राण गेल्यासारखा सोफ्यात बसला. काकू उठल्या. त्यांनी तेजसच्या केसांतून हात फिरवला. तेजस काही बोलणार, इतक्यात काकूंनी त्याच्या खांद्यावर थोपटलं आणि त्या पण आत गेल्या. तेजस सुन्न बसून होता.

इथे हॉस्पिटलमध्ये मुग्धा शांत झोपली होती. तिला एक स्वप्न पडू लागलं. त्यात एक लग्न दिसू लागलं. खूप लोक होते. त्यात मुग्धा आणि अमेय पण होते. अमेय खुश होता. अंतरपाट धरलेल्या जोडप्यावर मंगलाष्टक सुरू असताना अक्षता उधळत होता. त्याला दिसावं म्हणून मुग्धा त्याला पुढे घेऊन गेली. गुरुजींनी “तदेव लग्नं सुदिनं तदेव” सुरू केलं. मुग्धा आणि अमेय वधू-वरांच्या अगदी जवळ जाऊन उभे राहिले. गुरुजींनी अंतरपाट बाजूला केला. मुग्धाला नवरीचा चेहरा दिसला. लग्न आर्याचं होतं. ती वधूच्या वेशात खूप सुंदर दिसत होती. नवरा-नवरी दोघांनी एकमेकांना हार घातले. मुग्धाने सहज नवऱ्या मुलाकडे पाहिलं. नवऱ्याच्या वेशात प्रशांत उभा होता! ते पाहून मुग्धाच्या अंगावर काटा आला! मुग्धा जोरात ओरडली—

मुग्धा – प्रशांत, हे काय आहे? प्रशांत, तू मला सोडून हे लग्न करू शकत नाहीस. प्रशांत प्लीज… प्रशांत….

इथे हॉस्पिटलमध्ये मुग्धा बेभान झाली होती. अर्धवट शुद्धीत प्रशांतला हाका मारत होती. नर्सेसची धावपळ सुरू झाली. डॉक्टरांना पेशंटला attack आल्याचा कॉल गेला. मुग्धाला गुंगीच्या औषधाचं इंजेक्शन देण्यात आलं. मुग्धा बेशुद्ध झाली. त्याच वेळी तिच्या रूमच्या बाहेर खिडकीजवळ असलेल्या झाडाच्या पानांची सळसळ झाली. त्या झाडावरून काहीतरी पांढरी आकृती उडून जात असल्याचा भास एका ward boyला झाला. हॉस्पिटलमध्ये परत शांतता पसरली आणि लांबून बाराचे टोले ऐकू आले. आकाशात चंद्र हसत होता!

क्रमशः

© मंदार जोग

पुढील भागाची लिंक- गुंतता हृदय….(भाग २७)

मागील भागाची लिंक- गुंतता हृदय….(भाग २५)

सर्व भाग एकत्र लिंक- गुंतता हृदय – सर्व भाग

हे पण वाचा-

सख्या रे …

ट्वेंटी थ्री

गुंतता हृदय – सर्व भाग

मृगजळ- सर्व भाग

व्हॅलेंटाईन डे- भाग १

रिफ्लेक्शन भाग १

गब्बर जिंदा है…

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

One thought on “गुंतता हृदय….(भाग २६)”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!