मृगजळ सीझन २ भाग ६- स्थळ आलं.
श्रीरंग मीटिंग रूममधून बाहेर पडला. त्याच्या मागे उमेश होता आणि अंकिता त्याच वेळी क्लासमध्ये आली. श्रीरंग आणि उमेशला तिने बाहेर पडताना पाहिलं. ती श्रीरंगकडे टक लावून बघत होती आणि श्रीरंग तिच्याकडे..तिला पाहून श्रीरंग दोन क्षण थबकला आणि मागे वळून उमेशला म्हणाला-
श्रीरंग- thank you उमेश सर. मी कळवतो admission चं.
हे बोलून अंकिताकडे एक कटाक्ष टाकून तो निघून गेला. पाठमोऱ्या श्रीरंगकडे बघत अंकिताने विचारलं-
अंकिता- कोण होते हे?
उमेशला क्षणभर काय बोलावं सुचेना. पण श्रीरंगच्या हो मध्ये हो मिळवत तो म्हणाला-
उमेश- parent…मुलाच्या admission साठी चौकशी करायला आले होते. मी दिली सगळी माहिती. पण mam तुम्ही का आलात? आराम करायचा ना?
अंकिता- नाही हो सर. माझं मन घरात लागतंच नाही. क्लास म्हणजेच माझ्यासाठी आराम आहे.
उमेश- ठीक आहे. पण तुम्ही फक्त ऑफिसमध्ये बसायचं आहे. आज शिकवायचं नाहीये.
अंकिता- पण सर…
उमेश- नाही म्हणजे नाही. ऐकणार नाही का माझं?
हे त्याने इतक्या प्रेमाने विचारलं की अंकिता नाही म्हणू शकली नाही.
मानसी ऑफिसमध्ये कॉफीचा मग हातात धरून काचेबाहेर बघत होती. समोर आकाशात एक विमान दिसलं आणि तिला रंगाची आठवण आली. रंगाचं बोलणं आठवलं. तिच्या एका होकारावर ती त्याच्या बरोबर अश्याच एका विमानात बसून पटकन साता समुद्रापलीकडे अमेरिकेत जाऊन राहू शकत होती. आता तिच्या डोक्यावर कोणत्याही जबाबदाऱ्या नव्हत्या. फक्त आदित्यचं लग्न हे एक कर्तव्य बाकी होतं. त्यासाठी ती वेळ पडेल तेव्हा परत येऊ शकली असती. अजूनही ती मनाने आणि शरीरानेही तशी तरुण होती. समोर जवळ जवळ अर्ध आयुष्य उभं होतं. तिचा एक निर्णय तिला एका वेगळ्याच दुनियेत नेऊ शकत होता. पण…पण सौरभबरोबर invest केलेली ती बारा वर्षं, त्याच्याबरोबर असलेलं नातं आणि तिचं त्याच्यावर असलेलं प्रेम आणि त्याच्या शब्दावर अजूनही असलेला तिचा विश्वास तिला मागे ओढत होते. सौरभ आपल्याशी लग्न नक्की करेल ही आशा, त्याच्याबरोबर लग्नाची तिने बारा वर्षं रंगवलेली आणि आता थोडी fade झालेली असंख्य स्वप्नं सौरभ की रंगा ह्या तिच्या मनात क्वचित निर्माण होणाऱ्या तुलनेत सौरभचं पारडं जड करत होती. डोळ्यात आलेले अश्रू तिने पुसले आणि ती आपल्या डेस्कवर आली. डेस्कवर आली इतक्यात तिला तिच्या बहिणीचा फोन आला.
मानसी- हेलो…बोल ताई…
ताई- मनू, ऐक एक गोड बातमी आहे.
मानसी- (चिडवत) काय सांगतेस? मी परत मावशी बनणार आहे?
ताई- मार खाशील हा फाजीलपणा केलास तर.
मानसी- ए काय ग ताई. जरा गम्मत केली मी. सांग काय बातमी आहे?
ताई- ह्यांनी तुझ्यासाठी एक स्थळ आणलं आहे.
हे ऐकून मानसी सिरीयस झाली.
मानसी- स्थळ? म्हणजे?
ताई- म्हणजे तुझ्या लग्नासाठी मुलगा आणला आहे. वकील आहे. चांगली प्रॅक्टिस आहे. स्वतःचं घर, गाडी आहे. त्याची मुलगी लग्न करून जर्मनीमध्ये सेटल आहे. बायको चार वर्षांपूर्वी गेली. तुझ्याहून पाच वर्षांनी मोठा आहे. पण दिसायला अजूनही एकदम तरुण आहे. हाफ marathon वगैरे धावतो. मी फोटो पाठवते तो बघ. एकाच मिनिट…
मानसी- पण ताई…
तोवर ताईने फोटो पाठवला देखील.
ताई- आधी तो फोटो बघ.
मानसी- ताई अग…
ताई- फोटो बघ म्हणाले ना?
मानसीने नाईलाजाने फोटो पाहिला.
ताई- कसा आहे?
मानसी- चांगला आहे पण…
ताई- आवडला ना तुला? बास. हे पण तेच म्हणत होते की मानसीला पसंत पडला की बाकी काळजी नाही. ह्यांच्या ओळखीतला आहे. निर्व्यसनी आहे. प्रेमळ आहे. तू सुखात राहशील मानू. उद्या तुला बघायला येणार आहे.
मानसी- ताई प्लीज…मला नाही लग्न वगैरे करायचं.
ताई- का? त्या सौरभसाठी आयुष्यभर वाट बघायची आहे का? तो कधीही लग्न करणार नाहीये तुझ्याशी.
मानसी- ते माझं मी बघेन.
ताई- नाही मनू. ह्यावेळी नाही. ह्यावेळी मी आणि ह्यांनी ठरवलं आहे की काहीही झालं तरी तुझं लग्न लावून द्यायचं. आमची पण काही जबाबदारी आहे ना? तू अशी एकटी राहतेस ते आम्हाला पटत नाही.
मानसी- पण ताई…
ताई- अजिबात ऐकणार नाहीये मी तुझं. उद्या आम्ही त्यांना घेऊन तुझ्या घरी येतोय. छान तयार हो. आम्ही ६ वाजता येतोय बरोब्बर. आणि माझं ऐकलं नाहीस तर आम्ही परत तुझ्याशी बोलणार नाही हे लक्षात ठेव.
इतकं बोलून ताईने फोन कट केला. मानसी दोन्ही हातात डोकं धरून बसून राहिली. तिला आता एकूणच हे प्रेशर सहन होत नव्हतं आणि सर्वात जास्त राग येत होता तो सौरभचा. कारण तिच्या त्रासाचं कारण सौरभ होता आणि तरीही त्या सगळ्या त्रासात तो अलिप्त होता. तिच्या बरोबर किंवा तिच्या बाजूने नव्हता. तिने रागानेच सौरभला फोन लावला.
मानसी- माझं लग्न ठरतंय.
सौरभ- हे काय नवीन नाटक आता?
मानसी- नाटक? तुला लग्न हे नाटक वाटत असेल. पण ताईने माझ्यासाठी खरंच एक मुलगा शोधला आहे. तो उद्या मला बघायला येतोय.
सौरभ- अरे वा. मस्तच की मग. करून टाक लग्न.
मानसी- आणि आपलं काय?
सौरभ- आपलं काय? आपलं सुरूच राहील. आता आहे तसं.
मानसी- तुला लाज नाही वाटत हे असं बोलायला?
सौरभ- तुला लाज नाही वाटत माझ्यावर प्रेशर टाकायला काहीतरी नवीन आयडिया काढायला?
मानसी- म्हणजे तू ह्यात काहीही करणार नाहीस ना?
सौरभ- मी काय करणार? तुला मुलगा बघायला येतोय ना? तू reject कर. मी काय करणार त्यात?
मानसी- आणि reject करून काय करू? तुझ्या मागे धावत राहू?
सौरभ- हे बघ तुला माझा प्रॉब्लेम काय आहे माहित्येय. सकाळी तर तू नीट होतीस. आता परत हे नवीन नाटक सुरू केलं आहेस.
मानसी- प्रॉब्लेम फक्त तुलाच आहेत ना? मला नाही. मी अशीच आहे अव्हेलेबल तुला हवी तेव्हा.
सौरभ- ए मानसी हे जरा जास्त बोलते आहेस तू.
मानसी- जास्त नाही खरं बोलते आहे मी. तुझ्या बायकोशी तुझं भांडण झालं आहे, ती तुला सुख देत नाही म्हणून मग माझ्याकडे येतोस. आज रात्री पण त्यासाठीच येणार होतास. बरोबर ना?
सौरभ- अच्छा? अग जा. मला त्यास्तही तुझी गरज नाही. काल रात्रीच मी आणि अंकिताने…
हे बोलून आपण काय बोलतोय हे लक्षात येऊन सौरभ थांबला. पण मानसीने ते ऐकलं होतं आणि ती प्रचंड शॉक झाली होती.
मानसी- काय? तू काय म्हणालास?
सौरभ- क…कुठे काय?
मानसी- तू आणि अंकिताने काल रात्री काय केलंत? सांग सौरभ…
सौरभ- आम्ही क..काय…काय करणार आम्ही? आ..आम्ही भांडलो…काल खूप भांडलो आम्ही…
मानसीला आता सहन होत नव्हतं. ती जवळजवळ ओरडली-
मानसी- सौरभ खरं बोल….
हे ऐकून ऑफिसमधले सगळे उठून तिच्याकडे बघू लागले. ते लक्षात आल्यावर तिने आवाज खाली घेत रागाने थरथरत विचारलं-
मानसी- सौरभ तू आणि अंकिता काल…did you sleep with her?
सौरभ- न..नाही मानसी…तसं काही नाहीये…माझा तो हेतूच नव्हता…पण …
मानसी- पण काय सौरभ…
सौरभ- प्लीज यार…तू जास्त चौकश्या करू नको. मी काही पाप केलेलं नाही. It was a moment…it has passed…
मानसी- माझ्याशी कमिटेड असून दुसऱ्या बाईबरोबर तू झोपलास आणि ते पाप नाही म्हणतोस?
सौरभ- बास मानसी…ती दुसरी बाई वगैरे नाहीये. ती बायको आहे माझी आणि बायकोबरोबर intimate होणं पाप नाहीये.
हे ऐकून मानसीला आपलं डोकं फुटून मेंदू बाहेर येतो की काय असं वाटू लागलं. तिने रागानेच फोन कट केला. उठून धावत लेडीज रूममध्ये ती गेली आणि हमसाहमशी रडू लागली.
इथे श्रीरंग उमेशची वाट बघत होता. उमेश आला.
उमेश- हाय..
श्रीरंग- हाय..बस ना…
उमेश- हो बसतो. पण माझ्याकडे वेळ कमी आहे. फक्त पंधरा मिनिटं आहेत. माझा पुढचा क्लास आहे पंधरा मिनिटांनी.
श्रीरंग- प्रेम एक्स्प्रेस करायला पंधरा सेकंद पण खूप असतात. आपल्याकडे तर पंधरा मिनिटं आहेत.
हे ऐकून उमेश चकित होत म्हणाला-
उमेश- प्रेम? म्हणजे?
श्रीरंग- सांगतो. तू काय घेणार सांग आधी.
उमेश- black coffee.
श्रीरंग- ग्रेट. (वेटरला) दोन black coffee प्लीज. (उमेशकडे वळून) आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून let me come straight to the point. माझं नाव श्रीरंग. मी अमेरिकेत असतो. सध्या भारतात एका matter मध्ये अडकलो आहे. आणि त्याचा तू पण पार्ट आहेस हे लक्षात आल्यावर तुझ्याशी बोलतोय मी.
उमेश- matter? म्हणजे? तुम्ही वकील आहात का?
श्रीरंग- नाही. Matter म्हणजे मराठीत काय बरं म्हणतात…ते म वरूनच आहे…
उमेश- मामला…
श्रीरंग- right. मामला आहे आणि तो पण प्रेमाचा.
उमेश आणखीच कन्फ्युज झाला.
उमेश- प्लीज तुम्ही जरा नीट सांगता का? हे फार confusing होतंय.
तेवढ्यात वेटरने कॉफी आणून ठेवली. श्रीरंग कॉफीचा एक सिप घेत म्हणाला-
श्रीरंग- घे ना. तू पण कॉफी घे. तर हा मामला तुझ्या अंकिता madam चा आहे.
अंकिताच्या प्रेमाचा मामला आहे हे ऐकून उमेशच्या हृदयात एक हलकी कळ आली.
उमेश- (हताश चेहऱ्याने) a…अंकिता madam च्या प्रेमाचा मामला म्हणजे तुम्ही आणि अंकिता madam…
श्रीरंग जोरात हसून म्हणाला-
श्रीरंग- नाही रे बाबा. अंकिताच्या love story चा हिरो तूच आहेस. पण आपल्या दोघांच्याही love story चा व्हिलन एक आहे.
हे वाक्य ऐकून उमेश थोडा गोंधळला, थोडा खुश झाला, थोडा लाजला देखील. त्याच्या चेहऱ्यावर ते सगळे भाव दिसत होते. ते पाहून श्रीरंगला गम्मत वाटली.
श्रीरंग- उमेश तू खरंच खूप चांगला मुलगा आहेस. मनाने एकदम साफ. आणि तुझ्या मनात goodness बरोबरच अंकिताबद्दल प्रेम पण आहे हे मला माहित्येय.
हे ऐकून उमेश घाबरला.
उमेश- अ..अहो क..काहीही काय बोलताय? Madam आणि मी..
श्रीरंग- हो madam आणि तू…तुमचं जमू शकतं. पण मला खरं सांग अंकिता स्वभावाने खरंच वाईट आहे का?
उमेश- नाही हो…madam खूप चांगल्या आहेत. त्यांचा दोष हा आहे की त्या फटकळ आहेत. जे मनात येईल ते पटकन बोलून जातात. आणि रागीट पण आहेत. पटकन रागावतात, irritate पण फार पटकन होतात. पेशंस नाहीये त्यांच्यात. त्यांची भाषा अनेकदा चुकते. पण त्यांचं मन साफ आहे. फक्त एक दोष म्हणता येईल असा आहे त्यांच्यात.
श्रीरंग- काय?
उमेश- आता बर्याच प्रमाणात कमी झाला असला तरी त्यांच्यात इगो खूप आहे…किंवा होता असं म्हणू आपण. त्यामुळे त्या जरा self centered वाटू शकतात. पण त्या दयाळू आहेत, खूप हुशार आहेत, कर्तृत्ववान आहेत. हा सगळा क्लासचा डोलारा त्यांनी स्वतःच्या हातांनी उभा केला आहे. मला वाटतं त्यांची घरची financial कंडीशन चांगली नसताना त्यांनी क्लास सुरू करून घर सांभाळलं आहे. Madam खूप चांगल्या आहेत आमच्या.
श्रीरंग- आणि म्हणूनच तुला आवडतात. दिसायला पण छान आहे अंकिता, जरा नीट काळजी घेतली तर. मी मगाशी निघताना आली तीच अंकिता ना?
उमेश- हो सर…
श्रीरंग- जोडी छान आहे तुमची दोघांची.
उमेश- काय उपयोग सर. Madam married आहेत. आमचा नंबर पुढल्या जन्मी लागणार.
श्रीरंग- नाही. ह्याच जन्मी लागू शकतो. तिचा नवरा सौरभ आणि अंकिताचं पटत नाही एकमेकांशी. त्या सौरभचं अफेयर आहे बाहेर.
हे ऐकून हादरलेला उमेश म्हणाला-
उमेश- हे..हे काय सांगताय तुम्ही?
श्रीरंग- हो. आणि ते पण माझ्या मैत्रिणीशी जिला त्याने बारा वर्षं लग्नच प्रॉमिस करून झुलवत ठेवली आहे.
उमेश- ओह…बापरे. आणि हे madam ना माहित आहे?
श्रीरंग- नाही सगळं नाही. पण त्याचं अफेयर आहे आणि ते मानसीबरोबर आहे ह्याच्या संशयातूनच त्या दोघांचं भांडण झालं आणि drift निर्माण झाली.
उमेश- ओह…
श्रीरंग- सौरभ डबल गेम खेळतोय. अंकिताला सोडत नाहीये आणि मानसीला पण लटकावून ठेवलं आहे त्याने.
उमेश- आणि मानसी तुम्हाला आवडते. Right?
श्रीरंग हसून म्हणाला-
श्रीरंग- हुशार आहेस. Yes. मानसी मला आवडते आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. पण सौरभचं भूत तिच्या डोक्यातून उतरायला हवं.
उमेश- hmm…पण ह्या सगळ्यात मी काय करू शकतो?
श्रीरंग- तू अंकिताशी लग्न करशील ना नक्की? की तू पण सौरभ नंबर २ बनशील?
उमेश- मी ह्या क्षणी पण लग्न करेन madam तयार असतील तर.
श्रीरंग- ती जबाबदारी माझी.
उमेश- पण मला एक कळत नाहीये. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे madam आणि माझं जमलं आणि लग्न पण झालं तर मानसीचा आणि सौरभचा लग्नाचा मार्ग मोकळा होईल की आपोआप. तुमचा पत्ता कट होईल.
श्रीरंग- माझा पत्ता डावात कधीच नव्हता आणि नाहीये. त्यामुळे तो कट व्हायचा प्रश्नच नाही. माझे तीन हेतू आहेत. नीट ऐक. पहिला म्हणजे सौरभ अंकिताची फसवणूक करतोय. तुझ्याकडून जे ऐकलं त्यामुळे तर माझी खात्री झाली आहे की तिच्यात काही flaw असले तरी she doesn’t deserve this. She deserves you who loves her. दुसरा हेतू मानसीला सौरभशी लग्न करायची पूर्ण संधी मिळवून द्यायची. आणि ती मिळाल्यावर देखील ती नाकारून जर मानसी माझ्याकडे आली तरच तिच्याशी लग्न करायचं. कारण मला तिचा ऑप्शन नाही तर चोइस बनायचं आहे. आणि जर पहिले दोन्ही प्लान सक्सेस झाले तर तिसरा हेतू म्हणजे दोन बायकांना फसवणाऱ्या सौरभसारख्या नालायक माणसाला punish करायचं.
उमेश- हम्म…बरोबर बोलताय तुम्ही…माझी तयारी आहे. मला madam शी लग्न करायचं आहे. तुम्ही सांगा मी काय करायचं ते. आपण करू. बरं मी निघू आता. माझा क्लास आहे.
श्रीरंग- ओके..बाय..बोलूच आपण…
उमेश निरोप घेऊन निघून गेला. श्रीरंग पुढे काय ह्याचा विचार करत होता. इतक्यात त्याला मानसीचा फोन आला.
श्रीरंग- बोल…
मानसी- ताई माझं लग्न ठरवते आहे. उद्या मुलगा येतोय मला बघायला.
श्रीरंग- what? तुला करायचं आहे का ते लग्न?
मानसी- नाही..
श्रीरंग- बास तर मग. मी आहे ना. काळजी नको करू. मी बघतो काय करायचं ते. ये शादी नही होगी. ओके?
मानसी- हम्म…बाय…
मानसीने फोन कट केला. तिला मगाशी सौरभ जे म्हणाला ते आणि आता श्रीरंग जे बोलला ते दोन्ही आठवत होतं. तिने बेसिनमध्ये चेहऱ्यावर पाणी मारलं आणि समोर आरशात पाहिलं तर तिला तिच्या एका बाजूला उभा असलेला सौरभ आणि दुसऱ्या बाजूला उभा असलेला श्रीरंग दिसत होते. तिची प्रचंड द्विधा मनःस्थिती आता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती.
क्रमश:
पुढील भागाची लिंक- मृगजळ सीझन २ भाग ७ – मानसीचे कांदेपोहे
आधीच्या भागाची लिंक- मृगजळ सीझन २ भाग ५- रंगाची चाल
पहिल्या सीझनच्या सर्व भागांची लिंक- मृगजळ- सर्व भाग
हे पण वाचा-
आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा
आमच्या लघुकथा लघुकथा
माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख
आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण
