मृगजळ सीझन २ भाग ४
सौरभ अंकिताकडे बघत तिच्या जवळ जाऊ लागला. त्याने पुढे होत तिला मिठी मारली. आज अनेक वर्षांनी सौरभ आणि अंकिता एकमेकांच्या जवळ आले होते. अंकिताच्या अंगातून विजेचा झटका लागावा असं काहीतरी होऊ लागलं. तिचा टॉवेल गळून पडला. सौरभने तिच्या ओठांवर ओठ टेकवत तिला जवळ घेतली तेव्हा तिचा फोन वाजत होता. त्यावर उमेश सर असं नाव डिस्प्ले होत होतं. अंकिता काही क्षण सौरभच्या मिठीत हरवली आणि एका क्षणी काहीतरी जाणीव होऊन तिने सौरभला मागे ढकलून दिला. सौरभ बेडवर पडला. अंकिता आपला टॉवेल अंगाभोवती घट्ट धरून म्हणाली-
अंकिता- सौरभ तू प्लीज बाहेर जा…
सौरभ- पण…
अंकिता- मी म्हणाले ना सौरभ…तू बाहेर जा…लगेच बाहेर जा तू…
सौरभ चिडून बाहेर निघून गेला. अंकिता त्राण गेल्यासारखी बेडवर बसली. सौरभची ती हवीहवीशी वाटणारी मिठी आठवून तिला रडू आलं. पण नंतर सौरभ जे वागला होता ते आठवून तिने त्याला जवळ येऊ न देण्याचा जो निर्णय घेतला होता तोच योग्य होता असं वाटून तिने डोळे पुसले आणि ती शांत बसली. इतक्यात तिचा फोन परत वाजला. परत उमेश सर नाव दिसत होतं. सौरभच्या नादात तिने उमेशचा फोन घेतला नव्हता आणि काहीतरी महत्त्वाचं काम असेल हे लक्षात घेत तिने घाईत फोन घेतला. सर्व विचारांच्या गर्दीत आणि फोन घेण्याच्या घाईत तिला लक्षात आलं नाही की तो व्हिडीओ कॉल होता. ती टॉवेल गुंडाळून होती आणि उमेशने क्लासतर्फे मुलांना देण्याच्या bags चे ऑप्शन दाखवायला तिला व्हिडीओ कॉल केला होता. अंकिता फोन कानाला लावून म्हणाली-
अंकिता- बोला सर..sorry हा तुमचे दोन कॉल मिस झाले.
उमेशला समोर अंधार दिसत होता. आश्चर्य वाटून उमेश म्हणाला-
उमेश- हेलो madam मला काहीच दिसत नाहीये.
अंकिता कन्फ्युज होत म्हणाली-
अंकिता- का लाईट गेलेत का?
उमेश- नाही…कदाचित तुमच्या इथे गेले आहेत.
अंकिताने आजूबाजूला पाहिलं. दिवा आणि पंखे सुरू होते.
अंकिता- नाही. इथे लाईट गेलेले नाहीत.
उमेश- मग इतका अंधार का आहे?
अंकिताला आवरायचं होतं. फोन हातात धरून बसण्याऐवजी स्पीकरवर ठेवून बोलावं असं वाटून तिने फोन कानापासून लांब नेला आणि स्पीकरचं बटण दाबण्यासाठी स्वतःच्या समोर धरला. तसं केल्यावर तिला व्हिडीओ कॉल लावलेला उमेश समोर दिसला. उमेशला खांद्याखाली टॉवेल गुंडाळलेली, आत्ताच आंघोळ करून येऊन निथळत असलेली अंकिता दिसली. काही क्षण दोघांनाही नक्की काय होतंय ते कळलं नाही. ज्या क्षणी अंकिताच्या ते लक्षात आलं त्या क्षणी तिने फोन बेडवर फेकला आणि ती बाथरूममध्ये पळाली. उमेशने पण घाबरून फोन कट केला. दोघांचेही हृदयाचे ठोके वाढले होते. उमेशला नक्की काय दिसलं असेल ह्या भीतीने अंकिता बाथरूममध्येही आपला टॉवेल अंगाभोवती घट्ट लपेटून होती. आणि इथे उमेश आपल्याला जे काही दिसलं ते कसं शक्य आहे? Madam आपल्यावर चिडल्या असतील का ह्या भीतीमध्ये होता आणि कुठेतरी back of the mind त्याला फोनवर पाहिलेलं अंकिताचं ओलं रूप आठवून काहीतरी होतं पण होतं.
सौरभ गच्चीवर येऊन फ्रस्ट्रेट होऊन सिगारेट ओढत उभा होता. त्याच्या मिठीत आलेली अंकिता काहीही करून त्याच्या मनातून जात नव्हती. त्यात मानसीला फोन लागत नव्हता. तिने block केल्याचं त्याच्या लक्षात आलं होतं. त्याची जाम चिडचिड होत होती. त्याने रागातच परत मानसीला फोन लावला. पण ब्लॉक असल्याने फोन लागू शकला नाही. तो सिगारेट फेकून घरात आला. इतक्यात अंकिता पण बेडरूममधून चेंज करून बाहेर आली. दोघांची नजरानजर झाल्यावर अंकिताच्या नजरेत दिसत असलेला राग सौरभच्या नजरेतून सुटला नाही. अंकिता येऊन सोफ्यावर बसली. अस्वस्थ असल्याने उठून उभी राहून काही पावलं चालून परत सोफ्यावर बसली. सौरभ तसाच उभा होता. त्याला निर्विकार उभा असलेला पाहून अंकिताची आणखी चिडचिड झाली. तिला नक्की काय होत होतं हे तीच तिलाच कळत नव्हतं. ती परत उठली आणि रागातच सौरभसमोर येऊन उभी राहिली. त्याच्याकडे रागाने बघत होती. सौरभ मात्र तिच्या shampoo च्या वासात हरवला होता. ती रागातच म्हणाली-
अंकिता- सौरभ तू…तू स्वतःला काय समजतोस?
सौरभ- काय?
अंकिता- तुझी हिम्मत कशी झाली मगाशी तू जे केलंस ते करण्याची?
सौरभ- काय केलं मी जे मी करायला नको होतं?
अंकिता- मगाशी बेडरूममध्ये…तू…तू स्वतःला समजतोस काय? आणि आता काहीच न केल्यासारखा साळसूदपणा दाखवतो आहेस?
सौरभ- (जोरात श्वास घेत डोळे बंद करून) तुझ्या शाम्पूचा वास अजूनही तोच आहे…आपलं लग्न झालं तेव्हा होता तोच…आहा…
हे ऐकून अंकिता थोडी लाजली, आणखी चिडली पण तिला शरीरात एक हलका करंट वाहत असल्यासारखं वाटू लागलं. जवळजवळ बारा पंधरा वर्षांनी सौरभ तिच्या इतका जवळ होता. लग्नानंतरच्या दिवसांचा उल्लेख करून त्याने तिच्या मनातल्या काही तारा अलगद छेडल्या होत्या. तिला काय होत होतं ते तिचं तिलाच कळत नव्हतं. पण सौरभचा राग तर तिला येताच होता. आपण इतके रागावत असताना तो निर्लज्जपणे shampoo चा वास घेतोय ह्याचा तिला आणखी राग आला. की बरं वाटलं? ते तिलाच कळत नव्हतं. पण राग दाखवायला तिने सौरभची कॉलर धरली आणि म्हणाली-
अंकिता- जास्त शहाणपणा करू नको. तुला माहित्येय मी कशाबद्दल बोलते आहे ते. ह्यापुढे परत माझ्या अंगाला हात लावलास ना तर…
सौरभने डोळे उघडले आणि हाताने तिचे केस धरून तिला आपल्या जवळ ओढत म्हणाला-
सौरभ- तर काय? काय करशील? पोलिसात जाशील? केस करशील? की मला मारून टाकशील?
हे बोलताना सौरभ आणि ती एकमेकांच्या इतके जवळ आले होते की सौरभचा श्वास तिच्या चेहऱ्यावर तिला जाणवत होता. सौरभ तिच्याकडे असा काही बघत होता की तिच्या नजरेतला सगळा राग वितळून तिथे लाजणे दिसू लागले. नकळत तिची नजर खाली गेली.
सौरभ- सांग ना काय करशील? हे बघ मी मगाशी केलं ते परत करतो.
असं म्हणून त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकले. आणि अंकिताचा सगळा विरोध गळून पडला. त्याची कॉलर धरणारे हात त्याच्या मानेभोवती विळखा घालू लागले. बारा पंधरा वर्षं ज्या सुखाला ती पारखी झाली होती ते सुख आता तिला हवहवसं वाटू लागलं आणि जणू मधली बारा तेरा वर्षं त्यांच्या आयुष्यात आलीच नाहीत असे सौरभ आणि अंकिता एकमेकांच्या जवळ आले. एका क्षणी सौरभने अंकिताला उचलली आणि दोघे बेडरूममध्ये गेले आणि त्यांनी दार लावून घेतलं. बेडरूमच्या दाराचा बंद झाल्याचा आवाज ऐकून इतावेळ आपल्या रूममधून बाहेर घडणारं सगळं हळूच ऐकत आणि दरवाजा किलकिला करून बघत असलेली सौरभची आई तिच्या बेडरूममधून खुश होत बाहेर आली. तिने देवासमोर दिवा लावला आणि हात जोडून म्हणाली-
आई- देवा आजचा दिवस पाहिला आणि धन्य झाले. आता मी मरायला मोकळी आहे.
ती हे बोलल्यावर गणपतीच्या मूर्तीला वाहिलेलं एक फूल खाली पडलं. ते पाहून सौरभची आई घाबरली आणि म्हणाली-
आई- मी हर्षच्या मुलांची मुंज पाहिल्याशिवाय अजिबात डोळे मिटणार नाहीये. तू मला शब्दात पकडू नको. बाकी आज जे झालंय ते मात्र तसंच राहू दे.
इतकं बोलून तिने देवाला परत नमस्कार केला आणि आपल्या बेडरूममध्ये गेली.
सकाळी अंकिताला जाग आली ती सौरभच्या मिठीत. रात्रभर खरं तर झोप झाली नव्हती. सौरभ गाढ झोपला होता. अंकिता उठून बाथरूममध्ये गेली. तिथे असलेल्या आरशात स्वतःला बघताना तिच्या मनात अपराधीपणा, स्वतःबद्दल राग, चिडचिड ह्याच भावना होत्या. काल भावनेच्या भरात मी इतकी कशी वाहात गेले ह्याचं शल्य कुठेतरी टोचत होतं. रात्रीच्या सुखाचं धुकं विरून गेलं होतं आणि आता तिच्या आयुष्यातलं कुरूप सत्य तिच्या समोर उभं राहून तिला प्रश्न विचारत होतं. ती आरशासमोर उभी राहून ढसाढसा रडू लागली आणि तशीच पुढे जाऊन shower सुरू करून त्याखाली उभी राहून अंगावरून कालची रात्र धुवून टाकायचा प्रयत्न करू लागली!
उमेश सकाळी उठला तोच बेडवरून खाली पडल्यामुळे. म्हणजे पहाटे त्याला स्वप्न पडलं ज्यात अंकिता त्याला व्हिडीओ कॉलवर दिसली होती त्या रूपात दिसली. मग पुढे त्याच्या कल्पनेने ज्या भराऱ्या घेतल्या त्यांच्या बरोबर उडताना तो बेडवरून खाली पडला. डोक्याला थोडं लागलं होतं. पण तो ते स्वप्न आठवून खूप खुश होता. त्या आनंदात असतानाच त्याला हॉस्पिटलमध्ये भेटलेला सौरभ आठवला आणि त्याचं स्वप्न खळकन फुटल्याच्या आवाजाने तो दचकला.
श्रीरंगच्या फ्लाईटमध्ये ब्रेकफास्ट सर्व्ह होत होता. नुकत्याच उगवत असलेल्या सूर्याची कोवळी किरणं खिडकीतून विमानात येत होती. श्रीरंग ह्यावेळी काहीतरी निश्चय करून भारतात येत होता. त्याने मोबाईल काढून त्यात असलेला मानसीचा फोटो पाहिला आणि आळस दिला.
मानसीला जाग आली. तिने गजर बंद केला. उठून रोजच्यासारखी देवाला प्रार्थना केली. तिला नकळत सौरभची आठवण आली. Valentine day ला जे झालं ते आणि त्यानंतर तिने त्याला block केला आहे हे आठवून तिला जरा काळजी वाटली. त्याच्याकडे नक्की काय घडलं असेल, तो ठीक असेल ना? त्यांना माझी गरज असेल का? मी त्याला block करून मूर्खपणा केला आहे असं वाटून तिला प्रचंड अपराधी वाटलं. तिने लगेच त्याचे सगळे block काढले आणि त्याला मेसेज केला, “baby I am sorry..मी रागात तुला block केला. कसा आहेस तू? All okay ना? प्लीज मला फोन कर वेळ मिळाला की. I am really sorry!” तिने मेसेज सेंड केला.
इथे सौरभला नुकतीच जाग आली होती. अंकिता बरोबरचे काल रात्रीचे क्षण आठवून तो खुश होत होता इतक्यात त्याच्या फोनमध्ये notification वाजलं. त्याने फोन घेतला आणि पाहिलं तर मानसीचा मेसेज. त्याने मेसेज वाचला आणि तो मनातून खूप खुश झाला. डोळे मिटून आळस देत असताना त्याच्या डोळ्यासमोर तो स्वतः आणि त्याच्या एका बाजूला मानसी आणि दुसऱ्या बाजूला अंकिता आणि दोघीही त्याला मिठी मारून आहेत असं चित्र दिसत होतं. बाहेर वडाच्या झाडावर बसलेली नियती सौरभ, अंकिता, मानसी, श्रीरंग आणि उमेश ह्या तिच्या पाच कळसूत्रीच्या बाहुल्यांच्या खेळात पुढल्या अंकात काय करायचं ह्याचा विचार करत पारंब्यांना लटकून झोके घेत भीषण हसत होती.
क्रमश:
पुढील भागाची लिंक- मृगजळ सीझन २ भाग ५- रंगाची चाल
मागील भागाची लिंक- मृगजळ सीझन २ भाग ३- आकर्षण
पहिल्या सीझनच्या सर्व भागांची लिंक- मृगजळ- सर्व भाग
हे पण वाचा-
आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा
आमच्या लघुकथा लघुकथा
माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख
आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

खूप छान शब्दांत व्यक्त केले आहे असेच पुढील भागाची वाट पाहत आहे