मृगजळ मंदार जोग मराठी दीर्घकथा

त्या रात्रीनंतर सौरभ आणि मानसीचं आयुष्य पूर्णपणे बदललं. ज्या दोघांमध्ये कोणतंही नातं नव्हतं, त्यांच्यात निव्वळ अंकिताने संशय घेऊन तमाशा केल्यामुळे आता एक अफेअर सुरू झालं होतं. सौरभने तिला लग्नाचं वचन दिलं होतं आणि त्या वचनावर विश्वास ठेवून मानसीने होकार दिला होता.

मानसी आणि सौरभ दोघेही आपापल्या आयुष्यात व्यस्त होते. सौरभच्या घरी आता तशी शांतता होती. हर्षद शिकत होता. अंकिता तिच्या क्लासेसमध्ये बिझी होती. तिच्यात आणि सौरभमध्ये फार संवाद नव्हता. ते कामापुरतं बोलत असत. मानसी आणि सौरभ मानसीच्या घरी भेटत असत. आयुष्य सुरळीत चाललं होतं. अफेअर नसताना आकांडतांडव करणारी अंकिता आता सौरभचं फुल्ल अफेअर सुरू असताना अनभिज्ञ होती. सौरभने अजूनही घरी तिच्यासमोर आजवर कधीच त्याचं आणि मानसीचं अफेअर असल्याचं मान्य केलं नव्हतं. हर्षदला त्यांची मैत्री आहे ह्याची कल्पना होती. पण अफेअर आहे हे मात्र माहीत नव्हतं.

त्यातच दोन वर्षं गेली. मानसी लग्नाबद्दल सौरभला अधूनमधून विचारत असे. पण सौरभ अजून धंदा नीट सेटल नाहीये सांगून वेळ मारून नेत असे. खरा प्रॉब्लेम त्याला अंकिताला डिव्होर्सबद्दल स्पष्ट सांगायची हिंमत नव्हती हा होता. मानसी त्या लग्नाच्या आशेवर नातं टिकवून होती. आणि सौरभ मात्र आपल्या वचनापासून रोज दूर पळत होता.

एक दिवस अचानक सौरभला त्याच्या कॉलेजमधल्या मित्राचा, संदीपचा फोन आला. त्याने फोन घेतला.

संदीप- काय शेठ, ओळखलं का?

सौरभने नंबर पाहिला. Unknown होता.

सौरभ- नाही… कोण?

संदीप- काय राव. गरीबांचा नंबर तुम्ही ठेवत नाही ना. काय करणार?

सौरभ- कोण बोलतंय?

संदीप- ओळख की लेका…

सौरभ- न… नाही… सांगा, आपण कोण बोलताय?

संदीप- मला म्युच्युअल फंडात पैसे टाकायचे आहेत. मग म्हटलं मित्राकडून टाकावे. भेट पण होईल आणि धंदा पण होईल.

सौरभ अचंब्यात पडला.

सौरभ- मित्र? कोण बोलतंय नक्की? राजू का?

संदीप- नाही…

सौरभ- मग कोण आहे? सांग ना यार, प्लीज.

संदीप- सांगतो. पण तू मला भेटून, सगळं समजावून माझी म्युच्युअल फंड गुंतवणूक घेणार का?

सौरभ- अर्थातच… भेटावं लागणारच.

संदीप- मग ठीक आहे. उद्या सकाळची फ्लाईट पकडून गोव्याला ये.

सौरभ- गोव्याला? कोण बोलताय आपण? प्लीज नाव सांगा.

संदीप- अरे बाबा, मी तुझा वर्गमित्र संदीप रेगे बोलतोय. आठवला का?

सौरभ- (आश्चर्याने) संदीप रेगे… म्हणजे तू तो…

संदीप- काळ्या… बोल ना बिनधास्त. अजूनही रंग बदलला नाहीये माझा. पक्का कलर आहे.

सौरभ- चायला… तू गोव्याला कधी गेलास? तू तर कॉलेज नंतर दिल्लीला होतास ना?

संदीप- पंधरा वर्षं झाली. माझ्या बायकोची एक प्रॉपर्टी होती इथे. रोझी ख्रिश्चन आहे, माहीत आहे ना तुला?

सौरभ- हो…

संदीप- तर तिचे आजोबा गोव्याला होते. आईचे वडील. पंधरा वर्षांपूर्वी ते गेले. आणि सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करून गेले. रोझीला गोवा फार आवडतं. ती आधी आली इथे आणि तिने एक लहानसं होमस्टे सुरू केलं. सॉलिड रिस्पॉन्स मिळाला. फिरंगी लोक लई यायला लागले. मग मी पण नोकरी-बिकरी सोडली आणि इथेच आलो. आता आमच्या तीन प्रॉपर्टीज आहेत. एक आमची आणि दोन चालवायला घेतल्या आहेत.

सौरभ- काळ्या, यार, सॉलिड आहे हे.

संदीप- रोझीची कमाल आहे. ती बोलली की आता जरा पैसे इन्व्हेस्ट करू. म्हणून आपल्या मित्रांना फोन केले, तर ते बोलले की सौरभ म्युच्युअल फंड किंग झालाय. मग बोललो, तुझ्याकडेच काढतो ना… तू भले मला लग्नाला वगैरे बोलावलं नाहीस. पण मी धंदा तुलाच देणार.

सौरभ- जास्त बोलू नको. पत्रिका पाठवली होती तुला. तू आला नाहीस.

संदीप- हो यार. मी तेव्हा नेमका दुबईला होतो. तुझं लग्न झाल्यावर दोन वर्षांनी दिल्लीला परत आलो. ते सोड. तू एक काम कर. तू उद्या सकाळची फ्लाईट घेऊन ये. माझ्या रिसॉर्टवर मस्त राहा. इथे फिर, माझे पैसे म्युच्युअल फंडमध्ये टाकून दे आणि परत जा. ए, एक काम करतो का? वहिनीला पण बरोबर घेऊन ये. रोझी खुश होईल तिला भेटून.

सौरभ- उद्या? अरे नाही… असं अचानक शक्य नाही. जरा प्लॅन करावा लागेल.

संदीप- प्लॅन करून काहीच होत नाही. Opportunity अचानक येते. ती सोडली तर निसटून जाते. ते काही नाही. तू उद्या येतो आहेस.

सौरभ- अरे पण…

संदीप- माझा पत्ता मेसेज केलाय. मी आणि रोझी वाट बघतोय. आणि हो, माझे २ कोटी टाकायचे आहेत. आला नाहीस उद्या, तर लोकल एजंट बघून त्याच्यामार्फत इन्व्हेस्ट करून टाकेन मी. बाय…

संदीपने फोन ठेवला आणि दुसऱ्या मिनिटाला त्याचा पत्ता मेसेजमध्ये आला पण.

सौरभला २ कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट हवी होती, पण अंकिताला गोव्याला घेऊन जाणं सोडा, विचारणं पण शक्य नव्हतं. इतकं की तो त्या २ कोटींवर पाणी सोडायला तयार होता, पण अंकिताला विचारायची त्याची इच्छा नव्हती.

सौरभ शांत बसून होता. इतक्यात त्याला मानसीचा मेसेज आला-

मानसी- हाय… काय करतो आहेस?

सौरभने रिप्लाय दिला-

सौरभ- काही खास नाही. का?

मानसी- उद्या मूव्हीला जाऊया का? लास्ट शो? Sat-Sunday सुट्टी आहे ना? म्हणून प्लॅन. मग माझ्याकडेच रहा. Weekend मला खूप बोअरिंग होतात.

हे वाचून सौरभच्या मनात अचानक एक विचार आला.

सौरभ- मी तुला दोन मिनिटांत फोन करतो.

सौरभ बाल्कनीत आला आणि एक सिगारेट पेटवून त्याने फोन केला.

मानसी- काय झालं बेबी? माझी इतकी आठवण येते आहे का? उडून येऊ का मी तुझ्याकडे?

सौरभ- नको. त्यापेक्षा आपण दोघे उडून जाऊया.

मानसी- म्हणजे?

सौरभ- म्हणजे माझा एक जुना मित्र आहे, काळ्या…

मानसी- कोण?

सौरभ- संदीप रेगे… पण आम्ही त्याला काळ्या म्हणतो. त्याची बायको आहे रोझी आणि त्याचं गोव्याला रिसॉर्ट आहे. त्याने मला बायकोबरोबर उद्या तिथे बोलावलं आहे. तो माझ्यामार्फत म्युच्युअल फंडमध्ये २ कोटी गुंतवणार आहे. तू चल माझ्याबरोबर माझी बायको म्हणून.

मानसी- (अस्वस्थ होत) तुझी बायको म्हणून? गोव्याला?

सौरभ- हो… त्यात काय. काळ्या अंकिताला ओळखत नाही. तिचं नावदेखील त्याला माहीत नाहीये. तू टेन्शन नको घेऊ.

मानसी- टेन्शन नाही रे… पण असं अचानक उद्या गोव्याला आणि ते पण तुझी बायको म्हणून… मी त्या संदीपला ओळखत पण नाही आणि…

सौरभ- म्हणून तर चान्स आहे ना? तो तुला ओळखत नाही आणि तू त्याला. ओळख करून देईन तुझी, माझी बायको म्हणून.

मानसी- आणि त्याने कधी अंकिताला पाहिलं तर?

सौरभ- तेव्हा तेव्हा. तू विचार कर ना बेबी… आपण दोघेच असे कुठेच गेलो नाही आहोत. गोवा किती सुंदर जागा आहे. तू, मी, वाईन आणि बीच… किती मजा येईल. मस्त हनिमून होईल आपला. आणि तुला माझी बायको म्हणून सोशलाइज करायची एक प्रॅक्टिस पण होईल.

मानसी- पण…

सौरभ- पण वगैरे काही नाही. उद्या सकाळची तिकिटं काढतोय मी. उद्याची रजा टाक. आजारी पडली आहेस सांग. Sunday night return. ओके?

मानसी- (क्षणभर विचार करून) ओके.

सौरभने खुश होत तिकीट बुक केली. आपण बायकोबरोबर येत असल्याचा मेसेज काळ्याला केला. सौरभ प्रचंड खुश होता. जवळजवळ तीन वर्षांनी तो कुठेतरी बाहेर फिरायला जाणार होता. गोवा ट्रिपमध्ये त्याचा धंदा होणार होता आणि मानसीबरोबर गोव्यात काही छान क्षण घालवता येणार होते. त्याच आनंदात त्याने बॅग भरायला घेतली.

दुसऱ्या दिवशी सकाळी सौरभ आणि मानसी एअरपोर्टवर आले. लगेज चेक-इन करून बोर्डिंग गेटजवळ येऊन बसले. मानसी शांत होती.

सौरभ- काय गं, अशी शांत का? हस की. मस्त गोव्याला जातोय. मजा करणार आहोत.

मानसी- सौरभ… आपलं अफेअर सुरू होऊन दोन वर्षं झाली. तू अंकिताला डिव्होर्स देऊन माझ्याशी लग्न करायचं वचन दिलं आहेस. मला ते लक्षात आहे ना?

सौरभ- मानसी, प्लीज यार… तू सतत तेच बोलून मूड नको ना खराब करू.

मानसी- सतत तेच? सौरभ, दोन वर्षं झाली. तू जर तेव्हाच डिव्होर्स फाईल केला असतास, तर आज तो ग्रँट झालेला असता आणि मी खरोखर तुझी बायको म्हणून गोव्याला आले असते.

सौरभ- तुला इतकं सोपं वाटतं का डिव्होर्स देणं?

मानसी- हो… कारण मी डिव्होर्स दिलेला आहे. मला माहीत आहे, डिव्होर्स म्हणजे काय असतं ते.

सौरभ- तुझी केस वेगळी होती, मानसी. माझी वेगळी आहे. माझ्या घरी हर्षद आहे, त्याचं शिक्षण आहे, माझे नातेवाईक आहेत… तुझ्याइतकं सोपं नाहीये मला.

मानसी- माझाही आदित्य आहे, माझेही नातेवाईक आहेत. तुझे आहेत त्याहून जास्त आहेत. त्यात मी बाई आहे. पण मी दिला ना डिव्होर्स यतिनला? इच्छा आहे तिथे मार्ग आहे.

सौरभ- म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? मला डिव्होर्स द्यायची इच्छा नाहीये? मी तुला खोटं प्रॉमिस देऊन फसवतो आहे? Exploit करतोय?

मानसी- मी असं काहीही म्हणाले नाहीये. मला इतकंच म्हणायचं आहे की तू किमान विषय तरी काढ अंकिताकडे. तिला कळू दे की आपण रिलेशनशिपमध्ये आहोत आणि तुला वेगळं व्हायचं आहे.

सौरभ- इतकं सोपं नाहीये ते, मानसी. आपण अफेअर नसताना तिने काय तमाशा केला माहीत आहे ना? मग आता मीच माझ्या तोंडाने सांगितलं की माझं अफेअर आहे आणि मी तुला सोडणार आहे, तर ती काय करेल ह्याची कल्पना पण करवत नाही.

मानसी- इतकी भीती वाटते, तर मला वचन का दिलंस लग्नाचं?

सौरभ- प्रश्न भीतीचा नाही. योग्य वेळेचा आहे. ती आली की सांगेन अंकिताला.

मानसी- अच्छा? दोन वर्षांत ती वेळ एकदाही आली नाही?

सौरभ- मानसी, प्लीज… ही ट्रिप नको ना स्पॉईल करू.

मानसी- मग तू मला प्रॉमिस कर. ह्या ट्रिपवरून परत यायच्या आधी तू अंकिताला फोन करून आपल्याबद्दल सांगशील.

सौरभ- मानसी…

मानसी- (त्याचा हात आपल्या डोक्यावर ठेवून) तुला माझी शपथ आहे.

सौरभ- ठीक आहे. मी गोव्याहून फोन करून अंकिताला आपल्याबद्दल सांगेन. ओके? हॅपी?

मानसी- Yes. ह्याच्या बदल्यात खरं तर तुला एक सणसणीत किस द्यायला हवा. पण एअरपोर्टवर कॅमेरे आहेत. आपली रील बनतील. पण किसऐवजी माझ्या लिपस्टिकने रंगलेली फिल्टरची सिगारेट देऊ शकते मी.

सौरभ- Wow. Let’s go.

दोघे स्मोकिंग लाउंजमध्ये गेले. मानसीने सिगारेट पेटवली. दोन कश मारून थोटूक लाल झालेली सिगारेट सौरभसमोर धरली. दोघांनी एक सिगारेट शेअर केली आणि तितक्यात बोर्डिंगची घोषणा झाली. दोघे बोर्डिंग गेटकडे निघाले.

विमानात मानसी खिडकीजवळ बसली होती. सौरभ तिच्या शेजारी होता. विमानाने रनवेवर धावायला सुरुवात केली. मानसी खिडकीतून बाहेर बघत होती. विमान हलकेच आकाशात झेपावलं. मानसीचं मनदेखील सौरभच्या आजच्या वचनानंतर कल्पनेच्या जगात त्या विमानासारखं झेपावत होतं.

क्रमश:

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. MandarJOG.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

One thought on “मृगजळ — भाग १०”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!