….. इथे हॉस्पिटलमध्ये मुग्धा बेभान झाली होती. अर्धवट शुद्धीत प्रशांतला हाका मारत होती. नर्सेसची धावपळ सुरू झाली. डॉक्टरना पेशंटला अटॅक आल्याचा कॉल गेला. मुग्धाला गुंगीच्या औषधाचं इंजेक्शन देण्यात आलं. मुग्धा बेशुद्ध झाली. त्याच वेळी तिच्या रूमच्या बाहेर खिडकीजवळ असलेल्या झाडाच्या पानांची सळसळ झाली. त्या झाडावरून काहीतरी पांढरी आकृती उडून जात असल्याचा भास एका वॉर्ड बॉयला झाला. हॉस्पिटलमध्ये परत शांतता पसरली आणि लांबून बाराचे टोले ऐकू आले. आकाशात चंद्र हसत होता!
दुसऱ्या दिवशी सकाळी तेजस मुग्धाला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायच्या तयारीने त्याच्या बेडरूममधून खाली आला तेव्हा दांडेकर काका, काकू, राधिका आणि आर्या दिवाणखान्यात बसलेले होते. त्यांना बघून तेजसला आश्चर्य वाटलं. त्याला आलेला बघून राधिका उठून उभी राहिली आणि म्हणाली-
राधिका- Good morning तेजस…
काका- बरं झालं आलास तू तेजस. बस. आम्ही तुझ्या आणि आर्याच्या engagement बद्दल बोलत आहोत.
हे ऐकून तेजसच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव आर्याने टिपले. तेजस नाईलाजाने बसला. त्याने घड्याळात बघितलं.
काका- तर तेजस, आपण काल बोललो त्यानुसार तुझा आणि आर्याचा साखरपुडा आपण पुढल्या आठवड्यात करणार आहोत. त्यांच्या बाजूने मोठी म्हणून राधिका आली आहे. आर्याच्या आई-वडिलांना ही सोयरिक मान्य आहे. काय राधिका?
राधिका- हो सर. पण आज हिच्या आईची, म्हणजे माझ्या बहिणीची तब्येत थोडी बरी नाहीये म्हणून मी आले आहे.
काकू- अगं ठीक आहे. तू मावशी आहेस ना हिची. मग झालं तर. आणि तुझ्यामुळेच तर हे सर्व जुळून आलंय.
घरचे हे बोलत असताना आर्या तेजसला बघत होती. त्याच्या चेहऱ्यावर असलेली नाराजी तिला जाणवत होती. तेजस तिच्यापासून नजर चोरत होता.
काका- So आर्या, तू तयार आहेस ना ह्या नात्यासाठी आणि साखरपुड्यासाठी. म्हणजे आमचा मुलगा पसंत आहे ना तुला?
हे ऐकून काकू आणि राधिका हसल्या. आर्या अजूनही तेजसला बघत होती.
राधिका- आर्या, अगं तेजसला आयुष्यभर बघायचं आहे आता. काका काय विचारत आहेत त्याला उत्तर तर दे.
आर्या- सॉरी काका. काय म्हणालात तुम्ही?
काका- मी म्हणालो, तुला आमचा मुलगा आणि पुढल्या आठवड्यात साखरपुड्याचा निर्णय मान्य आहे ना?
आर्या विचारात पडली. सगळे तिच्याकडे आश्चर्याने बघत होते.
राधिका- आर्या, काय झालं? अगं हो म्हण की पटकन.
आर्या- हो….
सगळे रिलिव्ह झाले.
आर्या- (शांतपणे) आणि नाही पण…
हे ऐकून सगळे शॉक झाले.
काकू- म्हणजे? हो आणि नाही म्हणजे काय?
आर्या- (तेजसकडे बघत शांतपणे) म्हणजे काकू, मला तेजसशी साखरपुडा आणि लग्न मान्य आहे. पण पुढल्या आठवड्यात नाही.
राधिका- का पण? काय प्रॉब्लेम आहे?
आर्या- प्रॉब्लेम आता नाहीये मावशी, पण नंतर होऊ शकेल आणि तो मला नकोय.
काका- हे काय बोलते आहेस तू आर्या?
आर्या- काका, तुम्ही मला जे प्रश्न विचारलेत ते तेजसला विचारले तर आज तरी दोन्ही प्रश्नांना त्याचं उत्तर नाही असंच असेल. आणि लग्न करून एकत्र आयुष्य जगण्यासाठी दोघांची तयारी असणं महत्त्वाचं आहे. नाहीतर त्या नात्यात फक्त आणि फक्त प्रॉब्लेम निर्माण होतात आणि सर्वांनाच त्याचा त्रास होऊ लागतो.
काका- पण तेजसला हे मान्य आहे. काय रे तेजस?
आर्या- काका, मला त्याचा होकार त्याच्या शब्दात नाही, त्याच्या डोळ्यात बघायचा आहे. आणि मला खात्री आहे की तो त्याच्या डोळ्यात मी निर्माण करू शकेन. फक्त तुम्ही आम्हाला थोडा वेळ द्या काका.
राधिका- (रागाने) आर्या, तू वेडी आहेस का? (काकांना) सर, तुम्ही हिच्याकडे लक्ष देऊ नका. लग्नाच्या आनंदात आर्या जरा जास्तच खुश झाली आहे आणि टेन्स पण. म्हणून असं बोलते आहे. आपण पुढल्या आठवड्यात साखरपुडा उरकून टाकूया.
काका- राधिका, आपण साखरपुड्याबद्दल बोलतोय. एक नातं जुळवण्याबद्दल बोलतोय. ते उरकून नाही टाकता येणार. आर्या काय म्हणते आहे ते मला पटतंय. आर्या, मी तुला वेळ द्यायला तयार आहे. पण लक्षात ठेव, वेळ कमी आहे.
आर्या- Thanks काका. मला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते. आता मी तेजसची मूर्ती सुरू करणार आहे. त्यावेळी आम्हाला आम्हा दोघांचा एकत्र वेळ मिळेल. तेव्हा मला खात्री आहे की मी मला हवा असलेला होकार त्याच्या डोळ्यात आणू शकेन.
काका- ठीक आहे आर्या. मी तुला वचन देतो की आमच्या घराची सून म्हणून फक्त तूच ह्या घरात येशील.
आर्या- Thanks काका.
काका- राधिका, त्या मुग्धाला लगेच रिलीज कर. तिला तीन महिन्यांची salary आजच देऊन टाक. तिचं रिलीव्हिंग लेटर घरी पाठवायची व्यवस्था कर. ती मुलगी आपल्या ऑफिसात परत दिसता कामा नये.
राधिका- (खुश होऊन) ओके सर. मी लगेच ते करते.
तेजस- बाबा, मी निघतो.
इतकं म्हणून तेजस उठला. तेवढ्यात आर्या म्हणाली-
आर्या- तेजस, एक मिनिट….
तेजस थांबला. सगळे आर्याकडे बघू लागले.
आर्या- तेजस, आपण आजपासून मूर्तीच्या कामाला सुरुवात करूया? इथेच. तुझ्या घरी, तुझ्या रूममध्ये. काका, पुढले दहा दिवस तेजस ऑफिसला नाही आला तर चालेल का तुम्हाला?
काका- हो. अगदीच चालेल. तो हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा पण ऑफिसला आला नव्हता. मी सांभाळतो ऑफिस. तुम्ही मूर्ती सुरू करा.
हे ऐकून गोंधळलेला तेजस म्हणाला-
तेजस- पण बाबा, हे असं अचानक? मी… मी उद्यापासून मूर्तीसाठी वेळ देतो.
काकू- आज कुठे जायचं आहे तुला तेजस?
तेजस- आई, मुग्धा हॉस्पिटलमध्ये आहे. तिला डिस्चार्ज घ्यावा लागेल. घरी सोडावं लागेल.
काका- त्यासाठी तू जायची गरज नाही तेजस. राधिका, आपल्या admin मधून कोणाला तरी हॉस्पिटलमध्ये पाठव. मुग्धाला डिस्चार्ज घेऊन घरी पोहोचवायची व्यवस्था कर. तिचं बिल कंपनी भरेल. आणि तेजस बरोबर असताना तिला अपघात झाला म्हणून कंपनीतर्फे तिला दहा लाखांचा चेक देऊन टाक.
राधिका- ओके सर. मी करते सर्व manage. तुम्ही काळजी नका करू.
काका- So तेजस? Sorted? आता तू आणि आर्या तुझ्या रूममध्ये जा. आणि राधिका, तू थांब. तुझी गाडी पुढे पाठव. मी रेडी होऊन येतो. तू माझ्याबरोबर ऑफिसला चल. वाटेत मला महत्त्वाच्या विषयांवर बोलायचं आहे.
राधिका- ओके सर.
दांडेकर काका निघाले. काकू त्यांच्या मागे गेल्या. राधिका तेजस आणि आर्याकडे बघत होती. तिने मानेने आर्याला ह्याला घेऊन जा असा इशारा केला. आर्याने तेजसचा हात धरला आणि म्हणाली-
आर्या- तेजस, जाऊया आपण?
तेजस हताश होता. त्याला मुग्धाची काळजी वाटत होती. आठवण येत होती. पण आर्याबरोबर जाण्यावाचून त्याच्याकडे पर्याय नव्हता. ते दोघे वर गेले. राधिकाने विजयी मुद्रेने त्यांना बघत मुग्धाची रवानगी करायला ऑफिसात फोन करून सूचना द्यायला सुरुवात केली.
हॉस्पिटलमध्ये मुग्धा शून्यात बघत बेडवर बसून होती. तिला काल पाहिलेलं स्वप्न आठवत होतं. त्या स्वप्नाचा अर्थ तिला लागत नव्हता. इतक्यात डॉक्टर आले आणि म्हणाले-
डॉक्टर- मिसेस साठे, तुम्ही आता जाऊ शकता घरी. कोणी नातेवाईक आले आहेत का तुमचे?
मुग्धा- (आश्चर्याने) म्हणजे मला डिस्चार्ज आहे.
डॉक्टर- हो. तुमचं पेमेंट झालं आहे आणि तुमच्या ऑफिसने ही फाईल तुम्हाला दिली आहे. तुम्ही अर्ध्या तासात निघा. पुढचा पेशंट वाट बघतो आहे रूमची.
इतकं बोलून डॉक्टर निघून गेले. मुग्धाने त्यांनी दिलेली फाईल उघडली. त्यात तिचं रिलीव्हिंग लेटर. तीन महिन्यांचा पगार तिच्या खात्यात जमा केल्याची रिसीट आणि दहा लाखांचा चेक होता. चेकवर तेजस आणि फायनान्स हेड दोघांच्या सह्या होत्या. मुग्धाला कळतंच नव्हतं की हे नक्की काय आहे. तिने तेजसला फोन लावला.
तेजसच्या रूममध्ये तेजस एका बाकावर बसला होता. समोर एका टेबलवर आर्याने एक मोठा दगड ठेवला होता. त्याच्या सभोवताली तिची हातोडी, छिन्नी अशी हत्यारे होती. आर्या तेजसकडे बघत त्या दगडावर पेनाने काही खुणा करत होती. इतक्यात तेजसचा फोन वाजला. तेजस फोन घ्यायला उठणार इतक्यात आर्या म्हणाली-
आर्या- तेजस, प्लीज हलू नको. माझं मार्किंग चुकेल. मी बघते फोन आणि नंतर करायला सांगते.
आर्या त्याच्या फोनजवळ आली. फोन हातात घेऊन बघितला तर फोन मुग्धाचा होता. आर्याने फोन घेतला.
आर्या- हाय…
तिचा आवाज ऐकून मुग्धाला प्रचंड आश्चर्य वाटलं.
मुग्धा- मी तेजसशी बोलू शकते का?
आर्या- नाही. आत्ता आम्ही बिझी आहोत जरा. आता नाही बोलता येणार त्यांना. (तेजसला) तेजस, उद्या हे बेडरूमचे पडदे चेंज करूया. मला हे पडदे बोअरिंग वाटतात. एखादी पेस्टल, romantic शेड घेऊया. (मुग्धाला) ठेऊ मी फोन?
मुग्धा- ते घरी आहेत? बेडरूममध्ये? तुमच्या बरोबर?
आर्या- हो. Any problem?
मुग्धा- (प्रचंड धक्का बसून) न… नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. माझा फोन होता म्हणून सांगा त्यांना. बाय….
मुग्धाने फोन ठेवला. एक मिनिट विचार केला. हातातील चेक आणि त्यावर असलेली तेजसची सही बघितली आणि तो चेक फाडून टाकून ती चेंज करू लागली.
तेजसच्या रूममध्ये दगडावर रेषा मारून झाल्यावर आर्या तेजसच्या जवळ आली. तिने त्याला ताठ बसायला सांगितलं. तेजस ताठ बसला. आर्याने पुढे वाकून समोरून त्याचे खांदे दोन्ही हातांनी धरले. ते करताना तिच्या गळ्यातील लॉकेट तेजसच्या नाकावर आपटत होतं. तिचे रेशमी केस त्याच्या चेहऱ्यावर हुळहुळत होते. तिच्या परफ्युम आणि shampoo चा धुंद करणारा वास त्याच्या नाकात शिरून त्याला कासावीस करत होता. त्याने डोळे बंद केले होते. आर्या मादक नजरेने त्याच्याकडे बघत होती. अचानक तेजसच्या ओठांना ओलसर, मऊ स्पर्शाची जाणीव झाली. त्याने डोळे उघडले तेव्हा आर्या त्याच्यावर पूर्ण झुकली होती. तिने त्याचे केस दोन्ही हातांनी धरले होते. नकळत तेजसच्या हाताची पकड तिच्या दंडावर पडली. आर्या दोन्ही पाय दोन बाजूला टाकून त्याच्या मांडीवर बसली आणि त्याचं चुंबन घेऊ लागली. दोघे एका धुंद क्षणात हरवले. त्याच अवस्थेत काही मिनिटं गेल्यावर तेजसच्या मोबाईलमध्ये मेसेज टोन वाजला. तेजस भानावर आला. आर्या तशीच बसून होती.
आर्या- तेजस, हाच स्वीकार आणि होकार मला तुझ्या डोळ्यात कायमचा बघायचा आहे.
तेजसने तिला बाजूला केली आणि तो उठून उभा राहिला. त्याने जाऊन फोन बघितला. त्यात मुग्धाचा मेसेज होता. “ह्यापुढे मी तुम्हाला कधीच भेटणार आणि दिसणार नाही. मला भेटायचा प्रयत्न करू नका.” तो मेसेज वाचून शॉक झालेल्या तेजसने तिला फोन केला. मुग्धाने त्याचा नंबर ब्लॉक केला होता. तेजस कासावीस झाला. तो निघणार इतक्यात आर्याने त्याचा हात धरला आणि म्हणाली-
आर्या- तेजस, आपण सुरुवात करूया?
तेजस- पण….
आर्या- तेजस, वेळ कमी आहे. We have to start. बस ना तू प्लीज.
तिने तेजसला हाताला धरून बाकावर बसवला. तेजस प्रचंड टेन्स होता.
मुग्धा घरी आल्यावर तिने bag भरली. अमेयला घेऊन ती जवळच राहत असलेल्या तिच्या मैत्रिणीच्या घरी निघून गेली. जाताना कपडे आणि प्रशांतचा फोटो घेऊन गेली.
संध्याकाळी आर्याने उद्या सकाळी भेटायचं ठरवून तेजसला डिनरला जायचं सुचवलं. तेजस म्हणाला-
तेजस- आज नको आर्या. मला बरं वाटत नाहीये. I need rest.
आर्या- ओके. उद्या भेटू.
आर्या निघून गेली. तेजसने बाथरूममध्ये चेहरा धुतला आणि तो घाईत निघाला. तेजसची गाडी मुग्धाच्या बिल्डिंगमध्ये येऊन थांबली. तेजस लिफ्टमधून वर निघाला. लिफ्ट थांबल्यावर बाहेर पडून त्याने मुग्धाच्या घराची बेल वाजवली आणि आतुरतेने दार उघडायची वाट बघू लागला. काही मिनिटं होऊनदेखील दार न उघडल्याने त्याने परत बेल वाजवली. पण दहा मिनिटं झाली तरी दार उघडलं नाही. त्याने मुग्धाला फोन लावला. तिचा नंबर अनअव्हेलेबल होता. तेजसला काय करायचं सुचत नव्हतं. तो हताश होऊन निघाला.
मुग्धा आणि अमेय तिच्या मैत्रिणीच्या घरी एका रूममध्ये झोपले होते. मुग्धाला स्वप्न पडू लागलं. त्यात प्रशांत आणि आर्या हनिमूनला गेले आहेत असं तिला दिसत होतं. तिला त्यांचा संपूर्ण प्रणय समोर बघितल्यासारखा दिसत होता. तोच passionate प्रशांत, ती आणि तो करत असलेल्या सर्व क्रीडा प्रशांत आर्याबरोबर करत होता. मुग्धाला अचानक श्वास कोंडल्यासारखं वाटू लागलं. कोणीतरी गळा दाबत आहे असं वाटत होतं. त्या धसक्याने मुग्धा दचकून जागी झाली. अमेय शेजारी शांत झोपला होता. मुग्धा काही वेळ बेडवर तशीच बसून होती. मग उठून तिने बाथरूममध्ये चेहऱ्यावर पाण्याचे हपके मारले. ती बाहेर येऊन बघते तर अमेयच्या अंगावर पांघरूण घातलेलं होतं. ती बाथरूममध्ये जाताना नसलेलं पांघरूण अमेयच्या अंगावर कोणी घातलं ह्या विचाराने तिच्या अंगावर काटा आला. त्याच वेळी बेडरूमच्या खिडकीबाहेर एक पांढरी आकृती उडून जात होती!
क्रमश:
© मंदार जोग
पुढील भागाची लिंक- गुंतता हृदय….(भाग २८)
सर्व भाग एकत्र- गुंतता हृदय – सर्व भाग
