मृगजळ सिझन २- भाग १ | |Mandar Jog

मृगजळ सीझन २ भाग ७ – मानसीचे कांदेपोहे

मानसीने फोन कट केला. तिला मगाशी सौरभ जे म्हणाला ते आणि आता श्रीरंग जे बोलला ते दोन्ही आठवत होतं. तिने बेसिनमध्ये चेहऱ्यावर पाणी मारलं आणि समोर आरशात पाहिलं तर तिला तिच्या एका बाजूला उभा असलेला सौरभ आणि दुसऱ्या बाजूला उभा असलेला श्रीरंग दिसत होते. तिची प्रचंड द्विधा मनस्थिती आता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती.

त्या संध्याकाळी श्रीरंग मानसीच्या घरी गेला. मानसी प्रचंड टेन्स होती. उद्या तिचा कांदे पोह्याचा कार्यक्रम होता. तिची चिडचिड होत होती. हातातला वाईनचा ग्लास बाजूला ठेवत तिने सिगारेट पेटवली आणि ती विचार करत फेऱ्या मारू लागली. ती पाहून श्रीरंगला हसू आलं. त्याला हसताना पाहून मानसीने सगळा राग त्याच्यावर काढायला सुरुवात केली.

मानसी- तू मित्र आहेस ना माझा? आणि ह्या इतक्या सिरीयस सिच्युएशनमध्ये तू हसतो आहेस? तुला लाज नाही वाटत रंगा? उद्या मला बघायला एक मुलगा येणार आहे…

श्रीरंग- मुलगा नाही माणूस…पन्नाशीचा माणूस.

हे बोलून श्रीरंग हसला. ते पाहून मानसी आणखी चिडली.

मानसी- तुला ह्यातही जोक्स सुचतात?

श्रीरंग- तुझं रागावून, चिडून, माझ्यावर ओरडून झालं ना की मग मला सांग. मी तुला एक आयडिया सांगेन.

मानसी- कसली आयडिया?

श्रीरंग- तू आधी शांत हो मग सांगतो.

मानसी- मी शांतच आहे. आता सांग काय ते.

श्रीरंग- नीट ऐक.

असं म्हणून श्रीरंगने तिला स्वतःच्या शेजारी बसवलं आणि तिला एक आयडिया सांगितली. ती ऐकून मानसी खुश झाली आणि त्याला घट्ट मिठी मारत म्हणाली-

मानसी- तू इतका हुशार कसा काय आहेस रे रंगा?

श्रीरंग- काय उपयोग अशा हुशारीचा जी एका मुलीला वीस पंचवीस वर्षांत पटवायला उपयोगी पडली नाही.

मानसी- ए आपण तुझ्यासाठी एक मुलगी शोधूया का? अगदी तुला आवडेल अशी. मी शोधते. मला तुझी आवड माहीत आहे.

श्रीरंग- प्रॉब्लेम माझ्या आवडीचा नाहीये. माझी आवड माझ्या समोर बसलेली आहे. प्रॉब्लेम हा आहे की मी तिची आवड नाहीये.

मानसी- नाही रे रंगा तसं नाहीये..

श्रीरंग- हो actually तसं नाहीये. तुला स्वतःलाच तुझी आवड माहीत नाहीये म्हणून तुझी निवड चुकली आहे. पण ती चूक सुधारेल एक दिवस. मला खात्री आहे.

मानसी- अच्छा? स्वतःबद्दल इतका confidence?

श्रीरंग- स्वतःबद्दल नाही. तुझ्याबद्दल. तुझी निवड चुकलेली आहे हे एक दिवस तुझ्याच लक्षात येईल आणि तेव्हा तुला तुझी खरी आवड कोण आहे हे पण कळेल आणि आपण एकत्र येऊ.

मानसी- हम्म…बघू तेव्हाच तेव्हा…पण तू आत्ता मला जी आयडिया सांगितली आहेस ना ती सुपर आहे. Thanks.

असं म्हणून तिने त्याच्या गालाची पापी घेतली आणि म्हणाली-

मानसी- चल जेवूया. तुझ्या आवडीचं जेवण केलंय मी.

दोघे जेवायला म्हणून उठले इतक्यात मानसीचा फोन वाजू लागला. फोन सौरभचा होता. त्याचं नाव पाहून तिला दुपारचा संवाद आठवला. तिने फोन रींगर बंद केला आणि दोघे जेवायला बसले.

मानसीचा दुसरा दिवस खूप गडबडीत गेला. ऑफिसात प्रचंड काम होतं. एकीकडे सौरभ सकाळपासून फोन करत होता पण तिचा बोलायचा मूड नव्हता म्हणून तिने फोन घेतला नाही. शेवटी सौरभने मेसेज पाठवला.

मेसेज- आज तुला बघायला मुलगा येतोय ना? काय ठरवलं आहेस तू? Reject कर त्याला. सांगून टाक तू committed आहेस म्हणून.

हे वाचून मात्र ती चिडली. तिने फोन केला.

सौरभ- ही काय नाटकं आहेत मानसी? मी काल रात्रीपासून फोन करतोय. पण तू answer करत नाहीयेस.

मानसी- हे बघ सौरभ मला ना ऑफिसात खूप काम आहे. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. मी त्या माणसाला सांगितलं की मी कमिटेड आहे आणि तुझ्याशी कमिटेड आहे, तर तू तिथे असशील ना ते कन्फर्म करायला?

हा प्रश्न ऐकून सौरभ चपापला. काय बोलावं हे त्याला सुचलं नाही.

मानसी- thanks. मला माझं उत्तर मिळालं. आता let me handle this. परत फोन करू नको नाहीतर तुला ब्लॉक करेन मी.

ती फोन कट करून काम करू लागली.

संध्याकाळी ताई आणि जिजाजी घरी आले. मानसी पण कन्सेशन घेऊन चार वाजता घरी पोहोचली. ताईने तिला स्वतःच्या हातांनी तयार केली. मानसी अगदी नॉर्मल वागत होती. ताईला तेच जातं खटकत होतं. शेवटी तिने न राहवून विचारलंच.

ताई- काय ग मनू तू इतकी शांत कशी काय?

मानसी- शांत म्हणजे?

ताई- तुला जेव्हा हे स्थळ आल्याचं सांगितलं तेव्हाची तुझी चीडचीड आणि आता तो बघायला येणार आहे तेव्हा मात्र तू इतकी शांत कशी? कुठे गेला तुझा राग? चिडचिड?

मानसी- चिडचिड करून तू ऐकणार आहेस का? तर नाही. आणि तू म्हणतेस ते एका अर्थी बरोबर पण आहे. मी सेटल व्हायला हवं. त्यामुळे ठीक आहे. करूया हा कार्यक्रम.

तीचं बोलणं ऐकून ताईला खूप बरं वाटलं. तितक्यात बेल वाजली. ताई म्हणाली-

ताई- अरे बापरे लवकर आले की काय. थांब मी बघतेच.

असं म्हणून तिने दार उघडलं तर दारात श्रीरंग होता. तिला आश्चर्य वाटलं आणि ती जरा वैतागली देखील.

ताई- रंगा तू?

श्रीरंग- हो मी..कशी आहेस ताई? मानसी आहे का?

ताई- हो म्हणजे आहे पण…

श्रीरंग- आहे पण तिला बघायला येत आहेत. बरोबर ना? मला माहीत आहे. मी तुला मदत करायलाच आलोय.

असं म्हणून तो घरात शिरला. साडी नेसून सुंदर दिसणाऱ्या मानसीला पाहून त्याच्या मनात एक प्रेमाची लहर आली. तिला बाजूला सरत तो म्हणाला-

श्रीरंग- मानसी आज तू killer दिसते आहेस. येणारा मुलगा फक्त तुला बघूनच होकार देईल. All the best.

त्या नंतर श्रीरंगने सगळ्या कार्यक्रमाचा जणू ताबा घेतला. ताई आणि जिजाजी दोघांशीही मस्त गप्पा मारत तो तयारी करत होता. पाहुणे ठरलेल्या वेळी आले. आलेला माणूस खरंच दिसायला रुबाबदार होता. जुजबी बोलणं झाल्यावर श्रीरंग म्हणाला-

श्रीरंग- तुम्हा दोघांना जर काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर तुम्ही आत त्या रूममध्ये जाऊन बोला आरामात.

ताई- हो चालेल ना…जा मानसी…

ते दोघे उठून बेडरूममध्ये गेले. मानसी थोडी नर्व्हस होती. पण तिने बोलायला सुरुवात केली.

मानसी- हे बघा…तू..तुम्ही…तुम्ही चांगलेच आहात. म्हणजे personality, पोझिशन वगैरे wise..म्हणजे जी तुमच्याशी लग्न करेल ती नक्कीच सुखी होईल. पण प्रॉब्लेम असा आहे की मी ऑलरेडी कमिटेड आहे.

तिने बाहेर येऊन श्रीरंगला हाक मारली. श्रीरंग आत गेला.

मानसी- हा श्रीरंग…अमेरिकेला असतो. आम्ही दोघे एकमेकांशी लग्न करणार आहोत. हो ना श्रीरंग?

श्रीरंग- येस. पण काय आहे ना…हिचे ताई आणि जिजाजी…त्यांना ही अमेरिकेला जावी असं वाटत नाही. त्यामुळे जरा delay होतोय. म्हणूनच ते तिचं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी लावायचा प्रयत्न करत आहेत.

मानसी- i am sorry…पण

श्रीरंग- i hope you will understand and appreciate her honesty…उगाच तुमच्या लाईफमध्ये पण कॉम्प्लिकेशन निर्माण होतील हे लग्न झालं तर…सो…

माणूस- i completely understand and appreciate. बरं झालं तुम्ही मला हे आधीच सांगितलंत. तुम्हाला दोघांना शुभेच्छा.

मानसी- आणि प्लीज तुम्ही मला reject करा. मी तुम्हाला केलं तर त्यांना आणखी राग येईल.

माणूस- हम्म आलं लक्षात. ठीक आहे.

तिघे बाहेर आले.

माणूस- खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. मी फोन करतो माझ्या मुलीशी बोलून. Thanks. येतो मी.

हे बोलून तो माणूस निघून गेला. मानसी हुश्श करत सोफ्यावर बसली. ताई संशयाने त्या दोघांकडे बघत होती. शेवटी तिने विचारलं-

ताई- काय ग मनू, तू ह्याला आत का बोलावलं?

मानसी – त्यांची मुलगी जर्मनीत आहे ना? तिला युएसमध्ये काही contact हवे आहेत असं ते म्हणाले. म्हणून मी रंगाशी त्यांची ओळख करू दिली.

ताई आणि जिजाजी निघून गेले. मानसीने श्रीरंगला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली-

मानसी- thanks रंगा. तुझी ही आयडिया खूप मस्त होती.

श्रीरंग- पण ज्याच्यासाठी तू हे सगळं केलं आहेस त्याला हे कळायला नको का?

मानसी- म्हणजे सौरभ?

श्रीरंग- yes…

मानसी- काही गरज नाहीये. त्याला माझी पडलेली नाही. मग मी त्याला का सांगू?

श्रीरंग- त्याला तुझी पडलेली नाहीये ना? मग तू त्या माणसाला reject का केलास? अजूनही हो म्हण. मस्त सेटल हो.

मानसी- तू गप ना रे रंगा. काहीही काय.

श्रीरंग- मानसी, तुझ्या ताई आणि जीजाजींची काळजी चूक नाहीये. तू लग्न करायलाच हवं. आता नाही. पण म्हातारी होशील ना तेव्हा तुझ्याबद्दल lust असलेला नाही तुझ्याबद्दल प्रेम असणारा कोणीतरी आयुष्यात लागेल. तो आत्ताच शोध. मग तो माणूस सौरभ असेल, मी असेन, तो आज बघायला आलेला माणूस असेल किंवा आणखी कोणीतरी असेल. पण तुला निर्णय घ्यावाच लागेल मानसी. हे असं अधांतरी एकाकी आयुष्य किती दिवस जगणार आहेस.

मानसी- एकाकी का? तू आहेस ना?

श्रीरंग- मित्र आणि नवरा ह्यात फरक असतो. मी मित्र आहे तुझा. नवरा नाही. उगाच बालिशपणा करू नको आणि निर्णय घे. तो पण लवकरात लवकर.

मानसीने क्षणभर विचार केला आणि सौरभला फोन लावला.

सौरभ- हेलो..

मानसी- आज शार्प आठ वाजता भेट. Boling pot रेस्तोरांत. मी टेबल बुक करते आहे.

सौरभ- पण अचानक…

मानसी- हो अर्जंट आहे.

सौरभ- ओके.

तिने फोन कट केला.

मानसी- happy?

श्रीरंग- yes. त्याला सांग की तू त्या मुलाला आणि ताईला सांगितलं आहेस की तू आणि सौरभ लग्न करत आहात आणि सौरभ त्याच्या बायकोला डिव्होर्स देतो आहे. बघ काय म्हणतो ते.

मानसी- yes sir.

श्रीरंग तिच्या घरातून बाहेर पडला आणि त्याने उमेशला फोन केला.

उमेश- बोला सर.

श्रीरंग- आज शार्प आठ वाजता. Boling pot रेस्तोरांत. बाकी लक्षात आहे ना?

उमेश- हो सर. मी अंकिता madamना घेऊन पोहोचतो तिथे.

श्रीरंग- बास. बाकी तिथली तयारी मी करतो. बाय.

फोन कट करून श्रीरंग Boling pot रेस्तोरांतकडे निघाला. तिथे पोहोचून बियर सिप करताना त्याने एक वेटर हेरला. त्याला पैसे देऊन रिझर्व्हेशन लिस्टमध्ये मानसीचं नाव असल्याची खात्री करून घेतली आणि आपल्या खिशात असलेला ब्लूटूथ माईक वेटरला मानसी आणि सौरभ बसतील त्या टेबलवर असलेल्या लहानशा फुलदाणीमध्ये ठेवायला सांगितला. वेटरच्या हातात दोन गांधी सरकवून श्रीरंग तिथून बाहेर पडला.

इथे क्लासमध्ये उमेश अंकिताच्या केबिनमध्ये येऊन तिला म्हणाला-

उमेश- madam आज तिथीने माझा वाढदिवस आहे.

अंकिता- अरे वा. Happy बर्थडे सर.

उमेश- madam मी तुम्हाला पार्टी देऊ का? म्हणजे मी दर वर्षी एकटाच सेलिब्रेट करतो. पण आज तुम्हाला पार्टी द्यावी असं वाटलं म्हणून…

अंकिता- पण सर..

उमेश- sorry. तुम्हाला राग आला का? ठीक आहे…मी Boling pot रेस्तोरांतमध्ये टेबल बुक केलं होतं आज डिनरसाठी. जाऊ दे. मी कॅन्सल करतो.

तो वळून जाऊ लागला. अंकिताने क्षणभर विचार केला. उमेशबरोबर डिनर ही कल्पना तिलाही थोडी सुखावत होती. अंकिता म्हणाली-

अंकिता- नको सर. कॅन्सल नका करू. आपण जाऊया.

हे ऐकून उमेश खुश झाला. त्याने बाहेर पडून श्रीरंगला मेसेज केला “madam is ready” असा. श्रीरंग आता रात्र होण्याची वाट बघत होता.

क्रमश:

मागील भागाची लिंक- मृगजळ सीझन २ भाग ६- स्थळ आलं.

पहिल्या सीझनच्या सर्व भागांची लिंक- मृगजळ- सर्व भाग

हे पण वाचा-

सख्या रे …

ट्वेंटी थ्री

गुंतता हृदय – सर्व भाग

व्हॅलेंटाईन डे- भाग १

रिफ्लेक्शन भाग १

आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा

आमच्या लघुकथा लघुकथा

माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख

आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

ललित

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!