मानसीचा डिव्होर्स होऊन आता जवळजवळ दोन महिने झाले होते. आदित्य त्याच्या बापाबरोबर राहत होता, पण तो तिच्याही टचमध्ये होता. तो खरं तर तिच्याच बाजूने होता. पण आदित्यला गायक बनायचं होतं आणि यतीन त्याला काही म्युझिक डायरेक्टरकडे jingle वगैरे म्हणायला नेऊ शकत असल्याने तो यतीनबरोबर राहत होता. आणि मानसीला ते मान्य होतं. आदित्यला त्याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य होतं.
सौरभच्या घरी तो खूप एकटा पडला होता. हर्षद पूर्णपणे अंकिताच्या बाजूने होता. कारण स्पष्ट होतं. अंकिताचा त्याच्यावर असलेला पगडा आणि अंकिता त्याला खर्चासाठी देत असलेले पैसे! पण त्यामुळे अंकिता सौरभला घालून-पाडून बोलली की तो हसत असे. आपल्या बापाला तो कमी समजत असे.
मानसी आणि सौरभ एकमेकांशी बोलत असत. मध्ये-मध्ये भेटत असत. सौरभचा म्युच्युअल फंड व्यवसायही हळूहळू पसरत होता. दोघेही वैयक्तिक आयुष्यात एकाकी असले तरी प्रोफेशनल आयुष्यात मात्र गाडी चांगली चालली होती. आणि तो एकाकीपणा दोघेही एकमेकांच्या नकळत एकमेकांसाठी भरून काढत होते.
त्या दिवशी सकाळी अंकिता क्लासला जायला निघाली. सौरभ पेपर वाचत होता. हर्षद सकाळीच क्रिकेट खेळायला बाहेर पडला होता. घरात ते दोघेच होते. हर्षद कोणत्याही क्षणी घरी येऊन अंघोळ करून मग कॉलेजला जाणार होता. अंकिता ड्रेसिंग टेबलसमोर उभी राहून तयार होत होती. तयार होत असताना ती काहीतरी शोधू लागली. तिला वस्तू मिळत नव्हती. तिने कपाटात, बाथरूममध्ये पाहिलं. गाद्या उचलून शोधल्या, पण मिळाली नाही. ती चिडून बाहेर आली आणि तिथे शोधू लागली. सौरभने ते पाहिलं, पण तो काहीच बोलला नाही. हल्ली त्यांच्यात संवाद जवळजवळ बंद झाला होता. ती लिव्हिंग रूममध्ये काहीतरी शोधत होती आणि तिच्या रागाचा पारा चढत होता. चढणाऱ्या पाऱ्याबरोबरच तिची आदळआपट वाढत होती. सौरभ मात्र शांत बसून पेपर वाचत होता.
शेवटी अंकिताने विचारलं—
अंकिता – माझी अंगठी कुठे आहे?
सौरभने पेपर बाजूला ठेवला आणि तो म्हणाला—
सौरभ – मला विचारते आहेस का?
अंकिता – मग इथे अजून कोण आहे? भिंतींशी नाही बोलायला लागले मी अजून तरी. माझी अंगठी कुठे आहे, सांग.
सौरभ – मला काय माहीत. आपली engagement रिंग का?
अंकिता – नाही. माझी हिऱ्याची अंगठी. माझ्या मेहनतीच्या पैशांनी बनवलेली. कुठे आहे ती?
सौरभ – मला काहीच माहीत नाही. तू ती अंगठी बनवलेली हेही माहीत नाही आणि ती तू कुठे ठेवली आहेस तेही माहीत नाही.
अंकिता – तू मला मूर्ख समजतोस ना? तुला काय वाटलं, तू माझी अंगठी चोरून तुझ्या त्या रखेलीला देशील आणि मी गप्प बसेन?
सौरभ – अंकिता, तोंड सांभाळून बोल. माझा तुझ्या अंगठीशी काही संबंध नाहीये आणि मानसीबद्दल हे असं बोलायची काहीही गरज नाही. तुझा जो काही गैरसमज आणि संशय आहे, त्याला औषध नाहीये. पण एका चांगल्या मुलीला शिव्या नको देऊ. तूच ठेवली असेल अंगठी कुठेतरी. नीट शोध म्हणजे सापडेल.
अंकिता – मी किचनमध्ये बघते. सापडली तर ठीक. नाहीतर मी तुला सोडणार नाही.
असं म्हणून ती किचनमध्ये गेली आणि सौरभला सकाळची घटना आठवली. सौरभ बाल्कनीत सिगारेट ओढून घरात परत येत असताना हर्षद घाईघाईत घरातून बाहेर पडत होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. सौरभने त्याला विचारलं देखील की काय झालं. तो काहीही न बोलता पटकन निघून गेला. सौरभ त्या विचारात असतानाच अंकिता किचनमधून बाहेर आली आणि म्हणाली—
अंकिता – खरं सांग सौरभ, माझी अंगठी तू त्या बाईला देण्यासाठी चोरलीस ना? स्वतः एक दमडी कमवायची नाही, लफडी करायची आणि आता बायकोचे दागिने चोरून रखेलीला द्यायचे. बोल, कुठे ठेवली आहेस माझी अंगठी? माझ्या मेहनतीच्या पैशांनी केली आहे मी ती. तुझ्या रखेलीसारखी दहा जणांच्या खाली झोपून नाही.
हे ऐकून सौरभ भडकला आणि ओरडला—
सौरभ – अंकिता, बस! किती घाण विचार आणि भाषा आहे तुझी. एका सभ्य मुलीबद्दल, आपल्या नवऱ्याबद्दल असं बोलतेस तू? लाज नाही वाटत? माझं आणि मानसीचं काहीही नाहीये, हे मी हजारदा सांगितलं आहे आणि आता परत एकदा सांगतो आहे. तुला नसेल माझ्याशी बोलायचं तर नको बोलू. पण तिला शिव्या देऊ नको. आणि मी उपाशी मरेन, पण तुझी अंगठी चोरायचा विचारही माझ्या मनात येणार नाही. का उगाच माझ्यावर आरोप करतेस? बस कर ना, प्लीज.
अंकिता – ए… माझ्या अंगावर ओरडून आपली मर्दानगी दाखवू नको. जी काही मर्दानगी दाखवायची असेल ना, ती त्या मानसीला झोपवताना दाखवत जा. मला माझी अंगठी बऱ्या बोलाने दे. नाहीतर मी त्या बाईच्या घरी जाऊन तिला बाजारात विकून माझे पैसे वसूल करेन.
हे ऐकून सौरभचा धीर संपला आणि त्याने हात उगारला—
सौरभ – अंकिता…
पण उगारलेला हात त्याने तिच्यावर टाकला नाही. संस्कारांनी रागावर मात केली. पण त्याने हात उगारलेला पाहून अंकिता चिडली आणि दोन्ही हातांनी सौरभला ढकलू लागली. ढकलत म्हणत होती—
अंकिता – मार ना… मार मला. का थांबलास? मर्द आहेस ना? मग मार एका बाईला. त्यातच तुझा पुरुषार्थ आहे ना? ए सौरभ… मार ना मला… मार… त्या रखेलीसाठी तू एक दिवस माझा खून पण करशील. मार ना मला… पण मी विचारणारच… माझी अंगठी कुठे ठेवली आहेस? तिच्या बोटात घातलीस की लपवून ठेवली आहेस?… ए सौरभ, सांग ना माझी अंगठी कुठे आहे? आणि तू मला काय मारणार रे? मी दाखवते तुला मारणं म्हणजे काय असतं ते.
असं म्हणून आता ढकलत-ढकलत भिंतीपर्यंत नेलेल्या सौरभच्या दोन्ही गालांवर ती थोबाडीत मारू लागली. आणि “कुठे आहे माझी अंगठी?” म्हणून विचारू लागली.
हे सुरू असताना हर्षद घरी आला. सुरू असलेला प्रकार पाहून क्षणभर थबकला आणि आपल्या रूममध्ये निघून गेला.
सौरभला मारून थकलेली अंकिता म्हणाली—
अंकिता – तुला आज रात्री बारा वाजेपर्यंत वेळ देते मी. माझी अंगठी मला परत दे. नाहीतर मी काय करेन ते मलाही माहीत नाहीये.
अंकिता त्याच रागात निघून गेली.
सौरभ भकास बसून होता. दहा मिनिटांत हर्षद पण नजर चोरत घाईघाईत निघून गेला.
सौरभ जे झालं त्यामुळे शॉक, व्यथित आणि अपमानित झाला होता. तो काही तास तसाच शांत बसून होता. त्याला जेवायची इच्छाही झाली नाही. दुपार तशीच गेली.
सौरभ अचानक उठला. त्याने मानसीला फोन केला.
मानसी – बोल…
सौरभ – आज भेटूया का?
मानसी – आज? हम्म… पण अरे, मला ना आज उशीर होणार आहे. बंगलोरवरून रघुनाथन आलाय. तुला माहीतच आहे तो किती पकाऊ आहे ते. पण MD आहे. ज्ञान ऐकावंच लागणार.
सौरभ – कितीही वाजले तरी चालतील.
मानसी – काय रे, काय झालं? सगळं ठीक आहे ना?
सौरभ – भेटणार आहेस की नाही ते सांग.
मानसी – ठीक आहे, भेटूया. एक काम कर. तू घरीच ये. मी घरी जेवणार आहे. हा रघु आल्यापासून तीन दिवस सतत बाहेरच जेवून कंटाळा आला आहे. मी लोकेशन पाठवते.
सौरभ – ठीक आहे. तू निघायच्या दहा मिनिटं आधी फोन कर. मी येतो.
मानसी – ओके… ठीक आहेस ना तू?
सौरभ – रात्री बोलू. बाय.
त्याने फोन कट केला.
मानसीला भेटायचं आहे, या विचारानेच त्याला थोडं बरं वाटलं. त्याने एक सिगारेट पेटवली आणि तो घरातून बाहेर पडला.
रात्री साधारण आठला त्याला मानसीचा फोन आला. तेव्हा तो एका बागेत बसला होता. तो तिथे दुपारपासून बसला होता. फोन कट करून तो लगेच मानसीच्या घरी जायला निघाला.
तिच्या घरी पोहोचून त्याने बेल वाजवली. मानसीने दार उघडलं. मानसी ऑफिसातून येऊन अंघोळ करून फ्रेश होऊन नुकतीच घराच्या कपड्यांत आली होती. सौरभ पहिल्यांदाच तिला घरच्या कपड्यांत बघत होता. ती त्यात आणखी जास्त सुंदर दिसत असल्याचं त्याच्या लक्षात आलं.
मानसी – हाय… Welcome home…
सौरभ आत आला. बसला.
मानसी – काय घेणार? Wine, व्हिस्की? मी beer घेणार आहे. मस्त chilled beer.
सौरभ – मलाही थंड beer दे. डोकं थंड होईल.
मानसीने त्याच्याकडे एकदा पाहिलं. तो मान खाली घालून बसला होता. मानसीने त्याला आणखी प्रश्न न विचारण्याचा निर्णय घेतला आणि ती आत जाऊन beer चे दोन कॅन घेऊन आली. एक कॅन तिने सौरभसमोर ठेवला आणि म्हणाली—
मानसी – मी जेवायला मस्त आणि साधा आमटी-भात केलाय. तू जेवणार ना?
सौरभने काहीही न बोलता कॅन उघडला आणि beer चा sip घेतला. त्याला बरं वाटलं. मानसी समोरच्या सोफ्यावर बसून शांतपणे beer sip करत होती.
दोन-तीन मिनिटं तशीच शांततेत गेली.
मग सौरभ म्हणाला—
सौरभ – आज अंकिताने मला मारलं.
हे ऐकून मानसीचा तिच्या कानांवर विश्वास बसला नाही. ती आश्चर्याने म्हणाली—
मानसी – काय?
सौरभ – हो.
मानसी – पण का? काय झालं?
सौरभ – तिला असं वाटतंय की मी तिची डायमंड रिंग चोरून तुला दिली.
मानसी – What?
सौरभ – हो. कारण तुझं आणि माझं लफडं आहे. तू माझी रखेल आहेस.
मानसी – सौरभ, तुझी बायको वेडी आहे. She needs mental treatment. आणि म्हणून तिने तुझ्या अंगावर हात टाकला? आणि तू गप्प बसलास?
सौरभ – मग काय करू? मारू तिला? मानसिक रुग्ण ती आहे, मानसी… मी नाहीये ना? माझ्यावर स्त्रियांचा आदर करण्याचे संस्कार केले आहेत माझ्या आई-वडिलांनी. ते संस्कार आडवे आले. आणि खरं बोलण्यापासून मला माझ्यातल्या बापाने अडवलं…
मानसी – बापाने अडवलं? म्हणजे?
सौरभ काहीही बोलला नाही.
मानसी उठून त्याच्या शेजारी येऊन बसली आणि त्याचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवत त्याला म्हणाली—
मानसी – सौरभ, खरं सांग… हे काय बोलतो आहेस तू?
सौरभ – मला संशय आहे… नाही, मला खात्री आहे की ती अंगठी हर्षदने घेतली आहे. मी आज सकाळी त्याला suspiciously बाहेर जाताना पाहिलं. घरी आल्यावर पण तो माझ्या नजरेला नजर देत नव्हता. पण मी हे अंकिताला नाही सांगितलं. ती हर्षदला सोडणार नाही. तिला तिचे दागिने आणि पैसे जगात सर्वात जास्त प्रिय आहेत. सख्ख्या मुलापेक्षाही जास्त.
मानसी – पण म्हणून तू चोरी केलेली नसतानाही चोर बनलास ना, सौरभ?
सौरभ – हो. आणि चोवीस तासांत मी तिला ती अंगठी दिली नाही तर ती कदाचित पोलिसांत देईल मला.
मानसी – What the f@ck? मोगलाई आहे का? पोलिसांत कशी देईल ती? सौरभ, आजच्या जगात इतकं पण चांगलं असू नये रे. हर्षदने चोरी केली असेल तर त्याला खाऊ दे ना आईचा मार. सुधारेल तो.
सौरभ – बाप आहे मी त्याचा. त्याला अंकिताकडून शिव्या खाताना नाही पाहू शकणार मी.
मानसी हे ऐकून जाम चिडली. काही न बोलता उठून फेर्या मारू लागली. विचार करू लागली आणि अचानक म्हणाली—
मानसी – सौरभ, मला हर्षदचा नंबर दे.
सौरभ – काय?
मानसी – मला हर्षदचा नंबर दे.
सौरभ – का?
मानसी – मला त्याच्याशी बोलायचं आहे.
सौरभ – पण…
मानसी – Chill… माझ्यावर विश्वास आहे ना? मग दे नंबर. त्यालाही कळू दे की त्याच्या बापाचं so-called लफडं असलेली बाई काय चीज आहे ते.
सौरभ – नको मानसी, प्लीज. I will handle it.
मानसी – नाही सौरभ. It’s not your hands now. मला नंबर दे. नाहीतर मी तुझ्या घरी जाऊन बोलू त्याच्याशी? मला कोणाचीच भीती नाहीये. उद्या तुझ्या त्या बिनडोक बायकोने अख्ख्या शहरात banner लावले ना की सौरभ आणि मानसीचं लफडं आहे म्हणून, तरी मला फरक पडणार नाही. पण म्हणून मला तुझ्यावर फालतू अन्याय होऊ द्यायचा नाहीये. नंबर दे मला पटकन.
मानसीने सौरभचा फोन घेतला आणि म्हणाली—
मानसी – Unlock code सांग.
सौरभ – ६७५६४३.
तिने फोन unlock केला आणि हर्षदचा नंबर शोधून फोन लावला.
हर्षद – हेलो.
मानसी – हर्षद, मी मानसी बोलते आहे. तुझी आणि तुझ्या बाबांचं जिच्याबरोबर अफेअर आहे असं समजता ना ती. मी पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि इथले इन्स्पेक्टर भोसले माझे मित्र आहेत. आता फक्त ऐक. आणि मी विचारेन त्याची हो किंवा नाही इतकीच उत्तरं दे. तुझी आई समोर असली तरी फोन कट नाही करायचा. ओके?
हे ऐकून हर्षद घाबरला.
हर्षद – हो…
मानसी – शाब्बास… आता मला खरं सांग… तुझ्या आईची अंगठी तू घेतली आहेस ना? मी चोरली म्हणत नाही, कारण तू चांगला मुलगा आहेस हे मला माहीत आहे. पण ती अंगठी तू घेतली आहेस ना?
हा प्रश्न ऐकून हर्षद हादरला. चपला घालून घरातून बाहेर पडून धावत टेरेसवर गेला. मानसीने फोन स्पीकरवर टाकला.
मानसी – हर्षद… हेलो… काय विचारलं मी? अंगठी तू घेतलीस ना?
हर्षद – न… नाही… मी का घेईन?
मानसी – ते तू भोसले साहेबांना सांगशील, पाच मिनिटांत तुला interrogation room मध्ये घेतल्यावर. सिनेमात बघतोस ना, त्यापेक्षाही बेकार मारतात. नाहीतर इथे कबूल कर आणि विषय संपव.
हर्षदला काय बोलावं हे सुचत नसल्याने तो टेन्शनमध्ये होता.
मानसी – बोलतोस का घरी पोलीस पाठवू मी?
हर्षद – न… नको… प्लीज… पो… पोलीस नको… मी… मी सांगतो. आईची अंगठी माझ्याकडेच आहे.
मानसी – का घेतलीस ती तू?
हर्षद – मला बाईक हवी आहे. मी आईला किती वेळा सांगितलं, पण ती तयार होत नाही. बाबांकडे पैसे नाहीत. मग काय करू मी? माझ्या सगळ्या मित्रांकडे बाईक आहेत. म्हणून मग मी अंगठी विकून बाईक घ्यायचं ठरवलं.
हे ऐकून सौरभच्या डोळ्यांत पाणी आलं.
मानसी – हम्म… ओके… पण ही चोरी आहे ना, हर्षद. आणि तुझ्या आईने तुझ्या बाबांवर आळ घेतला. त्यांच्यावर हात उचलला.
हर्षद – हे तुम्हाला कसं माहीत?
मानसी – तुझ्या बाबांनीच सांगितलं. कारण आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. फक्त मित्र. तुला आणि तुझ्या आईला वाटतं तसं काहीही नाहीये आमच्यात. तुझ्याही female friends असतील ना कॉलेजमध्ये. त्या सगळ्यांशी तुझं लफडं आहे का?
हर्षद – नाही.
मानसी – आमचं पण तसं काही नाहीये. आणि तरीही तू ज्या बाबांवर संशय घेतोस आणि आईची बाजू घेतोस, त्या तुझ्या बाबांनी आज तुला आईसमोर एक्स्पोज केलं नाही. त्यांना माहीत होतं की अंगठी तू घेतली आहेस. तरीही ते मार खात राहिले.
हे ऐकून हर्षदला वाईट वाटलं.
मानसी – आता एक काम कर. ती अंगठी तू तुलाच घरात कुठेतरी मिळाल्याचं नाटक करून आईला परत दे. बाकी तुझी बाईक तुझे बाबा तुला देतील. मी तुझा निरोप त्यांना देते. ओके?
हर्षद – Thank you, aunty… आणि sorry.
मानसी – Sorry बाबांना म्हण… आणि परत कधीही असं काही करू नको… बाय…
तिने फोन कट केला आणि सौरभला म्हणाली—
मानसी – त्याला कोणती बाईक हवी आहे ते मला सांग. मी पेमेंट करते. ते पैसे पण आपल्या डायरीमध्ये लिहून ठेव.
इतका वेळ बसून सगळं ऐकत असलेला सौरभ उठून उभा राहिला. पुढे होऊन त्याने मानसीला घट्ट मिठी मारली.
सौरभ – Thank you, मानसी… तू पूर्ण वेडी मुलगी आहेस… I… I love you…
असं म्हणत त्याच्याही नकळत त्याने मानसीच्या ओठांवर आपले ओठ ठेवले…
अचानक झालेल्या या प्रकाराने मानसीला आश्चर्य वाटलं असलं तरी तिने त्याला विरोध केला नाही. तिने त्याच्या मानेभोवती असलेली आपली मिठी घट्ट केली…
क्रमशः
पुढील भागाची लिंक- मृगजळ भाग ९
मृगजळ सर्व भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा- मृगजळ- सर्व भाग

[…] पुढील भागाची लिंक- मृगजळ भाग ८ […]
Ithe kahi like karaycha option nahi ahe ka? Going good.
thanks. कॉमेंट करू शकता की. आणि लेख/ पोर्टलची लिंक नातेवाईक, मैत्रिणी ह्यांना अवश्य पाठवा.
उत्तम कथा व छान शब्दांत लिहिले आहे
THANKS. पोस्टची लिंक आपल्या मित्र आणि नातेवाईकांना पण पाठवा.
khup chhan katha atta paryant barech utar chadhav pahile kathe madhe …………..maitri .. khup sunder dakhavli aahe doghanchi pan kiti tras sahan karava lagtoy doghana ….she is really handling the situations very smartly… utkantha vadhli aahe pudhche bhag vachaychi …. keep it up Man
thanks