…..रोहित त्याच्या ऑफिसात एका माणसला सांगत होता “मुग्धाचा इंटरव्ह्यू तू घे आणि सिलेक्ट कर. एकदा आपल्या कंपनीत माझ्या हाताखाली आली की मग….” बरोबर असलेला माणूस म्हणाला “मग ‘खालीच’ राहणार आयुष्यभर!” दोघे पाचकळ हसले.
इथे मुग्धा प्रशांतची आवडती साडी नेसून, त्याने तिला दिलेल त्याच अत्यंत आवडतं परफ्युम स्प्रे करून फक्त अमेय घरी यायची वाट बघत होती. फोटो मधून प्रशांत मात्र गूढ हसत होता. दाराची बेल वाजली. अमेय घरी आला. आईला साडी नेसलेली बघून म्हणाला आई तू कुठे निघालीस? मी पण येणार. मुग्धा त्याला म्हणाली “आता बाबा नाहीये ना? मग मला ऑफिसला जायला हव ना? म्हणून मी ऑफिसला भेटायला चालले आहे. येईन लवकर ओके?” तिने अमेयला जेवायला वाढलं. टीव्ही लावून दिला आणि शेजारणीला लक्ष ठेवायला सांगून मुग्धा निघाली. जाताना उकडू आणि धूळ लागू नये म्हणून तिने एसी taxi बोलावली होती. taxi मध्ये बसल्यावर मुग्धाला जरा बर वाटलं. बाहेरचा कोलाहल बराच कमी झाला होता. गाडीत एफ एम वर मर्डर चित्रपटातलं ‘भीगे होंट तेरे, प्यासा दिल मेरा’ गाण लागलं होत. ते ऐकून तिला प्रशांत आठवला.
तिने आणि प्रशांतने तो सिनेमा घरी टीव्हीवर पाहिला होता. त्यातील प्रणय दृश्य पाहून प्रशांत म्हणाला होता “काय सॉलिड शूट केल आहे हे सर्व! ए मुग्धा ते दोघ त्या गच्चीच्या छ्ज्ज्यावर करतात तसं आपण एकदा नक्की करायचं. तो समोरचा टॉवर आहे ना त्याच्या चाळीसाव्या मजल्यावर गच्चीतून उतरायचं आणि एक रात्र तिथेच छज्जावर. काय धमाल येईल ना?” त्यावर मुग्धा लाजून म्हणाली होती “शी. किती निर्लज्ज आहेस तू? गच्चीत काय? कोणी आलं तर?” त्यावर प्रशांत म्हणाला “ इतक्या रात्री छज्जावर यायला प्रशांत इतक रोमांटीक असावं लागतं. सगळेच प्रशांतसारखे innovative नसतात मुग्धा.” त्याने innovative शब्दावर दिलेला विशेष जोर लक्षात येऊन मुग्धा लाजली होती.
इथे taxi मध्ये त्या विचारात असलेली मुग्धा लाजली आणि आरशातून तिला इतकावेळ न्याहाळत असलेला taxi ड्रायव्हर खल्लास झाला. इतका की त्याला पुढे थांबलेली स्कूटर पण दिसली नाही. गाडी चुकून टच झाली. थोडी बाचाबाची झाली. मुग्धा भानावर आली. त्याला म्हणाली “दादा लवकर चला. मला वेळेवर पोहोचायचं आहे.” तिने दादा म्हटल्यावर ड्रायव्हरने आरशाचा angle बदलला आणि तो सरळ गाडी चालवू लागला. मुग्धाच डेस्टिनेशन आलं. तिने मोबाईलच्या सेल्फी क्यामेर्यात एकदा आपल रूप न्याहाळल. परत एकदा हलके परफ्युम स्प्रे केला. मग ड्रायव्हरला पैसे देऊन ती निघाली. प्राईम एव्हीन्यू एक प्रचंड मोठी काचेची इमारत होती. मुग्धा लॉबी मध्ये शिरली. तिथे असलेल्या वीस लिफ्टसाठी लॉबी मध्ये अटेंडंट होते. मुग्धाने रिसेप्शन वर कुठे जायचं आहे हे सांगून एन्ट्री पास घेऊन व्हिजिटर लिहिलेलं कार्ड गळ्यात अडकवलं. अटेंडंटने तिला तिच्या मजल्यावर जाणार्या लिफ्टचा नंबर सांगितला. त्या वातावरणात थोडी दबून, गोंधळून गेलेली मुग्धा लिफ्टची वाट पाहू लागली. लिफ्ट आल्यावर शांतपणे आत शिरल्यावर तिला थोड टेन्शन जाणवू लागलं. लिफ्ट तिच्या मजल्यावर पोहोचली. मुग्धा बाहेर आली. समोर सुप्रीम इंजिनियर्सच्या प्रचंड ऑफिसचा काचेचा दरवाजा होता. मुग्धाने सिक्युरिटीच्या बुकात एन्ट्री केली आणि ती रिसेप्शन वर आली. हलक्या आवाजात तिने इंटरव्ह्यूला आल्याच सांगितल. रीसेप्शनिस्तने तिला बसायला सांगितल. मुग्धा त्या भव्य रिसेप्शनच्या लॉबीत असलेल्या मऊ सोफ्यात बसली. तिला थोड दडपण आल होत.
तेजस त्याच्या केबिन मध्ये कॉफी सिप करत काचेतून बाहेर बघत होता. समोर दिसणार विस्तीर्ण कॉंक्रीट जंगल त्याच्या मनात वेगवेगळे random विचार आणत होत. अचानक त्याला गुगल map वर दिसल्यासारखी ती बिल्डींग दिसू लागली जिथे त्याने मुग्धाला ड्रोप केली होती. जिथे उतरून तो क्रिकेट खेळला होता. मग त्याला मुग्धा आठवली. विमानात त्याच्या दंडाला धरून, त्याच्या खांद्यावर बिनधास्त डोक टेकून झोपलेली मुग्धा. मग गाडीच्या पुढे आलेली आणि मग गाडीच्या आरश्यातून त्याला दिसत असलेली मुग्धा. इतक्यात त्याला एक कामाचा फोन आला आणि त्याची लिंक तुटली. त्याने डेस्कवर येऊन laptop मध्ये डोकं खुपसलं. करोडोंच्या आकड्यांनी त्याच्या मनातून मुग्धाची आठवण पुसून टाकली.
रीसेप्शानिस्तचा फोन वाजला. ती ओके म्हणून आणि मुग्धाला हाक मारून म्हणाली “मिसेस साठे मिटिंग रूम नंबर १०. लास्ट रूम धिस वे.” मुग्धा thanks म्हणून निघाली. तिला प्रचंड दडपण जाणवत होत. . ती रूम नंबर दहा लिहिलेल्या मिटिंग रूम मध्ये बसली. कडक गणवेश घातलेला माणसाने येऊन चहा की कॉफी विचारल. मुग्धाने कॉफी ऑर्डर केली. तो गेल्यावर मुग्धा टेन्स बसलेली असतानाच घरून अमेयचा फोन आला. त्या शांततेत तिच्या फोनची रिंग फार लाऊड वाटली. मुग्धाने पहिला फोन सायलेंट करून हेलो म्हटले. अमेयने “आई तू कधी येणार?” हा नेहमीचा प्रश्न विचारला. मुग्धा म्हणाली “बाळा वेळ लागेल. मी इथून निघाले की कॉल करते ओके? आता मी कामात आहे. परत फोन केला तर उचलू शकणार नाही ओके?” अमेयने समजूतदारपणा दाखवत फोन ठेवला . मुग्धा वाट बघू लागली.
इथे मुग्धाच्या घराची बेल वाजते. आतून अमेय कोण आहे विचारतो. बाहेर उभा असलेला रोहित म्हणतो “मी. रोहित काका” अमेय दार उघडतो. रोहित विचारतो “आई कुठाय?” अमेय त्याला आईने पत्ता लिहिलेली डायरी दाखवतो आणि म्हणतो “आता बाबा नाहीत ना? म्हणून आई कामावर गेली आहे.” त्या डायरीत लिहिलेला पत्ता वाचतो. तो वाचून मुग्धाला नोकरी देऊन कायम आपल्या “खाली” ठेवायचं त्याच स्वप्न धूसर होताना दिसतं. तो घाईघाईत प्राईम एव्हीन्युला जायला निघतो.
मुग्धा वाट बघत बसलेली असताना तिथे एक साधारण पन्नाशीची बाई येते. चेहऱ्यावर विद्वत्तेच तेज आणि आत्मविश्वास ल्यालेली. एक महागडी सुती साडी नेसलेली. केसांचा बॉय कट. आल्या आल्या ती मुग्धाला “सॉरी जरा दुसरा इंटरव्ह्यू सुरु होता म्हणून सहा मिनिट उशीर झाला. तू चहा घेतलास ना?” अस प्रेमाने हसत विचारते. मुग्धा घाबरत “हो” म्हणते. ती बाई स्वतःची ओळख करून देते. म्हणते “मी राधिका कामत. ह्या कंपनीची ग्रुप एच आर हेड. आज इथला एच आर manager रजेवर आहे म्हणून मी इंटरव्ह्यू घेते आहे.” दोघी बसतात. राधिका मुग्धाचा सीव्ही बघत म्हणते “सो मुग्धा…tell me about yourself. आणि हो. अगदी सावकाश आणि न घाबरता बोल. तू जरा नर्व्हस वाटते आहेस म्हणून सांगितल मी. ओके? शूट.” तिने दिलेल्या विश्वासाने मुग्धा हळू हळू स्वतः बद्दल माहिती सांगू लागली. इंटरव्ह्यू पेक्षाही राधिका मध्ये तिला एक मैत्रीण, एक तिला समजून घेईल अशी बाई दिसू लागली. त्यामुळे राधिका मनापासून बोलत होती. इंटरव्ह्यू मधील formality बाजूला पडून एक हार्ट टू हार्ट talk सुरु होता. मुग्धाच्या मनात इतके दिवस साचलेली भीती, नैराश्य, असहायता ह्यांना वाट मिळाली होती. जवळजवळ पंधरा मिनिट मुग्धा बोलत होती आणि राधिका तिच्या डोळ्यात बघून ऐकत होती. मुग्धाच झाल्यावर राधिका म्हणाली “मुग्धा तुला इथे एका वेगळ्या रोलसाठी इंटरव्ह्यूला बोलावलं होत. पण तुझ्याशी बोलल्यावर तू एका वेगळ्या रोल साठी मला जास्त योग्य वाटते आहेस. माझ्याबरोबर काम करशील एच आर डिपार्टमेंट मध्ये?” ते ऐकून मुग्धाला खूप बर वाटलं. ती म्हणाली “हो. मला खूप आवडेल.” राधिका म्हणाली “ग्रेट. तुला ऑफर लेटर आणि इतर सर्व माहिती मेल वर येईल. कधी जॉईन करू शकतेस?” मुग्धा म्हणाली “येत्या बुधवारी चालेल? चतुर्थी आहे…सो…” राधिका हसून म्हणाली “हम्म..चालेल. चांगला मुहूर्त आहे. सो welcome aboard मुग्धा साठे.” मुग्धा म्हणाली “thanks mam.” राधिका म्हणाली “mam नाही राधिका. हे कॉर्पोरेट आहे. सरकारी ऑफिस नाही. इथे माणसांना त्यांच्या नावांनी संबोधतात. अगदी आमचे सीएमडी तेजसला पण. ओके?” मुग्धा म्हणाली “ओके राधिका. thanks!” राधिकाशी हस्तांदोलन केल्यावर मुग्धाला एका आश्वासक स्पर्शाची जाणीव झाली. दोघी निघाल्या. राधिका ऑफिसात गेली आणि मुग्धा रीसेप्शानिस्तला विचारून लेडीज रूम मध्ये गेली.
तेजसचा कॉल संपला. शंभर कोटीच contract confirm झालं. आजचा दिवस सत्कारणी लागला होता. बाकी formalities पूर्ण करायला ऑफिसचा स्टाफ होता. त्याने डोळे मिटून, खुर्चीच्या पाठीला टेकून एक खोल श्वास घेतला आणि त्याला एका गोडट वासाच्या फिमेल परफ्युमचा वास आला. त्याने खाडकन डोळे उघडले. समोर कोणीच नव्हत. त्याच्या पाचशे फुटांच्या बंद केबिन मध्ये बाहेरू आवाज येण शक्य नव्हत तर वास म्हणजे अगदीच अशक्य. तो फोन मधले मेसेज चेक करू लागला. पण त्याला अजूनही तो वास येत होता. तो वास त्याला खूप आवडला होता. प्रचंड आश्चर्याने तेजस उठून उभा राहिला. वासाच्या दिशेने निघाला. केबिनचा दरवाजा उघडून तो बाहेर आला.
मुग्धा लिफ्टची वाट बघत उभी होती. नोकरी मिळाल्याचा आणि ती पण राधिका बरोबर कामाची संधी मिळाल्याचा तिला आनंद होत होता. खाली बिल्डींगच्या लॉबी मध्ये रोहित लिफ्टसाठी थांबला होता. इथे आत तेजस वासाचा माग काढत रिसेप्शन जवळ आला. त्याला असा वास घेत चालत असलेला पाहून रीसेप्शनिस्त पण चकित झाली. तेजस वासाचा माग काढत लिफ्टच्या दिशेने घाईघाईत जाऊ लागला. मुग्धाच्या समोरील लिफ्टच दार उघडलं. मुग्धा आत शिरल्यावर बंद झालं आणि तेजस लिफ्ट पर्यंत पोहोचायच्या आधीच लिफ्ट निघाली. तो वास नक्की त्या लिफ्ट मधून येत असल्याची खात्री झालेला तेजस दुसर्या लिफ्टची वाट न बघता पायऱ्या उतरत खाली निघाला. खाली रोहितला देखील लिफ्ट मिळाली. आपण खेळवत असलेल्या कळसूत्रीच्या बाहुल्या एकाच इमारतीत वर आणि खाली जाताना बघत असलेली नियती स्वतःवर खुश होऊन हसत होती.
क्रमशः
(© मंदार जोग)गुंतता हृदय…(भाग ९)

