खोल खोल पाणी भाग 1 | मराठी दीर्घ कथा
खोल खोल पाणी भाग 1 | मराठी दीर्घ कथा
खोल खोल पाणी या मराठी दीर्घ कथा मालिकेचा हा पहिला भाग आहे.
गुरुजींनी “तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव…” सुरू केलं आणि शरदरावांच्या हृदयाचे ठोके वाढले. काही क्षणात त्यांची लाडकी अपू म्हणजेच अपर्णा परकी होणार होती. ती इतकी वर्षं अपर्णा ‘शरद पाध्ये’ असं स्वतःच्या नावापुढे लावत असलेलं त्यांचं नाव लावणं थांबवून काही क्षणांनंतर अपर्णा राहुल कुलकर्णी असं नाव लावायला सुरुवात करणार होती. शरदराव आणि सुरेखाताई ह्यांची मोठी कन्या आज राहुलची पत्नी बनून आई-वडिलांना सोडून एका नव्या आयुष्याची सुरुवात करणार होती. त्या काही क्षणात शरदरावांच्या डोळ्यासमोरून अपर्णाच्या जन्मापासून तिच्या एमबीए (MBA) होण्यापर्यंतचा काळ सरकून गेला. सुरेखाताईंचं माहेर बार्शीला म्हणून अपूचा जन्म तिथला. मग पुण्याला आल्यावर झालेले लाड, कौतुक, पहिला वाढदिवस, शिशु वर्गातील पहिला दिवस, मग शाळा, ती चार वर्षांची असताना झालेली त्यांच्या दुसऱ्या मुलीची म्हणजे अंजलीचा जन्म. मग दोघींच्या शाळा, बालपण, तरुणपण, कॉलेज आणि आता अपूचं लग्न! गुरुजींनी अंतरपाट सोडला आणि अपू व राहुल यांनी एकमेकांना हार घातले. लोकांनी अक्षता उधळल्या. सनई-चौघडा जोरात वाजू लागला. शरदरावांच्या डोळ्यात जमलेल्या अश्रूंमध्ये अपू धुरकट होत गेली.
सदाशिव पेठेत राहणारे शरदराव पाध्ये सहकारी बँकेत नोकरी करून गेल्याच वर्षी निवृत्त झाले. सुरेखाताईंनी आजवर एस. पी. रोड (SP Road) पोस्ट ऑफिसात पोस्टाची नोकरी इमानइतबारे केली. अजून पाच वर्षं सर्व्हिस बाकी आहे. हे दोघे आणि त्यांच्या अपू आणि अंजू ह्या दोन मुली असं मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंब. दोघी मुली हुशार निघाल्या. शाळेपासून सतत पहिल्या तीनात नंबर. अपू तर विशेष हुशार. दहावीला एका मार्काने मेरीट लिस्ट हुकली. पुढे बीएमसीसी (BMCC) मध्ये प्रवेश, बीकॉम आणि मग फायनान्समध्ये एमबीए (MBA). मोठ्या कंपनीत नोकरी. दिसायला सुंदर, अगदी आईवर गेलेली आणि वागायला शालीन. मित्रमैत्रिणींचा मोठा गोतावळा. गाण्याची आवड. ट्रेक आणि ढोल पथक ही पॅशन. धाकटी अंजू अभ्यासात हुशार. दिसायला देखणी पण थोडी टॉमबॉईश (tom boyish). बिनधास्त. लपून सिगारेट ओढणारी, बुलेट चालवणारी, एक-दोन वेळा फक्त अनुभव म्हणून मित्रांनाच किस बीस करून पाहिलेली. दहावीला उत्तम मार्क असून आर्ट्सला प्रवेश घेतला. जर्नालिझमची आवड. मग बीए झाल्यावर त्याचं शिक्षण घ्यायची सुरुवात. सध्या जर्नालिझम शिकत असताना एका “निर्भीड” वृत्तपत्राबरोबर इंटर्न किंवा खरं तर लर्नर म्हणून काम करत आहे.
राहुल कुलकर्णी म्हणजे पुण्यातील सुप्रसिद्ध मांडववाले कुलकर्णी म्हणजेच माधव कुलकर्णी ह्यांचा मुलगा. माधवरावांचे वडील गोपाळराव ह्यांनी केटरिंगचा लहानसा व्यवसाय सुरू केला. पुढे तो माधवरावांच्या उमेदीच्या काळात वाढत गेल्यावर त्याला आज असलेलं मॅरेज कॉन्ट्रॅक्टरचं स्वरूप आलं. “लग्न” नामक सोहळ्यासाठी नवरा-नवरी वगैरे जे लागेल ते मांडववाले कुलकर्णी पुरवत. उत्तम दर्जा आणि भरपूर किंमत ही त्यांची खासियत असल्याने पुण्यातील उच्चभ्रू लोकच त्यांच्याकडे जायचे. भरपूर पैसे घेत असले तरी उत्तम दर्जा टिकवून ठेवल्याने प्रगती उत्तम झाली होती. आता तर नवरा-नवरी देखील तेच देत असत. म्हणजे त्यांनी मांडवाखाली नावाचा ऑनलाइन मॅरेज ब्युरो सुरू केला होता. त्यालाही तुफान रिस्पॉन्स होता. पाच वर्षांपूर्वी त्यांचा प्रभात रोडवरचा बंगला पाडून बिल्डरने प्रेक्षणीय आर्किटेक्चर असलेली इमारत उभी केल्यावर वरचे दोन मजले आणि काही कोटी रुपये माधवरावांना मिळाले होते.
धंद्याच्या दृष्टीने आवश्यक असल्याने मुंबईच्या केटरिंग कॉलेजात डिग्री घेतलेला राहुल हळूहळू घरच्या व्यवसायात एकएक जबाबदारी घेऊ लागला होता. त्याची धंद्यातील समज उत्तम होती. मुळात तो बुद्धीने तल्लख होताच. फक्त लहानपणापासून माधवरावांनी त्याला प्रचंड शिस्तीत, त्यांच्या छायेत वाढवलं होता. इतका की त्याला मोकळ्या वातावरणाचा त्रास होत असे. मुंबईत केटरिंग कॉलेजात हॉस्टेलमध्ये राहत असतानादेखील इतर मुलं प्रचंड धमाल करत असताना राहुल मात्र त्याच्या रूममध्ये बसून अभ्यास करायचा. माधवराव रोज फोन करायचे आणि तो दिवसभर काय घडलं ह्याचा त्यांना रिपोर्ट द्यायचा. मग ते त्याला काही सूचना करायचे आणि राहुल त्या सूचना तशाच्या तशा अंमलाਤ आणून जगायचा.
माधवरावांची बायको मंजिरीताई म्हणजे अत्यंत लाघवी बाई. त्यांची एक लहानशी सामाजिक संस्था होती. त्या संस्थेत गरीब, अनाथ बायकांकडून वस्तू बनवून घेऊन, त्याची प्रदर्शनं भरवून होणाऱ्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून मंजिरीताई त्या बायकांना स्वावलंबी बनवायचा प्रयत्न करत असायच्या. त्यांच्या संस्थेतील अनेक बायका माधवरावांच्या कंपनीच्या लग्नाच्या ऑर्डरमध्ये जेवण बनवायला, वाढायला, भांडी घासायला जायच्या. रोज काही ना काही फंक्शन असल्याने त्या बायकांना तो एक उत्तम रोजगार होता. मंजिरीताई इतर वेळी व्यवसाय तसेच कुटुंबाचा मोठा गोतावळा ह्यामुळे घरी सतत येत असलेल्या पाहुण्यांची सरबराई आनंदाने आणि हसतमुखाने करत असत.
प्रचंड पैसा, ओळखी आणि प्रसिद्धी असलेल्या माधवरावांना सुपारीच्या खांडाचं देखील व्यसन नव्हतं. पुण्यातल्या विविध संस्था, क्लब्स ह्यांचे ते सभासद होते. अनेक शाळांत, कॉलेजांत, इतर अनेक ठिकाणी फीत कापायला किंवा यशाची गुरुकिल्ली छाप भाषण द्यायला जाणं त्यांना नवीन नव्हतं. ते पुण्यातील एक महत्त्वाचं प्रस्थ बनले होते.
माधवरावांना फक्त एक शौक होता. सुंदर बायकांचा. अगदी लग्नाच्या आधीपासून. त्यासाठी ते अगदी सातारा, सांगली, कोल्हापूरपर्यंत जात असत. क्वचित त्यांच्याकडे कामाला येणाऱ्या बायकांची “सोय” देखील ऑफिसात होत असे. मंजिरीताईंच्या संस्थөतून कामाला आलेली एखादी मुलगी देखील माधवरावांना आवडली तर लग्न संपल्यावर तिला ऑफिसात पाठवायची सोय त्यांचा विश्वासू मॅनेजर जयंत शिंदे करत असे. जयंतला ती कला अवगत होती आणि त्याचे तो वेगळे पैसे घ्यायचा माधवरावांकडून! हे त्या दोघांचं खूप जुनं आणि जपलेलं सिक्रेट होतं.
माधवरावांना राहुलसाठी एक अशी मुलगी हवी होती जी दिसायला सुंदर असेल, शिकलेली आणि आधुनिक विचारांची असेल. पण जी “मांडववाले कुलकर्णी” हे आपलं सासर होणार ह्या कल्पनेनेच भारावून जाईल, दबेल आणि दिपून जाईल. राहुल जसा त्यांच्या मुठीत होता तशी ती देखील सहज त्यांच्या मुठीत राहील. मग त्यांच्याच ब्युरोमध्ये नोंदणी केलेल्या मुलींमधून निवड सुरू झाली. त्यांना अपर्णा सर्वच दृष्टीने योग्य वाटली. आणि झालं देखील अपेक्षितच. त्यांच्याकडून फोन गेल्यावर शरदरावांची पहिली रिएक्शन होती “काय सांगताय? मांडववाले कुलकर्णी? पोरीने नशीब काढलं आमचं. बोला सर.” इथेच माधवरावांनी कांदेपोहे कार्यक्रम करायचा निर्णय घेतला. मग त्यांनी मुद्दाम शरदराव आणि कुटुंबियांना कांदेपोह्याच्या कार्यक्रमाला स्वतःच्या घरी बोलावलं. त्याचं ऐश्वर्य पाहून शरदरावांचे दिपलेले डोळे माधवरावांना बरंच काही सांगून गेले. जुजबी ओळख झाल्यावर अपर्णा आणि राहुलला टेरेसवर एकांतात बोलायला सोडल्यावर माधवराव आणि मंजिरीताई पाध्ये कुटुंबियांशी गप्पा मारू लागले.
समहाऊ (Somehow) अंजलीला माधवराव फार आवडले नव्हते आणि राहुल चमचा वाटत होता. शरदरावांनी तिला हे असं बोलल्यावर दटावलं. मग ती चिडून बाहेर निघून गेली. तिचं बोलणं ऐकून अपर्णा विचार करत असतानाच कुलकर्ण्यांचा होकार कळवणारा फोन आला आणि अपर्णाला विचार करायला वेळच मिळाला नाही. मग चक्र वेगाने फिरली आणि आज लग्न होऊन अपर्णा पहिल्या भेटीत राहुलला ज्या खोलीत भेटली होती त्याच खोलीत त्याची बायको बनून त्याची वाट बघत होती.
राहुल साधारण दहा वाजता खोलीत आला. तो आल्यावर अपर्णाच्या अंगावर काटा फुलला. मैत्रिणींनी सांगितलेल्या पहिल्या रात्रीच्या गमती आणि कथा आठवून पोटात गुदगुल्या होऊ लागल्या. ती लाजून खिडकीत जाऊन काचेतून बाहेर बघत पायाचा अंगठा जमिनीवर घासत उभी होती. राहुल आला आणि त्याने तिला मागून मिठी मारून विचारलं-
राहुल- ए बायको, काय बघते आहेस?
अपर्णा- (त्याच्या स्पर्शाने मोहोरून) क…काही नाही…
राहुलने तिला आपल्या दिशेला वळवलं. तिच्या हनुवटीला बोटाने आधार देत तिचा झुकलेला चेहरा वर केला. तिने डोळे मिटले होते. राहुलने रिमोटने रूममधील दिवे बंद केले आणि तिच्या ओठांवर ओठ टेकले.
राहुलचं लग्न आटपल्यावर माधवराव कामाचं निमित्त करून त्यांच्या ऑफिसात गेले होते. जयंतने सोय केलेली मुलगी त्यांची वाट बघत होती. माधवरावांनी आपलं व्यसन, आपली भूक भागवायला सुरुवात केली आणि त्याच वेळी घरी अचानक काहीतरी झाल्यासारखा राहुल अपर्णाच्या मिठीतून बाजूला होऊन बाथरूममध्ये निघून गेला.
अजूनही धुमसत असलेली, न विझलेली अपर्णा राहुलच्या ह्या वागण्याने प्रचंड शॉक होऊन खोलीत पसरलेल्या जांभळ्या थीमलाईट कडे बघत डोळ्यात आलेले अश्रू पुसत होती!
ही तर नियतीच्या पाण्याच्या खोलीची सुरुवात देखील नव्हती. नियती आज तिच्या पाण्यात खोलवर पसरलेला अंधार ढवळून वर आणत त्या डोहात पोहत हसत होती.
तुम्हाला आमची मराठी दीर्घ कथा कशी वाटली ते नक्की सांगा. पुढील भाग नक्की वाचा/
क्रमश:
आमचे whatsapp channel join करा- whatsapp.com
हे पण वाचा- वेळ
