चांद मातला भाग ६
रात्री बारा चे टोले पडले… मोहित अजूनही जागाच होता.. मायाच्या रिप्लाय ची वाट बघत.. त्यानी एकदा मीरा कडे पाहिलं.. त्याच्या हाताचा आधार घेत तशीच झोपी गेली होती ती ..इतक्यात मोहित चा मोबाईल वाजला.. आणि तिची झोप चाळवली गेली.. त्यानी झटकन मोबाईल घेतला आणि बाहेर गॅलरीत आला.. दबक्या आवाजात तो बोलू लागला..
मोहित – “माया.. अगं एवढ्या उशिरा फोन का केलास..?? मीरा शेजारीच होती.. मेसेज करायचास ना…!”
माया – ” Ohhh common Moh.. Stop now.. तूच म्हट्लास ना आपला प्लॅन वर्क होतोय.. आता नको एवढा विचार करत जाऊ.. “
मोहित – “हो.. अगं पण.. असु दे.. का फोन केलास..? “
माया – “उद्या तुझी बायको नक्कीच त्या रोहन ला भेटायला जाईल.. आणि असं ही उद्या संडे आहे..सो. . उद्या तू माझ्या कडे येतोयस.. Just you and me “
मोहित – “अगं पण… “
माया – ” मोह..प्लीज… आता उगी नेहमीसारखी कारणं देऊ नको.. आणि आता तर तुझ्या मनात गिल्ट पण येणार नाही ..”
मोहित – “बरं.. सकाळी बाहेर पडल्यावर फोन करतो आणि प्लीज तोपर्यंत फोन करू नकोस.. “
………..मोहित दबक्या पावलांनी आत आला आणि हळूच बेड वर आडवा झाला.
“कुणाचा फोन होता इतक्या रात्री..?? “….मीराच्या अनपेक्षित आवाजाने त्याला धस्सस झालं..
“अं.. तू जागी…?? “…त्यानी विचारलं.
“फोन च्या आवाजाने जाग आली.. “
“ओह.. सॉरी.. झोप आता.. “
“अरे सांगितलं नाहीस कुणाचा फोन होता..?? “
“अं.. ते उद्या अर्जन्ट मुंबई ला जावं लागणार आहे.. काम आहे.. त्याच संदर्भात होता. “
“पण उद्या सुट्टी असेल ना..?? “
“हो.. पण कामच असं आहे तर काय.. तू झोप.. सकाळी बोलू आपण..”
मोहितने कसाबसा विषयाला फुलस्टॉप लावला आणि त्यानी बळजबरी डोळे मिटून घेतले.. मीरा ला पण हे सगळं काही नवीन नव्हतं, ती जास्त विचार न करता झोपून गेली…
पहाटे, जरा लवकरच तिला जाग आली.. मोहित ला मुंबई ला जायचंय म्हटल्यावर तिने त्याची सगळी तयारी करून ठेवली.. नेहमीचं होतं तिला हे.. स्वतःसाठी कडक चहा करून घेतला आणि हातात मोबाईल घेऊन ती टेकली.. रोहन चे 10-12 मेसेज येऊन धडकले होते. तिने न बघताच सगळे मेसेज डिलिट करून टाकले…
तिला कुणाजवळ तरी व्यक्त व्हायचं होतं. . मोकळं व्हायचं होतं.. जे काही झालं, जे काही होतंय.. ते कितपत चूक, बरोबर हे जाणून घ्यायचं होतं. मित्र असण्यात काही चूक तर नव्हतंच ना.. मग असे फोटो काढणं चूक होतं का…?? की रोहन च्या घरी जाणं चूक होतं.. की लपवून, खोटं बोलून हे करणं चुकीचं होतं.. मोहित च्या आवाजाने तिचे विचार थांबले.. मोहित त्याचं आवरून 9 वाजताच बाहेर पडला.. सगळ्यात आधी तो रोहन ला भेटला… आणि तिथून तडक माया कडे….
….मोहित गेला तसं तिला परत घर खायला उठलं.. परत सगळे तेच विचार आणि विचार.. तिने मानस चं आवरलं.. आणि काहीसं ठरवून डॉक्टर आनंदी ला फोन केला… रविवार असल्यामुळे त्याही घरीच होत्या..
“बोला मॅडम.. काय झालं??.. आज सुट्टीच्या दिवशी माझी आठवण?”
“अ..”.. मीरा ला कुठून सुरवात करू कळत नव्हतं..
“काय गं.. कुठं हरवलीस…? “
“तुझ्याशी थोडं बोलायचं होतं गं.. पण लक्षात नाही आलं.. तू आज घरीच असशील.. उद्या करते फोन.. “
“अगं हो हो.. थांब.. मी घरी आहे.. पण निवांत आहे.. बाप लेक आजीकडे गेलेत.. तू एक काम कर.. तुझं आवर आणि इकडेच ये.. निवांत बोलू पण आणि दिवस छान जाईल.. “
“हो.. येते मी… “…जास्त काही न बोलता मीरा लगेच घरी यायला तयार झाली त्यावरूनच आनंदीला कळलं नक्की काहीतरी सिरीयस बोलायचं असणार मीराला….
बरोबर 11 वाजता मीरा सगळं आवरून बाहेर पडली.. रोहन वाडेश्वर ला वाट बघत असेल हे सुद्धा ती विसरून गेली… इकडे रोहन मात्र ऐटीत मीरा ची वाट बघत बसला होता.. आजपर्यंत त्याचा एकही निशाणा असा फुकट गेला नव्हता.. त्यामुळे तो नेहमीसारखा निर्धास्त होता.. पण यावेळी त्याचा गळ चुकीच्या माश्याला लागला होता ह्याची त्याला कल्पना पण नव्हती…
आनंदी कडे गेल्यावर मानस ला खाऊ घालून आधी त्याला झोपवलं तिने.. आणि आनंदी समोर जाऊन बसली… मीरा च्या चेहऱ्याकडे बघून तिला कळत होतं की तिला खूप काही बोलायचं आहे.. पण तिला व्यक्त होता येत नव्हतं…
“मी ऐकतेय.. तू कर सुरु…. “…शेवटी तिनेच सुरवात केली..
“कुणीतरी आपली स्तुती करत असेल.. आपल्याला जवळून ओळखू लागलं असेल.. तर त्या व्यक्तीशी बोलण्यात काही चूक नसतं ना..?? “
“मुळीच नाही.. मी पण ओळखतेच की तुला जवळून.. “
“तसं नाही.. ती व्यक्ती मित्र असेल तर.. म्हणजे……. !!!!”
“त्या दिवशी तू वाडेश्वर ला भेटायला येणार होता त्या मित्राविषयी बोलतेस का..?? “a
..आनंदी नी तसं विचारलं आणि मीरा चपापली.. ती शांतच झाली..
“मीरा.. इट्स ओके.. तुला त्या दिवशी भेटलेले तेंव्हाच तुझा चेहरा बघून मला कळालेलं… आणि चालत गं तेवढं.. मित्र तर होता ना.. कॉलेज चा मित्र होता का..?? “
“नाही.. म्हणजे.. मी त्याच दिवशी त्याला पहिल्यांदा भेटले होते.. आमची फेसबुक वर ओळख झालीय.. “
“हम्म…. “…आता मात्र आनंदी शांत झाली…
मीरानी अगदी सुरवाती पासून झाला प्रकार आनंदी ला सांगितला..
“हे बघ.. कोण तो रोहन.. मी काही त्याला ओळखत नाही..असेलही तो स्मार्ट, हॅंडसम.. अगदी कुणालाही आवडेल असा..अगदी तो म्हणतो तस तो खरंच फोटोग्राफर पण असेल.. पण असं कसलीच शहानिशा न करता तू त्याच्या घरी गेलीस.. हे जरा जास्त नाही का?? आणि तुमच्या त्या पहिल्या सॉरी दुसऱ्या भेटीत त्यानी तुला जवळ घेतलं म्हणतेस.. हे म्हणजे….!!! मी तू चुकीची आहेस असं नाही म्हणत.. तुला स्वतः साठी काही करावंसं वाटलं.. छान फोटो काढून घ्यावेसे वाटले तर त्यात हरकत काहीच नाही.. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे.. समोरच्या माणसाला ओळख तर आधी.. आणि जर तुला वाटलं की तो चुकीचा नाहीये..इनफॅक्ट काहीच चुकीचं होत नाहीये तर ते लपवून करायची गरज पडणार ही नाही.. “
….मीरा शांतच होती.. आनंदी म्हणते ते तिला कळत होत पण मनाला पटवून देता येत नव्हतं..
“आताही हाच विचार करतेस ना.. की रोहन बाकीच्यांसारखा नसेल.. “
“अं… तू लहान मुलांची डॉक्टर आहेस की मनाची.. ?? “
“मनात काय सुरू आहे ते अचूक ओळखलं म्हणून म्हणतेस ना..?? “
“हम्म… “
“सगळे माणसाच्या मनाचे खेळ आहेत बाकी काही नाही बघ.. आपण चुकत नाही असं कळलं की उगीचच समाधान वाटून जातं.. मुळात आपण मन पण अश्याच माणसाजवळ व्यक्त करतो जो आपल्याला चुकीचा ठरवणार नाही..”
“पटतंय मला.. मी असं डायरेक्ट घरी जायला नको होतं.. पण एक क्षण असा येतो ना.. चुकीचं काही वाटतच नाही तेंव्हा.. आपण करत असणाऱ्या गोष्टीचं मनातल्या मनात स्पष्टीकरण तयार असतं.. पण त्यानी आपण स्वतःचीच जास्त फसवणूक करतो ते कळत नाही.. “
“करेक्ट… आणि असं गिल्ट वाटून घेऊ नकोस.. मित्र असण्यात चुकीचं काहीच नाही.. “
“हम्म.. त्या दिवशी मोहित कुठं भेटलेला तुला..?? “…मीरा नी सहज विचारलं..
“मला??? कधी..??? मी आणि मोहित जवळपास महिना झालं भेटलोच नाही.. लास्ट टाइम मानस ला घेऊन आलेला क्लीनिक मध्ये.. तेच की.. “
“पण…..??? मग…?? मोहित ला कसं माहित की मी वाडेश्वर ला मैत्रिणीला भेटायला गेलेले…?? “
“त्याला माहितेय???? “
“हो.. म्हणजे त्यानेच विचारलं आणि हेही म्हणाला की तूच त्याला हे सांगितलं.. “
“नाही गं.. . तुझं ऐकण्यात काही चुकलं असेल.. मी तर नाही भेटले त्याला.. “
…….पण मीराचे विचार पळत होते.. असं कसं होईल.. मी जर आनंदी ला एखादी थाप मारली होती.. तर ती इतकी अचूक मोहित ला कशी कळाली..?? अगदी ठिकाण पण..?? मोहित खोटं बोलतोय की मोहित नि मला रोहन सोबत पाहिलं..?????.. विचार करून पण तिला घाम फुटला..
“मीरा.. अगं नको इतका विचार करुस.. स्वतःसाठी थोडा वेळ काढून.. जगावंसं वाटल म्हणजे पाप नाहीये.. फक्त जे करशील ते सांभाळून.. “
…..आनंदी शी बोलून तिला बर जरा बरंच वाटल.. संध्याकाळ पर्यंत ती तिच्याच घरी होती.. 6 वाजता तिथून निघाली पण तिला घरी जावंसं वाटेना. घरी जाऊन परत तोच विचार मनात नको म्हणून मानस ला घेऊन ती जवळच मॉल मध्ये शिरली.. दोघं मस्त फिरले.. तिथंच थोडंसं खाल्लं.. पण तिथे फिरताना तिला सतत जाणवत होत की कुणीतरी तिच्या मागे आहे.. उगीचच नजर ठेवून आहे.. रोहन तर नसेल… तिला विचार करून पण अंगावर काटा आला.. तोच तिला एका लहान मुलाचा धक्का लागला आणि तिची पर्स खाली पडली.. ती वाकून उचलणार तोच तिला पर्स सोबत पडलेला एक चिटोरा दिसला.. तिने हळूच उघडून बघितल..
….त्यात कुणाचा तर मोबाईल नंबर होता.. आणि अर्जन्ट कॉल करायला सांगितलं होता..
“हे माझ्यासाठी होतं??? तिला काहीच कळेना.. एक त्रास काय कमी होता की अजून नवीन वादळ.. तिने तिच्या पर्स मध्ये तो चिटोरा टाकला आणि मॉल च्या बाहेर आली.. जवळच असलेल्या रिक्षा स्टॉप वर ती गेली.. पत्ता सांगून रिक्षात बसणार इतक्यात मानस “बाबा बाबा” म्हणून ओरडू लागला..
“मानस अरे काय..?? “
“आई.. बाबा… बाबा.. “
“अरे इथं कुठून बाबा येतील.. चल.. “..म्हणून तिने त्याला रिक्षात बसवलं. ती आत बसताना तिने एकदा मागे फिरून उगीचच खात्री करून घेतली….रिक्षा सुरु झाली पण मानस काही शांत बसेना.. बाबा होते, बाबा होते म्हणून त्याचं तुणतुणं चालूच होत.. बाबांची आठवण येत असेल म्हणून तिने पण दुर्लक्ष केलं…
“माया आंटी पण होती… “..असं तो म्हणाला आणि ती दचकली..
“काय..??? “
“बाबा होते कार मध्ये.. आणि माया आंटी.. “
……आता मात्र तिला कळेना.. बाबांचा भास होऊ शकतो पण माया???मोहित ची सेक्रेटरी??… मीरा नि मुद्दाम त्याला बोलतं केलं.
“तुला कशी काय आठवली रे माया आंटी..?? “
“केक आणलेला.. बर्थडे ला.. तीच आंटी..”
“एवढ्याश्या त्या लेकरावर पटकन विश्वास पण बसेना पण खोटं पण वाटेना.. फोन करून बघू का एकदा.. पण फोन वरून काय खरं खोटं बोलतोय कळणार होतं..
घरी येऊन तिने बेडवर अंग टाकलं आणि तिचे विचार पळू लागले..
“कोण कुठला रोहन आपल्याला भेटतो काय.. ?? तेही फेसबुक वर.. पहिल्या वहिल्या भेटीत आपण त्याच्याकडे ओढलं काय जातो..?? अचानक सगळं चुकीचं वाटू लागत..?? आणि आता हे नवीन प्रकरण..खरंच तो मोहित असेल.. ?? पण तो पूण्यात?? तेही मायासोबत???
….इतक्यात तिला पर्स मधल्या त्या चिटोऱ्याची आठवण झाली आणि तिने काहीसा विचार करून तो नंबर फिरवला..
“हॅलो.. कोण बोलतंय..?? “
“आपण?? “
“मी मीरा.. तुम्ही… तुम्ही ओळखता का मला.. ?? म्हणजे असा फोन नंबर दिलात आणि… “
“मीरा… मी पूर्वा.. सध्या मी कोण हे महत्वाचं नाही.. श्रेयस महत्वाचा.. “
“श्रेयस?? मी कुठल्याच श्रेयस ला ओळखत नाही.. तुमचा काहीतरी गैरसमज झाला वाटतं… ठेवते मी.. “
“वाडेश्वर मध्ये भेटलेल्या मित्राला ओळखता ना.. “….मीरा फोन कट करणार इतक्यात पूर्वा बोलली..
“अं.. काय बोलताय.?? . कोण…?? श्रेयस.. कुठलं वाडेश्वर..?? ” मीरा गडबडली..
“मीरा.. मी तुझ्या भल्यासाठीच तुला फोन करायला सांगितला.. माझ्यासारखी तू ह्यात फसली जाऊ नयेस म्हणून… श्रेयस.. म्हणजे ज्या कुठल्या नावानी तो तुला भेटलेला.. “
“रोहन…”… मीरा चटकन म्हणाली..
“तेच.. नाव काहीही असो… नाव. अनेक आहेत त्याची.. पण हरामखोर, नालायक अशी ती एकच व्यक्ती आहे.. “
….यापुढे पूर्वा जे जे सांगत होती .. मीरा सुन्न पणे ऐकत होती.. किती मोठ्या अघटित गोष्टीपासून ती वाचली होती…
फोन ठेवून बराच वेळ झाला.. पण मीरा अजून सावरली नव्हती.. आणि त्यात भरीस भर म्हणून मोहित चं वेगळं..
नक्की काय सांगितलं असेल पूर्वा नि मीरा ला.. मीरा खरंच त्या वाकड्या वळणापासून वाचली असेल की आधीच पूर्णतः गुरफटली गेली असेल.. रोहन.. असा सहजासहजी जाळ्यात आलेला मासा सोडेल.. आणि मोहित…. त्याच्या आणि माया च्या डोक्यात नक्की काय शिजत असेल…. ???
क्रमश:
लेखिका – सुमेधा पाटील
पुढील भागाची लिंक- चांद मातला भाग ७
आधीच्या भागाची लिंक- चांद मातला भाग ५
हे पण वाचा-
आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा
आमच्या लघुकथा लघुकथा
माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख
आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

[…] मागील भागाची लिंक- चांद मातला भाग ६ […]