चांद मातला | Mandar Jog

चांद मातला भाग ७

पूर्वाशी बोलणं झाल्यानंतर मीराची अवस्था खूप विचित्र झाली होती. नक्की काय खरं? काय खोटं? नक्की असं काय घडतंय जे आपल्याला उमजत नाहीय असे अनेक प्रश्न एकाच वेळी तिच्या मनात घोंघावत होते. शेजारी झोपलेल्या मानसच्या अंगावर हात ठेवत तिने डोळे मिटले. विचारांच्या वादळातच तिला झोप लागली.

सकाळी तिला जरा उशिराच जाग आली. मानसही उठून बसला होता. त्याच्या “भूक,भूक” च्या आवाजाने गडबडीने तिने त्याच्यासाठी आणि स्वतःसाठी नाश्ता केला. कालपासून अस्ताव्यस्त झालेलं घर आवरलं.तेवढ्यात तिचा फोन वाजला. मोहितचाच फोन होता. त्याने आपण डायरेक्ट ऑफिसलाच जाऊन संध्याकाळी घरी येणार असल्याचं कळवलं आणि फोन ठेवला. काल संध्याकाळी मानसने त्याला आणि मायाला एकत्र पाहिल्याचं सांगितल्यापासून मीराच्या जीवाला हुरहूर लागून राहिली होती. शेवटी तिने डॉक्टर आनंदीशी पुन्हा एकदा बोलायचं ठरवलं आणि तिला मेसेज केला.

” हाय आनंदी.. अगं मला तुझ्याशी एका महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलायच आहे. तुला आज वेळ असेल का?”

काही वेळातच आनंदीचा रिप्लाय आला.” हाय..अगं आज दुपारपर्यंत मी थोडी बिझी आहे पण आपण लंचला भेटू शकतो. येशील का तू इथंच? निवांत बोलता येईल.”

यावर मीराने आपण येऊ असं तिला कळवलं आणि आपल्या कामाला लागली.

दुपारी लंचब्रेक मध्ये आनंदीच्या क्लीनिकमधेच दोघीही भेटल्या. जेवण झाल्यावर आनंदीने आपल्या रिसेप्शनिस्टला थोडावेळ मानसकडे लक्ष द्यायला सांगितलं आणि ती मीराकडे वळली.

“बोल मीरा,काय झालं? तुला काय इतकं महत्वाचं बोलायच होत? अगदी मोकळेपणाने सांग. “ती म्हणाली.

यावर मीराने काल संध्याकाळी आनंदीकडून निघाल्यानंतर घडलेले सगळे प्रसंग जशास तसे तिला सांगितले आणि स्वतःच्या मनाचा झालेला गोंधळदेखील. पूर्वाच्या फोनबद्दल ऐकून आनंदीसुद्धा थोडी चक्रावून गेली. थोडासा विचार केल्यानंतर मात्र तिने मीराला काही गोष्टी समजावून सांगितल्या आणि मग मीरा थोडी शांत झाली आणि घरी निघाली.

संध्याकाळी मोहित थोडा लवकरच घरी आला. आल्या आल्या त्याने अगदी प्रेमाने मानसला जवळ घेतलं.त्याच्याशी गप्पागोष्टी केल्या. सुट्टीच्या दिवशीसुद्धा ऑफिसच्या कामाला गेल्याबद्दल मीराला सॉरीदेखील म्हटलं. त्याच्याकडे त्याच्या नकळत निरखून पाहताना मीरा तो आपल्याशी खोटं वागू शकतो का याचाच विचार करत होती.

आज मानसने बाबा आल्यापासून त्याला सोडलंच नव्हत. कालपासून बाबा घरात नाही म्हणून आज त्याने जेवण झाल्यावर आईस्क्रीम खायचा हट्ट धरला आणि मग मोहित त्याला घेऊन आईस्क्रीम आणायला गेला. सगळी आवराआवर झाल्यावर मोहितच्या बॅगेतले कपडे धुवायला टाकण्यासाठी मीराने त्याची बॅग उघडली.सगळे धुवायचे कपडे बाहेर काढून झाल्यावर बॅगच्या साईडच्या छोट्याशा कप्प्यात बघताना तिला एक कागद सापडला.काल ती ज्या मॉलमध्ये मानस ला घेऊन गेली होती तिथल्याच एका प्रसिद्ध ब्रँडच्या आउटलेटमधून केलेल्या एका हँडबॅगच बिल होतं ते. तिने ते उचलून आपल्या पर्स मध्ये ठेवलं. तेवढ्यात मोहितच्या फोनवर मेसेज आल्याची रिंग वाजली आणि स्क्रीनवर मायाचं नाव फ्लॅश होताना दिसलं.

” Hi darling!! I am damn missing you today. Yesterday’s night was awesome dear.. पुन्हा लवकर भेटू असाच निवांत वेळ काढुन” आणि पुढे फ्लायिंग किस च्या काही ईमोजी.

मीराने मेसेज पाहिला आणि तिला भोवळच आली. पण स्वतःला सावरत ती सोफ्यावर बसली. एवढ्यात मोहित आणि मानस आईस्क्रीम घेऊन आले आणि मग “मम्मा आईस्क्रीम खाऊ ना चल “अशा मानसच्या बडबडीत त्यांनी आईस्क्रीम संपवलं. तिला शांत बघून मोहितने विचारलं” काय ग बरं नाहीये का? अशी शांत का आहेस?” 

त्यावर काही विशेष नाही किंचित डोकं दुखतंय अस सांगून ती मानसला घेऊन बेडरूममध्ये झोपायला गेली. मानस ला झोपवता झोपवता सहज म्हणून तिने मोबाइल हातात घेतला.त्यावर रोहनचे सात आठ मेसेज येऊन पडलेले दिसले.आपल्या वागण्याबद्दल तो पुन्हा पुन्हा माफी मागत होता.

“प्लिज मीरा फक्त एकदा भेट ना मला..माझी चूक झाली गं खरंच. पुन्हा असं होणार नाही ग. प्लिज एकदा भेट मी तुझे सगळे गैरसमज दूर करतो” -रोहन

काही क्षण विचार करून मीराने त्याला रिप्लाय केला. ” उद्या सकाळी शार्प 11 ला भेटू. नेहमीच्या ठिकाणी.”

काही क्षणातच रोहनचा रिप्लाय आला “थँक्स अ लॉट मीरा. नक्की भेटू उद्या. gn”

इकडे मोहितच्या मोबाईलवर रोहनचा मेसेज फ्लॅश होत होता. “काम होणार. उद्या भेटतोय आम्ही “

त्याचवेळी आनंदीच्या मोबाइलला एक मेसेज फ्लॅश होत होता..”उद्या भेटतेय मी त्याला आपलं ठरल्याप्रमाणे..”

काय होणार नक्की? कोण कोणाशी कसला खेळ खेळतय? मीरा पुन्हा त्याच चक्रात अडकणार की दुसरं कोणी अडकणार?

(क्रमशः)

लेखिका- उत्तरा जोशी

पुढील भागाची लिंक- चांद मातला भाग ८

मागील भागाची लिंक- चांद मातला भाग ६

हे पण वाचा-

सख्या रे …

ट्वेंटी थ्री

गुंतता हृदय – सर्व भाग

मृगजळ- सर्व भाग

व्हॅलेंटाईन डे- भाग १

रिफ्लेक्शन भाग १

आमच्या इतर दीर्घकथा- दीर्घ कथा

आमच्या लघुकथा लघुकथा

माहितीपूर्ण लेख माहितीपूर्ण लेख

आमची व्यक्तिचित्र व्यक्तिचित्रण

ललित

By Mandar Jog

mandar jog हे मराठी लेखक असून कथा, ललित लेख, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील लेखन करतात. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, सामाजिक विषय, अर्थकारण आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांचा समावेश आहे. mandarjog.com हे त्यांचे अधिकृत लेखन पोर्टल आहे.

2 thoughts on “चांद मातला भाग ७”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!